गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे.

“माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींग-टेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार”

सुलभाकडे मला दरदिवाळीला फराळासाठी बोलावलं जातं.मला अनारसे आवडतात हे सुलभालाही माहित आहे.त्यांच्या फराळात अनारसे निक्षून असायचे.मी ते आवडीने खाताना सुलभाची आजी मला टक लावून पहायची.आणि माझ्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून तिही खूश व्हायची.
“वाः! काय सुंदर झालेत अनारसे”
असं मी म्हटल्यावर,
“मोठे कष्ट पडतात बाबा! पण खाणार्‍याचा चेहरा पाहून सर्व कष्ट पार विरून जातात.आणखी हवे तेव्हडे मागून खा”
असा नेहमीचा आमचा दिवाळीचा संवाद व्ह्यायचा.
ह्यावेळी दिवाळी पूर्वीच आजी गेल्याने ह्या वर्षाची दिवाळी सहाजीकच सुलभाच्या घरी साजरी झाली नाही.
पण नंतर एक दिवस सुलभा मला आपल्या घरी येण्यासाठी निरोप घेऊन आली.
“काय विशेष काय?”
मी सुलभाला विचारलं.
“ते तुम्हाला आमच्या घरी आल्यावर कळेल.पण नक्की न-विसरता या मात्र.”
असं म्हणून मिष्कील हंसली.

त्या दिवशी मी सुलभाच्या घरी गेलो.गप्पा मारीत असताना सणावाराच्या रीति-रिवाजाबद्दल विषय निघाला.
मी सुलभाला म्हणालो,
“रीति-रिवाजाबद्दल मला विशेष वाटतं.ती एक जबरदस्त प्रकिया आहे.रोजच्या जीवनात हे रीति-रिवाज निरनीराळ्या दृष्टीकोनाना खास अर्थ देतात.मला नेहमीच वाटतं की हे सणावाराचे रीति-रिवाज, कुटूंबातल्या मंडळीना अगोदरच्या पिढीबरोबर दुवा साधायचं काम करतात.”

“मी लहान असताना दिवाळी हा असाच रीति-रिवाजाचा सण वाटायचा.पण दिवाळ-सण आल्याचं तोपर्यंत भासत नसायचं, जोपर्यंत घरात माझी आजी आणि आई फराळाची तयारी करीत नसत.त्या अनेक पदार्थात मला अनारस्याचं विशेष वाटायचं.
हे गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे खायाला कुरकुरीत,चवीला अंमळ गोड-गोड आणि त्याच्यावर पेरलेली खसखस जेव्हा दातात अडकायची-विशेष करून दाढेत-अडकायची तिला जीभेने हलकेच बाजूला करून पुन्हा दाताखाली चिरडून खायला मजा यायची.”
सुलभाने आपलं मत देताना तिच्या आजीची आठवण काढून सांगीतलं.

मी सुलभाला म्हणालो,
मला पण अनारसे खूप आवडतात.विशेषतः तुझ्या आजीने केलेले. ह्या दिवाळीत तिची खूप आठवण आली.
एकावेळाला भराभर हे दोन-तिन अनारसे पटकन खाऊन फस्त व्हायचे पण ते तयार करायला लागणारे श्रम आणि कष्ट, त्याची तयारी करण्यापासून ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळाच्या ताटात येईपर्यंत,आई आणि आजीच्या चेहर्‍यावर उमटून दिसायचे.
जास्त करून तुझ्या आजीच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर.”

“आता तुम्ही अनारस्याचा आणि माझ्या आजीचा विषय काढल्यावर आणखी सांगते”
असं म्हणून सुलभा म्हणाली,
“अनारसे तळून काढण्याचा झारा आणि चमचा खास असायचा आणि तो माझ्या आजीकडून आईकडे परंपरेने आलेला होता.ती आईला आजीची गिफ्ट होती.माझी खात्री आहे की ती गिफ्ट आईकडून माझ्याकडे येऊन मग ती मी माझ्या मुलींकडे पोहोचवणार आहे.”

“कष्ट म्हणजे असं काय काय करावं लागतं? मला तुझ्याकडून ऐकायचं आहे.”
मी सुलभाला म्हणालो.

“दिवाळी येण्यापूर्वी फार अगोदर पासून अनारस्याची तयारी करावी लागते. तीन दिवस माझी आजी अनारस्यासाठी तांदूळ भिजवून ठेवायची.रोज ते पाणी बदलायची.चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवून मग पंच्यावर घालून कोरडं करून घ्यायची.नंतर एकदम बारीक करून चाळणी मधून चाळून घ्यायची.किसलेला गूळ आणि चमचाभर तूप ह्या पीठात घालून ते पीठ घट्ट मळून पाच-सहा दिवस एका डब्यात घालून ठेवायची.

माझी आई माझ्या आजीकडून हे शिकून घेण्यासाठी एकही क्षण वाया जावू द्यायची नाही.बर्‍याच वर्षाच्या माझ्या पहाणीनुसार अनारसे बनवण्याची ही प्रक्रिया जरा शांती-समाधानीने घ्यायची ही प्रथा असावी.मी त्यावेळी जरी लहान असले तरी,माझ्या लक्षात यायचं की पाच-सहा दिवसानी ते पीठ बाहेर काढणं,मध्यम आचेवर तेल गरम करणं,सुपारी एव्हडे गोळे करून पुरी सारखं खसखशीवर लाटणं, तळताना खसखसीचा भाग वर ठेवणं,चुकून पुरी पलटल्यास खसखस जळून जाऊ शकते याची काळजी घेणं,तेलात पूरी पसरते तेव्हा त्या खास झार्‍याने आणि चमच्याने ती पसरलेली पूरी हलकेच धरून फुटूं न देणं,तळून आलेले अनारसे तेल नितळून जाण्यासाठी चाळणीत उभे करून ठेवणं,हे सर्व सोपस्कार माझ्या आईला खास रीति-रिवाजच वाटायचे.”
हे सगळं सुलभाकडून ऐकून ती सुद्धा अनारसे करण्यात नक्कीच प्रविण झाली आहे हे कळायला मला वेळ लागला नाही.

मी तिला म्हणालो,
“तुझ्या आजीने तुझ्या आईला शिकवलं आणि आता तू पण तुझ्या आईकडून शिकून वारसा पुढे चालवणार आहेस हे निश्चीत आहे.”

“आजी आणि आई अनारसे करीत असताना मी त्यात मग्न होऊन, आईची एकाग्रता,तिचा सोशिकपणा,आणि प्रत्येक अनारसा नीट तळून आणाण्यासाठी ती घेत असलेली आस्था पहाण्यात विशेष रस घ्यायची.मला आठवतं अनारसे तळले जात असताना घरभर पसरलेला तो तेला/तूपाचा सुवास कमी कमी होत गेल्यानंतर,तो प्रत्येक अनारसा हलकेच उचलून पसरट डब्यात नीट रचून ठेवताना एकूण किती अनारसे झाले त्याची गणती ती न चूकता घ्यायची.आणि येणार्‍या पाहूण्यांना आवडीने खायायला द्यायची.”
सुलभाने असं सांगून माझ्या विचाराला बळकटीच आणली.

“आज माझी आजी नाही. त्यानंतरची आमची पहिली दिवाळी ती नसल्याने तिची आठवण काढण्यात गेली.आज माझ्या आजीचा जन्मदिवस आहे.
आठ दिवसापूर्वी माझ्या बाबांनी मला सुचित केलं की आजीच्या वाढदिवसाला अनारसे करावेत.मी आणि माझ्या आईने, आजीने दिलेला झारा,चमचा आणि बाकी सामुग्री जमा केली.त्या सामुग्रीसोबत आजीने आपल्या हाताने लिहिलेली अनारस्याची रेसिपी मला मिळाली.

जसं लिहलं होतं तसंच मी ते वाचून आम्ही दोघीने अनारसे केले.
तिच्या जन्मदिवशी ते आम्ही तिची आठवण काढून खावेत असं ठरलं.नंतर माझ्या लक्षात आलं की दरदिवाळीला तुम्ही येता आणि ह्यावेळी अनारसे खायचं तुम्हाला चुकूं नयेत म्हणून त्यादिवशी मी तुम्हाला बोलवायला आले होते.आजीचा जन्मदिवस आणि अनारसे करण्याचा बेत तुमच्यासाठी सरप्राईझ होतं.
आता प्रत्येक दिवाळी-साणाच्या दिवशी इतर फराळात अनारस्याची तयारी केली जाणार.”

हे सगळं सांगून मला सुलभाने खरोखरंच सरप्राईझ दिलं.
मी सुलभाला म्हणालो,
मला वाटतं हे सणावारी केलेले रीति-रिवाज म्हणजेच मागल्या पीढीच्या सन्मासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर बाळगण्यासाठी केलेले प्रयत्न असतात.
आणि हीच संधी घेऊन आपल्या पुढच्या पीढीला देऊ केलेली रीति-रिवाजाची प्रथा असावी.मला वाटतं,सणांचे रीति-रिवाज कुटूंबाला एकमेकात गुंफून ठेवतात,आणि आपणां सर्वांना काही क्षणासाठी शाश्वत करून ठेवतात.”

“आता मी पण दरदिवाळीला न-विसरता अनारसे करणार.आजीची रेसिपी वाचून मी अनारसे करीत असताना माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींगटेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार.”
सुलभाचा ठराव पाहून मला आनंद झाला.

“मी पण दरदिवाळीला तू न-बोलवता तू केलेले अनारसे खायला हटकून येणार.आणि आज तू आणि तुझ्या आईने केलेले अनारसे तुझ्या आजीच्या जन्मदिवशी तिची आठवण काढून काढून अवश्य खाणार.”
माझं हे ऐकून सुलभा आत गेली आणि थाळी भरून अनारसे आणून माझ्या जवळ ठेवून डोळे ओले करीत म्हणाली,
“अलबत”

सुलभाच्या चेहर्‍यावर तिच्या आजीच्या चेहर्‍याची छटा पाहून मला राहवलं नाही.पहिलाच अनारसा खाताना मी ओघानेच म्हणालो,
“वाः! काय सुंदर झालेत अनारसे”
हे ऐकून,
“आणखी हवे तेव्हडे मागून खा”
असं म्हणायला सुलभाची आजी मात्र नव्हती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. janhvi mandhare
    Posted ऑक्टोबर 20, 2010 at 1:36 सकाळी | Permalink

    khup chan aahe ti gost

  2. Posted ऑक्टोबर 21, 2010 at 10:33 सकाळी | Permalink

    वाचून बरं वाटलं.प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: