माझी आजी,माझी हिरो.

“माणूस आहे त्याची चूक ही होणारच.पण चूक लक्षात आणून त्याची कबूली देणं ह्यातच माणूसकी आहे.पण एक तितकंच खरं आहे,तिच चूक परत परत करणारा मात्र माणूस नसतो.”

ज्याज्यावेळी मी मेधाला भेटायचो त्यात्यावेळी मी तिच्या आजीची हटकून चौकशी करायचो.आणि मेधाचं उत्तर यायचं,
“आजी फारच किटकिट करते.”

एकदा मी मेधाला विचारलं,
“किटकिट म्हणजे तुझी आजी काय करते गं?”

मेधाने मला सांगायला सूरवात केली,
“माझी आजी जेव्हा तरूण होती तेव्हा अर्थातच ती सुधृडही होती.मी तिच्याच जवळ झोपायचे आम्ही दोघी मिळून एल्लापे,घावण,गवल्याच्या खिरी सारखे अनेक गोडधोड पदार्थ कयायचो.कसल्याना कसल्या विषयावर आम्ही बोलत बसायचो.अलीकडे आजीच्या वागण्यात फरक व्हायला लागला. आणि तो वाढतच गेला.तिला बोलायला जरा कठीण व्ह्यायला लागलं.वृत्तिनेपण थोडी कोती व्हायला लागली.मला वाटायला लागलं की आता ती माझ्यावर प्रेम करीत नाही. आणि त्याहून वाईट म्हणजे मला असंही वाटायला लागलं की मी ही तिच्यावर प्रेम करीत नाही. तिच्या खोलीत जायचं मी टाळायची.तिलाच टाळायची.”

“मला आठवतं तुच म्हणायचीस की,
“माझी आजी,माझी हिरो,माझी विश्वासपात्र जीवलग. मग हे केव्हा पासून झालं?”
अगदी सरळच प्रश्न मी मेधाला केला.

“हो मला नेहमीच असं आजीबद्दल वाटायचं.”
मेधा सांगू लागली,
“मी लहान असताना माझी आजी इतर आज्यांसारखी वागायची.
सकाळीच उठल्यावर मला नास्त्याला कांदे पोहे करून द्यायची,कधी गोडा शिरा करून द्यायची,रात्री झोपताना पुराणातल्या गोष्टी सांगून, मला थोपटून  झोपवायची.”

“आणि आता ती तुझा मोठ्यातमोठा खेद-धारक केव्हा पासून झाली.?”
माझा मेधाला दुसरा प्रश्न.

“अलीकडे,माझी आजी तर स्वतःहून एक वाक्य नीट बोलून दाखवू शकत नाही.मग स्वतःची स्वतः आंघोळ करून घ्यायचं सोडूनच द्या.तिला आंघोळ घालायचं माझंच काम झालं.एव्हडंच नाही तर तिला पातळ नेसवायचं,तिला भरवायचं आणि तिची खोली नीट झाडून-पुसून नीटनेटकी ठेवायचं काम माझंच झालं.”

“जसजसं वय होत जातं तसतसं म्हातार्‍या मंडळीची कसली ना कसली कटकट चालूच असते.मग ती शरीराची असो वा वागणूकीबद्दल असो.इतरानी त्यांना समजून घेतलं पाहिजे.ही पाळी म्हातारवयात प्रत्येकाला येते.”
मी मेधाला सांगण्याचा प्रयत्न केला.

मेधाला माझं हे सांगणं जरा जीव्हारी लागलं.डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली,
“पूर्वी,रात्री झोपताना मी माझ्या आजीसाठी बिछान्यात रडायची.माझी पूर्वीची आजी गेली असं मला वाटायचं.जी आहे ती काय माझी आजीच नाही असं वाटायचं.आणि आता मी जशी वयाने मोठी होत चालली आहे तसं मला तिचं जास्त काम करावं लागत आहे.मी त्याचा तिरस्कार करायला लागली आहे.कुठे तरी निघून जावं असं मला वाटायला लागलं आहे.
मी माझ्या आजीचा तिरस्कार करायला लागली आहे.तिची मला लाज वाटायला लागली आहे,तिची मला किटकिट वाटायला लागली आहे.”

मला मेधाचं हे म्हणणं ऐकून तिची तसंच तिच्या आजीची किंव आली.
मी मेधाला म्हणालो,
“पण तुझी आजी अलीकडे खूप आजारी होती असं तू मला म्हणाल्याचं आठवतं आता ती कशी आहे?”

“हो,आता ती बरी आहे.त्याला खूप दिवस होऊन गेले.त्याचं काय झालं,”
मेधा सांगू लागली,
“एक दिवशी ती घरातच पडली.तिला हॉस्पिटलात ठेवावं लागलं. ती अशी का वागते ह्याची आम्ही डॉक्टरकडे विचारणा केली.ते म्हणाले,
“वृद्धत्वामुळे तिला भ्रम व्ह्यायला लागलाय.आणि दिवस जातील तसं तो आणखीच वाढत जाणार आहे.ह्या व्याधीमुळे तिच्या मनातल्या भावना गोंधळतात.”
हे ऐकून माझे डोळे उघडले.काही गोष्टी कळण्यासाठी काही गोष्टी व्हाव्या लागतात.ती हॉस्पिटलात गेलीच नसती तर तिच्या वागण्याबाबत आम्हाला डॉक्टरना विचारायची बुद्धिच झाली नसती.”

मी मेधाला म्हणालो,
“पण गंमत म्हणजे जरका तुला एव्हडं जरी कळलं असतं की तुझी आजी इतकी तिरस्कार करण्यासारखी नव्हती तर मग तू तिच्यासाठी जे काही करीत होतीस ते काहीच नव्हतं असं तुला वाटायला लागलं असतं.जीवनात एक धडा शिकण्यासारखा आहे की कुणा व्यक्तिवर प्रेम करायचं झाल्यास ती व्यक्ति सर्व दृष्टीने निपुण असण्याची गरज नसते.”

“तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.”
मेधा सांगू लागली,
“डॉक्टरांचं ऐकून मी मनात म्हणाले इतके दिवस माझी आजी जी माझ्याशी कोत्या वृत्तिने वागायची हे खरं असलं तरी ती आपलं प्रेम किती आहे हे दाखवायच्या प्रयत्नात असायची.पण तिच्या भावना गोंधळायच्या.पण मी मात्र केवळ माझ्यावर ती प्रेम करीत नव्हती म्हणूनच तिचा तिरस्कार करायची आणी हेच मला पटेना.
आता मी परत रात्री बिछान्यात रडायला लागते आणि त्याचं कारण दुसरं असतं.मी माझ्या आजीवर प्रेम करीत नव्हते म्हणून माझाच मी तिरस्कार करायला लागले होते.”

माझ्या मनातला विचार मेधाला स्पष्ट्पणे सांगायला मला धीर आला.
मी म्हणालो,
“हे जर का पूर्वीच तुझ्या लक्षात आलं असतं तर तू तुझाच तिरस्कार केला नसता्स,तू पश्चातापी झाली नसतीस.
तुझी आजी अगदी निपुण नसेना का? आणि तुझी आजी निपुण का नसावी?.तुझ्याच डोळ्यावर तू पूर्वी पट्टी बांधली होतीस.हे समजण्यासाठी तू खूपच आंधळी झाली होतीस.”

“तुम्हीच माझे डोळे उघडलेत.माझी डोळ्यावरची पट्टी काढलीत.”
मेधा थोडी भावूक होऊन मला सांगत होती.
“आता मला वाटायला लागलं की माझ्या आयुष्यात माझ्याकडून मोठी चूक झाली की कुणाही व्यक्तिवर प्रेम करायचं झाल्यास ती व्यक्ति अगदी निपुण असायला हवी अशी माझी विचारधारणा होती तेच चुकीचं होतं.एखाद्याच्या अंगात दोष किती आहेत हे पहाण्यापेक्षा, त्याच्या हृदयात प्रेम किती आहे हे पाहूनच प्रेम केलं पाहिजे.”

मेधाला शाबासकी देत मी म्हणालो,
“माणूस आहे त्याची चूक ही होणारच.पण चूक लक्षात आणून त्याची कबूली देणं ह्यातच माणूसकी आहे.पण एक तितकंच खरं आहे,तिच चूक परत परत करणारा मात्र माणूस नसतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: