सतार वादक.

“ही सतार माझ्या खांद्यावर टेकवायला मिळते त्याबद्दल मी नशिबवान आहे असं मला मी समजतो.”

“अनेक तासांचा रियाज करून मी सतार-वादक झालो.त्याबरोबर ह्या प्रक्रियेत असताना,मानवीय परिसीमेची प्रशंसा करणं आणि स्वीकृति करणं ह्या गोष्टी मी माझ्यात विकसीत करू शकलो.पण ही वास्तविकता लहान वयात,मला आठवतं,मुळीच समजून घेता येत नसायची,आणि मग प्रौढ झाल्यावर जर समजून घेतली गेली तर आस्ते आस्ते माझ्याकडून त्याची स्वीकृति केली जायची.”
सुरेश मेहेंदळे मला सांगत होता.
तो चांगल्यापैकी सतार वादक होऊन आता त्याने सतार शिकवायचे क्लासीस काढले आहेत.

गेल्या आठवड्यात मी मेट्रो सिनेमाकडून क्राफर्ड मार्केटच्या दिशेने जात असताना वाटेत एका दुकानात डोकावून पाहिलं.ते संगीत वाद्यांचं दुकान होतं. बाहेरच्या शोकेसमधे निरनीराळी वाद्यं नीट रचून ठेवली होती.कुतूहल म्हणून एक एक वाद्य मी न्याहळून पहात होतो.मला बराच वेळ शोकेसजवळ न्याहळीत उभा राहिलेला पाहून आतून एक व्यक्ति बाहेर येऊन माझ्याकडे चौकशी करू लागली. त्यांची बोलण्याची ढब पाहून हा सुरेश मेहेंदळे असणार असं मला वाटलं.आणि ते खरं ठरलं.त्याने मला आत बोलावलं.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी सुरेशला विचारलं,
“ह्या संगीताच्या जगात तू कसा काय शिरलास?”

मला सुरेश म्हणाला,
“माझ्या जीवनात परिपक्वतेची शंतिपूर्ण अवस्था यायला मला सतारीची मदत झाली.माझ्या गत आयुष्याकडे मी मागे वळून पाहिल्यावर,माझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही की मी माझं अपमानीत जीवन टाळण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते.मूळपासून मला धंदा करण्यात स्वारस्य होतं.
व्यापार-धंद्यात माझं काही खरं नव्हतं.मी काही धिरूभाई अंबानी नव्हतो किंवा मित्तल नव्हतो. माझ्या मध्यम-जीवनातला संकट-काल आला हे जेव्हा उघड झालं तेव्हा रंगकला किंवा शिल्पकला शिकून त्यात व्यवसाय करायची वेळ कदाचीत आली असं मला वाटायला लागलं होतं.
पण हे ही खरं की, अनेक वेळा त्या महान लेखकाच्या-वि.स.खांडेकरांच्या-कांदब‍र्‍या वाचून वाचून त्यातली काही महान वाक्यें अनेकदा स्वतःलाच प्रकट करण्यासाठी रात्री-मध्यरात्री माझ्या मनात येऊन जायची,त्याचा आधार घेऊन काहीतरी लिहिण्याचा उद्योग अंगीकारण्याचंही मनात येऊ लागलं होतं.पण लेखन अगदी सुरवातीपासून सुरू करायची वाटत असलेली संभावना मला नाउमेद करणारी होती.”

मी म्हणालो,
“मला तू एक लेखक होशील असं पूर्वी पासून वाटायचं.कारण आपण शिक्षण घेत असताना मी पाहिलं होतं की, तुला वाचानाची खूप आवड असायची.तू लहान लहान गोष्टी लिहून मासिकात छापायला पाठवायचास हे मला माहित होतं. पण संगीताकडे वळशील हे माझ्या ध्यानात कधीच आलं नाही.”

“त्याचीच तर गंमत सांगतो.”
सूरेश खूशीत येऊन सांगू लागला,
“हे सर्व मनन करीत असताना मधेच मी माझ्याजवळ असलेल्या जुन्या सतारीच्या काही तारावर अकुशलतेने का होईना बोटं फिरवण्याचं ठरवलं.
आणि नंतर माझ्या लक्षात आलं की,अशा तंतू-वाद्यावर हात फिरवल्यावर ते वाद्य असे सूर निर्माण करतं आणि ते सूर असे निनादतात की त्यातून निघणारी ध्वनी आणि त्याची स्पष्टता केव्हडी तरी शुद्ध आणि सुंदर वाटत असल्याने माझं मन उल्हासित होत होतं. ते सूर ऐकून सर्व प्रकारचे जाणूनबजून होणारे उपक्रम स्तब्ध व्हायला कारणीभूत होत होते.हेही आश्चर्यकारक वाटायचं.
पण हे सर्व हवं तसंच होतं. तरीपण हे सूर क्षणभंगूर असतात. निर्माण होता होताच ते हवेत विरून जातात,आणि मागे त्यांचा मागमूस रहात नाही.
रंगार्‍याच्या कुंचल्याचे कॅनव्हासवर मारलेल्या फटकार्‍यासारखे,किंवा शिल्पकाराच्या चिकण-माती सारखे वाटतात. माझं आयुष्य कितीसं दैदीप्यमान होतं,माझ्या कलात्मक जीवनाचा विस्तार कितीसा महान होता, हे येणार्‍या पिढीला सांगायला ते सूर अस्तित्वातच नसणार हे ह्यावरून नक्कीच जाणवत असायचं.माझा अहंपणा संकटात आला होता असं मला वाटायचं आणि मला दूरवरून माझ्याच अंताची पावलं आवाज देत होती असं वाटत
होतं.तरीसुद्धा मी निश्चय केला होता की मी माझ्या सतारीशी काही काळ वचनबद्ध रहाणार आहे आणि मला पहायचं होतं की माझ्या मध्य-जीवनातले विषाद मी हुसकावून लाऊ शकतो का? किंवा कमीत कमी मी त्यांना निभावून नेऊ शकतो का?”

“पण मग तू सतार वाजवायला कुठे शिकलास?”
मी सुरेशला प्रश्न केला.

“माझा मुलगा शोभेल अशा एका सतार-वादकाकडून मी् सतार वाजवायचे धडे घेऊ लागलो.तशी माझी प्रगति चांगलीच होती.पण इतर हजारों लोक करतात तसं, मुलभूत शिकायच्या गोष्टी माझ्याकडून निसटून गेल्या होत्या. पण ही नवीन विद्या मी उत्साहाने हाताळली.”
सुरेश मला सांगू लागला.
अलीकडे तर मी ह्या संगीत शास्त्राची उंची आणि कला-विस्तार गाठत असताना आणि प्रत्येक क्षणी नवा उच्चांक गाठत असताना,
“का तुझा वेळ तू निष्फळ दवडतो आहेस? कदापी तू त्याच्या सारखं किंवा ह्याच्या सारखं वाजवूच शकणार नाहीस.तू घेतलेल्या मेहनतीची फळं कुठे आहेत? तुला मिळणारा समय तू आणखीन काही महत्वाच्या गोष्टी करायला वापरू शकतोसच ना?”
असे माझ्या मनातल्या एका कप्यातून येणारे दुष्ट विचार मी उधळून लावीत होतो.”

मला सुरेशची जीद्द पाहून नवल वाटलं.मी म्हणालो,
“मला माहित आहे त्याप्रमाणे ह्या संगीत शास्त्रात रियाज करण्याची खूपच जरूरी असते.त्यासाठी निग्रह आणि निश्चय असण्याची जरूरी असते.तू हे कसं काय साधलंस?”

सुरेश म्हणाला,
“सर्वच गोष्टी मी जीवंत असे पर्यंत मला शक्य होणार नाहीत.आणि सर्वच गोष्टी मला मिळणारही नाहीत अर्धमुर्ध आयुष्य उरलं असताना असल्या गोष्टीत तुमचं मन जास्त केंद्रीत होत असतं.
जाता जाता, प्रथम माझ्या उरलेल्या जीवनाचा अवधी लक्षात घेऊन आणि नंतर महान वाद्यवादकांची प्रतिभा लक्षात घेऊन,मी त्यांच्या सारखा सतार वाजवू लागल्यास मला किती वेळ लागेल याचा अंदाज, तर्क करून आणि ठाकठोळे पाहून, सतार-वादक म्हणून मी माझ्या प्रगतिचा आढावा घेण्याच्या प्रयत्नात राहिलो.माझ्या प्रयत्नाची बढत होत होती पण उच्चांक गाठायला बरचसं अंतर राहिलं होतं.जर का मला सर्वोत्तम होता येत नाही तर प्रयत्न तरी कशाला हवा?असंही मनात येऊ लागलं होतं.”

मला एका सतार-वादकाचं आत्मचरित्र वाचल्याचं आठवलं.मी सुरेशला म्हणालो,
“एका महान सतार-वादकाबद्दल मी वाचलं होतं की तो रोज नचुकता तीन तास रियाज करायचा.आणि असं हे त्याने मरे पर्यंत केलं होतं.मला वाटतं, की त्याने आपण आपल्या समयाचा कसा विनियोग करतो आहो याचा विचारही केला नसेल.पण त्याने पुढे लिहिल्याचं आठवतं की, कदाचीत कुठल्याही गोष्टीवर प्रभूत्व असणं ही एक मनातली भ्रांति असते.आणि ती भ्रांति म्हणजेच,
आपण जो शौक करतो त्यात निपूणता आणण्यासाठी अनेकप्रकारचे मार्ग पत्करणं,जीवनाच्या मार्गात एक पाऊल एका वेळी घेणं.
जागतीक कीर्ति आणि धन, तरूण वयात मिळवताना पहातो,ते सुद्धा उंचं उडी घेण्याच्या प्रयत्नात असताना,पायाची टांच आणि पुढची बोटं एकाच वेळी एकदा टेकवतात.
आणि जर का ते विचारशील,सावध आणि आपली प्रतिष्टा संभाळून असतील तर ठोकर खाणं आणि तोंडघशी पडणं ते होऊच देत नाहीत.”

सुरेश मेहेंदळेला एका महान सतार-वादकाचं मी सांगीतलेलं मत ऐकून जरा स्फुर्ती आली.मला म्हणाला,
“जरी मी महान वादक नसलो तरी,जसा मी विचार करतोय,तसंच त्या महान वादकाने असं ही लक्षात घेतलं असेल की काही गोष्टी केवळ क्षणिक फायद्यासाठी करायच्या असतात.जसं बागकाम करणं,काही समारंभाना हजर रहाणं,संवादात भाग घेणं,कुणी कधीही ऐकणार नसला तरी एखादी संगीत रचना करणं.
हे शहाणपण काहीनां तरूण वयात येतं,पण माझ्या सारख्या इतराना त्यातून मिळणारं प्रतिफळ केवळ त्याबद्दल चिंतन केल्यामुळे, मग ते कसल्याही प्रकारचं असेना का, आणि जीवन कसं समृद्ध होईल ह्याचाही विचार केल्यामुळे, हेच शहाणपण थोडं उशीरा येतं.”

मला सुरेशचे हे विचार ऐकून खूपच बरं वाटलं.मी लगेचच त्याला म्हणालो,
“तुझ्या चिंतनात,तुझ्या वादनात आणि जीवनात इतर कसलाही आनंद घेण्यात तू तुझ्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात राहिलास हे मला स्पष्टच दिसतंय. ज्याचा लाभ व्हायचा असेल त्याबद्दल वास्तविकता बाळगून,स्पष्ट ध्येयं ठेऊन, जीवनाशी शांतपणे सामोरं जाणं तुला ह्यामुळे शक्य झालं असावं.तू संगीत शिकवायचे क्लासीस घेतोस,शिवाय हे दुकान चालवतोस हे काय कमी झालं काय?”

“ही सतार माझ्या खांद्यावर टेकवायला मिळते त्याबद्दल मी नशिबवान आहे असं मला मी समजतो.जेव्हा मला आराम करावासा वाटतो किंवा लक्ष केंद्रित करावं असं वाटतं,तेव्हा मी सतारीच्या जादू निर्माण करणार्‍या तारा छेडतो आणि त्याने बरेचदा माझ्या मनाचं संतुलन आणि विचाराच्या दिशा काही क्षणात संतुलित होतात.
मी माझ्या मला त्या उबदार बुडबूड्यात बुडवून घेतो म्हणजेच त्या मनोहर सूरात जो त्या लाकडी भोपळ्यातून निर्माण होतो,किंवा तारांच्या स्पंदनाने निनादतो त्यात माझं मन आणि शरीर एकजीव करून घेतो. उत्कंठा हीच माझ्या जीवनाची सामान्य स्थिती होण्यापूर्वी,बालपणात जसं माझं श्वसन, मंद,पूर्ण आणि शिथिल स्थितीत होतं तसंच हे सूर ऐकल्यावर होतं.बरेच वेळां ज्यावेळी मला झोप येत नाही असं होतं त्यावेळी मी ह्या सप्त सूरांचं चिंतन करतो.त्यामुळे माझं मन शांत होऊन मनावरचा ताण कमी करण्यात मदत होते.दुसर्‍या दिवसाची कामं सुलभ होतात.सहजा सहजी झोप येते.सतारीच्या संगीतातून आंतरीक शांती मिळते.”

सुरेशने आपल्या मनातलं सत्य माझ्याजवळ प्रकट केलं.शेवटी मी त्याला म्हणालो,
“योगायोगाने आपण इकडे भेटलो.मला तुझं सतार वादन ऐकाचं आहे.तू कुठे रहातोस त्याचा मला पत्ता दे.मला तुझ्याबरोबर थोडा वेळ घालवायला आवडेल.”
“अवश्य,अवश्य”
असं म्हणून सुरेशने त्याचं कार्ड मला दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: