नग्नावस्थेतलं सूख.

“मला तुमच्याकडून ह्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती.”

गेल्या गणपतीच्या दिवसात माझ्या घरी माझी मुलगी आणि नात अमेरिकेहून आली होती.
कॉलेजच्या पहिल्या वर्षात माझी नात शिकत असल्याने तिला खास रजा काढून यावं लागलं होतं.तिच्या बरोबर तिची मैत्रीण पण आली होती.त्यांना भारतात गणपतीचा सण कसा साजरा करतात ह्याचं खूप कुतूहल होतं.

माझ्याबरोबर माझी नात एकटी असली की आम्ही निरनीराळ्या विषयावर मनसोक्त चर्चा करतो. ती लहान असल्यापासून बारीक सारीक विषय काढून मला उद्युक्त करायची.आणि तो तिचा विषय घेऊन मी एखादा लेख तरी लिहायचो किंवा एखादी कविता लिहायचो.

निर्जीव वस्तुला सजीव समजून ती त्या वस्तुबरोबर बोलायची.आणि नकळत कीव आल्यासारखं त्या वस्तूचा उल्लेख करून त्या वस्तुशी बोललेले आपले मनातले विचार मला सांगून टाकायची.
ती लहान असताना एकदा, शुन्य ते नऊ आकड्यांबद्दल माझ्याशी बोलत होती.एक ते नऊ आकड्यांना त्या त्या परीने किंमत आहे.पण शुन्य मात्र “बिचारा” काहीच किंमतीचा नाही.असंच सहज मला एकदा म्हणून गेली.मी ह्या आकड्यावरून तिच्यासाठी एक कविता लिहिली.
“शुन्याचं महत्व”

मी तिला म्हणालो होतो, दोन एका पेक्षा मोठा, तीन दोना पेक्षा मोठा असं करत करत नऊ सगळ्यांपेक्षा मोठा मग शून्याचं काय?
तिला शून्याचं खूप वाईट वाटलं.ते मला तिच्या चेहर्‍यावरून दिसलं.ती म्हणालीच,
“पुअर झीरो”

मी म्हणालो,
झीरोच खरा हिरो असतो.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर झीरोवर एक कविता करतो.ती वाचल्यावर तुला कळेल शून्याची महती.
कविता अशी होती.

“शुन्याची महती”
एकदां दोन म्हणे एकाला
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे तिनाला
माहीत नाही का एक आणि दोनाला
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला

दोन शिंगी चार होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकलं का रे एक दोन आणि तिना?
पांच सहा सात आठ आणि मीना
कबूल झालो आहो नऊना
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

शून्य बिचारा कोपर्‍यात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वतःशीच म्हणाला,
ठाऊक नाही त्यांना घेऊन
मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
वृद्धि होईल त्याची तुरन्त

सूर्य,चन्द्र,तार्‍यांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधिकार

नको स्वतःची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

एकाने केली तक्रार शून्याकडे
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
शून्य म्हणाला त्याला
करशील तूं वृद्धि बेरीज करताना
नंतर
शून्य विचारतो एकाला
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे शून्य इतर आकड्यांना
कमी लेखूं नका कुणा
वेळ आली असताना
शून्यसम आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना

मी ज्यावेळी माझ्या नातीला ह्या कवितेची  आठवण करून दिली तेव्हा ती मला म्हणाली,
“तुम्ही बर्‍याच कविता लिहिल्या आहेत.मला आठवतात त्या,
“दातांची व्यथा”, इश्वराचे कोडे” ,”कालाय तस्मै नमः”, कॉर्नींगचे भांडे” वगैरे,
मीच तुम्हाला काहीना काही कारणाने कविता लिहायला उद्युक्त केलं होतं.”

“हो,आणि बरेच लेख लिहायला पण.”
मी म्हणालो.

“पाश्चात्य देशात सगळे खेळ चेन्डूचे. बास्केट-बॉल,व्हाली-बॉल,फुट-बॉल(सॉकर),टेबल-टेनीस,टेनीस, गॉल्फ, क्रिकेट,बोलिन्ग वगैरे,वगैरे.”
माझी नात सांगू लागली.

आणि पुढे म्हणाली,
“ह्या सर्व खेळात मला फुट-बॉल मधल्या बॉलची कीव आली होती.त्यालाच फक्त खेळात लाथेने तुडवतात.बाकी सर्व हातात झेलेले जातात.
“पुअर फुट-बॉल”
असं मी म्हणाल्यावर तुम्ही त्यावर एक लेख लिहाला होता.तो मला अजून आठवतो.”

आमचे हे संवाद चालले असताना माझ्या नातीची मैत्रीण अगदी कुतूहल वाटून ऐकत होती.मला उद्देशून म्हणाली,
“सुखाबद्दलचं माझं मत मी तुम्हाला सांगते.तुमची प्रतिक्रिया मला ऐकायची आहे.”
माझ्या नातीकडे डोळे करून पहात होती.कदाचीत तिच्या होकाराची वाट पहात होती.तिने मान हलवून होकार दिल्यावर, मैत्रीण सांगू लागली,
“सकाळीच न्हाणीघरातून आंघोळ झाल्यावर आपण काय करतो? कदाचीत कुणी दात ब्रश करतात,कुणी केस विंचरतात,केसावर ब्रश फिरवतात,हे नक्कीच.
कुणी चेहर्‍यावर पावडर लावतात,कुणी पर्फ्युम लावतात,अशी आशा करायला हरकत नाही.
लोक,ह्या अगदी विशिष्ट गोष्टी करण्याचा विचार बाथरूम मधून न्हाऊन आल्यावर करतात.मी काय करते तुम्हाला ठाऊक आहे का? पैजेने सांगते तुम्ही तर्कसुद्धा करू शकणार नाही.माझ्या खोलीत चक्क नग्न होऊन थोडावेळ मी नाचते.
आपल्याच खोलीत नग्नावस्थेत नाचण्यात मला विशेष वाटतं.
आंघोळ करून आल्यावरचे माझे रिवाज इतर लोकांच्या रिवाजा पेक्षा काहीसे जरा दुसर्‍या टोकाचे वाटतील.मी स्वतःच जरा वेडी आहे किंवा जरा सनकी आहे असं म्हटलंत तरी चालेल.
मुळीच नाही. मी पूर्ण समझदार आहे.आणि माझी खात्री आहे की लोकं माझ्या सारखं करतील तर जग नक्कीच उत्तम होईल.
मला खात्री आहे,तुम्ही म्हणाल की माझं हे म्हणणं थोडं निडर असल्यासारखं आहे.ह्या दुश्चरित्र जगात रहाताना त्यात थोडा बदल आणण्यासाठी एव्हड्या साध्या आणि बिनडोक गोष्टीवर,नग्नावस्थेत नाचण्यावर,विश्वास ठेवणं तुम्हाला जरा कठीण जात असावं.
तुमच्या रोजच्या दिनचर्येचा विचार करा.सकाळी उठता,कामावर जाता,किंवा शाळेत जाता,मुलांना घरी घेऊन येता,घरी आणखी कामं करता,जेवता,कुटूंबीयात थोडा वेळ घालवता आणि नंतर झोपी जाता.
नंतर दुसर्‍या दिवशी उठता आणि हे सगळं पुन्हा तसंच करता. त्यावर माझा एक प्रस्ताव आहे.
थांबा.
तुमच्याच दिवसातली पाच मिनीटं तुमच्यासाठीच काढा.मग ती पाच मिनीटं, नग्नावस्थेत नाचण्यात जावो,पुस्तक वाचण्यात जावो, एखादं गाणं वाजवण्यात जावो किंवा नुसतं समोरच्या भिंतवर एक टक पहाण्यात जावो.मी तुमच्याशी वादा करते की तुम्ही नक्कीच जास्त प्रसन्न व्हाल.
तुमचं काय म्हणणं आहे?”

मला नातीच्या मैत्रीणीचा विचार खूपच क्रान्तीकारी वाटला. सुखाच्या मागे धडपडण्याचा तिचा प्रयत्न ऐकून मी पण आवांक झालो.आणि तो प्रयत्न सुद्धा ती मला बिनदास उघडपणे सांगत होती ह्याचं जास्त नवल वाटलं.

मी दोघीनाही उद्देशून म्हणालो,
“तुमच्या सारखी नव्या पिढीतलं मुलं मनात आलं की सर्व स्पष्ट करायला भिडभाड ठेवीत नाहीत.”
मी दिलेल्या शेर्‍याचा दोघींच्याही चेहर्‍यावर तसूभरही परिणाम झाला नाही.पण तिचा मुद्दा मला पटला होता. म्हणून माझा प्रतिसाद देण्यासाठी मी म्हणालो,
“जग कसं सुखी होईल हा जरी इतका तर्क-वितर्क करण्या सारखा विषय नसला,कॅन्सर पासून पुर्ण सुटकार कसा मिळेल,हाःहाःकार होतो तिथे मदत कशी पुरवली जाईल हे आणि असले विषय त्या त्या जागी महत्वाचे आहेतच. आणि मला वाटतं बरेच लोक त्याचं महत्व विसरतातही.
उदासिनता, उत्सुकता,आत्मघात,मृत्यु हे शब्द आपल्याला कसे वाटतात?अगदीच कष्टप्रद?
मला अगदी तसंच वाटतं.
यश,संपत्ती,अधिकार ह्या गोष्टी आजच्या जगात लाखो लोकांच्या आकांक्षेमुळे आहेत.ह्या तिन गोष्टीसाठी जे प्रयास करतात ते खरोखर निरर्थक आहे.
ते जीवनात हास्य आणणार नाहीत,बदल आणणार नाहीत, सुखही आणणार नाहीत.आणि म्हणून आपल्या खोलीत नग्नावस्थेत नाचण्याबद्दलचं तुझं म्हणणं आणि त्यापासून तुला सुख कसं मिळतं ह्याबद्दलचं तुझं स्पष्टीकरण मला विशेष वाटतं. देशातली गरीबी सुधारण्यात त्यामुळे उपाय होणार नाही पण माझी खात्री आहे की ती किंमती पाच मिनटं एखाद्याच्या जीवनात आनंदाचे क्षण जरूर आणतील.”

“मला तुमच्याकडून ह्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती.”
असं म्हणून माझ्या नातीने आमच्या गप्पात विराम आणला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

7 Comments

 1. Posted ऑगस्ट 13, 2010 at 5:13 pm | Permalink

  aaplya ithe ekhadyala express karnyasaathi vay, vel, sthal baryach goshtinchaa vichar karava lagto.

  mala lekh avadala, ek nirbhid lekh

  • Posted ऑगस्ट 13, 2010 at 7:40 pm | Permalink

   आपल्याशी मी पूर्ण सहमत आहे.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 2. Posted ऑगस्ट 13, 2010 at 10:18 pm | Permalink

  नमस्कार कविता आवडली…एक आगाऊ सल्ला आहे. बघा पटला तर.
  एकाच पोस्ट मध्ये इतके देन्यापेक्षा दोन पोस्ट केल्या असते तर जास्त बरे झाले असते…त्याचे कारण…
  दुसरी माहिती लगेच वाचल्यामुळे कवितेचा परिणाम कमी होतो वा त्याकडे दुर्लक्ष होते…व शेवटी फक्त नग्न होवून नाचणे इतकेच काय ते लक्षत राहते.

  • Posted ऑगस्ट 14, 2010 at 11:02 सकाळी | Permalink

   नमस्कार,
   आपल्याला माझी कविता आवडली हे वाचून बरं वाटलं.
   आपण दिलेला सल्ला पण मला आवडला.
   आतापावेतो जवळ जवळ ५८२ पोस्टस माझ्या ब्लॉगवर मी लिहिले.मी लिहिलेल्या माझ्या काही जुन्या कवितांची मला आठवण आली.त्या पुन्हा कुणी तरी वाचाव्यात म्हणून हा असा जुन्या आणि नव्या विषयाचा मिलाप करून एकत्र पोस्ट लिहावा अशी कल्पना मनात येऊन हा प्रयत्न केला.
   आपण म्हणता तसं कवितेकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे.
   पण कविता आवडली म्हणूनही काहींनी कळवलं आहे तसंच
   नाचण्याचं “निर्भिड मत” आवडलं असंही काहींनी लिहिलं आहे.
   आणि असं होणार हे लेख लिहिताना माझ्या ध्यानात आलं होतं.आपल्याही ते लक्षात येऊन आपण सल्ला दिला ह्यात काहीही गैर नाही.
   माझ्या ह्या लेखाचं शिर्षक काहीसं “लक्ष वेधक ” असल्याने आज माझ्या ब्लॉगवर २७० हून जास्त हिट्स मिळाल्या आहेत.सरासरी रोज १५० हिट्स मिळतात.
   नुसत्या कवितेला एव्हड्या हिट्स मिळाल्या नसत्या असं मला अनुभवाने वाटतं.
   पण माझी कविता वाचली जाईल हा माझा मतलब साध्य झाला.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

   • Posted ऑगस्ट 14, 2010 at 11:18 सकाळी | Permalink

    तुमचा हेतू लक्षात आला. हरकत नाही अशा ट्रिक्स मधे मधे वापरायला.पण ही चलाखी आहे हे चाणक्षाच्या लक्षात येवू शकते.व ज्याच्या लक्षत येणार नाही ते एवढे मोठा लेख वाचून कंटाळू शकतात. (वाचक म्हणून आपली एक शक्यता मांडतोय..नक्की माहित नाही.)
    आजच तुमचा उल्लेख मी महेंद्र कुलकर्णीच्या “काय वाटेल ते” या ब्लॉगवर केलाय…तुम्ही खूप सिनिअर ब्लॉगर आहात असे त्यांच्याकडून कळले..खूप आदर वाटला आपल्याबद्दल. तुमच्या अनुवादितची लिंक ही दिली आहे मी तिथे. तुमच्या लिखानाबाद्दल्ची माहिती इतरांना होण्यासाठी. त्यांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे. त्यांना थोडे इतराबद्दल समजावे हा हेतू मनात ठेवून.असो…
    लिहीत रहा..आम्ही येवूच भेटायला असेच…

    • Posted ऑगस्ट 15, 2010 at 4:53 सकाळी | Permalink

     नमस्कार!! काका बोलू की बाबा समजत नाही…असो तुम्हाला वाढदिवसाच्या व स्वातत्र्यदिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. वयाच्या सत्त्याहात्ताराव्या वर्षी हा इतका उत्साह..ह्या कल्पना..इतके इनोवेशन…आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. असेच आनंदाने लिहीत रहा व आम्हालाही आनंदी रहायला प्रेरित करा..

     • Posted ऑगस्ट 16, 2010 at 9:41 सकाळी | Permalink

      नमस्कार,
      आपल्या शुभेच्छाबद्दल मनस्वी आभार.
      आपल्याकडून मिळणारं प्रोत्साहन,प्रेम,सुचना आणि टिका हे आमचं खाद्य आहे.त्यावर जगतो.लेखनातूनच उत्साहासकट सगळं काही मिळतं.वय विसरलं जातं.
      तुमच्या सारख्या माझ्या वाचकानी माझे लेख वाचून आनंदीत रहावं हाच मुळ उद्देश आहे.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: