गतकालातल्या एखाद्या घटनेची आठवण.

“आम्ही आमच्या बागेतला,मोठ्यात मोठा फणस, कोकणातून कसा आणला होता हे सर्व चित्रातून, एक शब्द न बोलता, स्पष्ट करता येतं.”

मी मागच्या पावसाळ्यात गोव्याला सुट्टी घेऊन गेलो होतो,त्यावेळी करमकर कुटूंबाची आणि आमची बीचवर वरचेवर भेट व्हायची.करमरकरांची कुसूम हातात सतत कॅमेरा बाळगून असायची.दिसेल ते ती कॅमेर्‍यात टिपत असायची.त्याबद्दल कुतूहल वाटून मी तिला विचारल्यावर ती मला हंसून म्हणाल्याचं आठवतं,
“मी फोटॉग्राफीकडे नेहमीच उत्कटतेने पहात असते.”

हे तिचं वाक्य आज लक्षात का आलं,याचं कारण कुसूमला मी आज एका लग्नात पाहिलं.लग्नाच्या सोहळ्यात ती हातात कॅमेरा घेऊन तसंच करीत होती.पटापट चित्र शूट करीत होती.
आज मात्र मी ठरवलं होतं की ह्या तिच्या उद्दोगाचं वेड काय आहे ते समजून घ्यावं.
लग्नातलं दुपारचं जेवण झाल्यावर संध्याकाळी स्वागत समारंभ होता,त्यासाठी घरी न जाता हॉलवरच वेळ काढायचा मी ठरवलं होतं.कुसूम पण तेच करणार होती.त्यामुळे तिच्याशी गप्पा करायला उत्तम समय मिळाला होता.

“मागे एकदा आपण गोव्याला भेटलो होतो तेव्हा मी तुला तुझ्या फोटो टिपत जाण्याच्या संवयी बद्दल विचारलं होतं. तुला आठवत असेल.”
मी कुसूमला म्हणालो.

कुसूम मला म्हणाली,
“हो मला आठवतं.आणि मी तुम्हाला उत्तर दिलेलंही आठवतंय.”

“मग सांग बघू तुझ्या फोटॉग्राफीच्या उत्कटतेबद्दल.आपल्याला आता बोलायला भरपूर वेळ आहे.”
मी म्हणालो.

कुसूम मला सांगू लागली,
“आपण कोण आहोत,ते आपल्या मनातल्या स्मृती आपल्याला कल्पना करून देतात.आपला गतकाल काय होता ते आपल्या स्मृती सांगतात. आणि भविष्यात जे काही घडणार आहे,ते घडून गेल्यावर,आपल्या स्मृतीतून कळणार आहे हे आपल्याला माहित असतं.
ज्या घटनेमुळे स्मृती निर्माण होते,चांगली असो वा वाईट,ती घटना अक्षरशः जीवनातला एकवेळच्या अनुभवामुळे असते. त्या घटनेची जशासतशी पुनरावृत्ती केली जाणं अशक्य आहे.आणि त्यासाठीच आपल्या मनावर आपण अवलंबून असतो कारण त्यामुळेच आपल्या जीवनातली महत्वपूर्ण घटना लक्षात रहाते.अगदी काही फार मोठं घडण्याची जरूरी नसते.कुणाबरोबर देवळात गेल्याची आठवण किंवा आपल्या आईबरोबर बराच वेळ घालवल्याची
एखादी आठवण पुरे होते.

आपण ज्या प्रसंगातून जातो ते सर्व स्मृतीत असलं तरी वास्तविकता म्हणून आपल्या जवळ नसतं.पण एक गोष्ट आहे.चित्राच्या रूपाने किंवा तस्वीरीच्या रूपाने ते आपल्या जवळ ठेवता येतं.आणि यासाठीच मी फोटॉग्राफीकडे उत्कटतेने पहात असते.एक बटन दाबून मला,क्षणातली एकच एक घटना काबीज करून ठेवता येते. अशीच एखादी घटना की तिला पाहून मला माझा गतकाल या क्षणाला आठवला जाईल.
ह्या अशा चित्रांमुळे,लोकांना पूर्णपणे जे काही घडलं त्याचं स्मरण करून ठेवण्याची जरूरी भासत नसावी.खरंच,किती विस्मयजनक आहे की अगदी साधा गुळगुळीत,चमकणारा हा कागदाचा तुकडा आपली स्मृती शाबूत ठेवायला मदत करतो.
माझी डायरी चित्रांनी भरलेली असते.बरेच लोक डायरी किंवा वार्तापत्र ठेवण्यासाठी कागद आणि पेनची मदत मिळण्याच्या खटपटीत असतात.मी कॅमेर्‍याची मदत घेते. पुढे कधीतरी माझ्या आठवणीत रहाण्यासाठी अगदी बारीकसारीक गोष्टी टिपून ठेवायाला मला ही वस्तू शक्य करते.

काल पाहिलेला रमणीय सूर्यास्त मी कसा वर्णन करू ह्याची चिंता मला लागत नाही. समुद्रात कोळ्याने दाखवलेला तो मासा किती मोठा होता किंवा सूर्यास्त होत असताना पाहिलेले विविध रंग किती विस्मयकारक होते हे चित्रात जसेच्यातसे काबीज करून ठेवता येतात.

भविष्य काळात माझी स्मृती पुस्सट व्हायला लागली तरी मला त्या चित्राकडे बघून गतकालाचा अनुभव पुन्हा घ्यायला सोपं जाणार.”

मधेच मी कुसूमला अडवीत म्हणालो,
“मला कुणीतरी म्हटल्याचं आठवतंय,
प्रत्येक चित्रात हजार शब्द बोलके असतात.मी ह्या म्हणण्याशी पूर्ण सहमत आहे.”

“अगदी माझ्या मनातलं बोललात”
असं म्हणून कुसूम पुढे सांगू लागली,
“भर पावसात मी आणि माझे बाबा एकाच छत्रीतून कसे भिजून आलो होतो,माझा हायस्कूल मधला सोहळा कसा झाला होता,आम्ही आमच्या बागेतला,मोठ्यात मोठा फणस, कोकणातून कसा आणला होता हे सर्व चित्रातून, एक शब्द न बोलता, स्पष्ट करता येतं. त्या चित्रात आम्ही होतो ह्याची साक्ष विनासायास,टिपली गेली आहे.”

“अनेक लोक फोटो शूट करताना मी पाहिले आहेत.पण तुझ्या सारखी एखादीच व्यक्ती,इतक्या तन्मयतेने,आणि इतका विचार करून, तू म्हणतेस तशी, “उत्कट” होऊन काम करताना मी पहिल्यांदाच पहात आहे.”
असं मी सांगेपर्यंत दुपारचा चहा घेऊन एक माणूस आला आणि त्याने मला कुणीतरी बोलवतंय म्हणून निरोप दिला त्यामुळे आमचा विषय तिथेच संपला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: