चेहर्‍यावरचं हास्य.

“हसर्‍या चेहर्‍याबद्दल मला विशेष वाटतं.मित्र-मंडळी आणि घरचे लोक यांच्या विषयी, मला आवडत असलेल्या माझ्या स्मृतिंची, मला जेव्हा आठवण येते,तेव्हा नक्कीच माझ्या चेहर्‍यावर हंसू येतं.”
प्रो.देसायांची नात मला सांगत होती.

त्याचं असं झालं,प्रो.देसायानी त्यांच्या नातीबरोबर-मनीषाबरोबर- मला हवं असलेलं एक पुस्तक “हास्य फवारे” पाठवून दिलं होतं.पिशवीतून पुस्तक काढून मला देताना मनीषाने पुस्तकाचं शिर्षक वाचून माझ्याशी हंसतच असं म्हणाली.

पुढे सांगू लागली,
“माझे आजोबा हे पुस्तक वाचत असताना मी त्यांना पाहिलं.चेहर्‍यावरच्या हास्याबद्दल मला काय वाटतं ते मला त्यांना सांगायचं होतं.विषय काढणार तेव्हड्यात कुणी त्यांना भेटायला आलं आणि ते सर्व राहून गेलं.म्हटलं तुमच्याबरोबर चर्चा केली तरी काही हरकत नाही.”

“मग सांग ना.मला तुझं म्हणणं ऐकायला आवडेल”
मी मनीषाला म्हणालो.

मनीषा सांगू लागली,
“पुन्हा जर का ह्या आठवणी मी काढल्या, तर त्या आठवणी काढताना त्यावेळी आलेल्या  माझ्या चेहर्‍यावरच्या हंसण्याचा अंतर्भाव, माझ्या स्मृतित झाला नाही तर त्या आठवणींच खरं परिमाण दिसणार नाही.
माझं हे हास्य आणि माझी ती मित्र-मंडळी एका क्षणार्धात गोठून गेली असताना, काढला गेलेला एखादा फोटो पाहिल्यावर, तत्क्षणी मला त्या आनंदाच्या क्षणाकडे गेल्या सारखं वाटतं आणि आपोआप एखादं नवं हंसू माझ्या चेहर्‍यावर येतं.”

मी म्हणालो,
“तुला हे अगदी लहानपणापासून अनुभवलं जात होतं का?

“हो अगदी शालेय शिक्षणापासून”
अशी सुरवात करीत मनीषा म्हणाली,
“माझ्या त्या शालेय शिक्षणाच्या दिवसात एकदा,एका वर्गातून दुसर्‍या वर्गात जाताना,माझ्या एका मैत्रीणीने केलेला विनोद ऐकून,जरी त्यावेळी माझ्या ध्यानात आलं नाही तरी,माझ्या चेहर्‍यावर टिकून राहिलेलं ते हंसू वाटेत भेटलेल्या इतर मैत्रीणींकडून हास्य मिळवण्यात जे रुपांतरीत होत होतं,ते  दुसर्‍या वर्गात जाऊन बसे पर्यंत होत होतं.

त्या दिवशी काही असंभवनीय लोकांकडूनपण माझ्याशी हास्य केलं जात होतं.माझे पूर्वीचे गणिताचे शिक्षक की ज्यांना मी बरेच वर्ष पाहिलं नव्हतं, त्यांच्याकडूनसुद्धा खात्रीपूर्वक मुस्कुराहट मला त्यावेळी मिळाली होती. ओळखीच्या मैत्रीणी आणि मैत्रीणींच्या मैत्रीणी,ज्यांना मी ओळखतही नव्हते, अशांकडूनही माझ्याशी हंसलं जात होतं,जणू त्या फार पूर्वीपासूनच्या मैत्रीणी असाव्यात असंच काहीसं.
ह्या सार्‍या घटनांमुळे,तिसर्‍या वर्गात चालत जाई तोपर्यंत,माझ्या दातांचं चांगलंच दर्शन इतराना होत होतं.

“मला वाटतं हंसण्याने जेवढा लोकांशी दुवा ठेवता येईल तेव्हडा शब्दांनी ठेवता येणार नाही.”
असं मी म्हटल्यावर,मनीषा म्हणाली,
“त्या दिवसाचा तो अनुभव, सबंध दिवसभर, माझी चित्तवृत्ति-मुड- वाढवून गेला.
मी जर का हंसत राहिली तर मला दुःखी चेहरा ठेवताच येणार नाही असं मला वाटतं.ज्या ज्या वेळेला मला उदास आणि मंद असल्यासारखं वाटतं, त्या त्या वेळी मी माझ्या आवडत्या हास्यप्रधान घटनांकडे स्वतःला झोकून देते.

दोन घटना मला आठवतात.एक म्हणजे माझ्या खरड वहितली पानं उगाचंच मी भरभर वाचल्यासारखी करते किंवा दुसरी म्हणजे, माझ्या आवडत्या बटर-स्कॉच आईसक्रिमची आठवण काढून प्रसन्न व्हायला बघते.हे आईसक्रिम खाताना एकदा एका विनोदावर एव्हडी हंसत होते की आईसक्रिम केव्हा वितळलं ते कळलंच नव्हतं.ही घटना आठवून माझी उदास चित्तवृत्ति अशीच त्या आईसक्रिम सारखी वितळून जाते.कधी कधी,निराश होऊन, तो माझा
कपाळावर आठ्या आलेला चेहरा,आरशात पाहून,माझ्या मलाच, चेहरा हंसण्याजोगा करण्यासाठी केलेली जबरदस्ती लक्षात आणून मुळात मी मला निराश का करून घेतलं,हेच विसरून जाते.

कधी कधी माझ्या मैत्रीणीबरोबर संध्याकाळचा फेरफटका मारून आल्यावर अति हंसण्यामुळे थोडीशी वेदना मला जाणवते.अशा प्रसंगी मी त्यांच्या बरोबर एव्हडी आनंदात असते की हंसून हंसून माझे, नंतर शिथिल झालेले गाल, दुखत रहातात.माझं सततचं हंसणं एव्हडं पराकोटीला जायचं की माझे स्नायू कडक होऊन,जणू काय शंभर उठा-बशा काढल्या सारखं वाटायचं.
चेहरा जरी थकलेला झाला तरी ह्या बारीक बारीक वेदनांचा त्याग करायला मी कबूल नसायची.
थोडासा वेळ जरी कष्टप्रद वाटलं तरी माझे ते दुःखादायी गाल माझ्या त्या आनंदी घटनाकडे आणि अनुभवाकडे माझा दुवा लावण्याच्या प्रयत्नात असायचे हे मला जाणवायचं.
ह्या सर्व अनुभवावरून मला वाटतं, अशावेळी हंसरा चेहरा आणि थकलेले गाल मला बरे वाटावेत ह्यात काही गैर नसावं.”

“ह्यात काहीच गैर नाही.निदान मला तरी तसं वाटत नाही.नाहीतरी उद्या मी प्रो.देसायाना तळ्यावर भेटणार आहेच.हे पुस्तक पण बरोबर घेऊन जाईन.
आणि चर्चेत तुझं नांव न सांगता तुझा किस्सा आणि अनुभव त्यांना सांगीन.बघुया त्यांच काय मत होतं ते.”
असं मी सांगीतल्यावर मनीषा खूश झालेली दिसली.

“पुढल्या आठवड्यात मी तुमच्या घरी येईन.”
असं सांगून तिने माझा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: