शरीर जसं उपेक्षित तसंच कौतुकास्पद.

“ज्यावर तुमचं अतोनात प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ शांत आणि निःशब्द होऊन पडून रहाण्यातल्या शरीराच्या कौशल्याबद्दल मला कौतूक वाटतं.”

ह्यावेळी मी थंडीच्या दिवसात कोकणात गेलो होतो.तो डिसेंबरचा महिना होता.दिवाळीही यायची होती.माझ्या भावाकडे माझा मुक्काम होता.माझ्या दोन पुतण्या कॉलेजात शिकतात.मागच्या पुढच्या वर्गात आहेत.
संध्याकाळच्या वेळी बाहेर खूप छान थंड पडलं होतं.जेवणं झाल्यावर आम्ही सर्व बाहेर अंगणात खूर्च्या टाकून बसलो होतो.वर आकाशाकडे पाहिल्यावर मात्र ढगाळ दिसत होतं.कधी कधी दिवाळीच्या मोसमात पावसाच्या सरी येऊन जातात.वळवाचा पाऊस म्हणतात.तसंच काहीसं वातावरण होतं.

कॉलेज कसं काय चालंय, ह्याची विचारपूस झाल्यावर,माझ्या डोक्यात एक चर्चेचा विषय आला.मी दोन्ही पुतणींना म्हटलं,
“आपण आपल्या शरीराशी बरेच वेळा “टेकन फॉर ग्रॅन्टेड” असं समजून वागतो.तसं पाहिलंत तर शरीर हे खरोखरच खिचकट बाब आहे.बरेच वेळा शरीराच्या काही भागांची उपेक्षा झालेली असते तर कधी कधी आपण काही भागांचं कौतूकही करतो.जे नकळत उपेक्षित होतं त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला तुमच्या दोघांकडून तुमचे विचार ऐकायचे आहेत.”

“तुमचं पण मत आम्हाला ऐकायचं आहे.”
अचल, मला म्हणाली.आणि आपला विचार तिने सांगीतला.
“एखाद्या हिरव्या पानांनी खच्चून भरलेल्या झाडाच्या फांद्यातून सकाळचा सूर्य जेव्हा डोकावून पहात असतो,ते दृश्य मान वर करून पहात असताना सूर्याच्या किरणाच्या प्रखर प्रकाशामुळे नकळत माझ्या नाकाच्या शेंड्याला गुदगुदल्या होऊन मला शिंका येतात त्याची मला फार गंमत वाटते.”

मी म्हणालो,
“सकाळच्या उन्हात, अंगणात कुत्र्याची लहान लहान पिल्लं एकमेकाशी मस्तीखोरपणे अंगावर धाऊन जाऊन पडापडी करतात तेव्हा माझ्या ह्या गालापासून ते त्या गालापर्यंत उत्पन्न होणार हंसू मला भावतं.”
माझी दुसरी पुतणी -लता- ती संगीतात विशेष ध्यान देत असते.ती अलीकडे शास्त्रीय संगीताच्या क्लासात पण जाते.

लता म्हणाली,
“नुकतीच पावसाची सर पडून गेली आहे.असंच एखाद्या चांद्ण्या रात्री अंगणात थंडगार हवेची झुळूक अंगावरून जात असताना रेडिओच्या दिल्ली स्टेशनवरून नॅशनल कार्यक्रम चालला असताना शास्त्रोक्त संगीताची तान ऐकायला मला मजा येते.अशावेळी गोड दुधामधे वेलची टाकून केलेल्या गरम गरम कॉफीचा दरवळणारा सुगंध नाकात गेल्यावर खूपच बरं वाटतं.कॉफीचा झुरका घेताना कप जवळ आणून ओठातर्फे कॉफीचं तापमान अजमावयाला निराळीच लज्जत येते.”

माझं मत मी दिलं,
“थंडीच्या दिवसात, भर दुपारच्या उन्हात,अमुकच ठिकाणी जाण्याच न ठरवता, फिरायला जायला मला बरं वाटतं. एखाद्या ओढ्याच्या कडेने जाताना लाजाळूच्या झुडपाना नकळत स्पर्श झाल्याने पानं आपोआप मिटताना पाहून खूप आनंद होतो.निसर्गाने त्या लाजाळूच्या झाडाला दिलेली ती स्पर्शाची स्वाभाविकता पाहून माझ्या अंगात एक आनंदाची उर्मी येते.
लहानश्या गोष्टीतली मोठी सुखसमाधानी,आणि मोठ्या गोष्टीतली लहानशी सुखसमाधानी पाहून माझं मन प्रसन्न होतं.”

अचल मराठीत विषय घेऊन शिकत असल्याने,तिच्या मनात साहित्याविषयी-प्रेमाविषयी- विचार आला नसता तर नवलच होतं,ती म्हणाली,
“ज्यावर तुमचं अतोनात प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ शांत आणि निःशब्द होऊन पडून रहाण्यातल्या शरीराच्या कौशल्याबद्दल मला कौतूक वाटतं. मग ते लहान मुल असो किंवा एखादा बापया असो.मला कसं वाटत असतं ते कुणालातरी ओरडून सांगावसं वाटतं.प्रत्येक क्षणाचा शांत श्वास ती व्यक्ती घेत असताना,ते अनुभवून माझ्या शरीरात आणखी,आणखी जान भरून येते.त्या जवळ असलेल्या व्यक्तीमुळे माझं अस्तीत्व आहे याची मला जाण येते.
आणि म्हणूनच मला माणसाच्या शरीराचा प्रभाव,आणि त्यात असलेली क्षमता ह्याचं विशेष वाटतं”.

मी वयस्कर असल्याने सहाजीकच अलीकडे माझे शरीराचे काही अवयव खालावत जात असल्याने माझं लक्ष माझ्या कातडीकडे जास्त केंद्रीत होतं.त्याचा विचार येऊन मी म्हणालो,
“शरीराच्या कातडीचं मला विशेष वाटतं. सूर्याच्या उन्हात बसल्यावर उन्हाच्या उबेने कातडीला थोडासा काळसरपणा येतो आणि थंडीत हळूवारपणे मेलेली कातडी पडून जाते आणि कातडीवरच्या सुरकुत्या कमी कमी होत जातात.हे पाहिल्यावर निसर्गाचं कौतूक करावं तेव्हडं थोडंच असं म्हणावसं वाटतं.कातडीला कंप येऊन सुख ज्या तर्‍हेने कातडीतून वाहून जात असतं,जसं नसा-नसातून रक्त वाहत असतं,अगदी तसं कातडीचं सुखाच्या संबंधाने
आहे.”

आमच्याकडून होणार्‍या ह्या एकामागून एक,शरीराच्या भागांच्या उपयुक्ततेबाबतच्या विचाराच्या चर्चेमुळे ,एरव्ही उपेक्षीत राहिलेली, माहिती कौतूकाच्या रुपाने स्पष्ट होत आहे हे पाहून लताला हंसू आलं.ती खाली पायाकडे बघून हंसत होती हे पाहून मी अंदाज केला की ही काहीतरी पायांबद्दल आपला विचार सांगण्याच्या तयारीत आहे.आणि माझा अंदाज खरा ठरला.

लता म्हणाली,
“पायाच्या बोटांबाबत मला तसंच विशेष वाटतं. पायांच्या बोटांना जेव्हडी संवेदना असते तेव्हडी आपल्या शरीराच्या इतर भागाना त्याचा अनुभव नसतो.आपण कुठेही जात असताना,तोल सांभाळता,सांभाळता,पायाखाली आलेली जमीन आणि त्या जमीनीची संरचना अनुभवताना पायाची बोटं कार्यभार संभाळून मागे काय होतं आणि पुढे काय होणार आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात असतात.”

हे लताचं ऐकून अचलला प्रेम ह्या विषयाला धरून आणखी सांगावसं वाटलं.ती म्हणाली,
“मला हातांच्या बोटांचं पण फार कौतूक करावसं वाटतं.एखाद्या कोड्याची अनेक तुकड्यातून जुळवाजूळव करून कोडं जसं रूपांतरीत करता येतं अगदी तशीच ही हाताची बोटं असतात.
आपल्या प्रेमळ माणसाला मिठीत घेतल्यावर त्याच्या पाठीच्या कण्यावरच्या मणक्यांवर ही हातांची बोटं अगदी फिट्ट बसतात.ही मिठीतली संवेदना ज्याला इंग्रजीत “स्पाईन-चिलींग- म्हणतात तशीच काहीशी असते.”

आपल्या तोंडाविषयी काहीतरी बोलावं असं मला वाटलं.मी म्हणालो,
“माणसाच्या तोंडाबाबत मला विशेष वाटतं.शरीराच्या अनेक भागा पैकी हा भाग माझा सगळ्यात पसंतीचा आहे. ओठाच्या हालचालीवरून एकमेकाचा आजचा दिवस कसा गेला ते कळायला सोपं होतं.
जीभेचं काय विचारता? समुद्रात असलेली एखादी होडी वलव्हताना वल्ह्याचं सततचं काम म्हणजे पाण्याला ढकलणं. अगदी तसंच हे जीभेचं वल्हं, शब्दांना बलपूर्वक ओठाच्या बाहेर जाऊ देण्याचं,किंवा दातांच्या मागे अधांतरी तरंगत ठेवण्याचं काम करतं.”

ओठाविषयी बोलण्याचा मक्ता नक्कीच अचलचा.तिने सांगून टाकलं,
“ओठांचं काय सांगावं? ओठाचं हवादार चुंबकत्व मला खूपच पसंत आहे.हे ओठ जेव्हा आपल्या प्रेमातल्या व्यक्तीच्या ओठाशी परिचीत होतात,आणि एकमेकाचं संवरण निर्माण करतात,त्यावेळी जवळीकेच्या सीमेचं प्रतीक काय आहे ते दाखवतात.”

दिसायला सुंदर आणि सरल नासिकेची,चाफेकळी सारखं आपलं नाक उडवीत लता म्हणाली,
“मला माहित आहे की सर्वात खास असं शरीराचं वैशिष्ट म्हणजे नाक.नाकाला वासाबद्दलची संवेदना असल्याने प्रत्येक वेळेला नाकाचा उपयोग झाल्यावर माझ्या मेंदुला,सुस्पष्ट जुन्या आठवणी आणि हृदयविदारक विचार,तो वास सांगत असतो.”

दोघी बहिणीत अचलचे डोळे जरा मोठे. हरिणाक्षी म्हटलं तरी चालेल.आम्ही तिच्या डोळ्यांची नेहमीच स्तुती करीत असतो.आणि आपल्या टपोर्‍या डोळ्यांचा तिला अभिमानही आहे.तिने लगेच चान्स घेतला.लताकडे आणि माझ्याकडे बघत अचल म्हणाली,
“पण डोळे मात्र, आपल्याला आपण कशावर विश्वास ठेवावा,हे स्वीकार करायला लावतात.ते जणू दुर्बीणीसारखे, द्रुतमार्गाच्या -म्हणजेच आपल्या मनाच्या-कडेवर बसल्यासारखे असून सतत आपल्याला आठवण करून देत असतात की,आपण एकटेच नसून, आपल्या बरोबर आजुबाजूला आणखीन काही अस्तीत्वात आहेत.आणि आपण आपले डोळे बंद केल्यावर आपल्याच कल्पना शक्तीच्या कक्षेत ते आपल्याला सोडून देतात.
डोळ्यांकडून मला,झाडांमधून वर आकाशाकडे नजर लावून सुर्याकडे पहाण्याची, देणगी मिळाली आहे.

माझ्या डोळ्यांकडून मला काय पहायला मिळतं आणि मिळत नाही हे शक्य झाल्याने, ह्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.मी जे पहाते,त्याचा मी शोध घेते.आणि ज्याचा मी शोध घेते,त्यापासून मी शिकते.आणि जे मी शिकते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”

हे अचलचं सुंदर वाक्य संपता संपता वार्‍याची अशी जोरदार वावटळ आली आणि वाटलं की नक्कीच पाऊस पडणार. पावसाने आम्हाला वारनींग दिली.आणि पडायला लागला.खुर्च्या उचलून नेत आम्ही सर्वानी घरात पळ काढला. आणि आमची चर्चा तुर्तास संपली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Leena
  Posted सप्टेंबर 29, 2010 at 4:48 pm | Permalink

  Khup chan lihtat tumhi vachat rahavas vatat mi fremontla rahate ithe taryabhovti phirayala malahi aawadat Tohi lekh chan hota thanx

  • Posted सप्टेंबर 30, 2010 at 10:50 सकाळी | Permalink

   नमस्कार,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
   माझे दोन्ही लेख आपल्याला आवडले हे वाचून मला बरं वाटलं.
   आपण फ्रिमॉन्टला रहाता.म्हणजे माझे शेजारीच आहात.हे वाचून पण बरं वाटलं.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: