अस्तित्व.. असाही एक विचार.

“माझं तर म्हणणं आहे की सरळ आणि साधेपणाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.”

“एक दिवस आपण सर्व ईहलोकाला जाणार आहोत.हे एक सत्य आहे शिवाय कुणीतरी जन्माला येणार आहे, हे ही एक सत्य आहे.एखादा दिवस आपल्याला अस्तित्वात आणतो आणि तसाच एखादा दिवस कसलाही विचार न होता, आपल्याला जीवनातून मिटवतो.”
प्रो.देसाई मला असं म्हणाले.

मी आज त्यांच्या घरी गेलो होतो.गेले कित्येक दिवस त्यांना सर्दी-खोकल्याने बेजार केलं होतं.त्यामुळे तळ्यावर यायचं त्यांनी तुर्तास बंद केलं होतं.मी मात्र नियमीत तळ्यावर फिरायला जात होतो.कुणी तळ्यावर भेटलं तर त्यांच्याकडून भाऊसाहेबांची प्रकृती कशी आहे ते कळायचं.आज स्वतःच जाऊन त्यांची विचारपूस करावी म्हणून त्यांच्या घरी जाण्याचा विचार केला.

“ह्या जीवनात,एकट्याने किंवा बरोबरीने,सुखाने जगण्याची जबाबदारी,नियतीने आपल्यावरच सोडून दिली आहे.
ह्यासाठीच आपली धडपड, आपल्या सुखासाठी झाली पाहिजे,उपलब्धिसाठी किंवा दुसर्‍याकडून प्रशंसेसाठी किंवा समाज विकसीत करण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवून घेण्यासाठी नव्हे.अशी माझी धारणा आहे.”
असं पुढे म्हणून माझ्याकडून काय प्रतिसाद येतो त्याची ते वाट पहात होते.

मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,हा आज आपल्या मनात विचार का आला?
आपल्याला बरं नाही म्हणून मी पाहायला आलो.”
माझ्या समोर पेपरातल्या एका बातमीचं काटण देत मला म्हणाले,
“मी आता चांगलाच बरा झालो आहे.हे वाचा अमेरिकेकडे दहा हजार न्युक्लिअर बॉम्ब आहेत.रशियाकडे सात हजार आहेत.इस्राईलकडे अमेरिकेने दिलेले शंभर बॉम्ब आहेत.भारत,पाकिस्तान,चीनकडे शेकडोंनी बॉम्ब आहेत.पण इराणने एकही बॉम्ब बनवूं नये म्हणून सर्व त्या देशाच्या मागे लागले आहेत.कुणाचं बरोबर किती आणि चूक किती ह्या वादात न जाता मला एव्हडंच वाटतंय हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या जगण्याच्या विचाराच्या पलीकडचं झालं आहे.आपलाच आपण सर्व नाश करायला तयार झालो आहो.जग फारच स्वार्थी होत चाललं आहे.

जेव्हा फैसला करण्याची पाळी येते तेव्हा,बल्बचा शोध कुणी लावला,बॉम्बचा शोध कुणी लावला,कोण युद्ध जिंकला ह्याचा विचार करायची गरज भासत नाही.गरज भासते ती ही दूरची यात्रा कुणी आनंदाने भोगली याची.
हे जग एकाकी आणि मतलबी आहे ह्या वास्तविकतेवर मात केली गेली पाहिजे.एका कुत्र्याची दुसर्‍या कुत्र्यावर मात करणारं हे जग आहे.आणि प्रत्येकाला मोठा कुत्रा व्हायचं असतं.पण उत्तम कोण आहे हे कळण्याची खरीच जरूरी आहे का?.मी जे आज जगात बघतोय,पेपरात वाचतोय त्यावरून माझ्या लक्षांत आलं की जगात काय ही चूरस चालली आहे.?शेवटी आपण सर्वनाशाकडे झेप घेत आहो.तुमचं काय मत आहे?”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचंच कुत्र्याचं उदाहरण घेऊन माझ्या मनात काय विचार आला ते सांगतो.
मला तर केवळ,सुखाने आणि शांतीने जगण्यासाठीचं अस्तित्व बाळगणारा,व्यवस्थीत पोसलेला,उत्तम अनुभव घेतलेला,बाहेर भटकंती करायला मिळणारा जसा हवा तसा जीवनातला अनुभव घेणारा कुत्रा व्हायला आवडेल.
सगळ्यात बलवान,उत्तम प्रशिक्षित झालेला,आणि कुठच्याही चूरशीला तुडवून टाकणारा कुत्रा व्हायला मी कबूल होणार नाही.”

“मला खरंच काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो.”
असं म्हणत प्रो.देसाई म्हणाले,
“आता पूर्वी सारखं शिक्षण राहिलं नाही.हल्लीचा नवसमाज, मुलांना गुलाम होण्यासाठी, प्रशिक्षण द्यायला रूपांतरीत झाला आहे.शाळेत जाण्यापूर्वी मुलांना काहीच माहित नसतं. नवसमाजाचा पुढे होणारा गुलाम म्हणून त्यांच्या दूरवरच्या शिक्षणास प्रारंभ केला जातो.त्यातले बरेचसे, एक दिवस डॉक्टर,वकिल,किंवा एखाद्या धंद्याचे प्रबंधक होणार हे अपेक्षिलं जातं.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.
आपणा सर्वांकडून हीच समजूत करून घेतली आहे की ह्यातलं एखादं काहीतरी होणं म्हणजे मोठी उपलब्धि झाल्यासारखं आहे.आणि हा एक मोठा संकल्प पूरा केल्या सारखं आणि मोठी जबाबदारी पार केल्यासारखी आहे.
खरं तर,आपलं जबरदस्तीने मत-परिवर्तन केलं गेलंय की,कागदमोड करणं,तासनतास टेलिफोनवर बोलत रहाणं, आणि पैसे कमवणं म्हणजे सुखाकडे जाण्याचा संकेत आहे.”

“मला तुम्ही स्वार्थी म्हटलंत तरी चालेल.”
असं म्हणून भाऊसाहेब सांगू लागले.
“माझं तर म्हणणं आहे की सरळ आणि साधेपणाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.कदाचीत एक दिवस समुद्राच्या किनार्‍यावर भटकत जावं,किंवा एखाद्या दुपारी एखादं वाद्य वाजवीत बसावं.

ज्यात रस नाही ज्यात कसला ढंग नाही, पण दुर्दैवाने, पैसे आवश्यक आहेत असं वाटणारी इर्षा बाळगून,केवळ जन्मापासून अंगात सर्व तर्‍हेची हांव योजनाबद्द झाल्याने तशी अभिलाषा बाळगून आवश्यक नसलेल्या महागड्या वस्तू विकत घ्याव्या असं वाटावं असा विचार न येता, साध्या सुखाचा विचार यायला हवा. शाळेत जाण्यापूर्वी आपल्याला वस्तूंचे आकार कसे असतात, निरनीराळे प्राणी कसे दि्सतात हे घरी शिकवलं जातं. नंतर शाळेत
लिहण्या-वाचायला शिकवून हायस्कूलमधे जाण्यासाठी तयार केलं जातं.चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी चांगले गुण मिळवण्यासाठी लक्ष केंद्रीत केलं जातं.पुढे आयुष्यभर काम मिळण्यासाठी कॉलेजात शिक्षण दिलं जातं.शेवटी आपण डॉक्टर,किंवा वकील होतो.कारण त्यांना भरपूर पैशाची कमाई करता येते.पैसा कमवणं चालू झालं की संसारात लागणार्‍या दुनियादारीसाठी पैशांचा व्यय होत रहातो.मुलांचं शिक्षण आणि पुढे त्यानीही आपल्या पावलावर पाऊल ठेवावं म्हणून हा प्रयत्न असतो.निवृत्तिसाठी मग बचत करावी लागते.”

मी प्रो.देसायांना मधेच थांबवीत हंसत हंसत म्हणालो,
“आणि पिकलं पान होण्यापूर्वी आपण निवृत्त होतो.आणि काहीही करायला मोकळे होतो.सर्व जग आपलंच आहे अशी मनोधारणा होते.मिळणार्‍या स्वातंत्र्याचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडतो, सुख उपभोगायला सुरवात होते आणि एक दिवस हृदयाला झटका येतो.आणि घराच्या दारातच प्राण सोडतो.”

प्रोफेसर म्हणाले,
“ह्या जीवनाच्या मार्गावर कसेही तुम्ही चालला तरी,तुमच्या कहाणीचा शेवट,दुसर्‍या कुणाच्या काहाणीचा जसा होतो तसा होतो. तुम्हाला उदास होण्यासाठी मी हे म्हणत नाही.मला फक्त एव्हडंच दाखवून द्यायचं आहे की,जीवन हे काही तुम्हाला, खूप परिश्रम घेऊन, हवंय तिथं नेण्यासाठी,नाही.
कारण प्रत्येक व्यक्ती त्याच ठिकाणी जाते. जीवन अशासाठी असावं की जिथे आत्ता आहात आणि आत्ता जो वेळ तुमच्यासाठी आहे त्यासाठी खर्ची करायला आहे. तुम्ही ज्यात आनंद घ्याल त्यासाठी जीवन आहे .तुम्हाला आर्थीक फायदा किती झाला आणि राजकारणातला फायदा किती झाला त्यासाठी नाही.
प्रत्येक दिवसा गणीक आपण आपल्याला आठवण ठेवून विचारलं पाहिजे की,आपण आपलं जीवन मजेत घालवतो? कां नाही?जीवनातला प्रत्येक क्षण आपण कसलीतरी मजा करण्यात घालवला पाहिजे.त्यामुळे,त्या क्षणी केलेला मजेचाच अनुभव नव्हे तर जो वेळ आपण आठवणी साठवण्यात, नाती-गोती साधण्यात,आणि अनुभव मिळवण्यात घालवतो त्या आनंदाचा अनुभव मिळवण्यात घातला पाहिजे.”

“तुम्ही बरे व्हा नंतर आपण ह्या विषयावर चर्चा करू ”
असं म्हणत मीच जायला निघालो.कारण लेक्चर द्यायला प्रोफेसरांचा हात कोण धरणार?मीच विषय आवरता घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: