आप्पा आणि गालावरची खळी.

“रांव रे! आप्पा येतां साईट दी.”
(गप्प बस! आप्पा येतोय.(आप्पाची बस येतेय) त्याला जाऊदे.साईड दे)

असले उद्गार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगाव किंवा वेगुर्ले-बेळगाव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.
त्याचं असं झालं आप्पाकाकांना धंद्यामधे-बिझीनेसमधे-जास्त दिलचस्पी होती.नाना आजोबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.
आणि आण्णा म्हणाले मुंबईहून मी त्याच्यासाठी(आप्पासाठी) एक नवीन बस (पॅसिंजर व्हेईकल)विकत घेतो.साधारण २०० रुपयांना (म्हणजे आताचे २० लाख रुपये होतील,आणि त्यावेळी गाड्या इंपोर्ट व्हायच्या.)बस विकत घेतली.
अण्णांचं लग्न झालं तेव्हा आप्पा एक वर्षाचे होते.आणि त्यांच्या आईचं (म्हणजे आमच्या आजीचं)निधन झालं होतं.माझ्या आईनेच त्यांना वाढवलं. अण्णांना आप्पा मुलासारखेच होते.

ही बस-सर्व्हिस आप्पा चालवीत असत.सुरवातीला आठवड्यातून २,३ वेळेला,आणि नंतर रोज आणि नंतर दिवसातून दोन वेळां वाडी-बेळगांव ट्रिप करीत असत.त्याशिवाय आणखी बर्‍याच लोकांच्या असल्या सर्व्हिसीस होत्या.पण आप्पांची एक खासियत होती. नियमीतपणा,सर्वांच्या अगोदर पोहोचायचं,कुणालाही नाखूश करायचं नाही,आणि हंसत,हंसत सर्वांचं स्वागत करायचं.

गोरा रंग,सफेद लांब बाह्यांचा शर्ट,डोक्यावर काळी टोपी,ती पण अर्धी मागे सरकलेली,कोट बरोबर घ्यायचा पण अंगावर कधीच घालायचा नाही तर तो डाव्या खांद्यावर लटकलेला असायचा,तोंडात पानाचा ठेचा,रंगदार पानाचा लाल-तांबडा रंग,दातां-ओठावर ठाम बसलेला,ओळखीचा माणूस दिसला की मधूर हास्य करीत उजव्या गालावरची खळी उठावदार दिसल्याने,समोरच्या माणसाला त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलावंसं वाटायचं.आप्पांच्या
सावंतवाडी-बेळगाव आणि परत, अशा सकाळ संध्याकाळच्या दोन फेर्‍या झाल्यावर घरी आल्यावर आप्पा खांद्यावरचा कोट काकूकडे द्यायचे.मग काकू कोटाचे सर्व खिसे चाचपून चुरलेल्या नोटा आणि पोसाभरून चिल्लर-खूर्दा मिळून दिवसाची कमाई मोजून ठेवायची.

आप्पांच्या २५,३० वर्षाच्या वयावर त्यांच्यात तारूण्यातली बेदरकारी होती.मग नवी करकरीत इंपोर्टेड गाडी चालवताना वेगावर लक्ष कसं रहायचं.त्यात भर म्हणजे धुळीने माखलेले कोकणातले लाल रस्ते,प्रवाशाना वेळेवर पोहोचवीण्याची अंगातली चूरस,त्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांना आणि आप्पांच्या पुढे धांवत असलेल्या इतर गाड्यांना ओव्हेरटेक करून आप्पांची बस भरधांव वेगाने जायची आप्पांच्या अंगातली धमक त्यांना रोखता कशी यायची?.आप्पांची बस  निघून गेल्यावर मागे प्रचंड धुळीचा लोट यायचा.धुळीचा लोट पातळ झाल्यावर समोर पाहिल्यावर लांब गेलीली आप्पांची बस एक ठिपका कसा दिसायची.

गांवातले आणि गांवाबाहेरचे पोलिस आप्पांच्या खिशात होते.आप्पांकडून मिळणारी अधुनमधूनची चिरीमिरी, आणि पोलिस खात्यात वरच्या हुद्यावर असलेले त्यांचेच भाऊ अण्णा, ह्या सर्व गोष्टीकडे बघून आप्पांना ही बेदरकारी करायला एक प्रकारे रान मोकळं असल्यास नवल ते काय?.
पुढल्या गाडीतले पॅसिंजर मागे वळून पाहिल्यावर आप्पांची बस येताना दिसली तर,
“रांव रे! आप्पा येतां,वाईंच साईट दी.”
किंवा आप्पांची बस धुळ उडवीत पुढे गेलेली पाहून,
“आप्पा गेलोसां दिसतां”
असे उद्बार काढायचे.
पण आप्पा त्याबद्दल कधीही शेखी मिरवीत नसत.एखाद्या पोलिसाने नानांच्या कानावर, आप्पानी केलेली अलीकडची बेदरकारी सांगून झाल्यावर,जेव्हा अण्णांना कळायची तेव्हा अण्णांकडून आप्पांची जराशी कान उघडणी व्हायची.

आम्ही त्यावेळी अगदीच लहान होतो.पण आमच्यापेक्षा मोठ्या सख्ख्या किंवा चुलत भावात ह्याची चर्चा व्हायची.
त्यांचे मित्र आप्पांच्या वेगवान बस चालवण्याच्या संवयीबद्दल कौतूकाने चर्चा करायचे,आणि आमचे भाऊ आपल्या मित्रांना सांगायचे
“आमचे काका आहेत ते”
ते ऐकून आप्पांची धडाधडी पाहून आमची छाती फुगायची.
पण आप्पांनी कधी अपघात केले नाहीत.कदाचीत ह्यामुळेच इतरांच्या बस सर्व्हिसपेक्षा आप्पांची बस जास्त पॉप्युलर होती.कारण त्यांच्या बसची तिकीटं आदल्यादिवशीच खपून जायची.
“नानानुं,बेळगांवचा एक तिकीट होयां.”
असं कोणी घरी सांगायला आल्यावर,
“तिकीटां संपली.उद्याच्या तिकीटासाठी काल येत जा”
म्हणून नाना लोकांना सांगताना आम्ही ऐकायचो.नाना आप्पांचं ऑफीस संभाळायचे.ऑफीस कसलं? घरंच ऑफीस होतं.

पण आता त्या गोष्टीला जाऊन ६०,७० वर्षं झाली.आप्पांच्या क्षीण प्रकृतिकडे बघून ते दिवस प्रकर्षाने आठवतात. अलीकडे गोरेगांव स्टेशनवर गाडीची वाट पहात असताना गाडी जवळ केव्हा आली ते आप्पांना मुळीच कळलं नाही.लोकांनी ओरडा करे पर्यंत आप्पा,गाडीबरोबर थोडे फरफटत जाऊन, बाजूला पडले.आप्पाना अलीकडे कमी ऐकायला यायचं.त्याचाच,ही घटना व्हायला, परिणाम असणार.
मी त्यांना गोरेगांवच्या एका खासगी हॉस्पिटलात भेटायला गेलो होतो.तोंडाला मार लागून आप्पांची मान वाकडी झाली होती.

बरं वाटल्यावर आप्पा घरी आल्यावर मी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो.आप्पा जरी अपघातातून खणखणीत बरे झाले होते तरी तोंडाला लागलेल्या मारामुळे ते बोलताना जरा अस्पष्ट बोलायचे.त्याना हंसतांना पाहून मला खूपच वाईट वाटलं.ते त्यांचं मधूर हास्य आणि त्यांच्या उजव्या गालावर दिसणारी ती खळी त्यांचा चेहरा उठावदार करायला दिसतच नव्हती. “फेस रीकंस्ट्रकशनमुळे” जरी त्यांचा चेहरा सुधारला गेला असला तरी ती खळी डॉक्टर “रीकंस्ट्रक” करू शकले नव्हते.

मला पूर्वीची गोष्ट सांगताना विनोद करून जेव्हा अप्पा हंसायला लागले तेव्हा मी लागलीच माझा चेहरा दोन हातांनी झाकून घेतला.आता आप्पांना हंसताना पाहून मला येणारं रडूं माझ्या चेहर्‍यावरून मला लपवायचं होतं.आप्पांचा निरोप घेऊन झाल्यावर जिन्यावरून खाली उतरून जाताना माझ्या तोंडून सहजच बोललं गेलं,
“रांव रे! आप्पा येतां.वाईंच साईेट दी”
कुठे गेले ते दिवस?

आदल्या आठवडयात मला आप्पा गेल्याचा निरोप आला.ते पावसाळ्याचे दिवस होते.आकाश ढगांनी व्यापलेलं होतं.आणि मोसमी वार्‍याच्या जोराने ढगांचा आकाशातला प्रवाह धुळी सारखाच दिसायचा.त्यांच्या अंत्ययात्रेला जात असताना वर आकाशाकडे पाहून माझ्या मनात आलं आणि मी मनात पुटपुटलो,
“आप्पा गेलोसां दिसतां” नव्हे तर
“आप्पा गेलोच”
पण ह्यावेळेला जाताना धुळी ऐवजी, ढगांचा लोट मागे सोडत ते वर चालले आहेत.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. Mangesh Nabar
  Posted ऑक्टोबर 4, 2010 at 7:28 pm | Permalink

  आपल्या या लेखातून आपण, मी न पाहिलेले पण कुठल्यातरी जुन्या साहित्यात वाचलेले सर्विस मोटारींचे दिवस जिवंत उभे केले आहेत. मी वाचलेले एक पुस्तक म्हणजे ” रविवार ते रविवार ” ही कै. शरच्चंद्र टोंगो यांची याच क्षेत्रावरील कादंबरी. ती आठवली याचे श्रेय आपल्या अजून आठवणीत रममाण होणा-या प्रतिभेस द्यावे लागेल. अभिनंदन.
  मंगेश नाबर

  • Posted ऑक्टोबर 6, 2010 at 7:50 pm | Permalink

   नमस्कार मंगेशजी,
   आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून आनंद झाला.आपल्याला योग्य वाटल्यावर आपणाकडून मिळणारे प्रोत्साहन आणखी लिहायला मला उमेद आणते.आणि आपल्याला आवडेल असंच लिहायची माझी जबाबदारी पण वाढते.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 2. savita wagle
  Posted ऑक्टोबर 6, 2010 at 7:58 सकाळी | Permalink

  abakaka chan lihile aahet appanbaddal. Mala mahit navate ki appa bus chalawayache. Khup varshani appa tumhala athavale. wachun chan watale.

  savita

  • Posted ऑक्टोबर 6, 2010 at 7:53 pm | Permalink

   सविता,
   तुझ्याच आजोबाबद्दल लिहिलं मी.माझ्या ह्या वयात आपल्या बुजूरगांची आठवण येत असते.आणि त्यांच्याबद्दल भरभरून लिहायला मन करतं.त्याचंच हे उदाहरण आहे.
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: