मी आणि माझं लेखन.

का कुणास ठाऊक.काल रात्री प्रो.देसाई माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले,
“तुम्हाला लेखन करण्यात विशेष असं काय वाटतं?”
त्यांच्या ह्या प्रश्नावर मी खो,खो हंसायला लागलो.
“हंसू नका,मी गंभीर होऊन तुम्हाला विचारतोय” इती प्रोफेसर.

मी पण गंभीर होऊन त्यांना सांगू लागलो,
“मला लेखन करण्यात विशेष वाटतं.लॅपटॉप ऊघडलेला,बोटं कीबोर्डच्या कीझवर,विचार वाचकांसाठी आणि लेखनाला प्रारंभ.

प्रत्येक क्षणातले मनोभाव,प्रत्येक तोळाभर जमलेलं मनन स्क्रीनवरच्या नोटपॅडवर उतरलं जातं.दवडलेल्या प्रत्येक मिनीटाचा,प्रत्येक सेकंदाचा तोळाभरचा समय,तोळाभरची प्रतीति वाचकांसाठी असते.थोडक्यात सांगायचं तर मला लेखनात खूप गम्य वाटतं.जणू माझं अंतर,माझा आत्मा, माझं प्रेम त्या लेखनात असतं.लेखनात माझा आनंद सामावलेला असतो,मला मनापासून जे काय हवंय ते त्यात असतं.जी उमंग माझ्या शरीरातून तीव्रतेने वहाते,जी आसवं माझ्या डोळ्यांना मोहित करतात ती वाचकांपर्यंत पोहोचतात. माझ्या मनातले विचारसुद्धा असेच सहजपणे माझ्या शरीरातून वहातात आणि शेवटी दुःसहपूर्ण माझ्या बोटांच्या टोकापर्यंत वाहत जातात.”

“वाः वाः! ऐकून बरं वाटलं.आणखी काही तुमच्या लेखनाबद्दल वाटतं ते सांगा.मी आज तुमच्याकडून ऐकणार आहे. मी बोलणार नाही.”
प्रो.देसाई आता खुशीत येऊन मला म्हणाले.

मी पण तेव्हडाच खुशीत येऊन त्यांना म्हणालो,
“माझे लेख हे माझं वाचकांसाठी संगीत आहे.असं हे संगीत की जरी माझ्या गळ्यातून गायलं गेलं नाही तरी माझी समयाशी असलेली लय ठेवून असतं.एखादं लहान मुल आकाशात तार्‍यांकडे बघून आपल्या मनोकामना पूर्ण व्हायची इच्छा दाखवतं तसंच माझ्या लेखनाचं आहे.माझ्या मनातल्या कल्पना माझ्यातूनच,गोष्टी आणि चित्रं, निर्माण करण्यापासून ते वाचकापर्यंत पोहचण्यापर्यंत हे लेखन मला कधीच रोखत नाहीत.लेखन हे माझं स्वप्नं आहे जे रात्रीच्या,अंधकाराबरोबर,माझ्या डोळ्यांच्या पापण्यामागून माझा पाठलाग करीत माझ्याबरोबर सावली सारखं दिवसाच्या उजेडात आल्यावर माझ्या प्रत्येक पावलागणीक मला साथ देत असतं.”

“मी ऐकलंय की लेखक होणं इतकं सोपं नाही”
हे खरं आहे का?”
भाऊसाहेबांनी कशा दृष्टीने प्रश्न केला कळलं नाही.पण मी मात्र त्यांना म्हणालो,
“जरी मलाही अनेक वेळा सांगीतलं गेलंय की लेखक होणं फार कठीण काम आहे.काही शब्द लिहून झाल्यावर,
“माझं झालं,आता ब्लॉगवर टाकू या”
असं म्हणून लेखन केलं जात नाही.तरी लेखन म्हणजे माझं जीवन आहे,लेखन म्हणजे माझं प्रेम आहे,माझं स्वप्न आहे. माझं जीवनातलं अंतिम लक्ष,जे माझं मनोगत आहे, ते माझ्या मनःचक्षूपासून कधीच दूर केलं जात नाही.

पुढचा मार्ग महाकठीण असला….तसं पाहिलंत तर जीवनातल्या प्रत्येक मार्गावर खांच-खळगे आणि कठीण वळणं असतातच.माझं म्हणणं एव्हडंच आहे की माझ्या स्वप्नावर माझा भरवंसा आहे.

कधी अशीही वेळ येते-आणि माझी खात्री आहे की ती प्रत्येकाला येते- जेव्हा माझं मन आणि शरीर विचारांच्या आणि भावनांच्या भाऊगर्दीने एव्हडं भारावलेलं असतं,की जणू मला वाटतं की माझ्या वाचकांनी माझ्यापासून पाठ फिरवली आहे.आणि कुणी माझं ऐकायलाच तयार नाही.
अशा प्रसंगी जेव्हा अश्रूनी माझे डोळे भरून येतात,आणि पुढे माझ्या गालावर ओघळतात,तेव्हा मी माझा लॅपटॉप उघडतो, कीबोर्डवर बोटं ठेवतो आणि लिहायला सुरवात करतो.”

“मी मघाशी तुम्हाला म्हणालो की मी बोलणार नाही पण तुमचं हे ऐकून मला बोलल्या शिवाय राहवत नाही.”
अशी प्रस्थावना करीत प्रोफेसर म्हणाले,
“लेखनाकडून तुमच्याबद्दल कसलाच निर्णय घेतला जात नसतो. ते तुमच्या जवळ बसून तुमच्याकडे कमी लेखून बघत नसतं. जीवनचा मार्ग मोठा कठीण आहे,लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याची तुम्ही पर्वा करण्या ऐवजी, तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं याचा विचार व्हावा,असं जरी सांगीतलं गेलं असलं तरी,दिलासा देणारी एक गोष्ट पक्की आहे की,तुमच्या मनात असलेलं कुठलही कष्टदायी गुपीत तुम्ही सांगत असताना,कोणतीही निर्णायक दृष्टी न ठेवता लेखन तुमचा हात हातात घेऊन, तुमच्या जवळ शांत बसून असतं.
मग तो लेख असो,कविता असो की आणखी काही असो तुमचं लेखन तुम्हाला सृजन करतं.”

भाऊसाहेबांचं म्हणणं मला इतकं पटलं,की मी लागलीच त्यांना थोडा भाऊक होऊन सांगीतलं,
“आणि कदाचीत,एखाद दिवशी,माझ्या लेखनाच्या मदतीने आणखी एखाद्या व्यक्तिला जाणीव होईल की,ह्या एव्हड्या जगात ती काही एकटी नाही.खरं सांगायचं झालं तर,मी जर का विश्वास ठेवीत असेन तर तो लेखनाच्या क्षमतेवर.”

माझं हे ऐकून भाऊसाहेब गप्प का झाले हेच मला कळेना.
“अहो,उठा सूर्यपण उगवला”
असं जेव्हा माझी पत्नी मला उद्देशून म्हणाली,तेव्हांच मला जाग आली.
स्वप्नातून जागा झाल्यावर,एक मात्र मी निश्चीत केलं,की आज संध्याकाळी तळ्यावर प्रो.देसायांची गाठ झाल्यावर हे सर्व सांगायला आज विषय बरा मिळाला आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: