माझी खास खोली.

धाके कॉलनीतल्या जुन्या इमारती आता पाडून नवीन टॉवर्स यायला लागले आहेत.बरेच लोक पैसे घेऊन दुसर्‍या ठिकाणी जातात,तर काही नव्या टॉवर्समधे आणखी जागा घेऊन रहायला तयार होतात.प्रत्येकाच्या आर्थीक परिस्थितीवर आणि त्यांच्या इच्छेवर हे अवलंबून असतं.

आमचे शेजारी, तावडे कुटूंब, टॉवरमधे रहायला गेले.त्यांनी तेराव्या मजल्यावर दोन फ्लॅट्स घेतले.त्यांच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभं राहिल्यावर जुहूची चौपाटी स्पष्ट दिसते.वारा पण मस्त येतो.संबध फ्लॅटमधे वारा खेळत असतो.काही वेळा अतिवार्‍यामुळे खिडक्या बंद कराव्या लागतात.

सुलू तावडेला आपला नवीन फ्लॅट खूप आवडतो.मला काल तिने तिच्या घरी बोलावलं होतं.
मी तिला विचारलं,
“ह्या नव्या जागेत तुला विशॆष असं काय आवडतं.”

मला म्हणाली,
“काय आवडत नाही ते विचारा.आम्हाला प्रत्येकाला इकडे स्वतंत्र खोली असून,प्रत्येक खोलीला स्वतंत्र बाथरूम जोडलेली आहे.मला माझी खोली आणि त्याहीपेक्षा माझी बाथरूम आवडते.”

“कां असं काय तुझ्या बाथरूममधे आहे की ती तुला एव्हडी आवडावी?
मी सहाजीक कुतूहलाने सुलूला प्रश्न केला.

“मला पहिल्यापासून वाटायचं आपणच वापरू असं आपलं एक स्वतंत्र बाथरूम असावं.एकदाची गंमत तुम्हाला सांगते.ह्या बाथरूमच्याच संबंधाने.”
असं म्हणून एक थंडगार लिंबाच्या सरबताचा ग्लास माझ्या हातात देत म्हणाली,
“मी एकदा, माझे काही दृढविश्वास आहेत, त्यावर विचार करीत होते, आणि माझ्या लक्षात आलं की,हा विचार करीत असताना, मी माझ्या बाथरूम मधे थपकट मारून बसले होते.आणि लगेचच माझ्या लक्षात आलं की,प्रत्येकाला स्वतःची अशी एक खोली,एखादी स्वतंत्र जागा किंवा कुठेतरी शांत बसावं असं क्षेत्र असावं.त्यात बसून रहावं.आणि कुणीही कटकट करायला येऊ नये. आणि आपल्याच विचारत मग्न होऊन जावं”

मी सुलूला म्हणालो,
“खरं आहे तुझं म्हणणं, पण हे थोडसं चमत्कारीक वाटतं.”

मला म्हणाली,
पण माझ्या बाजूने खरं सांगायचं झालं तर,कुणापासूनही दूर रहायचं झालं तर माझी बाथरूमच उपयोगी आहे असं मला वाटतं.
अगदीच लंगडं कारण आहे ना! तेच मला सर्व प्रथम वाटलं.नंतर माझ्या लक्षात आलं की,जेव्हडी मी माझ्या बाथरूममधे वेळ घालवते तेव्हडा माझ्या बेडरूममधे घालवीत नाही.माझी बेडरूम मला एखादी होटेल रूम सारखी वाटते. शिवाय माझी बाथरूम मला वाटत होतं त्यापेक्षा मस्त आहे असं वाटतं. उदा.त्यात दोन सिंक्स आहेत.एक सिंक माझ्या प्रत्यक्ष वापरात असते आणि दुसरं,मला माझी चेहरापट्टी वगैरे करयाला उपयोगी होत असतं.अलीकडे बरेच दिवस मी असाच वापर करते.
ही एक प्रकारची मला संवय झाली आहे.शिवाय ह्या संवयीमूळे मला बरंही वाटायला लागलं आहे.
बर्‍याच लोकांची अशी एखादी जागा असतेच जिथे ते त्यांचा वेळ दवडतात.एका अर्थी ती एक संरक्षीत जागा असते.”

जरा डोळ्यासमोर चित्र आणलं की, आपल्या जॉबवरून आल्यावर, घरात पाय ठेवल्यावर,तुमची अशी जी जागा असते त्यात जाऊन सर्व शरीर झोकून द्यावं.आणि लगेचच तुम्हाला अगदी आरामात आहे असं वाटावं.आपली अशीच एक खोली असावी जी आपल्याला हवी तशी सुशोभित करता यावी.जसा तुमच्याच हाताच्या मागच्या भागावर काय आहे हे फक्त तुम्हालाच माहित असतं तसंच तुमच्या अशा ह्या खोलीची इंच,इंच जागा तुम्हालाच माहित असते. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला समर्थ समजता आणि तुमचा तिथे पूरा काबू असतो. मला नक्कीच माहित आहे की माझी जर अशी स्वतंत्र खोली नसती तर मी स्वतःला,रोज घरी आल्यावर, अत्यंत कमजोर व्यक्ति समजले असते.

मला खोटं सांगायचं नाही,बाथरूम ही माझी खास खोली आहे हे सांगायला जरा अजीब वाटतं खरं.पण काय करणार?हे आहे हे असं आहे.मला जे खासगी वातावरण हवं आहे ते मला तिथे मिळतं.त्यासाठी मला भारी प्रयास करावा लागत नाही.आणि हे नेहमीच मला अतिरिक्त आहे असं वाटतं.”

हे सुलूने सगळं सांगीतल्यावर,
“बघू तुझी बाथरूम कशी आहे ती?”
असं म्हणायला मी धाडस केलं नाही.कारण ती तिची खासगी जागा आहे असं ती मला म्हणून गेली होती.

“प्रत्येकाला आपल्यात सुधारणा करायला पात्रता असावी लागते.प्रत्येकाला आनंद मिळायला,जरी तो काही क्षणाचा असला तरी,आपली अशी खोली असायला आपण पात्र आहे असं वाटलं पाहिजे.”
असं म्हणून रिकामा झालेला लिंबाच्या रसाचा ग्लास मी तिच्या हातात दिला.

“मला माहित होतं तुम्ही नुसतेच माझ्या विचाराशी सहमत होणार नाही, तर माझ्या विचाराची प्रशंसा पण करणार.म्हणूनच मी तुम्हाला आज घरी बोलावलं.”
मी उठता उठता मला सुलू म्हणाली.

श्रीकॄष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: