अनवहाणी चालणं.

मला आठवतात ते दिवस.

“गै वयनी,कालचां काय शिळांपाक्यां असलां तर वाढ गे!”

माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या अंगणाच्या बाहेरून दगडूमहाराचा( दगडूमहार ह्याच नांवाने तो ओळखला जात असल्याने तसं नाईलाजाने म्हणावं लागतं.) हा आवाज ऐकल्यावर माझी आजी मांगरात जाऊन अंगावरचं लुगडं सोडून मांगरातून जुनं लुगडं-त्याला कोकणात बोंदार म्हणायचे-नेसून यायची.ते झाल्यानंतरच दगडूमहाराच्या करटीत-नारळ फोडून नारळातलं खोबरं काढून झाल्यावर उरलेले कडक आवरणाचे दोन भाग. त्यातल्या अर्ध्या भागाला करटी म्हणायचे-आम्ही लहान मुलांनी खाऊन झाल्यावर उरलेली पेज आणि फणसाची भाजी,त्याच्या करटीत वरून टाकायची.करटीत टाकलेली पेज पिऊन झाल्यावर फणसाची भाजी त्या करटीत टाकायची.टाकायची म्हणण्याचा उद्देश खरंच वरून वाढायची.दगडूमहाराला कसलाच स्पर्श होऊ नये हा उद्देश असायचा.चुकून स्पर्श झाल्यास “आफड” झाली असं म्हणून आंघोळ करावी लागायची.दगडूमहार निघून गेल्यावर आजी “बोंदार” बदलून घरातलं लुगडं नेसायची.आणि घरात यायची.

त्यावेळी आमच्या त्या लहान वयात,अवलोकनापलीकडे,आमच्या डोक्यात, हे बरं की वाईट,स्पृश्य-अस्पृश्यता,हा माणसा माणसातला वागण्यातला फरक,ह्याला माणूसकी म्हणायचं काय? असले विचार येत नसायचे.आता भुतकाळात मागे वळून पाहिल्यावर त्याची आठवण येऊनही लाज वाटते.

त्याचं असं झालं,दगडूमहाराचा पणतू,रघू, मला भेटायला घरी आला होता.मी थोडे दिवस आजोळी रहायला गेलो होतो.मी आल्याचं त्याला कुणीतरी सांगीतलं.हा रघू, चांगला शिकून आता गावातल्या शाळेत हेडमास्तर म्हणून काम करतो.त्याला त्याचे पंजोबा-दगडूमहार-निटसा आठवत नव्हता.
इकडची,तिकडची चर्चा झाल्यावर मी रघूला म्हणालो,
“मला माझ्या एका कुतूहलाचं तू उत्तर द्यावंस.गावातले बरेच लोक अजून अनवहाणी चालतात, ह्याचं कारण काय असावं?.गरीबी हे एक कारण असू शकतं. बायका तर वहाणं घालतच नाहीत आणि बरेचसे पुरूषही अनवहाणी चालतात.”

मी त्याच्या वडलांची ह्याबाबतीत चौकशी केल्यावर आपल्या वडलांबद्दल तो सांगायला लागला,
“जितकं जमेल तितकं माझ्या वडलांना अनवहाणी चालायला आवडायचं.असं केल्याने त्यांचा त्यांच्या चालण्याच्या क्रियेत ताबा आहे आणि त्याशिवाय हे त्यांना आरामदायक आहे असं वाटत असायचं.लहानपणी त्यांनी कधीच वाहाणा वापरल्या नाहीत.
“लहानपणी शाळेत जातानासुद्धा.पायात वहाणा घातल्यावर माझ्या मनावर थोडा ताण यायचा,आणि जखडल्यासारखं वाटायचं.त्यामुळे इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करायला जरा कठीण व्ह्यायचं.”असं ते म्हणायचे.
वहाणा बहिषकृत करायला हव्या होत्या अशातला काही भाग नाही. फक्त त्यांना वाटायचं त्याची जरूरी नव्हती.”

“गावात हे सर्व चालतं.कुणी एव्हडं लक्ष देत नाहीत.पण शहरात वहाणांची फार जरूरी असते.वाहाणांशिवाय चालणं अप्रशस्त समजलं जातंच,त्याशिवाय गर्दीत कुणाचा जड बुटांचा पाय कुणाच्या अनवहाणी पायावर पडला तर पायाची कळ मस्तकात गेल्याशिवाय रहाणार नाही.”
मी रघूला म्हणालो.

मला रघू म्हणाला,
“मी मास्तर झाल्यानंतर पायात वहाणा घालायला लागलो.
त्या अगोदर इतका अनवहाणी चालत असल्याने,उन्हाने तापलेल्या रस्त्यावर किंवा टोकदार दगडावरून चालल्यावर मला कसल्याच वेदना होत नव्हत्या. काही शहरी लोक हे अनवहाणी चालणं काहीतरी विलक्षण आहे असं समजतात,पण मला फायद्याचं वाटतं. लहानपणाचं मला आठवतं,एकदा शेकोटी करून वापर झाल्यावर विझत असलेल्या लाकडाच्या तुकड्यावरून मी चालत जात आहे हे लक्षात आलं असताना,मी पटकन उडी मारून दूर झालो आणि पायाला लागलेली जळती राख धुऊन टाकली.माझ्या तळव्यांना काही झालं नव्हतं.कारण माझे तळवे तेव्हडं सहन करण्याच्या स्थितीत होते.”

रघू थोडासा,विचार करण्यासाठी गप्प झाला असं मला वाटलं.पण नंतर म्हणाला,
“माझ्या वडीलाना वहाणा आवडत नसायच्या त्याचं कारण कदाचीत नदीत कमरेपर्य़ंत पाण्यात दिवसभर उभं राहून गळाला लागणार्‍या मास्यांची वाट पहाण्यात त्यांचा बराचसा वेळ जात असल्याने,त्यांना वहाणांची जरूरी भासत नसावी.”
पुढे सांगू लागला,
“किंवा कदाचीत आमच्या हाडामासांत ते मुरलेलं असेल.मला आठवतं,माझी आजी तर अगदी लहानपणापासून नदीच्या किनार्‍यावरून किंवा रानातून चालायची अर्थात अनवहाणी.मी ऐकलंय की माझ्या आजोबांनी आयुष्यात कधी वहाणा वापरल्या नाहीत.शेवटी,शवटी त्यांना कापर्‍यावाताचा रोग झाला होता.ते म्हणायचे वहाणा घालून चालण्याने तोल सांभाळला न गेल्याने पडायची शक्यता असल्याने,ते अनवहाणीच चालायचे.तसंच इकडे अजून गावातल्या बायका चप्पल पायत घालून चालणं अप्रशस्त आहे असं समजतात.”

मला हे रघूने दिलेलं,स्पष्टीकरण जरी पटलं नाही तरी मला गावातल्या लोकांच्या रीति-रिवाजाचा आदर करावा असं मनात आलं.अनवहाणी चालल्याने तळव्यांना होणारे अपाय वगैर सांगण्यात काही हाशील नव्हतं.

मी रघूला म्हणालो,
“जर का वैकल्पिक असतं तर नक्कीच बरेचसे पैसे वाचले असते.वहाणांचा शोध लागण्यापूर्वी लोक अनवहाणीच चालायचे.अनवहाणी असताना त्यांना अवतिभवतिचा चांगलाच बोध रहायचा.मी कुठेतरी वाचलंय की,पळत असतानासुद्धा काहींना वहाणा घालायला आवडत नाही.कदाचीत हे ऐकून  विचित्र वाटत असेल पण असं सिद्ध केलं आहे की जर का तुम्ही अनवहाणी धावत असाल तर ते तसंच करीत रहा.अनवहाणी चालल्याने,आणि धावल्याने
तुमच्या पायाच्या पोटर्‍या मजबूत होतात आणि खोटा कमी झिजल्या जातात.”
दुर्भाग्याने,बरेचसे लोक अनवहाणी चालू शकत नाहीत कारण त्यांच्या पायाच्या नाजूक तळव्याना आरामदायी वाटत नसावं.पण तुझी ही कथा ऐकल्यावर मला वाटतं अनवहाणी चालण्याचं स्वातंत्र्य असावं.”
असं म्हणून मी हा विषय बदलला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफ्रनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Mangesh Nabar
  Posted जानेवारी 1, 2011 at 10:11 pm | Permalink

  आपण अनवाणी या ( माझ्या मते प्रचलित) शब्दाऐवजी अनवहाणी हा शब्द वापरला आहे.असे का ?

  • Posted जानेवारी 2, 2011 at 12:10 pm | Permalink

   नमस्कार मंगेशजी,
   आपण पृच्छा कराल अशी अपेक्षा होती.आपला प्रश्न छान आहे.माझ्याही मनात प्रथम “अनवाणी” असंच लिहायचं होतं.
   माझी आई मला माझ्या लहानपणी,
   “रे! अनवाणी जाऊं नकोस”
   असं शंभरवेळा म्हणायची.
   पण चक्क वहाणेवर लिहित असल्याने “अनवहाणी” लिहिणं योग्य होईल असं वाटलं.कदाचीत मुळ शब्द “अनवहाणी” असाच असावा असं मला वाटतं.पण आपण म्हणता त्याप्रमाणे “अनवाणी” म्हणणं हेच प्रचलीत आहे हे खरं आहे.
   “अनवहाणी”त ला “हा” कालांतराने गाळला जाऊन “अनवाणी”
   म्हणणं जास्त सोयीस्कर झालं असावं असं मला वाटतं.माझं चुकतही असेल.
   कोकणात चप्पलेला “जुतं” किंवा “पायतान” म्हणतात.”जुतं”
   हा शबद कुठून आला ह्याच्या मी शोधात आहे.पण “पायतान”
   म्हणजे ज्यात “पाय” ताणून घातला जातो ते “पायताण” असा मुळचा शब्द असून पुढे “पायतान” असा शब्द प्रचलीत झाला असं मी कुठेतरी वाचल्याचं स्मरतं.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: