डुलकी.

“थोडक्यात मी म्हणेन सगळं जग निश्चिंत आणि शांत रहाण्यासाठी लोकांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात थोडा डुलकी घेण्यासाठी वेळ ठेवावा.”

आज शुक्रवार होता.मी ऑ्फिसमधून जरा लवकर निघालो.लवकर निघण्याचं आणखी एक कारण होतं.अपनाबजारमधे हापूसचे आंबे आले आहेत हे मी दुकानाच्या बाहेर लिहून ठेवलेली पाटी सकाळी ऑफिसात जाताना वाचली होती.
एक चांगली देवगडच्या हापूस आंब्याची पेटी घेऊन दुकानाच्या बाहेर पडत असताना मदन घारपुरेला त्याच्या बिल्डिंगमधे चढताना पाहिलं.तो अपनाबजारच्या समोरच रहातो.आंब्याची पेटी घेऊन त्याच्या घरी कुठे जायचं म्हणून काय करावं याचा विचार करीत होतो तेव्हडयात माझ्या पुतण्याची गाडी दिसली. त्याला थांबवून ती पेटी त्याच्याजवळ घरी नेण्यासाठी देऊन मदनकडे जरा गप्पा मारायला जायचं म्हणून ठरवलं.

मदनला बिल्डिंगमधे चढताना पाहिल्यानंतर ह्यात अर्धा तास निघून गेला होता.
मदनबरोबर एखादा चहाचा कप ढोसावा म्हणून त्याच्या घरच्या पायर्‍या चढत वर गेलो.बेल दाबल्यावर त्याच्या मुलीने, प्रियाने,दार उघडलं.माझ्याच तोंडावर हात ठेऊन मला जोराने बोलण्याचा प्रतिबंध करून आत बोलावलं.आणि कानात हळू बोलली,
“बाबा आत्ताच आले आहेत आणि झोपले आहेत.”
मी प्रियाला विचारलं,
“काय त्याला बरं आहे ना?”
मला म्हणाली,
“ते अर्धा तास डुलकी काढून मग उठणार आहेत.त्यांना अशी डुलकी काढण्याची संवय आहे.तुम्हाला त्यांनी अपनाबजारात उभे असताना पाहिलं.मला म्हणाले,
तुम्ही आलात तर बसवून घे.”
खरंच अर्ध्या तासाने मदन उठला,फ्रेश होऊन माझ्या जवळ येऊन बसला.
मी मदनला म्हणालो,
“अरे,हे डुलकी काय प्रकरण आहे.?एकदा मी तुझ्या ऑफिसमधे आलो होतो.तुझ्या कॅबिनच्या बाहेर बसलेला शिपायी मला म्हणाल्याचं आठवतं,
“साहेब लंच अवरमधे जरा डुलकी काढतात.कुणी आलं तर थोडावेळ बाहेर बसवून घ्यायला सांगीतलंय.”
मी तुला त्यावेळी विचारलं नाही.पण आता तुला घरी विचारल्याशिवाय राहवत नाही.”
डोळ्यावरचा चष्मा हातात घेऊन टॉवेलने फुसता फुसता थोडावेळ हंसत राहून मला म्हणाला,
“डुलकी काढण्याबद्दल मला विशेष वाटतं.एखाद्या कटकटीच्या दिवशी,किंवा एखाद्या खूप परिश्रम झालेल्या दिवशी,घरी आल्यानंतर थोडीशी आरामदायी डुलकी काढल्यानंतर ताजेतवाने होण्यात जी मजा असते ती वेगळीच म्हटली पाहिजे.आता ह्या डुलकीला काही म्हणतात “उर्जादेती डुलकी.” ही साधारण तासभराची असते,पण माझं पाहिलंत तर मला अर्ध्या तासाची डुलकी पूरी पडते.ह्या डुलक्या कधीकधी आळसात येतात आणि कधीकधी आदल्या आणि रात्रीच्या झोपेच्या कमतरतेमुळेसुद्धा येतात.पण इतरवेळी डुलकीमुळे नक्कीच थोडा सुट्कार मिळतो.”

मी मदनला म्हणालो,
“हे काय मी नवीनच ऐकतोय.कुठेतरी सांयटिफीक सेमिनारला जाऊन आल्यावर एखाद्या चर्चेच्या विषयात डुलकीबद्द्ल कुणीतरी रिसर्च करून पेपर वाचल्यासारखा वाटतो.”

“तसं काही नाही.मी हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो.”
असं म्हणून जरा गंभिर होऊन मदन मला सांगायला लागला,
“डुलकीबाबत चांगलं सांगायचं म्हणजे,तुम्ही एकदा डुलकी काढलीत आणि त्यातून जागं झाल्यावर नुसतंच ताजंतवानं वाटत नाही तर तुम्ही चांगल्या लहरीतपण म्हणजेच मुडमधेपण येता.मला बरं न वाटल्यास, मी उपचार करण्यापूर्वी एक डुलकी काढतो.मला जर का कटकटीचा दिवस गेला,कुणाशी वादविवाद होऊन मन वैतागलं असल्यास,चिडचीडेपणा अंगात आला असल्यास,मी सरळ घरी जातो आणि एक डुलकी काढतो.नंतर मात्र एकदम ताजातवाना होतो,मला स्फुर्ती येते.बॅटरी चार्ज कशी करतात तसं वाटतं.काही काम करावं असं वाटतं,खाली जाऊन एखादी चक्कर टाकावीशी वाटते.

प्रामाणीकपणे सांगायचं झाल्यास, डुलकी काढून झाल्यावर उठायला अंमळ जीवावर येतं. पण एकदा उठल्यावर तासनतास काम करायला मी तयार असतो.
कुठचीही गोष्ट यशस्वीपणे हाताळण्यासाठी लागणार्‍या क्ल्रुप्तिचा जरा विचार केला तर: तुम्हाला बरं वाटावं म्हणून टीव्हीवर एखादी मालिका बघण्यात वेळ घालवण्या ऐवजी,किंवा ते एखादं खिन्नं करणारं गीत ऐकून झाल्यावर परत परत  ऐकण्यासाठी तुम्ही प्रयत्नात असण्याऐवजी मी तुम्हाला सुचवीन की उब येण्यासाठी एखादी चादर लपेटून,आणखी एक उबदार उषी घेऊन, तुमच्या बिछान्यात किंवा तुमच्या सोफ्यावर पडून राहून डुलकी काढण्यात आराम करावा.

मौज मजा करण्याचा विचार केला तर: इकडे तिकडे भटकण्यात आपण वेळ घालवतो,गाडी काढून लांब कुठेतरी फिरून येतो त्याऐवजी डुललकी काढावी. डुलकी तशी दिसायला साधारण दिसते,खरंतर ती एक छोट्याश्या विश्रामाचा प्रकार आहे.तिच्यामुळे तुम्हाला ताजंतवानं वाटतंच शिवाय पुढे घेतल्या जाणार्‍या जबाबदार्‍यांना ती तुम्हाला नवजीवन देते.”

मदनचं हे सर्व डुलकीबद्दल पुराण संपताच त्याची पत्नी चहाचे कप घेऊन आली आणि मला एक कप देत म्हणाली,
“थोडक्यात मी म्हणेन सगळं जग निश्चिंत आणि शांत रहाण्यासाठी लोकांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात थोडा डुलकी घेण्यासाठी वेळ ठेवावा हे तात्पर्य.”

मला वाटलं,मदन काहीतरी रागावून आपल्या पत्नीला बोलेल.
पण तो आत्ताच डुलकीतून जागा होऊन आल्यामुळे ताजातवाना आणि लहरीमधे म्हणजे मुड्मधे होता, हे त्यांने आम्हा दोघांकडे पाहून आपल्या चेहर्‍यावरचं हास्य दाखवलं,त्यावरून मी समजलो,
“हा डुलकीचा परिणाम असावा.”
असं मी मनात निश्चित केलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनेया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: