चिकटमातीच्या बाहुल्या.

“चित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून मी तिला जवळ घेतलं.ते अश्रू आनंदाचे होते आणि दुःखाचेही होते.”

अलीकडे मुंबईत खूप पाऊस पडला की पाणी प्रचंड तुंबून रहातं.सगळे व्यवहार ठप्प होतात.तसं पूर्वी होत नव्हतं.त्याचं कारण काय असावं ह्याचा विचार करण्या ऐवजी माझं मन तो दिवस आठवण्यात मग्न झालं.असाच मी एकदा अंधेरी स्टेशन जवळ वरसोवाच्या बससाठी लाईनीत उभा होतो.पाऊस जोरात पडत होता.माझ्या मागे चित्रा उभी होती.तिने मला हाय म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं.

ते पावसाळ्याचेच दिवस होते.बसमधे आम्हा दोघाना उभं राहून प्रवास करावा लागला होता.चित्रा नवरंग जवळ रहात असल्याने ती माझ्या अगोदर उतरणार होती.उतरण्यापूर्वी मला म्हणाली,
“आम्ही ठाण्याला घोडबंदर जवळ एक टुमदार बंगलावजा घर घेतलं आहे.आणि लवकरच तिकडे रहायला जाणार. पाऊस संपण्यापूर्वी तुम्ही वेळ काढून तिकडे या.पावसात तिकडे मजा येते.”

चित्रा तेव्हा निवृत्त होणार होती.तिचा नवरा आदल्यावर्षी निवृत्त झाला होता.
“मी नक्की येईन.”
असं सांगेपर्यंत तिचा स्टॉप आला.आणि ती उतरली.
चित्राला एक मुलगी होती.तिचं लग्न होऊन तिला एक मुलगी होती.

मी ज्यादिवशी चित्राच्या घोडबंदरच्या बंगल्यावर गेलो त्यादिवशी भरपूर पाऊस पडत होता.मला चित्राच्या मुलीने अंधूकसं ओळखलं पण तेव्हड्यात चित्रा आली.मला पाहून तिला खूप आनंद झाला.

चित्राची नात बाहेर अंगणात पावसात खेळत होती. बंगल्यासमोर छान बाग होती.आणि छोटसं पटांगण होतं.चित्राची मुलगी आपल्या मुलीला आत घरात ये म्हणून ओरडून सांगत होती.पण ती छोटी येणार नाही म्हणून हाताने दर्शवीत होती.तिच्या अंगावर लाल रंगाचा रेनकोट होता आणि खाली पायात लहान मुलांचे रेनबूट होते.
चित्रा आपल्या मुलीकडे बघून हंसत होती.आणि मुलगी रागावलेला चेहरा करून आईला चिडून म्हणाली,
“तुच तुझ्या नातीचे वेडे लाड करीत आहेस.आजारी झाली तर? आणि चिखलात ती आता घातलेले कपडे मळवून येणार आहे त्याचं काय?”

हा त्यांचा संवाद मी आल्या आल्या ऐकत होतो.मला तो सीन पाहून जरा गंमत वाटली.
जेवणं झाल्यावर मी सहज चित्राला विचारलं,
“तुझ्या नातीला घरात यायला सांगण्या ऐवजी तू हंसत का होतीस? ती चिखलात नाचत होती आणि कपडे खराब झाले होते हेही खरं आहे.”

“माझे लहानपणीचे दिवस मला आठवत होते.म्हणून मी हंसत होते.”
चित्राचं हंसं लक्षात ठेवून मी त्या संबंधाने प्रश्न विचारला ह्याचं कौतूक करीत ती मला असं म्हणाली.
आणि पुढे सांगू लागली,
“कोकणात पावसाच्या दिवसात आमच्या घरामागच्या परड्यात पाणी साचल्यावर चिकण मातीतून छान छान आकाराच्या बाहुल्या आम्हाला तयार करता यायच्या.लहान असताना माझा ह्या गोष्टीवर खूप भरवसा होता.असा एकही पावसाळा गेला नाही की मी माझ्या लहानपणी रेनकोट अंगावर घेऊन आणि पायात माझ्या बाबांचे रेनबूट घालून परड्यात तासनतास राहून चिखलात खेळत नसायची.खरं म्हणजे कपडे एकदम मळून जायचे.”

“म्हणून तू तुझ्या नातीला पावसात मनमुराद खेळायला देत होतीस की काय?”
मी चित्राला प्रश्न केला.

“नाही,नाही, गंमत पुढेच आहे.”
असं म्हणून, जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढवीत चित्रा पुढे सांगू लागली,
“मी जेव्हा आई झाली,तेव्हा पार विसरून गेली की,लहान मुलांनी आपले कपडे मळवायचे असतात.मला आठवतं माझी हीच मुलगी लहान असताना चिखलात खेळताना पाहून, चिखलाच्या बाहूल्या तयार करताना पाहून,लहानपणी मी स्वतः माझ्या आई समोर अशीच चिखलात खेळत असतानाही, तिने आपल्या हातात चिकण माती घेऊन कपडे मळवताना पाहून मात्र मी माझं नाक मुरडल्या शिवाय राहिली नाही.
मला आठवतं माझे बाबा, मला चिखलात खेळताना पाहून,माझ्या जवळ येऊन म्हणाले आहेत की चिखलात खेळून कपडे मळवूनसुद्धा तू चांगलीच मुलगी होणार आहेस.”

“आतां माझ्या लक्षात यायला लागलंय.पिढी,पिढीतला फरक जाणवायला लागलाय.”
मी म्हणालो.

मला समजावून सांगताना म्हणाली,
“माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर जीवनातले महत्वाचे धडे शिकत असताना,मी मात्र तिच्या मळक्या कपड्याविना दुसरं काहीच मनात आणीत नव्हते. खरं म्हणजे,ती जीवनात शिकत होती की,जे आपल्याला आवडतं,जे करताना आपल्याला आनंद होतो,ते करायला कुणाचीच हरकत नसावी,मात्र जोपर्यंत त्याचा कुणाला उपद्र्व होत नाही तोपर्यंत.ती शिकत होती की अगदी साध्या गोष्टीतून जीवन जगण्यालायक असतं.ती शिकत होती की लहान मुलांनी कपडे मळवले तरी चालतं.

एकदा मला आठवतं, माझी मुलगी साधारण सहा वर्षांची असताना एका पावसाळ्या दिवशी दरवाज्यात येऊन उभी ठाकली.पूर्ण भिजलेली होती. पायातले बुट काढून झाल्यावर ओले चिंब मोजे काढून त्यातलं पाणी पिळून काढून कोपर्‍यात टाकून घरात आली.नंतर अभ्यास करायला बसली असताना कुरकुरायला लागली.तिची पावलं खूपच दुखत होती.म्हणून मी तिची पावलं न्याहाळून पहात असताना,मला दिसून आलं की,ती एव्हडी ओली चिंब भिजली होती की,गच्च भिजल्यामुळे तिच्या पावलांना सुरकुत्या आल्या होत्या.बादलीत पाणी घेऊन त्यात तासनतास पावलं बुडवून कशी व्हावीत तशीच झाली होती.मी तिला विचारलं,
“कितीवेळ तुझे पाय पाण्यात होते.?”
अगदी निष्पापपणे म्हणाली,
“अं,अं, शाळेतल्या मैदानातल्या चिखलात पहिल्या सुट्टीपासून खेळत होतो.”
माझ्याच डोक्यात थोडं गणीत करून पाहिल्यावर दोन-तीन तास ती पाण्यात आणि चिखलात खेळत होती असं माझ्या लक्षात आलं. पावलं दुखली तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं अशी मी समजूत करून घेतली.
मी बरीच भावनावश झाली होते,आणि तिला सांगावसं वाटलं होतं की,
“तू काय केलंस ते बरोबर नव्हतं”
पण ज्यावेळेला मी तिच्या डोळ्यात पहायला लागली तेव्हा  मलाच माझा चेहरा दिसायला लागून माझी आई मला बाबांचे रेनबूट कुठे ठेवले आहेत तेच सांगत आहे असं भासलं.मी माझ्या मुलीला माझ्या मिठीत घेतलं आणि तीला म्हणाले,
“तुझ्या आईने तुझ्या वयावर असंच केलं होतं.चिखलात खेळणं मजेचं असतं.पण त्या अगोदर तुला रेनबूट घेऊया,परत तू असंच करण्यापूर्वी मात्र.”

प्रत्येक पावसाळ्यात एखाद्या दिवशी चिखलात,चिकट मातीत कसं खेळून मजा करायची ते जे मी शिकले होते,ते काही पाऊस आणि चिखल ह्याच्याच संबंधाने नव्हतं,कारण साधीशी गोष्टपण कारणीभूत होऊ शकते. मला वाटतं,जीवन संपूर्ण जगावं,आणि एकही क्षण असा दवडू देऊ नये की तोंडावर हसूं न यायला तो क्षण कारणीभूत व्हावा.

माझ्या लहानपणी आलेल्या अनेक अशाच पावसाच्या दिवसातला एकतरी दिवस माझ्या मुलीला मिळावा आणि मला मिळालेला आनंद तिलापण मिळावा आणि पुढे माझ्या नातीला पण मिळावा असं माझ्या मनात त्यावेळी आल्याशिवाय राहिलं नाही.”

“हे तुला आणि तुझ्या मुलीला माहित असूनही, आईच्या जीवाला शेवटी आपलं मुल आजारी पडेल ह्याची रुखरुख मनात असल्याने,तुला काय आणि तुझ्या मुलीला काय आपल्या मुलाला पावसात खेळताना पाहून त्याला रागावल्या शिवाय राहावत नाही,हे मला तरी अगदी स्पष्ट झालं आहे.
कुणीतरी आईबद्दल म्हटलंय,
“आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक,आईच्या पायी”

चित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून मी तीला जवळ घेतलं.ते अश्रू आनंदाचे होते आणि दुःखाचेही होते.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: