कांदेपोहे.

“तुझे पोहे तर मस्त झाले आहेतच शिवाय तू म्हणतोस ते ऐकून मजा आली.”

आज खूप दिवसानी सुरेश खोटेच्या घरी गेलो होतो.सध्या सुरेश एकटाच घरी असतो.त्याची पत्नी आणि मुलं कोकणात गणपती सणाला गेली आहेत. सुरेशला रजा मिळणं जरा कठीण झाल्याने तो ह्यावेळी कोकणात गेला नाही.

रविवारची सकाळ होती.पेपर वाचून झाल्यावर मनात आलं की सुरेशचं घर ठोठावून त्याची खबर घ्यावी.
दार उघडल्यावर सुरेश एकदम मस्त मनस्थितीत दिसला.माझं स्वागत करून झाल्यावर मला म्हणाला,
“आज झकास कांदेपोहे केले आहेत.गरम गरम चहा बरोबर तुम्ही कंपनी द्या.”
आंधळा मागतो….त्यापैकी झालं.मी सुरेशला म्हणालो,
“तुझ्याकडे कधीही आलं तर कांदेपोह्याची थाळी पुढे केली जातेच.हे गुढ काय आहे?”

मला सुरेश म्हणाला,
“मला रोज सकाळी उठल्यावर गरम गरम कांदेपोहे खायला आवडतं.मला वाटतं,ही गोष्टी कुणाला जरी अगदी मामूली वाटली किंवा नगण्य वाटली तरी ह्या लहान लहान गोष्टीच जीवन सुखकर करतात.माझ्या जीवनात तरी सकाळीच कांदेपोह्याची थाळी, त्यात पोह्यावर शिवरलेलं खवसलेलं ताज्या नारळाचं खोबरं-चून- ,आणि थोडी कोथिंबीर शिवरली आहे अशी थाळी समोर येणं महत्वाचं आहे,बरोबर अर्थात गरम गरम चहाचा प्याला हवा.”
मला हे सुरेशचं म्हणणं ऐकून जरा गम्मत वाटली.
मी म्हणालो,
“म्हणजे ह्याचा अर्थ सकाळीच तुला दुसरं कसलं खाणं आवडत नाही की काय?”

“मला तरी कांदेपोह्याशिवाय जगात काही महत्वाचं आहे असं वाटत नाही.”
असं म्हणून सुरेश पुढे सांगू लागला,
“कांदेपोह्याशिवाय जीवनालाच काही अर्थ आहे असं वाटत नाही.जीवनालाच अर्थ राहिला नाही असं वाटत असताना,शिक्षण घेऊन सुशिक्षीत होणं,प्रेमात पडणं,कुणाच्या मदतीला धावणं हे सर्व अर्थहीन वाटतं.

माझ्या जीवनात एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा झाल्यास प्रथम मी कांदेपोहे खाईन आणि मग निर्णय घेईन. त्यामुळे,जीवनातले मोठे स्तर लाभकर होतील असं मला वाटत असतं.माझ्याकडे सर्व साधनं असल्यावर कॉलेजमधे जाऊन शिक्षण घेण्यात मला काही विशेष वाटत नव्हतं.प्रेमात पडणं म्हणजे काही विशेष आहे असं मला वाटत नसायचं कारण जरका कुणाला जगाचंच प्रेम वाटत नसेल तर कुणाशी प्रेमाचा भागीदार कसं व्हायचं.?
एखाद्याला मदतीची जरूरी आहे हे माहित असताना त्याला मदत करणं काही उपयोग नाही, कारण जरका त्यालाच जगाकडून काही नको असल्यास त्याला मदत करून  काय उपयोग.?
लहान लहान गोष्टीच मोठ्या गोष्टीना मोठं करतात.”

मी सुरेशला म्हणालो,
“मला असं नेहमीच वाटतं की जगात असलेल्या हजारो गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.मी जे काही करीत असतो ती जगातली सर्वात महत्वाची गोष्ट असते,मात्र जोपर्यंत मी ती गोष्ट करीत असतो तोपर्यंत.अमूक एकच गोष्ट महत्वाची आहे असं मी कधीच समजत नाही.”

माझं हे ऐकून सुरेशच्या चेहर्‍यावर हसू दिसलं.
मला चहाचा कप पुढे करत म्हणाला,
“अमुक अमूक गोष्टीपेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट कमी किंवा जास्त महत्वाची नसते. एखादी गोष्ट जास्त वेळ टिकते किंवा त्यांचा परिणाम जास्तवेळ टिकत असावा एव्हडंच.
त्यासाठीच मी म्हणतो कांदेपोह्याची थाळी सकाळी,दुपारी किंवा संध्याकाळीका असेना ती तेव्हडी जगात माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे.

मला कुठेतरी वाचल्याचं आठवतं की,
“भरपूर घट्नानी भरलेलं जीवन हे खरं उत्तम जीवन.”
जीवनातून खरा मिळणारा अर्थ मी मिळवतो त्या घटनांची व्युत्पत्ति प्रत्येक घटना मी अनुभवतो त्यातून येत असते.
माझ्या जीवनात मोठ्या समजून ज्या योजना मी ठरवतो त्याचा उपयोग चांगल्या घटनांची संधी मिळावी म्हणून त्या योजना असतात.
मी कॉलेजमधे गेलो ते जाणुनबुजून मनात मानवजातीच्या कल्याणासाठी माझं शिक्षण उपयोगी पडावं म्हणून काही नाही,उलट माझ्या वयस्कर जीवनात निदान मला कांदेपोहे खायाला मिळावेत हाच उद्देश ठेऊन गेलो होतो.”

सुरेश आणखी पोहे खाण्याचा आग्रह करीत होता.मला त्याचे कांदेपोहे आणि त्याबद्दलचा त्याचा युक्तिवाद आवडला.
मी म्हणालो,
“तुझे पोहे तर मस्त झाले आहेतच शिवाय तू म्हणतोस ते ऐकून मजा आली.
मी विश्वास करतो की प्रत्येकाच्या जीवनात घटना होत असतात.पण तू म्हणतोस तसं, मला मात्र माझं जीवन भरपूर घटनांनी भरलेलं असावं असं वाटतं.मला वाटतं तू म्हणतोस तसं,प्रत्येकजण कांदेपोह्याच्या थाळी सारख्या प्रावस्थेमधून जात असतो.मला वाटतं हे आयुष्यभर टिकून असतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: