कपभर कॉफी.

“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,रोजच्या जीवनातल्या कटकटी संभाळताना एखादा कॉफी-ब्रेक खूपच उपयोगी होतो.”

मला कॉफी विषयी जरा विशेष वाटतं.जरी मी अगदी फटकळ होऊन असं सांगत असलो तरी त्यात बरचसं तथ्य आहे. कॉफीचा एक कप.
मला आठवतं की,ती संध्याकाळची वेळ होती.गार वारा वहात होता.घराच्या बाहेर खुर्च्या टाकून बसावं आणि गप्पा माराव्यात असं माझ्या चुलत बहिणीने-साधनाने- सुचवलं.

कोकणात दिवाळीच्या दिवसात मी तिच्या घरी गेलो होतो.
तिची आणखीन भावंडं पण येणार आहेत,एक तिचा भाऊ लंडनहून येणार आहे,आईवडीलांचं आता वय झालं आहे,सगळे मिळून एकत्र येऊन ह्या वर्षी दिवाळी साजरी करूया असा विचार झाला आहे असं मला साधनाने-फोन करून सांगीतलं होतं म्हणून मी कोकणात त्यांना कंपनी देण्यासाठी गेलो होतो.
त्या दिवाळीला थंडी फार छान पडली होती.लंडनहून आलेला,प्रकाश आणि त्याची मंडळी तर फारच खुश होती. प्रकाशाच्या लहान मुलांना कुणीतरी तिकडे सांगीतलं होतं की भारतात नेहमीच गरमी, उष्मा असतो.

प्रकाश मला म्हणा्ल्याचं आठवतं,
“मी माझ्या मुलांना खात्रीपूर्वक सांगीतलं होतं की प्रचंड उष्मा होतो तो मुंबई सारख्या शहरात.कोकणात त्यामानाने थंड असतं.पण ह्यावेळची थंडी अप्रतिमच आहे.ती सर्व खुशीत आहेत.”

आम्ही बाहेर जाऊन बसल्यावर,साधनाच्या मुलीने-मृणालने-सुचवलं की मी गरम गरम कॉफी प्यायला घेऊन येते.मृणाल दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजच्या होस्टेला रामराम ठोकून आठ दिवस रहायला आली होती.
प्रकाशची पत्नी आणि मुलं दुधाशिवाय डार्क कॉफी पितात.त्यांना कॉफीमधे साखर मुळीच आवडत नाही.जितकी कडू कॉफी असेल तितकं छान.कधी कधी त्यांना कोल्ड कॉफी आवडते.प्रकाश मात्र पुर्वीच्या सवयी प्रमाणे दुध आणि साखर घालूनच कॉफी पितो.
साधनाला दुध कमी,साखर कमी अशी कॉफी आवडते.मृणालला कॉलेजमधल्या सवयीने दुधाशिवाय पण साखर घातलेली कॉफी आवडते.मला मात्र मी सागीतलं की, भरपूर दुध घालून आणि त्यात वेलचीची पुड घालून केलेली, सत्यनारायणाच्या पुजेला करतात तशी कॉफी आवडते.आमच्या सर्वांच्या ह्या आवडी निवडी नीट लक्षात ठेऊन मुणालने कॉफी तयार केली होती.
सहाजीकच कॉफी पिता,पिता कॉफीवरच गप्पा चालू झाल्या.

प्रकाशने सुरवात केली.तो म्हणाला,
“सकाळ होताच तो कॉफीचा पहिला प्याला घेतल्यावर माझी सकाळ उदयाला येते.तो सुमधूर कॉफीचा सुवास आणि त्यातली गोड साखर ह्या दोन्ही गोष्टी मला अंथरूण सोडायला प्रवृत्त करतात.
खरंतर नुसत्याच कॉफीच्या चवीपेक्षा काहीतरी अर्थपूर्ण घटना होऊ घातल्या आहेत असं वाटायला लागतं.
जरा खुळ्यासारखं वाटत असेल पण कॉफी घेतल्यानंतर माझे दरवाजे,खिडक्या उघडल्या आहेत,भिंती कोसळल्या आहेत ज्यामुळे मी कोणताही निर्णय घेण्यास प्रवृत्त झालो आहे आणि श्वास घ्यायला मोकळा झालो आहे असं मला वाटतं.
एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या आजारात त्याला कंपनी द्यायला होस्पिटलमधे जागरण करून आल्यावर,ऑफीसात न संपलेलं कामं घरी आणून पूर्ण करायला रात्रभर जागरण केल्यावर,दोन दिवसात कोणत्याही कारणाने हप्ता भरलाच पाहिजे अशी घराच्या हप्त्याची नोटीस बॅन्केकडून आल्यावर,दोन तासाची गाढ झोप द्यायला कॉफीचा एक कप उपयोगात आणता येतो.जीवनात येणार्‍या अडचणींना  तोंड द्यायला कॉफी मला तरून जायला मदत करते.”

साधनाने आपलं कॉफीबद्दलचं मत दिलं.ती म्हणाली,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,रोजच्या जीवनातल्या कटकटी संभाळताना एखादा कॉफी-ब्रेक खूपच उपयोगी होतो.भाराभर कामं उरकताना थोडा विराम घेऊन चवदार कॉफीचा एक कप  खूपच कामाला येतो.जीवनातल्या वास्तविकतेपासून दोन मिनीटांचा विरंगुळा मिळतो.ती कॉफीची सूंदर चव जीभेवर एकरूप झाल्यावर नेहमीच्या प्रश्नापासून लक्ष दुसरीकडेच केंद्रीत करतं.
मला आठवतं माझी आई त्यावेळी काही दिवस हॉस्पिटलात होती. तासनतास तिच्या बिछान्याजवळ किंवा बाहेर लॉउन्जमधे मी आणि माझे बाबा वेळ घालवत असायचो.त्या जागेवर बसल्यावर सततच्या काळजीत रहायचो.मला आठवतं मधेच कधीतरी माझे बाबा कॉफी घ्यायला जाऊया म्हणून सुचना करायचे.कॅन्टीनमधे गेल्यावर,सर्व काळज्या दूर झाल्यासारख्या क्षणभर वाटायच्या.थोडावेळ तरी नको वाटणार्‍या शांततेपासून आणि अनिश्चित वातावरणापासून निकास राहिल्या सारखं वाटायचं.”

त्यानंतर मृणालने आपला कॉफीबद्दलचा अनुभव सांगीतला,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,सकाळ उजाडल्यावर सर्व काही व्यवस्थीत व्ह्यायला एक एक कॉफीच्या कपावर थोडीशी इकडची-तिकडची बातचीत करून होस्टेलमधल्या माझ्या इतर मैत्रीणींशी संपर्क ठेवायला सोपं होतं. अंथरूणातून लवकर उठायला सकाळच्या कॉफीच्या कपाची आठवण प्रोत्साहन देते.कुठल्याच अडचणीविना एकमेकाची कामं करायला उत्साह देते.

कॉफी ही एक प्रकारचा उपहार म्हणायला हवा.मला एक गोष्ट आठवते ती सांगते.
होस्टेलमधल्या माझ्या एका मैत्रीणीच्या आईचं निधन झालं होतं.माझी मैत्रीण घरी जाऊन परत आल्यावर तिच्याकडे बोलायला आमच्या जवळ शब्द नव्हते.आमच्याजवळ फक्त तिला जवळ प्रेमाने कवटाळून घ्यायला,खांद्यावर मान टेकून रडायला आणि तिला आधार द्यायला होतं.शिवाय आमच्याजवळ द्यायला कॉफीने भरलेला कप होता.पहिले काही दिवस ती सकाळी उठून वर्गात जाण्यापूर्वी आम्ही तिला कॉफी प्यायला घेऊन जायचो.आम्हाला तिच्याबद्दल किती अगत्य आहे हे त्या कपातून प्रदर्शित व्हायचं.”

मी माझं मत दिलं,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं,कारण सकाळी एक कप भरून कॉफी घेतल्यावर त्या सबंध दिवसात येणारी, ताण देणारी कामं मी विसरून जातो.कॉफी घेतल्यावर मला वाटत रहातं की मी कोणतही काम सफलतेने पूरं करीन.
कॉफीच्या एका कपाने स्वस्थचित्ताने रहायला मदत मिळते,जरूरीचा परावर्तक वेळ मिळतो.एव्हडंच काय तर माझ्या इमेल,माझे फोन मी थोडावेळ दुर्लक्षीत करू शकतो.लोकांना कॉफी पित बसल्याने निवांत बसता येतं.
जर का तुम्हाला कॉफी आवडत नसेल तर चहा घ्या दुसरं काही तरी घ्या पण कामाच्या कटकटीतून स्वतःच्या मनाला विरंगुळा द्या.कॉफी पिण्यासारखं वेळ काढण्यात तुम्हाला जे काय आवडतं,त्याच्यासाठी दिवसातून थोडातरी वेळ काढा.”

आमचं हे कॉफी आख्यान होता होता बाहेर बरंच गार वाटू लागलं.आणि जास्त करून प्रकाशच्या मुलांना थंड वाटायला लागलं हे विशेष.
मला प्रकाशचा मुलगा म्हणाला,
“ही इकडची थंडी जरा मजेदार वाटली.कारण तिकडे थंडीबरोबर पाऊस पडायला सुरवात होते आणि असं बराच वेळ बाहेर बसायला मिळत नाही.”
आम्ही प्रत्येकजण आपआपला रिकामा कॉफीचा कप घेत घरात आलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: