आळसावलेला रविवार.

“रविवार हा दिवस पूर्‍या आठवड्याचा जमलेला गंज खरवडून काढणारा दिवस असतो”

प्रमिलेच्या वडीलांचा मला फोन आला होता,
“प्रमिला एक आठवड्यासाठी माझ्याकडे कोकणात येणार आहे.तिच्या बरोबर गो.नि.दांडेकरांची “शितू” ही कादंबरी वाचण्यासाठी पाठवून द्या.”

ह्या कादंबरीत गोनीदानी कोकणाचं नयनरम्य दृष्य डोळासमोर उभं केलेलं आहे.मी ही कादंबरी पूर्वीच वाचली होती आणि ती कादंबरी माझ्याजवळ आहे असं मी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना बोललो होतो ते आठवून मला त्यांनी असा निरोप दिला होता.

प्रमिला अलीकडेच एका सॉफ्ट्वेअर कंपनीत कामाला लागली होती.चर्चगेटच्या वुमेन्स-हास्टेलमधे ती रहायला होती.ती सोमवारी कोकणात जाणार असल्याने मला तिच्याकडे रविवारी जाणं भाग होतं.रविवारी ती नक्कीच घरी असणार असा विचार मनात आणून मी तिच्याकडे सकाळीच दहाच्या दरम्यान ती कादंबरी घेऊन गेलो होतो.

हास्टेलच्या तळमजल्यावर असलेल्या वेटिंग-रूममधे मी तिची वाट बघत बसलो होतो. रखवालदारला मी आल्याचा तिला निरोप द्यायला सांगीतलं.तिची रूम-मेट खाली येऊन मला म्हणाली,
“प्रमिला दुपारचे बारा,साडेबारा वाजल्याशिवाय उठेल असं वाटत नाही.तुम्ही दुपारी एकच्या दरम्यान या.ती उठल्यावर मी तिला तुम्ही आल्याचं सांगीन.”

इतक्या उशिरापर्यंत काहीना झोप कशी लागते असा मी मनात विचार करत बाहेर पडलो.मरीन-ड्राइव्हच्या चौपाटीवर एका बाकावर बसून समुद्राची हवा खावी असा विचार करून तिकडेच गेलो.
एकच्या दरम्यान परत आल्यावर मला पाहून रखवालदाराने प्रमिलेला फोन केला.तशीच ती लगबगीने खाली आली.

“सॉरी,सॉरी तुम्ही आज येणार ते मी विसरूनच गेले.तुमची तत्परता माहित असूनही माझ्याकडून असं का झालं ते मी तुम्हाला थोडा वेळ असेल तर सांगते”
असं म्हणून मला म्हणाली,
“रविवारचा पहाटेचा एक वाजला होता. हसून, हसून पोट दुखायला लागलं होतं.आणि मी अंग टेकावं म्हणून माझ्या बिछान्यावर येऊन लेटली. गाढ झोपी गेल्यानंतर केवळ दोन मिनीटांची झोप लागली असावी असं वाटता वाटता माझ्या खिडकीतून सूर्याची चमकदार किरणं माझ्या डोळ्यावर पडून मला जाग आली.मस्त झोप झाली असं मी माझ्या मनात म्हणत असताना वाटत होतं की,आणखी थोडावेळ झोपावं.
अहो आश्चर्य!.घड्याळात रविवारच्या दुपारचे साडेबारा वाजले होते.
महमूदचा पडोसन सिनेमा पाहून “आळसावलेल्या रविवारच्या” दुपारी मी उठले होते.हा रविवार मला अगदी आरामात काढायचा होता.एकदा का “आळसावलेला रविवार” नीट गेला की माझा पुढचा पुरा कामाचा आठवडा सुख-शांतीत जातो,असं मला वाटत असतं.आणि तुम्ही येणार ते विसरूनच गेले.”

मी प्रमिलेला म्हणालो,
“कोकणातलं मला माहित आहे.एरव्ही तुम्ही घरातले एकमेकाना न भेटणारे आपआपल्या कामात दंग असलेले असताना रविवारी मात्र पूर्ण आराम घ्यायचे.तुझे बाबा मला तुमच्या घरातलं रविवारचं महत्व अगदी चघळून चघळून सांगायचे.”

मला प्रमिला म्हणाली,
“मला माझं लहानपण आठवतं.आमच्या चार भावंडात मी मोठी.त्यामुळे नेहमीच समजलं जायचं की सगळी जबाबदारी माझीच असते.मला जबाबदारीचं पद दिलं तरी हरकत नसायची. पण मला कधीच अवसर मिळायचा नाही हे नक्कीच.
शाळेतले वर्ग चालू असताना शिकण्यात वेळ जायचाच,आणि मधल्यावेळात आमच्या वर्ग शिक्षीकेला मदत करण्यात,निबंधाच्या सर्व वह्यात बाईनी दिलेल्या मार्कांची बेरीज करण्यात, “आजचा सुविचार” फळ्यावर लिहिण्यात वेळ जायचाच त्याशिवाय आजीचा बिछाना सारखा कर,तिला काही वाचून दाखव हे नित्य-नियमात असायचं.

बर्‍याच जणाना घरी गेल्यावर “माझा वेळ” म्हणून असतो.पण माझ्या जीवनात तसं काहीच नसायचं.घरी आल्यावर माझा बराचसा वेळ भावंडांची देखभाल कर,घराची साफसफाई कर, आणि कधी कधी जेवण करायलाही हातभार लाव असं असायचं.आठवड्याच्या अखेरीला रेस मधला घोडा धावून आल्यावर जसा दमतो तसं माझं व्हायचं.

खरं तर आमच्या कुटूंबात सर्वांचं तेच व्हायचं.माझी भावंडंपण माझ्या सारखीच कामात व्यस्त असायची आणि माझे आईबाबा आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असायचे.त्यामुळे रविवार हा आमचा सर्वांचा विश्रांतीचा दिवस मानला जायचा.मग मी आणि माझे बाबा जुन्या फिल्म्स
आणून त्या बघायचो,आई आणि इतर भावंडं त्याना आवडेल तशी करमणूक करून घ्यायचे. जेवण मात्र जरा विशेष व्हायचं.एकत्र बसून आम्ही जेवायचो.अगदी अजून पर्यंत ती रुढी कायम आहे.”

आता शहरात आल्यानंतरही माझ्यासाठी काही विशेष फरक झाला नाही.रविवार म्हणजे आराम हे अजूनही माझ्या समजुतीत आहे.माझा मात्र रविवारचा दिवस इकडे जास्त करून बिछान्यात लोळण्यात जातो.टाप-टीपपणा असणं,नेसलेल्या कपड्यांबद्दल जागृती असणं, असल्या गोष्टींना फाटा देऊन कोण काय म्हणेल ह्याची परवा नकरण्याचा माझा शिरस्ता असतो. आठवतो तेव्हडा आमच्या लहानपणापासूनच्या रुढीचा पुरंपूरा मी फायदा घेत असते.”

“तू ज्या कपड्यात खाली मला भेटायला आलीस त्यावरून तुझा शिरस्ता लक्षात यायला मला वेळ लागला नाही.”
मी हसत हसत प्रमिलेला म्हणालो.

प्रमिलापण माझ्या बरोबर हसली.पण त्या शिरस्त्याची सफाई सांगताना मला म्हणाली,
“पूर्वी आमच्या घरी,रविवार म्हणजे कुटूंबातल्या सगळ्यांचं एकत्रीत येणं असायचं.हे असं आठवड्याच्या इतर दिवशी कधीच व्ह्यायचं नाही.आता मला शहरात आल्यापासून रविवार म्हणजे “माझा वेळ” असं समजण्यात रुपांतर झालं आहे.रविवारी जर का मला आराम करायला मिळाला नाही तर पुढच्या आठवड्याचा माझा व्यस्त कार्यक्रम माझ्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन माझ्यावर मात करील.

मी जर नुसती कल्पना केली की मी ह्या “आळसावलेल्या रविवार” शिवाय असेन तर, मला दिसून येईल की झोपेचं खोबरं झालेली,मनावर प्रचंड तणाव असलेली, चीडचीडी, करवातलेली मुलगी होईन.”

उठता उठता मी प्रमिलेला म्हणालो,
“कुणीतरी म्हटलंय,
“रविवार हा दिवस पूर्‍या आठवड्याचा जमलेला गंज खरवडून काढणारा दिवस असतो”
रविवारी दुपारी साडेबाराला उठण्याने डोळ्यावर चढलेला पापुद्रा दूर करायला तुला मदत होत असावी.”

“वरील उक्तिशी मी जास्त सहमत न होऊन कसं चालेल?”
असं म्हणून प्रमिलेने मी दिलेलं पुस्तक आपल्या जवळ घेऊन मला निरोप दिला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. mangesh nabar
  Posted मार्च 26, 2011 at 12:41 सकाळी | Permalink

  आपला आळसावलेला रविवार हा एक ‘जमलेला’ लेख आवडला. आज मी निवृत्त काळ व्यतीत करत ( साध्या भाषेत ‘घालवत’ ) असलो, तरी अजूनही रविवारचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही मला रविवारच्या सकाळची उन्हे वेगळी भासतात. कारण माझ्या कामावर जाण्याच्या काळात मी रविवारची उन्हे कधीच बघत नसे. आजही रविवारची ती गोडी अजून टिकून आहे. कारण रविवारची वर्तमानपत्रे आणि रोजच्यापेक्षा वेगळे असलेले दुपारचे ‘जेवण’. आपल्या लक्षात मी काय म्हणतो ते आले ना ?
  मंगेश

  • Posted मार्च 26, 2011 at 10:35 सकाळी | Permalink

   नमस्कार मंगेशजी,
   आपल्याला माझा लेख आवडल्याचं वाचून बरं वाटलं.मनावर खोलवर बिंबलेल्या आठवणीना वेळ काळ नसतो हे खरं आहे.
   कुलाब्याच्या टाटा इन्स्टीट्युट्मधे मला सुद्धा सूर्योदयापूर्वी सकाळीच जावं लागायचं.आणि रात्री घरी कधी येईन याची खात्री नसायची.संशोधनाचं काम असायचं.त्याला वेळ काळ नाही.इमारतीच्या खिडक्याना प्रचंड प्रमाणात काचा असून सुद्धा वर मान करून सूर्याकडे बघायला वेळ नसायचा.(इल्ली अतिशयोक्ति).
   मात्र रविवारी बाल्कनीत बसून गरम गरम चहा पिताना रविवारची वर्तमानपत्रं न वाचून कसं चालेल?सुदैवाने बाल्कनी पूर्वेच्या दिशेने असल्याने सूर्यदर्शन खचित व्हायचं.
   ह्या माझ्या सर्व आठवणीना आपण जाग आणून दिलीत.बद्दल आभार.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: