पावसा़चा खेळ आणि पावसातला खेळ.

“मला पावसात खेळायला आवडतं,नाचायला आवडतं.” इति सुनंदा.

मी सुनंदाच्या घरी तिला भेटायला गेलो होतो.बाहेर खूप पाऊस पडत होता.
“अशावेळी गरम गरम भजी आणि मस्त गरम चहा घ्यायला मजा येते.”
मी सुनंदाला माझ्या मनातलं भीडभाड न ठेवता सांगीतलं.
ती उठून आत जायला लागली असं पाहून मी म्हणालो,
“अगं,मी तुझी गंमत केली.”

मला अडवीत म्हणाली.
“हाततिच्च्या,त्यात काय विशेष.मी आत्ता तयारीला लागते.”
असं म्हणत,
“तोपर्यंत हा पेपर चाळा”
असं म्हणून पेपर माझ्या हातात देत देत सुनंदा चहा ठेवायला आत गेली.

“मला पावसात खेळायला आवडतं,नाचायला आवडतं.”
असं तिच्याच हस्ताक्षरातलं,एक वाक्य एका कोर्‍या कागदावर लिहिलेलं पेपराच्या आतल्या घडीत राहून गेलेलं मी वाचलं.
ती बाहेर आल्यावर मी सुनंदाला विचारलं,
“काय पावसावर काही आठवणी लिहिते आहेस की काय?”

“तुम्हाला कसं कळलं?” इति सुनंदा.
“ह्या कागदावर मी वाचलं.”
तिचाच कागद तिला दाखवत मी म्हणालो.

“बाहेर पाऊस पडत होता.लहानपणीच्या आठवणी येऊ लागल्या काहीतरी खरडावं म्हणून सुरवात केली होती.तेव्हड्यात तुमची बेल वाजली.”
मला सुनंदा म्हणाली.
“अरेरे,माझ्यामुळे तुझ्या विचारात खंड आला.सुचलेले विचार लिहित असताना लिंक तुटली की मग तेच वि़चार येतील असं सांगता येत नाही.निदान माझं तर असं होतं.”
मी तिला म्हणालो.

“तुम्हाला कोकणातला पाऊस आवडतो तुम्ही मला खूपदा सांगीतलं आहे.तुमच्याशी पावसावर बोलून मला आणखी विचार सुचतील हे निश्चित.आपण दोघं बोलतोच आहो तर तुमचा अनुभव सांगा.तरच गरम भजी मिळतील.”
सुनंदाने अट घातली.

बरं बुवा!”
असं म्हणून मी सुनंदाला सांगायला लागलो,
“मला कोकणातला पाऊस आवडतो असं मी बरेचदा म्हटलं आहे.ज्यानी त्या पावसाचा अनुभव घेतला आहे त्यांना माझं म्हणणं नक्कीच पटणार.
कोकणातल्या पावसाच्या किती अवस्था असतील म्हणून सांगू.

आपल्या आगमनाची चुणूक देणारा पाऊस,
मे महिन्यातला खूप उकाडा सहन करून लोक आकाशाकाकडे पाहून हवालदिल होतात होतात तोच अचानक वळवाचे वारे वाहून,कोकणातल्या तांबड्या मातीला (आता तांबडी माती औषधालाही मिळणार नाही) सर्व आसमंतात भिरकावून देऊन,
“मी येतोय”
असा संकेत देणारा पाऊस थोडासा पडून जातो.आणि नंतर तो कुठे दडी मारून बसतो कोण जाणे?
कोकणातल्या शेतकर्‍याला माहित असतं की तो वळवाचा पाऊस आहे. खरा पाऊस अजून सुरू व्हायचा आहे.आता शेतीच्या कामाला सुरवात करायला हवी असं शेतकरी मनात म्हणतो.
कदाचीत
“मी येत आहे”
शेतकर्‍यालाच तो पाऊस असं सांगून जात असावा.

हल्ली तर पाऊस गेला असं समजून, शेतीचं ज्ञान नसलेले आमच्या सारखे,पाऊस केव्हा चालू होणार असा विचार करीत,
“ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम!”
असं अनमान काढून आपलं समाधान करून घेत असतात.
मी म्हणतो त्या पूर्वीच्या दिवसात कॅलेंडर उघडून पाहिलं गेलं असतं तर,सात जून यायला किती दिवस आहेत ते मोजून पहावेत. अगदी सात जूनला पाऊस नक्कीच कोसळायचा.

आलोच म्हणून सांगणारा पाऊस,
सहा जूनच्या रात्री,किंवा सात जूनच्या पुर्‍या दिवसात कधीतरी,गार,गार हवा वाहायला लागली की समजावं,
आकाशाकडे मान वर करून पाहिल्यावर, सूर्यनारायणाचं दर्शन होत नसेल तर समजावं,
काळ्याकूट्ट ढगांची, समुद्राकडून येत असल्याची, रीघ दिसली की ती पाहून समजावं,
आणि अचानक,
“कडाड-कुडूंब”
होऊन वीजा चमकायला लागल्या की नक्की खात्रीने समजावं,
“मी आलो”
म्हणून माळरानापासून ते नांगरलेल्या शेतीच्या कुणग्यापर्यंत,समुद्राच्या चौपाटीपासून ते डोंगरावरच्या उंचच उंच झाडापर्यंत बोंब मारत येणारा पर्जन्य,
“मी आलोच ”
म्हणून सांगत आहे.
“इलो रे! इलो आतां बघूंक नको”
असं कोकणी माणूस मनात काही न ठेवता जगाला ओरडून सांगतो.
“कोण इलो,केव्हा इलो”
हे ज्याला त्याला माहित असतं.

इतक्या वर्षाचा कोकणी माणसाचा अनुभव आहे तो जाणार कुठे?
पावसाला सुरवात होणार आहे ह्या कल्पनेने आनंदाने तूडूंब भरून गेलेलं त्याचं काळीज त्याला गप्प बसू देत नाही.
मंगळोरी कौलांची आणि नळ्यांच्या कौलांची घरावरची छप्परं,मे महिन्यातच “छप्पर साफसफाई आणि परतवणी” झाल्याने, तयारीत असल्याने वरून कोसळणार्‍या पावसाचं पाणी पावळ्यातून जमीनीवर सोडून द्यायला उत्सुक्त असतात.पन्हळी दुथडी भरून वाहत असतात. तांबड्या मातीचं तांबडं पाणी रस्त्याच्या कडेने खोदलेल्या गटारातून भरून भरून वाहत असतं.
मुंबईच्या इराण्याच्या दुकानातला,
“दुध-कम (तांबडा) चाय और एक मस्का ब्रुन”
ऑर्डर करणारा मुंबईकर ह्या दिवसात कोकणात येत असायचा तेव्हा इराण्याच्या कपातला तांबडा चहा मनात आणून हेच म्हणत असावा की,
“इराण्याचं चहाचं दुकान फुटून गटारातून तांबडा चहाच वहात आहे”
पण आता हे दिवस राहिले नाहीत.कोकणात सगळीकडे डांबरी रस्ते झाल्याने,इराण्याची दुकानं जशी मुंबईत बंद झाली तसं पावसाचं तांबडं पाणी कोकणात बंद झालं.

“भट (पाऊस) हात पाय पसरी”
अश्या परिस्थितीला आलेला पाऊस,
जूनचा शेवटचा अर्धा महिना आणि सुरवातीचा जुलैचा अर्धा महिना पाऊस पडत नाही असा एकही दिवस जात नाही.काही वेळा अपवादाने होत असेल ते विरळं.
शेतकरी एकदम खूश असतो.पेरणी झालेली असते.मधेच कधी उघडीप यावी असं वाटत असतं. पण सूर्याचं दर्शन कमीच.भाताची रोपं डोकं वर काढून बघत असतात.कोकणी शेतकरी आनंदाने मश्गूल असतो.कुणग्यात पाणी तुंबायला सुरवात होते.भात शेतीला त्याचीच जरूरी असते.
जुलै ओसरत जात असताना पाऊस पण तसाच ओसरत जातो.निसर्गाचीच ती योजना असावी.

चिरी-चिरी पडत रहाणारा पाऊस,
ऑगस्टमधे मात्र पाऊस चिरी-चिरी पडत रहातो.शेती नकरणारा माणूस म्हणतो,
“खूप झालं आता जा बाबा”
असं म्हणवून घेणारा पाऊसही खरंच पुढे पुढे कमी होत जातो.
कोकणात ह्या अडीच-तीन महिन्याच्या पावसाने सगळं वातावरण कसं थंडगार झालेलं असतं. मुंबईकराच्या भाषेत,
“कूल,जस्ट लाईक एसी”

ऑगस्ट-सप्टेंबर येता येता कोकणात बाप्पाच्या येण्याच्या तयारीला लागलेला कोकणी माणूस समजून जातो.हे वर्षाराजे आता जाण्याच्या मार्गावर आहेत.
अधून मधून सरी पडत असतात.गणपतीबाप्पाना कधी कधी भिजत यावं लागतं.
आणि शेवटी कधी कधी बाप्पा जाण्यापूर्वी किंवा बाप्पाबरोबर तर कधी कधी बाप्पा गेल्यानंतर,
“चाललो,परत पुढच्यावर्षी नक्कीच”
असं सांगणारा पाऊस खरोखरच बरेच वेळा वीजा चमकवून गडगडाट करून,
“बरं चाललो”
म्हणून नोटीस देऊन जातो.
कोकणातल्या पावसाच्या अशा ढोबळ अवस्था दिसून यायच्या.
असं हे पूर्वी थोड्या फरकात इकडे तिकडे होऊन पाऊस यायचा आणि जायचा.
पावसाचे खेळ मी तुला सांगीतले.आता तू पावसातले खेळ काय ते सांग.”

असं मी म्हणाल्यावर सुनंदा म्हणाली,
“थांबा,मी सांगत असताना तुम्ही चहा आणि भजी खा”
असं म्हणून आत जाऊन दोन प्लेट भरून गरम भजी घेऊन आली.सुनंदाची बाई भजी तळत होती.

नंतर सुनंदा मला म्हणाली,
“मी माझ्या लहानपणी आमच्या घराच्या पडवीत झोपाळ्यावर बसून सहजसुंदरतेने पडणार्‍या पावसाकडे टक लावून पहात असायची.अशावेळी पावसात धावत जाऊन चपळतेने नृत्य करण्यार्‍या नर्तकीसारखं मोकळे हात करून चक्राकार नाचून,मधेच वरती आकाशाकडे पहात पर्जन्यवृष्टीची कमाल पाहून आनंदात डुबून जावं असं मला वाटायचं.
मी कसल्याही कामात गर्क झाले असले तरी माझ्यासाठी पाऊस योग्य वेळीच पडायचा.मला पावसात खेळायला आवडत असल्याने बहुदा पाऊस मी बाहेर असताना पडला तर बरं वाटायचं.

काही लोकाना पाऊस आकाशातून कोसळणं म्हणजे त्यांच्या मार्गात आलेली अडचण किंवा कटकट वाटत असते.त्यांच्या दृष्टीने तो पाऊस म्हणजे अयोग्य वेळी आलेली बला वाटत असते. आणि त्यांना काळे कभिन्न ढग आकाशात जमलेले पाहून धसकी वाटत असते.माझ्या जीवनात मी पावसाकडे पहाते ते त्या पावसामागे छपलेल्या ह्या धरतीच्या संबंधाने असलेला त्याचा मतलबाकडे.
पाऊस पडत असताना सर्व काही जादूमय वाटतं.स्वर्गातून पाऊस कोसळत असताना एखादं इंद्रधन्युष्य दिसल्यास मुलाना तसंच मोठ्यानासुद्धा विस्मयकारक वाटतं.
पावसात खेळणं हे थोडसं सांकेतिक वाटतं.आपल्या मनात आलेल्या भावना जशा- मर्मभेदी दुःख, एकाकीपणा,प्रेम,वेदना आणि स्वातंत्र्य.

कल्पना करा की तुम्ही एका फुलांच्या बगीच्यात आहात.हवेतला गारवा आणि त्यात असलेले थोडेसे तुषार तुम्हाला जाणवतात,बरोबरीनी तुमच्या चेहर्‍यावर त्यांचा शिडकावा होतो.एकदम थोडा पाऊस आल्यावर आकाशाकडे पहाता,तिथे उभे असताना सूर्य धुसर होऊन काळे ढग नजरेला दिसतात.

अशावेळी काय जाणवतं?कदाचीत मोकळं झाल्यासारखं वाटतं,कदाचीत निस्सहाय वाटतं.
दुसर्‍या सीनमधे समजा तुम्ही रात्रीची गाडी चालवत आहात,गाडीत एकटेच आहात आणि प्रचंड गडगडाट होऊन वीजा चमकायला लागतात.पावसाची लक्षणं उघड होतात.जमीन सरकत असल्याचं वाटून तुम्ही गाडी काळजीपूर्वक चालवता.वीजांचा झगमगाट वाढायला लागतो.हे असलं वातावरण डोळ्यासमोर दुःख-वेदना आणि भीती उभी करते.
ह्या उदाहरणावरून दिसून येतं की, पावसात गेल्याने भावना उज्वलित होतात किंवा पावसात खेळल्याने निराळंच वाटू लागतं.आनंदात डुबून गेल्या सारखं वाटतं.”
मला सुनंदाचे, तिच्या डोक्यातून आलेले, पावसात खेळण्याचे विचार ऐकून खूपच मजा आली.

तेव्हड्यात तिची बाई दोन कप गरम चहा घेऊन आली.
“आणखी भजी हवीत का?”
असं सुनंदाने विचारताच चहाचा कप ओठाला लावित हाताने नको म्हणून खूणवीत मी सुनंदाला म्हणालो,
कुणीतरी म्हटलंय,
“जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा मला एकटेपणाचं काहीच वाटत नाही.मी आकाशाबरोबर रडत असतो.”

पावसाचं आणि माणसाच्या भावनांचं नातं किती जुळलंय ते दिसतं.
पावसाने तुमच्या जीवनात जान आल्यासारखं वाटतं तसंच पावसाने ह्या विलक्षण जगातल्या त्रुटिंची वास्तवता दाखवली जाते.
हा पाऊस कुणाला समस्या निर्माण करील तर कुणाच्या समस्या सोडवील.कोणत्याही परिस्थितीत पाऊस माणसाचा आणि धरतीचा दुवा सांधतो.आणि हेच कारण तुला पावसात खेळायला आणि मला पावसाचे खेळ पहायला उद्युक्त करतं.
पुढच्या खेपेला येईन तेव्हा, तुझ्या त्या एक वाक्य लिहून झालेल्या उरलेल्या कोर्‍या कागदावर,तू पावसाबद्दल आणखी लिहिलेलं मला वाचायला आवडेल .”
असं म्हणून मी सुनंदाचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: