उघड दार हेमा आता, उघड दार हेमा.

“अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा”

असं म्हणतात की,लग्न स्वर्गात ठरवली जातात.खरं पाहिलं तर श्रीधरचं आणि हेमाचं लग्न शाळेतच ठरलं.त्याचं असं झालं, श्रीधर आणि हेमा एकाच शाळेत एकाच वर्गात होती.त्यांची मैत्री,ती वयात आल्यावर,प्रेमात परिवर्तित झाली.
वैकुंठ-रखुमाईच्या मंदिरात जाऊन लग्न करण्याच्या आणा-भाका पण घेऊन झाल्या.गावात सगळीकडे आवई पसरली होती. दोघांनीही कॉलेजात जाऊन बीए डिग्री घेतली.पण हेमा पुढे बि.एड होऊन एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करीत होती. श्रीधरने बीए झाल्यावर वडीलांच्या धंद्यात लक्ष घातलं.

खिडक्यांतून,उन येऊ नये म्हणून, लावले जाणारे पडदे-व्हेनिशिन ब्लाईन्डस-बनवण्याचा त्यांचा धंदा होता. श्रीधरच्या आईबाबांना हेमा पसंत होती. तसंच हेमाच्या बाबांना श्रीधर पसंत होता.पण हेमाच्या आईने नाक मुरडलं होतं.तिला फॉरेनचा-अमेरिकेतला- जावई हवा होता.हेमाला श्रीधरशीच लग्न करायचं होतच.शिवाय आपल्या आईला तिने सांगीतलं होतं,की तिला अमेरिकेत जाऊन स्वतः ग्रोसरी आणायची,मुलांना डे-केअरमधे न्यायचं, घरातली लॉन्ड्री करायची,जास्त वेळेला घरातच स्वयंपाक करायचा, असली कामं स्वतःच करायाची मुळीच हौस नव्हती.हीच काम इकडे राहून घरी नोकरा-चाकराकडून करता येतात आणि स्वतःला आराम मिळतो. असं म्हणणं होतं.

बरीच चर्चा-वाद झाल्यावर हेमाचा आईशी समझोता झाला.आणि श्रीधर-हेमाचं लग्न पार पडलं.पण पुलाखालून पाणी खूपच वाहून गेलं होतं.कुणालाही सुखासुखी राहू देण्यात, स्वतःला हितचिंतक म्हणवर्‍यांना,असल्या बाबतीत जास्त गम्य नसतं. श्रीधर-हेमाला असाच त्रास झाला.हेमा समजूतदार होती.
आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल ती नेहमीच म्हणायची,
“इट इज पार्ट ऑफ द गेम”

आज श्रीधर-हेमाच्या लग्नाची पन्नासावी वर्षगाठ होती.मलाही त्यानी अगत्याने बोलावलं होतं.
त्यावेळी हे जोडपं आमच्याच बिल्डिंगमधे आमच्या समोरच्या फ्लॅटमधे रहायचं.
गप्पाकरताना मी हेमाला म्हणालो,
“अजून श्रीधर कामावरून घरी आल्यावर बेल न वाजवता,
“हेमा दार उघड”
असं ओरडून सांगतो का.?”
माझं हे ऐकून हेमा आणि श्रीधर दोघंही हसली.
“हो अखंड चालू आहे”
हेमा मला म्हणाली.

हेमाने दार न उघडल्यास घरात शिरण्यापूर्वीच हेमा कुठे आहे ह्याची श्रीधर चौकशी करायचा.कारण हेमा घरात असल्यावर श्रीधरसाठी तिच जाऊन दार उघडायची.हे मी चांगलंच मार्क केलं होतं,त्याचं त्या दोघानाही कौतूक वाटलं.हा त्यांचा शिरस्ता मी चांगलाच लक्षात ठेवला होता.
मी त्या दोघानाही म्हणालो,
“आज मी तुमच्या दोघांसाठी तुमच्या पन्नासाव्या वर्षगाठीला माझी एक कविता सादर करतो.तुमची काही हरकत नाही ना?”
हेमा लगेचच म्हणाली,
“नेकी और पुछ,पुछ?”
“त्यावर एक माझी अट आहे.कविता वाचून झाल्यावर तुझ्या हातची मसालेदार दुधाची कॉफी मला तू द्यावीस.”
मी हेमाला म्हणालो.

“नो प्रॉब्लेम”
असं हेमाने सांगताच मी कवितेची प्रस्थावना करताना त्यांना म्हणालो,
“मराठी सिनेमातल्या एका गाण्याचं ते एक “विम्बल्डन” आहे.
तुमच्या शिरस्त्याची आठवण ठेऊन आणि तुमच्या लग्नकाळात तुम्हाला झालेल्या त्रासाची आठवण ठेऊन मला ही कविता सुचली आहे.”
कविता अशी आहे.

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

येते डोळे उघडूनी, जात माणसाची
मनी द्वेषट्याना का गं भिती प्रेमाची
सरावल्या लोकानाही अचंबा का वाटावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

उजेडात होते भेट,अंधारात प्रेम
ज्याचे त्याचे हाती आहे सुरळीत काम
दुष्ट दुर्जानांचा कैसा वाढतो हेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

तुझ्या हातून सखये आवई फुटावी
शांतपणे युक्ति तुझी तुच संभाळावी
मार्ग तुझा सुटण्याचा मला तो कळावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

साधेपणासाठी कुणी मुर्खपणा केला
बंधनात असुनी जगी बभ्राच झाला
आपुल्या सौख्यात घेऊ जरा विसावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

हेमा लागलीच उठली आणि कॉफी करायला आत गेली.श्रीधर माझी कविता ऐकून मला म्हणाला,
“खरंच,दोन चार कडव्याच्या कवितेतून आपल्या भावना जेव्हड्या उघड करता येतात तेव्हड्या त्या भावना दहा पानी लेख लिहून उघड करणं कठीण आहे.हे मला तुमच्या कवितेतून प्रकर्षाने जाणवलं.”
मी श्रीधरला उत्तर देण्यापूर्वीच हेमा कॉफी घेऊन आली.एक कप माझ्या हातात देत मला म्हणाली,
“तुमची कविता संपल्यानंतर मी लगेच उठून गेली नसते तर मला रडू आवरलं नसतं.यापुढे जेव्हा जेव्हा,
” देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता,उघड दार देवा”
हे बाबुजींच्या आवाजातलं,
“आम्ही जातो अमुच्या गावा”
ह्या सिनेमातलं गाणं रेडीयोवर किंवा टीव्हीवर लागलं की तुमची आठवण येणार.होय ना रे! श्रीधर?”
श्रीधरने डोळे पुशीत मान खालीवर करीत होकार दिला.

मी दोघानाही जवळ घेत म्हणालो,
“तुमच्या पन्नासाव्या वर्षगाठी दिवशी,मला तुमच्या डोळ्यातून पाणी पहायचं नव्हतं.”
“नव्हे,नव्हे हे तर आमचे आनंदाश्रू होते”
हेमा हसत हसत मला म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. mangesh nabar
  Posted मे 23, 2011 at 12:39 सकाळी | Permalink

  नितांत सुंदर लेख,श्रीश्रीजी. हे कवितेचे विडंबन नव्हते. त्यात भावना ओतल्या होत्या.
  मंगेश

  • Posted मे 24, 2011 at 10:56 सकाळी | Permalink

   मंगेशजी,
   आपली प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 2. Posted मे 23, 2011 at 3:43 सकाळी | Permalink

  सुरेख लेख.आवडला.

  • Posted मे 24, 2011 at 11:06 सकाळी | Permalink

   नमस्कार देशपांडेजी,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
   आपला ब्लॉग पण मला आवडला.फार छान कविता वाचायला मिळाल्या.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: