हळदीच्या पानातला पातोळा आणि माझी आजी.

“पण एक मात्र नक्की,मी माझ्या हृदयापासून समजायला लागलो की,एक हळदीच्या पानातला पातोळा आणि प्रेम करणारी माझी आजी जवळ असल्यावर कोणत्याही गोष्टीवर इलाज होऊ शकतो.”

माझ्या आजीची प्रत्येक गोड आठवण,बहुदा आमच्या मालवणी जेवणाशी संबंधित असते.वयाने वाढत असताना,माझ्या मामेभावंडाबरोबर,खेळण्यात आणि कधीकधी त्यातून लहान-मोठी भांडाभांडी करण्यात,लहान वयात सर्वच असं करीत असतात,बराच वेळ जायचा.
असं दिसून यायचं की,आमची आजी घरात काहीनाकाही शिजवत असायची.काहीनाकाही शिजवल्याचा घरात मस्त वास यायचा असं म्हटलं तरी चालेल. मी ज्यावेळी आजीकडे तिच्या घरी तिला भेटायला जायचो त्यावेळी माझ्या तोंडाला पाणी सुटायचं.

प्रत्येक सणवाराला,मला आठवतं,त्यांच्याकडे वेळ घालवायला गेलो असताना,माझ्या माम्या, मावश्या,माझी आई आणि आजी काहीनाकाही विशेष जेवणाचे पदार्थ करण्यात दंग असायची.आमचं जेवणाचं टेबल मस्त मस्त पदार्थांच्या भरभरून थाळ्यानी सजलेलें असायचं.फणसाची भाजी,वालीची भाजी,अळुचं फदफदं,झुणका,उकड्या तांदळाचा भात,डाळीची आमटी….यादी वाढत जायची.
पण  माझी आवडती डीश म्हणजे,हळदीच्या पानातल्या पातोळ्या.
तांदळाचं पीठ,ओलं खोबरं,वेलचीपूड,गुळ,मीठ आणि कुणाला काही आवडलं तर जसं अंजीर,खजूर,अक्रोड वगैरे वगैरे घालून केलेलं सारण, तांदळाच्या कालवलेल्या थापटलेल्या पीठात घालून त्याचा हळदीच्या पानात सॅन्डवीच करून, मोदकपात्रात उकडलेल्या पातोळ्या मला खूप आवडाच्या.विशेषकरून हळदीच्या पानाचा सुगंध पातोळे खाताना मस्तच वाटायचा.अनेक पदार्थात पातोळ्या खायला माझा हात प्रथम जायचा.

आम्हा सर्वांचा आजोळी जमण्यात जेवणाचा भाग विशेष असायचा.अलीकडे पूर्वीसारखं ह्या भेटी वरचेवर होत नाहीत.पण ज्यावेळी आम्ही सर्व भेटतो, त्यावेळी जेवण असणारच हे नक्कीच.मला आठवतं त्यावेळी आमचे मामा,ज्या ज्या गोष्टीवर सहमत होऊ शकत नसत त्या सर्व गोष्टीवर वाद घालायचे. फक्त एक गोष्ट सोडून-जेव्हा जेवणाची वेळ यायची तेव्हा सर्वांचा वाद शांत व्हायचा.हे काय प्रकरण आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं नाही.जेवणात काहीतरी आत्मिक गोष्ट असावी.नुसतच जेवण नव्हे तर प्रेम ओतून केलेलं जेवण.माझी आजी आपलं तनमन घालून हे पदार्थ करायची.ह्यातच मला जीवन जगण्यातला फरक वाटायचा.
अजून,अजून मला हळदीतल्या पानातल्या पातोळ्याबद्दल अचंबा वाटतो.कायतर सारण,तांदळाचं पीठ आणि हळदीची पानं.पण त्याच्यातल्या जादूचं काय?.आजोळला जाण्याची मला ओढ लागायची आणि माझी आजी खासकरून माझ्यासाठी ते करायची.

मला सर्वात बरं वाटायचं जेव्हा माझी आजी मला पातोळ्या देऊन नंतर आपल्याला घेऊन माझ्याबरोबर गप्पा मारायला बसायची. माझ्या आजीकडून,मी लहान असताना,ऐकलेल्या गप्पातल्या शहाणपणाच्या सर्व शब्दानी एक समुद्र भरून जाईल. मला अजून आठवतं,मी बाराएक वर्षाचा असेन. स्वयंपाकाच्या खोलीत तिथे ठेवलेल्या लहानशा टेबलाशी एका लहानश्या खुर्चीवर बसून आजीकडून काहीतरी जीवनातलं वागायचं शहाणपण,किंवा तिचा अनुभव मिळेल याची वाट पहाचो.आणि त्याचबरोबर ती काहीही तयार करीत असलेल्या पदार्थाचा नमुना चाखायला मिळणार याचीही वाट पहायचो.

हळदीच्या पानातल्या पातोळ्यामधे,तो एक पदार्थ असण्यापलीकडे आणखी काहीतरी विशेष असायचं.तो एक सुख-साधनाचा भाग असायचा.पातोळ्याच्या सारणात असलेलं सम्मिश्रण आणि हळदीच्या पानाचा सुगंध,मला आजोळी यायला आकर्षित करायचच,त्याशिवाय,मी कोण आणि कुठून आलो ह्याचंही स्मरण व्हायचं.जगाने माझ्यावर भिरकाऊन दिलेल्या,शारीरीक आणि मानसिक तणावावरचा तो इलाज ठरायचा.

मला आठवतं,मी सतरावर्षाचा झालो आणि अनेक गोष्टीवर विश्वासून रहायला लागलो आणि जीवनाबद्दल माझ्या मताला रुपांतरीत करायला लागलो.पण एक मात्र नक्की,मी माझ्या हृदयापासून समजायला लागलो की,एक हळदीच्या पानातला पातोळा आणि प्रेम करणारी माझी आजी जवळ असल्यावर कोणत्याही गोष्टीवर इलाज होऊ शकतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: