(जेव्हा) काहीच करू नये. (असं वाटतं)

“काहीच करायचं नाही”,किंवा “असाच कुठे तरी वेळ घालवायचा” याचा अर्थ जीवनात कुणी आळशी असणं किंवा कुणी निष्क्रिय असणं असं नव्हे.”

त्या दिवशी मी नरेंद्राच्या घरी काही कामासाठी गेलो होतो.तो एकटाच घरी होता.अगदी कंटाळलेला दिसला.
“कायरे,नरेंद्रा अगदीच कंटाळलेला दिसतोस.बायको घरी नाही म्हणून तुझा वेळ जात नाही काय?”
मी नरेंद्राला कुतूहल म्हणून विचारलं.

“काहीच करू नये असं मला बरेच वेळा वाटतं.बरेच लोक त्याकडे निराळ्या अर्थाने पहातात तो अर्थ नव्हे .काहीच करू नये याचा अर्थ-चांगला आलेला दिवस मस्त घालवावा,अमुक ठिकाणी जाणार आहे,निर्दिष्ट स्थानाकडे जाणार आहे, असं न समजून चालत रहावं असं वाटतं.जीवनातले आनंदाचे क्षण,खरंच असे साधे आणि विनीत असतात.”
नरेंद्राला माझ्याकडे मन मोकळं करायचं होतं असं मला दिसलं.

मी त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“काहीच करू नये म्हणजे नुसतं बसून रहावं ही गोष्ट माझ्या अनेक पसंत असलेल्या गोष्टीतली एक गोष्ट आहे. दिसायला हे अगदीच कंटाळवाणं दिसेल पण ते विस्मयकारीक आहे त्याचं कारण असं की मी कोकणात असताना घराच्या मागच्या दारी आरामखुर्ची टाकून बसल्यावर वरून येणारं सुखदायी उन आणि हलकेच मधूनच येणारी समुद्रावरची वार्‍याची झुळक आल्यावर आणखी काय हवंय? असं मला वाटायचं.
मला जरका काहीच करायचं नसेल तर मी एक शिकलोय-कामापासून नुसती बुट्टी मारायची,चक्क वार्‍यासारखं वहायचं.आपला वेळ घालून नवीन कामं निर्माण करण्याऐवजी काहीच न करण्यातली मजा घ्यायची.”

“माझ्या अगदी मनातलं बोललात.”
मला नरेंद्र साथ देऊन बोलला.थोडा हसला.आणि म्हणाला,
“मला माझे शाळेतले दिवस आठवतात.सबंध दिवस वर्गात बसून अभ्यासाचं काम असायचं,होमवर्क असायचं, काही गंमतीचं,आणि काही कंटाळवाणं काम असायचं,काही महत्वाचं काम असायचं तर काही अगदीच फाल्तु कामं असायची.सर्व कामं झाली तरी गुरूजी मुलांसाठी नसती कामं उकरून काढायचे. शाळेचं वर्ष संपायची वेळ आली असायची,उन्हाळ्याची सुट्टी पडायची वेळ यायची.शाळेतल्या अर्थहीन,न संपणार्‍या कामापासून जरका
गुरूजींकडे एखाद दिवसाची सुट्टी मागीतली की लागलीच-
“तसं करायला शाळेचा नियम नाही”
असं गुरूजींचं उत्तर यायचं.
केवळ आराम करायचा असेल तर केवढे हे नियम?

मला वाटतं आपण जीवनातला स्वाभाविक आनंद लुटावा. अनावश्यक आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या ढगाळलेल्या आकाशाकडून,ही उघड उघड साध्यासुध्या आनंदाची आलेली पर्वणी, आच्छादली जाण्यापेक्षा चक्क उन्हाचा दिवस आहे आणि निरभ्र निळं अकाश आहे अशा आकाशाने आच्छादली जावी.”

नरेंद्राला मी माझ्या लहानपणाची आठवण काढून म्हणालो,
“हे रोजमरं जीवन,ह्या त्या कामामुळे एव्हडं वेटाळलं गेलं आहे की लोकं जरूरीपेक्षा जास्त ताण निर्माण करतात.कामाची यादी करायला गेलो तर ती मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब असणार.एखादी यादी संपली असेल तर मग नवीन करावी लागणार.
मला आठवतं,घराच्या पुढच्या दरवाजातून बाहेर पडत असताना आईने मला पाहिलं तर लगेचच विचारायची,
“काय काम काढलंस?”
मी जर का म्हणालो,
“मला माहित नाही ग!”
तर ती ऐकून गप्प बसायची.

पण असाच कुठेतरी वेळ घालवायचा झाला तरी तो कसा घालवायचा? बरंच काम करायचं बाकी असतं.
“काहीच करायचं नाही”,किंवा “असाच कुठे तरी वेळ घालवायचा” याचा अर्थ जीवनात कुणी आळशी असणं किंवा कुणी निष्क्रिय असणं असं नव्हे.उलट मी म्हणेन,एखादं काम करण्यापासून किंवा एखादं काम करण्याच्या जरूरीपासून किंवा कदाचीत कामं करण्याची योजना तयार करण्यासाठी हा एक सुटकार घ्यायचा मार्ग आहे.
जीवन ही काही कामाची यादी नव्हे,किंवा त्यासाठीची मोठी योजना नव्हे.लॅप-टॉप किंवा कामाच्या योजनेच्या आराखाडा जरा बाजूला ठेवावा.मला माहित आहे की त्यांचा वापर करायची वेळ येणार आहे पण ते बाजूला केव्हा ठेवायचे हे आपल्याला माहित असायला हवं.”

मला नरेंद्र म्हणाला,
“काहीतरी करत राहायला हवं हे पण मी मानतो.केव्हा काहीच करू नये असं मी म्हणत नाही,कोचावरून कधीही उठूं नये असं म्हणत नाही,कामाच्या कसल्याच योजना करू नये असं पण मी म्हणत नाही,महत्वाकांक्षा नसाव्यात,परिश्रम घेऊ नयेत असंही मी म्हणत नाही.

माझ्या कामाच्या यादीतून, पार पडलेल्या कामाची नोंद करायला मला आवडतं.अगदी वेगात जाणार्‍या वास्तविकेबरोबर आपल्या जवळ असलेल्या वेळ-काळाशी चुरस होत आहे हे मी पहात असतो.जगाचा चक्कर घेण्य़ाचा वेग वाढलेला आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून माझ्या वयाच्या एका अशा टप्प्यावर आल्यावर, मी फक्त क्रियाकर्माने घेरला जाऊ नये, तसंच मला जाणीव व्हायला नको आहे की,काही न करण्याची संधी मी गमावून बसलो आहे.

थोडा अवसर घेऊन-गालावर उन कसं सहजतेने पडतं,एखादी गाडी कशी सूं सूं करीत सहजतेने निघून जाते,तशा सहजतेचा आनंद मला घ्यायचा आहे. जे नाहीच त्याची मला खिल्ली उडवायची नाही.तसंच,काहीही न करण्याची मजा मला अनुभवायची आहे.मला वाटतं प्रत्येकाला थोडावेळतरी काहीही न करण्याची जरूरी भासत असते.”

नरेंद्राच्या दारावरची बेल वाजली.मी जायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted जुलै 14, 2011 at 9:21 सकाळी | Permalink

  अप्रतिम विषय सुचला सर तुम्हाला … मांडलाय पण खूपच छान. खरोखर निवांत , काहीही न करता शांतपणे वेळ ज्याला मिळतो तो खरच भाग्यवान . सगळेच असे नसतात म्हणूनच प्रत्येकाने असा वेळ काढायलाच पाहिजे.

  • Posted जुलै 15, 2011 at 11:28 सकाळी | Permalink

   थॅन्क्स संजीवनी,
   प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: