जयंत आणि जुगार.

“जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच हरतो.जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच जिंकतो.जीवनात मी नेहमीच जुगार खेळतो.”

एक दिवस मी रिधम-हाऊसकडून फुटपाथ घेत उत्तरेच्या दिशेने फाऊन्टकडे चालत जात होतो.सेन्ट्रल बॅन्केच्या हेडऑफीसकडून पुढे पुढे जात जात क्रॉस-मैदानाच्या पूर्वेकडच्या फुटपाथवरून चालत जात असताना पारसी जिमखान्याच्या क्लबच्या बिल्डिन्गमधून जयंतला बाहेर येताना पाहिलं.ह्या भागात बरेचसे क्लब्स आहेत.प्रतिष्टीत लोक,श्रीमंत लोक आणि नट-नट्या टाईमपास करायला ह्या क्लबात येतात हे मला माहित होतं.पण जयंतला पाहून मला जरा आश्चर्य वाटलं.जयंत तसा घरचा श्रीमंत आहे.कोकणात त्याची वडीलोपार्जीत शेती आहे,बागायती आहे.आणि त्याशिवाय नारळ, सुपारीचा आणि आंब्याच्या सिझनमधे आंब्याचा, व्यापार जोरात चालतो.क्रॉफर्ड मार्केट जवळ त्याचं ऑफिस आहे.

जयंतने वय झालं तरी लग्न काही केलं नाही.एकटा जीव सदाशीव हे जीवन बरं वाटतं असं मला नेहमीच म्हणतो. त्याला पारसी क्लबमधून बाहेर पडताना पाहून माझ्या मनात चटकन विचार आला की,सडेफटीन्ग आयुष्य असल्यानंतर आणि दाढे खाली मांस असल्यावर अशा तर्‍हेचं जीवन जगायला काहीच वाटत नसावं. तसं जयंताचं जीवन गुलहौशी आहे हे मला पूर्वेच माहित होतं.पण पारसी क्लबमधून बाहेर पडताना मी त्याला योगायोगानेच प्रथम पाहिलं.

मला त्याने पाहिलं नव्हतं.आपल्या गाडीत बसण्यासाठी तो भरभर चालत असताना पाहून माझं एक मन म्हणालं जाऊ देत त्याला.पण मनात दुसरा विचार आला आणि मी त्याला हाक मारली.मागे वळून पाहून माझ्यासाठी जयंत गाडीचा दरवाजा उघडून थांबला.

“का रे?आज तुझा ड्रॉईव्हर नाही.तुच गाडी चालवतोस?”
त्याच्या जवळ आल्यावर मी त्याला प्रश्न केला.

“हो मी क्लबात खेळायला आलो की स्वतःच गाडी घेऊन येतो.”
मला त्याने उत्तर दिलं.आणि वर म्हणाला,
“चल बस, बरेच दिवसानी भेटला आहेस.माझ्या ऑफीसमधे जाऊया.चहाच्या कपावर गप्पा मारूया.तुला वेळ असल्यास आणि तुला हरकत नसल्यास.”
जयंत बराचसा औपचारीक झालेला दिसला.आणि मलाही कुणाचा आग्रह मोडण्याची सवय नसल्याने मी गाडीचा दरवाजा उघडून त्याच्या बाजूला जाऊन बसलो.

गाडी चालवीत असताना,आपणच विषय काढून मला म्हणाला,
“मला पारसी क्लबातून बाहेर येताना तू पाहिलं असणार. क्लबात आल्यावर लोकांची ओळख होते. बिझीनेसच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं.”
ह्यावर मला काहीतरी म्हणायचं होतं.तेव्हड्यात त्याचं ऑफीस आलं.
गाडी पार्क करायला गुरख्याकडे चावी देऊन मला एलिव्हेटरमधून वर त्याच्या ऑफीसात घेऊन गेला.
मुंबईत बारा महिने तेरा काळ उकाड्याचं थैमान असतं.त्याच्या एअर-कंडीशन्ड कॅबिनमधे गेल्यावर हूश्श वाटलं.

दोन कप चहाची ऑर्डर देऊन झाल्यावर मला म्हणाला,
“काय म्हणतोस?कसं काय चालंय?”
मी जयंतला विचारलं,
“क्लबात खेळता म्हणजे पत्ते खेळता ना?म्हणजे एकप्रकारचा जुगारच ना रे?”
“एकप्रकारचा कसला एकच प्रकारचा. हो,जुगार म्हणालास तरी चालेल.गमंत म्हणून खेळायचं झालं.
मला अलीकडे जुगार खेळण्याबद्दल विशेष वाटतं.
त्यात प्राक्तनाचा भाग असतो.त्यात अंगातल्या कौशल्याचा भाग असतो.त्यात जीवन आहे.त्यात मरण आहे.मला पोकर,रुलेट,ब्लॅकजॅक आणि क्रॅप्स ह्या पत्यातल्या खेळांची थोडी माहिती आहे. जुगार खेळण्याबद्दल मला पूर्वी विशेष वाटत नव्हतं,पुढेही वाटेल असं नाही मात्र आत्ता विशेष वाटतं.

माझं मत आहे की जुगार खेळण्यावर कोणत्याही वयावर,कोणत्याही राज्यात,आणि कोणत्याही देशात बंदी असता कामानये.माझं मत आहे की जरका मी योग्य वयावर जुगार खेळायला पसंती देऊ शकतो तर मी जुगार खेळायलाही योग्य आहे.पैज मारल्याने व्यक्तित्व विकसीत करता येतं.
त्यातून मला माझ्याचबद्दल धडे मिळतात. त्यातून जबाबदारीचे,संभाव्यतेचे आणि परिसीमेचे धडे मिळतात.

मी म्हणालो,
“जयंता,मी जरा धारीष्ट करून, तुला पत्याविषयी विचारलं.आमचं जीवन कसलं रे? पत्ते खेळायचे म्हणजे आम्हाला पाच,तिन दोन आणि झब्बू खेळायचं माहित आहे.पैसे लावून खेळल्यावर तो जुगारच म्हटलं पाहिजे.
मला वाटत नाही की,जुगार हा दोषरहित आहे.मला वाटतं त्यात फसवा-फसवी आहे,त्यात प्रातारणा करता येते.जुगाराच्या खेळात सत्यता असते, असत्यताही असते.कुणी ज्यावेळी सट्टा लावतो,अंदाज लावतो त्यावेळी तो खेळाच्या आधीन होतो आणि त्याचं कधीही समाधान होत नाही.पण जरका यश मिळालं तर तो नेहमीच जोखीम पत्करतो आणि जोखीम घेतल्यावर तो यशस्वीही होतो. बरोबर आहे ना?”

मला जयंत म्हणाला,
“तुझं अगदी बरोबर आहे.जुगार ही एक प्रकारची जोखीम आहे.लहानपणी मी शाळेत जोखीम घेताना त्याचा विनियोग करायचो,तसंच शाळेत असताना मी नेहमीच जोखीम घ्यायचो.रोज मी कसला पेहराव करायचो,काय बोलायचो,काय विचारायचो,कसा विचारायचो हे सर्व जोखीम घेतल्यासारखंच होतं.मला सांग,त्यामुळे मी लोकांना आवडत नव्हतो का?ते मला मुर्ख समजायचे का?मी मला स्वतःला मूर्ख दिसेन असं करायचो का?

मी नेहमीच म्हणत असतो की,कधीच जुगार न खेळण्यापेक्षा जुगार खेळून हरणं पत्करतं.
माझ्या सामाजीक जीवनाशी मी जुगार खेळतो.माझ्या प्रणयी जीवनाशी मी जुगार खेळतो आणि माझ्या पैशाशी जुगार खेळतो.नेहमीच जिंकायला मी उत्सुक असतो पण हरायलाही माझी तयारी असते.सी-सॉचा खेळ जसा दोघे मिळून आपण खेळतो तसा जुगार खेळताना एकट्याने खेळू नये असं मला वाटतं.मी जुगार खेळत असताना माझ्या मागे कुणीतरी निरखणारा असावा.जुगारात पैज लावताना एकाग्रता लागते. कुणीतरी मागून एक पाऊल मागे घ्यायला आणि थोडा उसासा घ्यायला,सुस्कारा घ्यायला सांगणारा हवा.”

हे ऐकून मी जयंताला म्हणालो,
“प्रत्येकाने जुगार खेळावा असं जरी तुझं मत असलं तरी प्रत्येकाने जुगार खेळलाच पाहिजे असं मी म्हणत नाही.जीवनात कधीकधी सांभाळून पावलं टाकायाला हवीत.
पण मी कुठे तरी वाचयलंय की,पत्याच्या खेळातून काही गोष्टी जीवनात शिकायला मिळतात.”

“तुझं अगदी बरोबर आहे.कसं ते मी तुला सांगतो”
असं म्हणत जयंत मला सांगू लागला,
“पत्यांच्या खेळासंबंधाने बोलायचं झाल्यास,जेव्हा माझ्याकडे उत्तम पानं आहेत असं मला वाटतं आणि समोरच्याकडे त्याहून उच्च पानं असावीत असं वाटल्यास डाव गुंडाळलेला बरा.ब्लॅकजॅक खेळात “डबल-डाऊन” करण्यापेक्षा (ह्या खेळात आपली बारी आली असताना एक पत्ता जास्त मागून घेऊन खेळ पुढे चालू ठेवता येतो)कधीकधी शरणांगती पत्करलेली बरी.पण कधीकधी तसं वाटलं तरी “डबल-डाऊन” करावं.अलबत जिंकण्याची आशा करावी. कारण,सामना केलेलाच बरा.जरका चुकीची पैज मारून शिकता आलं नाही तर खरं जिंकणं कसं असतं हे समजणार नाही.अशा वेळी तणाव कसा सांभाळायचा,चेत कसा येतो हे कसं समजायचं आणि जुगाराची आवश्यकता काय असते हे कसं समजायचं, हे कळणार नाही.
जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच हरतो.जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच जिंकतो.जीवनात मी नेहमीच जुगार खेळतो.”

जयंताबरोबर थोडावेळ का होईना,चर्चा करून काही तरी शिकायला मिळालं.बाहेर खूप काळोख झाला होता.जयंताचा गुरखा ऑफीस बंद करायला आला होता.जयंत मला म्हणाला,
“तू अंधेरीला रहातोस ना?मी मुंबईसेन्ट्रलला रहातो.तुला मरीनलाईन्सला सोडतो.पुढच्या खेपेला माझ्या घरीच ये.मी तुला फोन करीन.”
स्टेशन आल्यावर जयंताला बाय,बाय करून त्याच्या गाडीतून खाली उतरलो.उलट्या दिशेने चर्चगेटला गेलो.नशीबाने तीच गाडी अंधेरी लोकल झाली.अंधेरी येईपर्यंत मी जयंताशी झालेल्या चर्चेची उजळणी करीत होतो.पण त्याचं शेवटचं वाक्य एकसारखं मनात यायचं,
“जीवनात मी नेहमीच जुगार खेळतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: