तुमचं वय तेव्हडं आहे जे त्यावेळी तुम्हाला वाटतं.

“नेहमीच्या जीवनात मी ऐकत आले आहे की,
“वयानुसार वाग”
पण मला म्हणायचं आहे,
“का म्हणून”?”

काल रेखाच्या आजीचा जन्म-दिवस होता म्हणून तिला शुभेच्छा द्यायला रेखाच्या घरी गेलो होतो.दरवाजा आजीनेच उघडला.लगेचच नतमस्तक होऊन तिला पाया पडलो.रेखाच्या आजीने काल एकाऐंशी वर्षात पदार्पण केलं.हे घेण्यासारखं आहे.एव्हडं वय होऊन आजी एकदम फिट्ट होती.दरवाजा उघडायला आली. गुढघे दुखत नव्हते,डोळ्याला चष्मा नव्हता,हातात काठी घेऊनपण फिरत नसायची.एखाद्याच्याच नशीबात असं जीवन जगायला मिळतं.

रेखा ज्यावेळी मला चहा आणि शिरा घेऊन माझ्याजवळ गप्पा मारायला बसली तेव्हा मी तिच्या आजीबद्दलचं माझं हे अवलोकन तिला सांगीतलं.
“तू पण तुझं वय झाल्यावर तुझ्या आजी सारखी प्रकृती ठेव.”
मी रेखाला म्हणालो.
माझं हे ऐकून जरा गालातल्या गालात हसत रेखा मला म्हणाली,
“माझी आजी माझा वारसा आहे.आजी हेच माझं लक्ष आहे.ते कसं ते मी तुम्हाला सांगते.
वय तुमचं पंचाऐंशी झाल्यावर तुम्ही कुठे असाल ह्याचा जरा विचार करा.एखाद्या वृद्धाश्रमात व्हीलचेअरवर बसून नाकपुड्यात ऑक्सिजनच्या नळ्या घालून,नाकावरचा चष्मा नाकावरून खाली सरकत आहे,कानात श्रवण यंत्र असून त्याची बॅट्री संपूष्टात आली आहे,मरून एक आठवडा झाला असावा अशी तुमच्या अंगाला दुर्गंधी येत आहे.
नाही.मी तशी नसणार.

माझं आत्ताचं वय फक्त सत्तावीस आहे.पण मी ह्याबद्दल नेहमीच विचार करीत असते.आणि मनात म्हणते,
“तुमचं वय तेव्हडं आहे जे त्यावेळी तुम्हाला वाटतं.”
असं मनात वाटून आणि त्याप्रमाणे वागून तुम्ही स्वतःला सशक्त आणि तरूण ठेवू शकता.

त्याचं कारण सांगते.मी ज्यावेळी अठरा वर्षाची होते तेव्हा माझ्या मावशीबरोबर एका स्मृतीभ्रम झालेल्या रुग्णांच्या आश्रमात गेले होते.माझी मावशी गेली कित्येक वर्षे ह्या आश्रमात सेवा करते.मी माझ्या मावशीला म्हणाले की,
“मी एक महिनातरी तुझ्याबरोबर ह्या ठिकाणी येत जाईन”
माझ्या मावशीला हे ऐकून आश्चर्य वाटलं.पण मी तिला माझं कारण समजावून सांगीतलं.

साठ वर्षापासून शंभर वर्षापर्यंतच्या आश्रमातल्या रुग्णांची सेवा करण्याचं मी ठरवलं होतं.माझ्या एक गोष्ट निक्षून लक्षात आली की ह्या बिचार्‍या सर्व रुग्णांना पहिला फटका बसतो तो त्यांचा संयतपणा जातो, त्यांचं नियंत्रण जातं.ते सर्व शाळकरी मुलांसारखे वागतात.त्यांना जगात काय चालंय ह्याची कदरच नसते.दुसर्‍या गोष्टीने माझं ध्यान वेधून घेतलं ते म्हणजे,ते सदासुखी दिसतात. जगात काय चाललंय ह्याकडे त्यांचं ध्यानच नसतं.

नंतर मी जशी मोठी होत गेले तसं ह्याच रुग्णांचा विचार करायची.अर्थात असा भयानक रोग मला व्हावा असं मी कधीच मनात आणलं नाही म्हणा.परंतु,त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटायला लागलं. आपल्यावर कसलंच नियंत्रण असू नये.मला ठाऊक होतं की आपल्यात चांगला निर्धार असला पाहिजे.पण त्याच वेळी येणारा रोजचा दिवस परिपूर्ण जगला पाहिजे.जे काही डोळ्यांना दिसतं त्याची दाद दिली गेली पाहिजे.लहान गोष्टीसुद्धा अध्याह्र्त धरून चालता येणार नाही.कारण उद्या त्या असतीलच असं नाही.आपणही उद्या असू असं नाही.

माझ्या मुलींना मी गावाला घेऊन गेले की घरातल्या अंगणात मी त्यांच्या बरोबर माती थापून खेळते.मी लहानच आहे असं समजून वागते.
पायांच्या बोटात माती गेली तरी मला चालते. तोंड दुखेपर्यंत मी हसते.जेवणापूर्वी मला आईसक्रीम खायाला आवडतं.किंवा कधी कधी जेवण म्हणून मला आईसक्रीम चालतं.
नेहमीच्या जीवनात मी ऐकत आले आहे की,
“वयानुसार वाग”
पण मला म्हणायचं आहे,
“का म्हणून”?

माझी ऐंशी वर्षाची आजी दर गुरवारी देवळात किर्तन ऐकायला जाते.किर्तनकार बुवांबरोबर गाते पण.दिसते मात्र जणू पासष्ट वर्षाचीच आहे.इतकं तरूण दिसण्याचं गुपीत काय म्हणून विचारलं तर सांगते,
“साठवर्षावर एकही दिवस मला झाला आहे असं मी मानीत नाही”

मला असं माझ्या आजीसारखं रहायचं आहे.माझ्या मुलींनापण मला हेच शिकवायचं आहे.रोजच्या कटकटीने आणि तणावाने तुम्हाला उदास वाटायला लागतं.उदास वाटण्यातून संताप आणि द्वेष निर्माण होतो.नंतर द्वेष आगीसारखा फैलावतो. उलटपक्षी हसावं आणि जग तुमच्याबरोबर हसतं.ह्यापेक्षा आणखी सत्य नसावं.

मला आठवतं,लहानपणी आम्ही काश्मिरला गेलो होतो.थंडीचे दिवस होते.बर्फ पहायचं आणि बर्फात खेळायचं ह्या उद्देशानेच थंडीच्या दिवसात गेलो होतो.त्यातला एक खेळ मला आठवतो .बर्फाचे गोळे करायचे आणि ते गोळे बर्फात घरंगळत नेल्यावर गोळे आकाराने मोठे होत जायचे.त्यालाच
स्नो-बॉल-इफेक्ट म्हणतात.माणसातला चांगूलपणा आणि दयाळूपणा हा बर्फाच्या गोळ्यासारखाच असतो. तसाच तो वाढत जातो.

तसंच,जितकं तरूण वाटावं तितकं रोज वाटून राहिल्यास बर्फाच्या गोळ्यासारखं वाटत रहाणार.माझ्या मित्र-मैत्रीणी मला नेहमीच सांगतात,
“तू आमच्यात असलीस की मजा येते.”
ज्या गोष्टीत गंमत असते ते पाहून हसून खेळून मी रहाते. माझ्या वयासारखंच का मला रहायला हवं? कंटाळवाणी जीवन जगायला जीवन पुरवतीला येत नाही.म्हणून ह्यापुढेही जीवनातला हरएक दिवस परिपूर्णत्वेने रहाते.काळजी नकरता प्रत्येक दिवस मजेने घालवते.

जीवनातले दिवस जस जसे जात रहातील तस तसे मी फुलपाखरांच्या मागे धावणार,भिरमुटे पकडणार, पुस्तकातली चित्रं रंगवणार,आणि माझ्या नवर्‍याबरोबर कालच लग्न झालं आहे असं वागणार.मला जेव्हडं वय वाटतं तेव्हडंच मी वाटून घेणार.मी अठरा वर्षाचीच आहे असं मला वाटतं.”

“विचाराने तरी आजीची नात शोभतेस.प्रत्यक्ष आजीच्या वयावर आल्यावर आम्ही कुठे तुला पहायला असणार?”
माझ्या हातातला रिकामा कप देत रेखाला मी म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. Posted जुलै 25, 2011 at 3:39 सकाळी | Permalink

    mast…


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: