चविष्ट जेवण.

“चवीपासून उत्पन्न झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे, जीवनाचा उगम प्रकट होतो,नवजीवनाच्या निर्मितीची पवित्रता जाणवते,जीवन जगण्यातला आनंद जाणवतो.”

सुमित्रा माझी चुलत बहीण.सुमित्रा चविष्ट जेवण करण्यात एकदम तरबेज आहे अशी माझी खात्री झाली आहे.मस्त मसालेदार जिन्नस करावेत ते सुमित्रानेच.तिच्या घरी कसलाही घरगुती कार्यक्रम असला की मला ती जेवायला हटकून बोलावते.मला ती पर्वणीच वाटते.
बरेच दिवस चविष्ट जेवण झालं नाही असं मनात आल्यावर मी सुमित्राकडे फोनवर कळवून तिच्याकडे जेवायला जातो.मात्र मीहून असा गेलो की सरंगा,पापलेट किंवा मटण मी सकाळीच तिला आणून देतो. तिला मी असं करणं पसंत नसतं ही गोष्ट वेगळी म्हणा.ती म्हणते तुला काय हवं आहे ते सांगून फक्त जेवायला ये.

ह्यावेळी मला सुमित्राने जेवायला बोलवलं होतं त्यावेळी जेवणं झाल्यावर गप्पा मारायच्यावेळी,सुमित्राला मुद्दाम विषय काढून तिच्या मस्त पदार्थ करण्याच्या हातोटीबद्दल विचारायचं मी ठरवलं होतं.

तिच्या घरात शिरताच शिजत असलेल्या जिन्नसांचे मसालेदार वास दरवळताना पाहून मीच तिला म्हणालो,
“निसर्गाने आपल्याला ज्ञानेंद्रिय दिली आहेत त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला वाटतं,ही ज्ञानेंद्रिय घेऊन आपण जन्माला येतो त्यामुळे आजुबाजूच्या जगाचं हजारो प्रकारे ज्ञान मिळू शकतं.ते प्रत्येक प्रकारचं ज्ञान हे एक, सुखसमाधानीसाठी,आनंदासाठी आणि स्वास्थ्यासाठी,प्रवेशद्वारच आहे असं मला वाटतं.”
ह्या माझ्या बोलण्यावर ती काही बोलणार असं दिसल्यावर मीच तिला म्हणालो,
“सगळी जेवणं झाल्यावर मला तुला ह्या विषयी काही विचारायचं आहे.प्रथम मस्त जेवूया.”

सुमित्राचा नवरा आणि त्याचा एक मित्र बाहेर बाल्कनीत बसून “घुटूं” घेत होते.
“आज काय विशेष?”
असा मी त्यांना प्रश्न केला.
“सुमित्राने तुम्हाला सांगीतलं नाही?.आज गटार अमावास्या.प्रथम घुटूं आणि नंतर मटण हे ओघाने आलंच.घुटूं बाबतीत जरी तुम्ही सोवळे ब्राम्हण असला तरी मटण मात्र तुम्हाला वर्ज नसतं.विशेषकरून सुमित्राने केलेलं.”
शरदला-सुमित्राच्या नवर्‍याला-माझं गुपित माहित होतं.बोलून झाल्यावर तो सातमजली हसला.ती त्यांची हसण्याची स्टाईल होती.
सुमित्राने सुकं मटण,रस्सा असलेलं मटण,कलेजी आणि वडे केले होते.सोलकढी आणि भात होताच.

सुमित्राकडून “जेवायला चला” म्हणून हाक ऐकण्याची वाटच पहात होतो.प्रत्येक डीश एका पेक्षा एक होती. जेवून मन तृप्त झालं.बाकी आम्ही बाहेर गप्पा मारीत होतो.सर्व आटोपून सुमित्रा येऊन माझ्या जवळ बसली.आपण दुसरीकडे बसूया म्हणून माझ्या कानात पुटपूट्ली.नंतर मला म्हणाली,
“सकाळी तुम्ही आल्याआल्या ज्ञानेंद्रियाबद्दल काहीतरी बोलत होता.डोळे, कान, नाक, जीभ,त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत.पण त्यातल्यात्यात मला चवीच्या ज्ञानाबद्दल विशेष वाटतं. मी ज्यावेळेला लहान मुलगी होते त्यावेळी, अंड्याचं आमलेट,तिखट शिरा,तेलात तळलेल्या तिखट पुर्‍या मला आवडायच्या.माझी आई रोज रात्रींचं जेवण काय करायचं ते ती एका पाटीवर लिहून ठेवायची.निरनीराळ्या चटण्या आणि त्याबरोबर मुख्य जिन्नस काय आहे ते आम्ही वाचायचो.पाटीवर लिहिण्याचा तिचा मुख्य उद्देश मन बदलल्यास तिला ते सहज पुसून दुसरं काहीतरी लिहून ठेवायला सुलभ व्हायचं.

जशी मी मोठी होत गेले तशी मी ब्रेकफास्ट तयार करण्यात मुरब्बी होत गेले.स्वादिष्ट आमलेटस,गोड पोळे,ब्रेडचं पुडींग,केशर घालून घोटवलेलं दुध असे पदार्थ असायचे.माझा आवडता ब्रेकफास्ट म्हणजे, कोथिंबीर घालून केलेले तिखट पोहे आणि त्यावर पेरलेलं ताजं किसलेलं खोबरं(चुन) किंवा भरपूर तूप घालून केलेला मखमखीत गोड शिरा,गरम गरम तिखट थालीपिठ आणि त्यावर लोण्याचा गोळा.”

“जेवण करणार्‍याला स्वतःला चवीचं ज्ञान जास्त आवश्यक आहे असं मला तरी तुझ्या बोलण्यावरून वाटतं. म्हणूनच तुझे जेवणाचे जिन्नस असे मस्त होतात नाही काय?
मी सुमित्राला प्रश्न करून मला विचारायचं होतं ते विचारलं.

“आता ह्या वयावर, शाळेतून निवृत्त झाल्यावर, मी निरनीराळ्या रेसिपीझ वाचून,प्रत्येक डीश आणखी चवदार करण्याची कल्पना करून,गोडा मसाला, मटणाचा मसाला,कुर्ल्याचं, तीसर्‍याचं भाजाण्याचं करण्यासाठी केलेला ताजा मसाला असावा असा विचार करून जिन्नस बनविते.ताज्या मसाल्याचा वापर हे पदार्थ जास्त चवदार व्ह्यायचं एक कारण आहे.पदार्थ शिजवला जात असताना योग्य तपमानाचा खालून दिला जाणारा जाळ हाही तेव्हडाच महत्वाचा आहे. मंद जाळाखाली जिन्नस पण शिजून चवदार लागतो.
बाहेर जेवायला जाते तेव्हा जिन्नस ऑर्डर करण्यापूर्वी तो कसा बनवला आहे त्याची चिकित्सा करून जमल्यास मला त्यावर आणखी काय हवं आहे याची सुचना देऊन तसा करून घेते.”
सुमित्रा माझ्या प्रश्नाचं उत्तर देत होती.

पुढे म्हणाली,
“घरी जिन्नस बनवून झाल्यावर त्याची चव पहाते.माझ्या मेंदुच्या मध्य भागातून, खरपूस तूपाची चव, खमंग मसाल्याची चव,सुक्या मटणाच्या फोडीची चव,तिरफळं घातलेल्या बांगड्याच्या तिखल्याची चव,कशी असते ते आठवूं शकते.ह्या आठवणी एव्हड्या जबर्‍या असतात की माझ्या जीभेवरपण त्या आठवणी आणता येतात.

माझ्या आजीच्या स्वयंपाक खोलीतल्या,निरनीराळ्या जिन्नसांच्या निरनीराळ्या वासांच्या आठवणी माझ्या मेंदूत अजून आहेत.जास्तकरून लसणीची फोडणी देऊन लोण्यासारखी शिजवलेल्या अळूच्या भाजीचा वास, कांद्याच्या चुरचूरीत भज्यांचा तळलेला वास,तिनेच तयार केलेल्या ताज्या मसाल्याचा वापर करून केलेल्या सुक्या मटणाचा शिजतानाचा वास.

चवदार पदार्थांच्या मिळणार्‍या चवीमुळे मी आनंदी होत असते.चव आणि चवीच्या आठवणी आणून शुद्ध आल्हाददायक वातावरणात चंगळ करणारी मी एक ज्ञानसंपन्न व्यक्ती झाली आहे आणि तशी असल्याबद्दल मला बरं वाटतं.हे विचार आता आता मला यायला लागले आहेत.शिक्षिकेची नोकरी असताना असले विचार डोक्यात आणायला वेळ कुणाला होता म्हणा.

चव आणि चवीची संरचना ह्यात मिळणार्‍या आल्हाददायक वातावरणामुळे माझ्या ध्यानात आलं आहे की, निसर्गाने त्यासाठीच आपलं शरीर आणि मन-आत्मा म्हणा वाटलं तर-बनवलं आहे.
ज्ञानेंद्रियाकडून मिळणारी माहिती माझ्या शरीरात जान आणते.मला वाटतं,चवीचं ज्ञान शरीराला आणि मनाला आनंद देतं,त्यांचं पोषण करतं.

चवीपासून उत्पन्न झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे, जीवनाचा उगम प्रकट होतो,नवजीवनाच्या निर्मितीची पवित्रता जाणवते,जीवन जगण्यातला आनंद जाणवतो.
नीट धुऊन साल काढून ताज्या ऊसाचा करवा दातामधे चावताना जेव्हा मी त्याचा स्वाद घेते, तेव्हा ज्या मातीत तो रुजला आणि उगवला त्या मातीचा मला स्वाद कळतो,आणि तो ऊस वाढत असताना ज्या साखरेने तो परिपूर्ण झाला त्या साखरेचा स्वाद कळतो.

मक्याची कणसं,उकडून मग खाताना त्याचे दाणे जीभेवर खरखरीत लागतात.पण ती कणसं शेतात वाढत असताना वार्‍यावर डुलताना,पावसात भिजताना दाण्या दाण्यात साखर जमा करीत असतात.प्रत्येक दाण्यातलं साखर मिश्रीत दुध जीभेवर वेगळाच स्वाद देतं.

कोकणात मिळणारे उंच झाडावरचे लहान लहान पिवळे जर्द आंबे,ज्यांना कोकणात घोटं म्हणतात,त्यांचा मिरमुटा स्वाद जीभेवर कसा लागतो ते अवर्णनीय आहे.ह्या घोटांचा रस खूप पातळ असतो आणि अतिशय गोड असतो,त्यासाठी तो चोखूनच खावा लागतो.एक एक आंबा चोखून खाताना जेव्हा त्याचा रस हनुवटीवरून हातावर आणि हातावरून मनगटावर झिरपत येतो तेव्हा पृथ्वीवरच स्वर्गाच्या दारात असल्यासारखं वाटतं.”

सुमित्रा,माझ्या प्रश्नाचं अशाप्रकारे सवित्सरपणे माहिती देऊन उत्तर देणार होती हे मला महित होतं.एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेत प्रिन्सिपालच्या पदावर जाऊन नंतर निवृत्त झालेली सुमित्रा किती सक्षम होती हे मी जाणून होतो.

मी तिला म्हणालो,
“आपली आई,आजीसुद्धा असेच चविष्ट जिन्नस बनवायची.पण तू त्याचं जे काय विश्लेषण करून सांगीतलंस त्याला तोड नाही.”

“मला चण्याच्या झाडावर चढवू नकोस.ही गटारी अमावास्या झाल्यावर श्रावण चालू होतो.एका मागून एक सण येणार आहेत.श्रावणात आम्ही सोवळे ब्राम्हण असतो.म्हणून तुला गोड चविष्ट जिन्नस करून घालीन. हे तुला स्थायी निमंत्रण आहे असं समज.”
सुमित्राने मला सांगून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*