संतुलन.

“कुणाच्याही भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी संतुलन ही एक किल्ली म्हणावी लागेल.”

ARISTOTLE’S TABLE OF VIRTUES AND VICES आणि त्यावर J.A.K Thomson ह्याने लिहिलेले आपले विचार, हे पुस्त्क मी लायब्ररीतून आणलं होतं.ते वाचायला घेतल्यावर हातातून सोडवत नव्हतं. संध्याकाळी तळ्यावर जाताना वाचायला न्यावं म्हणून बरोबर घेऊन गेलो होतो.प्रो.देसाई येई पर्यंत जमेल तेव्हडं ते पुस्तक वाचून काढावं असा माझा उद्देश होता.शिवाय त्या पुस्तकावर आणखी एक दोन क्लेम्स आहेत असं मला लायब्ररीयन-बाईने सांगीतलं होतं.म्हणून पुस्तक लवकर वाचून पूर्ण करून लायब्ररीत परत नेऊन द्यावं हाही माझा विचार होता.

आज नवल म्हणजे भाऊसाहेब माझ्या अगोदरच तळ्यावरच्या आमच्या नेहमीच्या बाकावर बसून मीच त्यांना दिलेली चिं.त्र्य.खानोलकरांची “कोंडूरा”ही कादंबरी, वाचत बसले होते.मला पहाताच वाचलेल्या पानांची रिमायंडर स्ट्रिप पुस्तकात घालून मला म्हणाले,
“कोकणात, भूत-खेत, देवचार,मुंजा,जळती चुड,विवर,विहीर,आड,डोंगर,वडा-पिंपळाचं झाड,कभिन्न काळोख,अमावास्या असल्या शब्दांचा आणि त्यावारच्या विषयांचा भरपूर वापर करून अनेक लेखकांच्या कादंबर्‍या मी वाचल्या आहेत.कोकण्यातल्या भुताखेताच्या गोष्टींवर सुंदर विचार लिहिले मी वाचले आहेत.ही खानोलकरांची कांदबरीपण मला आवडली आहे.तुम्ही कोणतं पुस्तक वाचत आहात?”
असा प्रश्न करून माझ्या हातातलं पुस्तक मागून त्यावरचं हेडींग वाचत होते.
“हे पुस्तक मी फार पूर्वी वाचलेलं आहे.आणि त्यावरच्या माझ्या विचारांची टिप्पणी पण केलेली मला आठवते.”
असं पुढे म्हणून मी काय म्हणतो याची वाट पहात आहेत असं मला भासलं.
मी सहाजिकच म्हणालो,
“मग ऐकूया तुमचे विचार”

मला भाऊसाहेब म्हणाले,
“जेव्हा लोकं आपलं जीवन जगत असतात,वयाने मोठी होत असतात,शरीर आणि मन धरून मोठी होत असतात, तेव्हा त्यांच्या ह्या सुखी जीवनाचं रहस्य काय असावं ह्याचा शोध लावण्याचा ही लोकं आटोकाट प्रयत्न करीत असतात. भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी किल्लीच्या शोधात असतात.
मला तरी असं वाटतं की जीवनात संतुलन असणं हा ह्या शोधाचा मुख्य आधार असावा.

कोणा एका तत्ववेत्त्याच्या-बहुतेक एरिस्टाटलच्या- सांगीतल्या जाणार्‍या नैतिकतेच्या अनेक मुद्यांचं हे तात्पर्य आहे असं समजून आधुनिक जगाला लागू व्हावं ह्या दृष्टीतून जीवनातल्या संतुलनाबाबत मला म्हणायचं आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या प्रयासात ह्या संतुलनाच्या वापराचं एव्हडं महत्व नसलं तरी,जीवनाच्या एका विशाल तस्वीरीचा एक भाग असण्यात त्याचं महत्व आहे.

आपण लहानाचं मोठं होत असताना,आपलं वय वाढत असताना निरनीराळ्य़ा प्रसंगाशी झुंज देत असताना, आपल्या पालकाकडून किंवा आपण ज्यांना मानतो अशा व्यक्तींच्या विचारातून,निर्णय घेण्यासाठी आपल्याला मार्ग सापडत असतो.योग्य आणि अयोग्य ह्या मधला फरक आपण शिकत असतो.आणि हळुहळू पोक्तपणा आल्यावर आपलाच आपण निर्णय घेत असतो.
असं असून सुद्धा तुमच्या तुम्हालाच जीवनात निर्णय घ्यायची खरी सीमा तेव्हा कळते जेव्हा तुमच्याकडून तुमच्या पसंतीचे निर्णय तुमच्याच जीवनाच्या आड येतात.

माझंच घ्या.मी माझ्या किशोर वयातच,शाळा कॉलेज संपल्यानंतर, आणखी काही उपद्व्याप करायचं ठरवलं होतं.उपद्व्याप म्हणजे,एक प्रकारची जनसेवा,गरीब वस्तीत जाऊन लहान मुलांना शिकवण्याची सेवा वगैरे.ह्या गोष्टी हळूहळू वाढतच गेल्या आणि त्याचबरोबर मला माझ्या शिक्षणाची आणि त्यासंबंधाची कामं संभाळावी लागायची.ह्या जीवनपद्धतीमुळे माझ्या जीवनातल्या अनेक बाबीवर त्याचा असर व्हायला लागला. माझ्या मनावर ताण यायला लागला.त्यामुळे वेळेवर जेवण घेणं आणि झोप घेणं ह्या गोष्टी होत नसल्याने माझ्या स्वास्थ्याला तेव्हड्या हितकारक रहात नव्हत्या.
त्यामुळे मी करीत असलेले उपद्व्याप आणि माझी रोजची आवश्यक कामं ह्यात मला संतुलन आणणं भाग पडायचं.मला आठवतं,त्या काळात माझ्या कानात सतत पडणारा माझ्या आईच्या तोंडचा शब्द म्हणजे “प्राधान्य”.

रोज लोकांना निर्णय घ्यायला सामोरं जावं लागतं.मग तो निर्णय, सकाळी गोड शिरा खाऊ की तिखट शिरा खाऊ पासून ते कामावर गेल्यावर बजेट संबंधी काय करायचं,इथपर्यंतचे निर्णय.
आणि घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे परिणाम दूरवर होत असतात.आहाराचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर होतो आणि कामावरच्या निर्णयाचे परिणाम जॉबची पत संभाळण्यात होते. आणि समाजात असलेली आपली पत समजली जाते.म्हणून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तडजोड म्हणून संतुलन ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

निर्णय घेण्यासाठी शोधून काढलेल्या मार्गात, मध्य-बिंदू गाठण्याचा प्रयत्न, नव्या निर्णयाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करतो.एखादी व्यक्ती एकाच निर्णयात स्वतःला गढून ठेवते तेव्हा तिच्या जीवनातल्या काही भागात दुसरं काहीतरी मिळण्यात उणीव आणण्याची पूर्वनियोजना झाली म्हणून समजावं.म्हणूनच संतुलनाचा विचार करून निर्णय घेतल्याने,काही कमजोर डाग नाहीसे होतात.

ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल हटवादी राहूच शकत नाही आणि तुमच्या मनात असलेल्या उद्देशाचा पिच्छाच करू शकत नाही.अगदी साधा अर्थ असा की,भविष्यातल्या तुमच्या उद्देशावर तुमचं लक्ष केंद्रीत असताना, तुमच्या जीवनाच्या हरएक अंगाचा आणि घेतलेल्या निर्णयाचा तुम्ही ताबा ठेवायला शिकलं पाहिजे.

हे संतुलन गाठणं थोडं जिकीरीचं आहे,परंतु एकदा का तुम्ही ते स्थापित केलंत की,जीवन बरंच सुखकारक जातं असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय निश्चित होतो आणि जीवनावर आणि त्याचबरोबर अचानक मिळालेल्या कलाटणीवर ताबा ठेवायला मदत होते.

एरिस्टाटलने,सुखी जीवनाची अपेक्षा करताना,सुख कशामुळे निर्माण होतं हे पहाण्याचा प्रयत्न केला होता. सदाचरणाचा त्याचा वापर पाहिल्यावर सुखी माणसाची व्याख्या कळते.तसंच,त्याने दिलेल्या सदाचरणाच्या यादीतून काढलेलं तात्पर्य सुखी जीवनाचा मार्ग दाखवतं.ह्याच तात्पर्याकडे मी संतुलनाच्या दृष्टीतून जीवनाकडे पहातो.”

मला प्रो.देसायांचे विचार आवडले.
मी त्यांना म्हणालो,
“एकदा का तुम्ही तुमच्या जीवनातल्या निर्णय घेण्याच्या संतुलानचा सुक्ष्म भेद जाणू शकला आणि तुमच्या रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करू शकला की,मला वाटतं,ज्यावेळी तुमच्यावर निर्णय घेण्याची पाळी येईल,त्यावेळी ती घेणं तुम्हाला फारच सुलभ होईल.असं केल्याने लोकांच्या जीवनातल्या तणावाचा मोठा भाग दूर होईल.त्यामुळे जवळ असलेले उद्देश साध्य व्हायला मदत होईल.म्हणूनच कुणाच्याही भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी संतुलन ही एक किल्ली म्हणावी लागेल. हे तुम्ही केलेल्या टिप्पणीचं तात्पर्य मला काढायला हरकत नाही.”

“द्या टाळी”
असं म्हणून भाऊसाहेबांनी आपला हात पुढे केला,त्याचवेळी मी समजलो की,वाचण्यासाठी ह्या पुस्तकाचा घेतलेला माझा चॉईस स्वारस्यदायक होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: