एखादा स्पर्श

” मी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.”

अलीकडे माझ्या पहाण्यात आलं आहे की,बॉलीवूडच्या विश्वात आणि टिव्हीवरच्या हिंदी सिरयल्समधे प्रथम भेटीत कोण कुणाला जवळ घेत असतो-हग देत असतो-कोण कुणाच्या गालानी गालाला स्पर्श करीत असतो.किंवा पाठ थोपटीत असतो.हे अलीकडे बरचसं आपण पाश्चात्यांकडून उचलून घेतलं आहे असं मला वाटतं.
आपल्या रीतीत पुर्वापार आपण प्रथम भेटीत आपलेच हात जोडून नमस्कार करतो.मोठ्यांना वाकून पायापडतो.पण स्पर्श असा होत नाही.

अप्पा कर्णीकांच्या घरात केव्हाही जा,घरात वयाने लहान मुलं असतील ती वाकून तुमच्या पायाला स्पर्श करून जातील.मोठी मंडळी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला जवळ घेतील.मग असं करण्यात त्यामधे घरातल्या बायका,पुरूष दोन्हींचा सामावेश असेल.त्यांच्या घरात आपल्यापेक्षा वयाने मोठी असतील त्यांना मग आपण सहाजीकच वाकून नमस्कार करायला उद्युक्त होतो.ही ह्यांच्या घरातली रीत आजची नाही.फार पूर्वी पासूनची आहे.

अप्पांकडे गेल्यावर ह्या गोष्टींच मला कुतूहल असायचं.
म्हणून अप्पांना मी त्यादिवशी विचारलं,
“ह्या स्पर्शाच्या मागचं गौडबंगाल काय असावं.?”

लागलीच अप्पा मला म्हणाले,
“एखाद्याने एखाद्याला नुसता साधा स्पर्श केल्याने त्या स्पर्शाचा उबारा जीवशक्तीत खोलवर जाऊन त्याला होत असलेल्या क्लेशांचं रुपांतर, तो उबारा, सुखात करीत असावा.

मी अशा कुटूंबात वाढलो आहे की त्या कुटूंबातला प्रत्येकजण अगदी सहजपणे एकमेकाच्या पाठीवर हाततरी फिरवीत असूं किंवा एकमेकाच्या गळ्यात हात टाकत असूं.जेव्हा कुणी तुम्हाला स्पर्श करतो तेव्हा ह्या उबार्‍यातली उब तुमचा दिवस प्रसन्न करून टाकते.मला तरी स्पर्शाबद्दल विशेष वाटतं.

स्पर्शाबद्दल काय सांगावं.? स्पर्श असा असतो की जणू त्यातली ती दिलासा देणारी उब, एखाद्याच्या शरीरातल्या आणि जीवातल्या थंडीचं प्रमाण कमी करून टाकते.स्पर्श एखाद्याच्या आत्मसन्मानाचं पोषण करतो.सहजच एखाद्याकडून झालेला स्पर्श दुसर्‍याला आपणावर प्रेम केल्याचं आणि आपण त्याच्या मान्यतेत असल्याचं भासवतं.”

हे अप्पांचं ऐकून झाल्यावर मी त्यांना म्हणालो,
“एखादा त्याला झालेल्या स्पर्शाचा गैरसमज करून घेऊन,त्याचा अर्थ लैंगिकतेचा संकेत किंवा मनात काहीतरी काळंबेरं आहे असही वाटून घेऊ शकतो.”

त्यावर अप्पा म्हणाले,
“माझी तरी खात्री झाली आहे की मैत्रीपूर्वक झालेला स्पर्श हा माणसामाणसातला सुधार आहे.स्पर्श ही एक सम्मिलित स्वीकृति आहे, आणि मैत्रीमधली सूक्ष्म जवळीक आहे असं दाखवलं जातं.”

थोडावेळ थांबून थोडा विचार करून अप्पा मला पुढे म्हणाले,
“माझंच घ्या.कुणावरतरी कसलाही प्रसंग आला असेल,तेव्हा त्याच्या मनात आलेल्या प्रतिकूल भावना शोषून घेण्यासाठी,माझा हात सहजच त्याच्या
पाठीवरून फिरवला जातो.

एकदा काय झालं,माझा एक मित्र त्याच्या आईवडीलांबरोबर,कसल्यातरी विषयावर हुज्जा घालत होता.नंतर,तो चिडचीडला होऊन माझ्या जवळ
येऊन बसला.मला काहीच बोलता येत नव्हतं.मी काहीच बोलू शकत नसल्याने,त्याला दिलासा द्यावा म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागलो.दोन तीन मिनीटांनंतर माझ्याकडे पाहून मी हे का असं करतो म्हणून मला तो विचारायला लागला.त्यावेळी त्याला सांगायला माझ्या डोक्यात काहीच आलं नाही.

मी त्याच्या पाठीवरचा माझा हात काढून घेऊन,चकित होऊन मान खाली घालून बसलो असताना,त्याच्याकडून मिळणारी समज ऐकत होतो.
सर्वांनाच असा पाठीवरून हात फिरवलेला आवडत नाही हे त्याला सांगायचं होतं.हे त्याचं म्हणणं खरही आहे.मला वाटतं,ज्या लोकांना असा स्पर्श
केलेला आवडत नाही ते कदाचीत स्पर्शाशी अनभिज्ञ असावेत.

मी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.मला त्याने सांगून टाकलं
की,माझ्याकडून झालेल्या स्पर्शाची त्याला वाखाणणी करावीशी वाटते, तसंच स्पर्शामुळे का आणि कसा दिलासा मिळतो हे त्याला समजत नाही
असही तो म्हणाला.तसंच मला ते करणं कसं सुचतं हेही त्याला कळत नाही असं त्याने मला सांगून टाकलं.
लोकं म्हणतील की,त्यांच्या अंगाला कुणी स्पर्श केलेला त्यांना आवडत नाही आणि तसं केल्यास त्यांना अगदी अस्वस्थ व्हायला होतं.मला वाटतं,असं म्हणणारे, स्पर्शास्पर्शातून होणार्‍या विकासापासून वंचित झालेले असावेत.”

मी अप्पाना म्हणालो,
“खरं म्हणजे,कुणालाही स्पर्श करणं म्हणजेच प्रत्येकाला स्पर्श हवा असं वाटणं, ह्याबद्दलचं ज्ञान असणं. असं मला वाटतं.”

“तुमचं अगदी बरोबर आहे”
असं म्हणून अप्पा पुढे म्हणाले,
“एखाद्याला दुःख झालं असताना त्याचा हात हातात घेऊन रहायला एखाद्याला का वाटावं?एखाद्याला दुखापत झाली असताना दुसरा सहज प्रवृति
म्हणून त्याला आपल्याजवळ ओढून घेतो,त्याला भिडून बसतो,त्याला मिठीत घेतो.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा, यदा कदाचीत चालताना पडून माझ्या गुडघ्याला खरचटलं गेलं की, माझी आई लगेचच मला जवळ घेऊन माझ्या खरचटलेल्या जागेची पापी घेऊन फुंकर घालून म्हणायची,
“पटकन बरं होवो”
एखाद्याची ही अगदी साधी कृती,छोटसं प्रेम दाखवून जाते आणि होणार्‍या वेदना त्यामुळे निवळून जातात.लोकाना स्पर्श हवा असतो.जरी तसं
आजुबाजूला दिसलं नाही तरी त्याची जरूरी असते.एखादा सहज झालेला स्पर्श एखाद्याला जीवनभर सुखी करू शकतो.स्पर्श हा एखाद्या ठिणगी
सारखा असून कुणाच्याही जीवनात भडका पेटवून देऊ शकतो. म्हणूच मला स्पर्शाच्या क्षमतेविषयी खास वाटत असतं. आणि आमच्या घरातली ती
पूर्वीपासूनची रीत आहे.”

“तुमच्याशी चर्चा केल्यामुळे स्पर्शामागच्या भावना काय असतात ते मला कळलं.”
असं मी शेवटी अप्पांना म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com

4 Comments

  1. Posted सप्टेंबर 10, 2011 at 3:37 सकाळी | Permalink

    अगदी बरोबर सामंत पंत. माझाही काहीसा असाच अनुभव आहे. माझ्या मावस बहिणीला एक मुलगी आहे. ती लहान असताना मी ह्या स्पर्श्या बद्दल वाचले होते म्हून एक प्रयोग म्हणून मी तिच्या बरोबर मस्ती करायचो. आमचा संपर्क होईल अशी मस्ती करायचो. आज ती ५ वर्षाची झाली आहे. पण माझ्या शेवय तिला करमत नाही. मामा-भाचीचे एक सुंदर नाते तयार झाले आहे. मला तिच्याशी बोलल्या शिवाय करमत नाही.

    • Posted सप्टेंबर 10, 2011 at 5:14 pm | Permalink

      कुणाल,
      तुमचा अनुभव ऐकून बरं वाटलं.कुठच्याही रूढीचा चिकित्सक राहिल्याने त्या रुढीच्या मागचा अर्थ नीट कळतो.स्पर्शामुळे मामा-भाचीचं सुंदर नातं तयार झाल्याने ह्यापेक्षा सुखदायी गोष्ट कुठची असू शकते?
      असंच आपलं नातं वृद्धिंगत होवो अशी आपल्याला शुभेच्छा.
      प्रतिक्रियेबद्दल आभार.

  2. shaunakk
    Posted सप्टेंबर 16, 2011 at 7:24 सकाळी | Permalink

    केवळ अप्रतिम!!!


Post a Comment to shaunakk

Required fields are marked *

*
*