चालण्यातलं पथ्य

“रोजच्या जीवनातल्या घाईगर्दीच्या व्यापात चालण्याला अग्रतेच्या यादीत अगदी खालचा नंबर दिला जातो.”

माझा पुतण्या राजीव ह्याने अर्नाळ्याजवळ फार्महाऊस घेऊन खूप वर्षं झाली. मुख्य कारण असं की, त्याने ते फार्महाऊस त्याच्या आईवडीलांसाठी
घेतलं आहे.शहरात राहून ते ह्या वयावर कंटाळायला लागले आहेत.राजीवला कमाईसाठी शहरात रहाणं भागच आहे.तो फार्महाऊसवर जाऊन येऊन
असतो.काही दिवस फार्महाऊसवर येऊन रहाण्यासाठी माझा भाऊ रघुनाथ केव्हापासून माझ्या मागे लागला होता.माझा वीक-पॉइन्ट म्हणजे
नियमीतपणे रोज पायी चालायला जाणं.आज कित्येक वर्षं मी ते करीत आलो आहे.

रघुनाथचं पण तेच आहे.तो तर कोकणात असताना डोंगर चढून जायचा. असे किती डोंगर त्याने पालथे घातले असतील कुणास ठाऊक.आता
ह्यावयात तो आणि त्याची बायको शहरात मुलाकडे येऊन राहिली आहेत. मुलानेच त्यांना आपल्या घरी आणलं.दोघेही शहरी जीवनाला कंटाळतात
म्हणूनच अलीकडे त्याने फार्महाऊसवर जाऊन रहाण्यासाठी त्यांना सांगीतलं.

मुद्दाम वेळ काढून अलीकडेच मी रघुनाथकडे रहायला गेलो होतो. चालण्याबाबत आम्हा दोघांचं सूत जमत असल्याने माझाही वेळ मजेत जात होता. रघुनाथ रहातो त्या जागेसभोवतीचा परिसर खरोखरच रमणीय होता.भरपूर झाडी आणि हिरवे गार शेताचे मळे आणि मधूनच एखादं कौलारू घर दिसायचं.डोंगराची रांग दिसली असती तर अगदी कोकणात गेल्यासारखं वाटलं असतं.

एक दिवस आम्ही दोघे सकाळीच उठून चालायला गेलो होतो.
मी रघुनाथला म्हणालो,
“तू खरोखरंच लकी आहेस.ह्या वयात तुला तुझ्या मुलाने सुखात रहायला छान फार्महाऊस घेऊन दिलं आहे.”
हे ऐकून रघुनाथला अर्थातच खूप आनंद झाला.

मला म्हणाला,
“मुख्य म्हणजे मला कोकणात चालायला मिळायचं त्यासारखं इथे भरपूर चालायला मिळतं त्याचा मला खूपच आनंद होतो.चालणं हा माझा एक
मॅडनेस आहेस असं म्हटलस तरी चालेल.”

मी रघुनाथला म्हणालो,
“मला पण चालायला आवडतं.पण तुझं चालणं भारीच आहे.म्हणून तू तुझी प्रकृती चांगली ठेवून आहेस.”
रघुनाथला चालणं ह्या विषयावर मी एक ट्रिगरच दिली.

मला म्हणाला,
“पायी चालण्यामधल्या क्षमतेचं मला विशेष वाटतं.मात्र क्षमतेमधून चालण्याच्या प्रकाराबद्दल नव्हे.अर्थात त्यामधेसुद्धा काही उपयोगी गोष्टी आहेत म्हणा.म्हणूनच म्हणतो,नुसतंच चालल्यामुळे जी मजबूती येते त्याबद्दल मला विशेष वाटतं.

मी जेव्हा रागावलेला असतो,निराश असतो किंवा माझं मन दुःखी होतं तेव्हा मी चालतो.तसंच मी जेव्हा खुशीत असतो,चैतन्यपूर्ण असतो किंवा
चहा-कॉफी पिऊन वैतागतो तेव्हा चालतो.मी चालतो जेव्हा मी दमलेला असतो आणि जेव्हा मला बसून बसून खूप वेळ झालेला असतो आणि माझी कार्यशक्ती दबली गेलेली असते तेव्हा मी चालतो.जिथून सुरवात केली त्या जागी परत आल्यावर माझी मानसिकता,माझ्या भावना आणि माझं शरीर पूर्वस्थितीला येऊन पोहचतं.खरंच,पायी चालण्याने जीवनात एक प्रकारचं संतुलन येतं.मन प्रसन्न होण्यासाठी आणि शांत होण्यासाठी केलेला प्रयत्न अशी मी चालण्याची गणना करतो.

चालत राहिल्याने विचार करायला मला वेळ मिळतो,जागेपणी स्वप्न बघायला वेळ मिळतो आणि वाटेत दिसणार्‍या उमलून येणार्‍या फुलांच्या
ताटव्यांकडे निरखून पहायला वेळ मिळतो.गाडीत बसून बाहेर पहात असताना ज्या गोष्टी दृष्टी आड होत असतात त्या गोष्टी मला त्यावेळी आठवण करून देत असतात की,सतत बदलणार्‍या विश्वात मी रहात आहे.

मी जेव्हा चालत असतो,तेव्हा मला वाटत असतं की येणार्‍या समस्यांचा कुठून ना कुठून उलगडा होत रहाणार आहे आणि जीवनात मिळणारा
आनंद स्विकारला पाहिजे आणि त्या आनंदाला दाद दिली पाहिजे.लाक्षणिक अर्थाने मी एक पाऊल मागे असतो पण शब्द्शः मी एक पाऊल पुढे असतो.

रात्रीचा चालायला गेलो तर चांद्ण्य़ा आणि तारे मला वर दिसतात, ढगाळलेल्या वातावरणात चालायला पण मला बरं वाटतं.मला शांती हवी असेल आणि गलबलाट नको असेल तर मी एकटाच चालायला जातो. स्वच्छ हवा आणि व्यायाम हवा असेल तर मी माझ्या मोत्याला घेऊन बाहेर जातो.

मित्रांच्या गप्पागोष्टीत रमायचं असेल तर त्यांनाही घेऊन फिरतो.
मोत्याला घेऊन फिरायला गेल्यावर एक फायदा म्हणजे वाटेत दिसणारे शेजारी-पाजारी थांबून चर्चा करतात. त्यांच्याबरोबर मुलं असल्यास तीही
माझ्या मोत्यावर कौतुकाने हात फिरवून आनंदी होतात.ते पाहून मला बरं वाटतं.

माझ्या दृष्टीने पायी चालणं हे एक व्यसन आहे आणि जबरदस्त सकारात्मक ताकद आहे.रोजच्या चालण्याच्या खुराकासाठी मी हपापलेला असतो.
मला नेहमीच वाटत असतं की,चालायचं असेल तर विचार करीत करीत चालण्याशिवाय गत्यंतर नाही.जीवनात समाधान मिळण्यासाठी चालणं
अंगभूत आहे.असं असूनही रोजच्या जीवनातल्या घाईगर्दीच्या व्यापात चालण्याला अग्रतेच्या यादीत अगदी खालचा नंबर दिला जातो.किती चाललो
अथवा किती वेगात चाललो हे तेव्हडं महत्वाचं नाही.चालण्यामधली क्षमता जास्त महत्वाची असते.

आता ह्या गावात खूप वर्षं जीवंत असलेल्या उंचच उंच झाडांच्या सावलीतून मी आनंद घेत घेत चालतो,भातशेतीच्या कुणग्याजवळून चालतो,फार
जुन्या असलेल्या आणि जुन्या झालेल्या घरांच्या आळीमधून मार्ग काढीत चालतो.पण अमुक एका स्थळाला महत्व नाही.निरंतर चालण्याच्या क्रियेत, स्थळं फक्त नावीन्यात भर टाकतात.

“चालण्यातलं पथ्य” हा एक माझा सिद्धान्त आहे.तो असा की,मला हवं असलेलं आईसक्रीम आणि कुठचंही झटपट तयार केलेलं अन्न मी खाऊ
शकतो.पण ते मला चालण्यातून कमवलं पाहिजे.प्रकृतीला मिळणारे फायदे आणि चालण्यातून होणारी उष्मांक जाळण्याची प्रक्रिया ह्यामधून माझ्या
अंतीम लक्षाचा उद्देश साधायला खाण्याचा समतोल राखावा लागतो ह्यावर मी विश्वास ठेवतो.मी माझ्या ह्या सिद्धांतावर बरीच माहिती गोळा करीत आहे. कसं का असेना सिद्धांत सिद्ध झाले पाहिजेतच असं काही नसतं.

मला माहित आहे की लोकांना चालायला मजा येत नाही.लोक मला माहित आहेत पण मी त्यांना समजू शकत नाही.
मला वाटतं चालणं ही एक मत्ता आहे,साधन आहे,एक आमोद आहे आणि माझ्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.असं मला वाटतं.”

रघुनाथचा शब्दानशब्द खरा होता.चालण्याबद्दल त्याने सांगीतलेलं हे ऐकून मी मनात म्हणालो रघुनाथचा हा चालण्याचा मॅडनेस अन-उपद्रवी आहेच
त्याशिवाय ह्यावयात उच्चप्रत जीवन जगायला हा मॅडनेस खूपच फायद्याचा आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: