टकमक पाही.

“माझ्या सर्वात लहान मुलाच्या, तो गाढ झोपला असताना,चेहर्‍याकडे निरखून बघायला मला आवडायचं.हळु हळु त्याचा चेहरा बदलणार आहे.
एकदिवस चेहर्‍यावर दाढी येऊन तो चेहरा खडबडीत होणार आहे,नंतर तो सुरकुतणारही आहे.आणि त्यानंतरचं विचारकरणंही सहन होत नव्हतं.”

अशोकला मी खुपदा पाहिलंय,साधे कांदे किंवा बटाटे विकत घेत असला तरी एक एक कांदा किंवा एक एक बटाटा हातात घेऊन वरून खालून
आजुबाजू पाहून योग्य वाटल्यास तो निवडून घेऊन वजनाच्या काट्यावर टाकायचा.पहिल्यांदा पाहायची कुठचीही गोष्ट तो अगदी निरखून पहायचा.ही
टकमक पहायची त्याची सवय जरा निराळीच वाटायची.

ह्याच त्याच्या सवयीवर मी अशोकशी त्यादिवशी बोलत होतो.
मी त्याला म्हणालो,
“एकदा आपण दोघे अंधेरीच्या मासळी बाजारात मासळी घ्यायला गेलो होतो.नेहमीच्या आपल्या कोळणीकडून आपण पापलेटाचा सौदा करीत होतो.
त्या कोळणीने दिलेली दोन पापलेटं मी माझ्या पिशवीत टाकली.तू सुद्धा दोन पापलेटं घेतलीस.पण त्यासाठी तिला तू टोपलीतली सर्व पापलेटं
दाखवायला सांगीतलीस.ती तुला जीव तोडून सांगत होती,
“अरे दादा! सर्व पापलेटं ताज्या पाण्याची आहेत.”
एक दोन पापलेटं तिने मास्याच्या गळ्याखाली दाबून त्यातून पांढरं पाणी काढूनही तुला दाखवलं.पण तू शेवटी तुला हवी असलेली दोन पापलेटं
तुझ्या हातात वर ऊचलून वरून खालून,चारीही बाजूने न्याहाळून मग पिशवीत टाकलीस.
तुला माहित आहे? पुढच्या रविवारी मासे आणायला मी गेलो असताना ती कोळीण मला काय म्हणाली,
“तुमच्या बरोबर आलेला दादा भारीच चोखट-म्हणजे चौकस- माणूस होता.माझ्यावर त्याचा विश्वास नाही.”

मी हे सर्व अशोकला सांगीतल्यावर तो दोन मिनीटं खोखो हसत राहिला. आवंढा गिळून मला म्हणाला,
“मला माहित आहे की हे असं टकमक पहाणं शिष्टाचारात बसत नाही, तरीपण मला टक लावून पहायला आवडतं.
खरंतर टक लावून पहाणं,अनिमिष दृष्टी ठेवून पहाणं,अगदी निरखून पहाणं ह्याबद्दल मला विशेष वाटतं.असं करणं कधी कधी असभ्य वाटतं हे ही
खरं आहे.इतरांसारखंच माझ्या आईनेसुद्धा बरेच वेळा मला सांगीतलं होतं की असं करणं अनपेक्षित आणि धक्कादायक दिसतं.पण मला नेहमीच
वाटतं की,एखादी गोष्ट नीट समजण्यासाठी अगदी जवळूनच पहायला हवी.
मी वाचतो,ऐकतो चर्चा करतो आणि अर्थात लिहितोही.पण हे सर्व करण्यापूर्वी पहाण्याची क्रिया होत असते.

माझा हा दूरवरचा टक लावून पहाण्याचा पेशा,ज्याला कधी कधी दिवास्वप्न म्हटलं जातं,शाळेत शिकत असताना गणिताच्या वर्गात, खिडकीतून कटाक्षाने बाहेर बघण्याच्या सवयीतून कदाचीत झाला असावा. खिडकीतून दिसणार्‍या बाहेरच्या खेळाच्या मैदानाच्या कडेकडेला, झोपाळ्यांच्या जवळ लावलेल्या,काहीशा जोमाने उगवलेल्या झुडपांच्या लयबद्ध डोलण्याकडे पहाण्य़ात मी मोहित होत होतो.
बेरीज,गुणाकार,भागाकारापेक्षा हे पहाण्यात माझ्या मनावर सक्ती होत असावी.खरंच सांगायचं झाल्यास माझ्या ह्या दिवास्वप्नाच्या सवयीमुळे माझ्या आईने मला नंतर दुसर्‍या शाळेत घातलं होतं.

कोकणातलं आमचं घर,अवतिभोवतीच्या भात-शेताच्या मळ्याजवळ असल्याने,माझ्या खोलीतून एका खिडकीमधून गुरं चरताना दिसायची. तासनतास खिडकीच्या चौकडीवर माझी हनुवटी स्थिर ठेवून,जोमाने वाढलेल्या उंच उंच गवतामधून वारा आपली बोटं घालून गवत पिंजारताना मी टक लावून पहात असायचो.पावसाच्या दिवसात नदीवरून येणारे काळेकुट्ट ढग वेगाने क्षितीजाजवळ जाताना मी मन लावून पहायचो.
खिडकीतून टक लावून पहाण्यात मला मिळणारा हा दिलासा मला वाटतं माझ्या बालपणातून आणि नंतर तरूणपणातही चालू राहिला.ते देखावे
माझ्या कल्पनेत आणि माझ्या हृदयात कोरले जाऊन बरीच वर्ष राहिले.

ह्या टक लावून पहाण्याचे अनेक क्षण होते.एकदा सकाळी मी रानातून फिरत जात असताना,डोंगराच्या माथ्यावर येऊन थबकलो.एका झाडाच्या
बुंध्यावर कुणीतरी हृदय-बाणाची आकृती कोरली होती.आणि त्यात चमकणारा रंग भरला होता.तो प्रकार माझ्या नजरेत भरला.थोडावेळ तिथेच उभा राहून मी एकटक त्याच्याकडे पहात राहिलो.आणखी पुढे फिरत जात असताना तो बुंध्यावरचा रंग भरलेला चमकणारा पॅच मला तहानेसाठी
घेतलेल्या बाटली सारखा वाटत होता.ही मनावर झालेली छाप मी दिवसभर बाळगून होतो.

पहाण्याच्या क्रियेकडे लक्ष दिल्यास ही क्रिया सर्वांना करता येतं.त्याची सवय ठेवल्यास तो एक टक लावून पहाण्यातला भाग होईल.जशी वर्षं निघून गेली तशी मी माझ्या ह्या टक लावून पहाण्याच्या निपुणतेला थोडं दमाने घेतलं आहे.
कामाचा रगाडा निभावून नेण्यात विलंब होत असल्याने तसं करण्याची आवश्यकता भासू लागली.ह्या घाईगर्दीच्या जीवनात समोर येईल ती गोष्ट
निरखून पहाण्याच्या सवयीमुळे एखाद्या कार्यक्रमला किंवा एखाद्या सभेला जायला विलंब व्हायला लागला.

एक दिवशी मी माझी फटफटी काढून,नेहमीप्रमाणे घाईघाईत जात असताना,वाटेत पाचसहा रानटी बदकं रस्त्याच्या एका बाजुकडून दुसर्‍या बाजुला जाण्याच्या प्रयत्नात मला आडवी आली.एरव्ही मी गाडी थांबवून त्या बदकांच्या लयीत चालण्याच्या आणि कर्कश पण तालबद्द ओरडण्याच्या क्रियेकडे निरखून बघण्यासाठी रस्त्यावर थांबून बघत राहिलो असतो.पण माझ्या मुलाच्या खेळण्यातलं बॅट्रीवर चालणारं बदक पाहिल्याने मला त्या
चालण्यातली लय माहित होती.त्यामुळे चटकन निघून गेलो.

अलीकडे बर्‍याच गोष्टी पहाण्यात येतात.आजुबाजूचं जग प्रतिमानी भरलेलं आहे.माझ्या अंगावरच्या टी-शर्टवर लिहिलेलं ब्रिद-वाक्य,माझ्या पत्नीच्या
उजव्या हातावर गोंदलेलं पिंपळाचं इवलुसं पान,रात्रीचं निरभ्र आकाश तो माझ्या हातातला सेल-फोन वगैरे.
मी लेखक असल्याने एक टक पहाण्यासाठी दमाने घेण्याची मला सवयच झाली आहे. त्यामुळे जे काही मी बघत असतो,त्यातून अर्थ काढायला मी
प्रवृत्त होतो.माझ्या सर्वात लहान मुलाच्या, तो गाढ झोपला असताना, चेहर्‍याकडे निरखून बघायला मला आवडायचं.हळु हळु त्याचा चेहरा बदलणार आहे.एकदिवस चेहर्‍यावर दाढी येऊन तो चेहरा खडबडीत होणार आहे,नंतर तो सुरकुतणारही आहे.आणि त्यानंतरचं विचारकरणंही सहन होत नव्हतं.
मी जे टक लावून पहातो ते माझ्या स्मृतीत ठेवतो.त्यामुळे जे टिकून रहाणार नाही तेही मी धरून ठेवू शकतो.”

अशोककडून हे त्याचं सर्व ऐकल्यावर मला त्याची कीव आली.
मी त्याला म्हणालो,
“साधी टकमक पहाण्याची तुझी सवय माझ्या नजरेत दिसली.पण त्याची पार्श्वभूमी काय ते तुझ्याकडून ऐकल्यावर मला खूपच बरं वाटलं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. Posted सप्टेंबर 22, 2011 at 7:33 सकाळी | Permalink

    Ekdam mast..


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: