दावूनी बोट त्याला,म्हणती हसून लोक.

“अश्रूनी भरलेले डोळे पुशीत मी ज्यावेळी घरी यायची तेव्हा माझी आई नेहमीच माझा धीर उत्क्षेपक करायची.”

जे.पी रोडवर स्वदेश हॉटेल समोर माझी आणि वंदनाची गाठ पडली.तिला पाहून मी एकदम चकीत झालो.माझा अचंबीत चेहरा पाहून वंदनापण थोडी लाजलेली मी पाहिली.
रस्त्यात गप्पा मारण्यापेक्षा आपण स्वदेशमधे कॉफी पिऊया असं मी तिला म्हणालो.

वंदनानेच मला ओळखलं.एरव्ही मी तिला ओळखलं नसतं.तसं पाहिलंत तर खूप वर्षानी मी तिला भेटलो होतो.माझ्या मनात तिची छबी होती ती म्हणजे जाड काचेचा गोल चष्मा आणि एकदम सुदाम्याची प्रकृती असलेली वंदना.पण आता वयात आलेली तरूण वंदना अगदीच निराळी दिसत होती.चष्मा जाऊन आता तिने कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला सुरवात केली असावी आणि अंगानेपण थोडी भरली होती.

कॉफीचा पहिला घोट घेऊन झाल्यावर मी वंदनाला म्हणालो,
“काही फुलं कशी उशीरा उगवतात तशीच काही मुलं उशीरा मोठी होतात.उशीरा सुंदर दिसतात.”
वंदना आता सुंदर दिसते हा माझा शेरा ऐकून वंदना खूपच खजील झाली.

मला म्हणाली,
“तळ्यात पोहत असलेल्या बगळ्यांच्या पिल्लांच्या कळपात असलेलं,काळसर दिसणारं बदक खरं तर राजहंस असतं.जरा मोठं झालं की ते त्या कळपातून सहजच उडून जातं.

माझ्या आईचं मला सर्वांत आवडणारं सांगणं म्हणजे,ती मला म्हणायची की,
“तू मुळीचच पुस्तकी किडा नाहीस.”
माझ्या मनात हा विचार आल्यावर माझी मलाच गंमत वाटते.मी अगदीच हाडळकुळी होते.मी इतकी हाडकुळी होते की मला माझे डॉक्टर म्हणायचे की,
“तुझ्यात काही तरी,कमी आहे.”
असेल काहीतरी कमी.माझे जाड भिंगाचे दोन चष्मे होते.माझ्या चेहर्‍याला ते खूप मोठे दिसायचे.अगदी गोल आकाराचेही होते.”

मी म्हणालो,
“अगदी लहानपणी मी तुला पाहिल्याचं मला आठवतं.साधारण पहिलीत असशील.”

माझं हे ऐकून वंदनाला आपल्या लहानपणची आठवण आली असावी.कॉफीचा घोट घेण्यासाठी उचललेला कप पुन्हा बशीत ठेऊन हसत,हसत मला म्हणाली,
“मला आठवतं, मी पहिलीत असताना,तुम्ही मला पाहिलं असतंत तर,मी आमच्या शाळेच्या खेळाच्या मैदानात असताना घाबरून एव्हडी पळत रहायची की,अगदी दुष्ट विचाराची दोन मुलं माझा खूप पाठलाग करायची.सरतेशेवटी ती दोन दुष्ट मुलं मला पकडायची,कारण माझ्या पायात असलेल्या त्या छोट्याश्या काळ्या बकलच्या बुटात मला जमेल तेव्हडं, जोरात पळायचा मी प्रयत्न करायची.पण ती दोघं मला ढकलून द्यायची आणि पाडायची.

एक चांगली जोराची धडक मिळाल्याने मी जमीनीवर उलथी-पालथी व्हायची आणि माझ्या आईला आवडणारा हिरवा,लाल,काळा कुठलाही फ्रॉक त्यादिवशी घालून गेलेली मी,खरचटलेला गुडघा आणि गुडघ्याजवळच फाटलेला फ्रॉक घेऊन,लंगडत,लंगडत घरी यायची.

हाडकुळी आणि डोळ्यावर, चेहर्‍यावर उठून दिसणारा, मोठा चष्मा असलेली ती मी सहासी पण हास्यास्पद दिसायची.माझ्यात आलेला माझा स्वतःचा जोश मलाच सांगायचा की,माझा कुणीही पाडाव करू शकणार नाही.खरं म्हणजे ह्या जोशावर माझ्या आईचा हक्क असायला हवा.
अश्रूनी भरलेले डोळे पुशीत मी ज्यावेळी घरी यायची तेव्हा माझी आई नेहमीच माझा धीर उत्क्षेपक करायची.

अशाच वेळी मी आणि माझी आई एकमेकाजवळ बसून त्या राजहंसाची गोष्ट वाचायचो.माझा तर्क आहे की ह्यासाठीच हे एकशे एकावं कारण असेल मी माझ्या आईवर प्रेम करण्याचं.

पाचवीत असताना मी गावातून शहरात शाळा शिकायला गेली.अजूनही मी विचित्र आणि हाडकुळी दिसायची,अजूनही माझ्या डोळ्यावर जाड काचांचा चष्मा असायचा आणि त्यात भर म्हणून आता मी माझे दात पुढे येऊ नयेत म्हणून तारा लावायची.डोळ्यावरच्या चष्मामुळे आणि दातावरच्या तारेमुळे मी विचित्र दिसते असं माझ्या वर्गाची बाई मला म्हणायची.
मागे वळून पाहिल्यावर मला माझ्या दिसण्याचं हसू येतं.मला वाटतं त्या लोकांचं म्हणणं अगदी योग्य होतं.

एकंदरीत काय? माझी आईच खरंतर बरोबर होती.ज्या गोष्टींमुळे माझा पाणउतारा व्ह्यायचा त्या गोष्टींकडे बघीतल्यावर आता मला गंमत वाटते,आणि माझं मलाच हसू येतं.माझ्या डोळ्यावरचा चष्मा माझ्या चेहर्‍यासाठी मोठा होता किंवा माझा हाडकुळेपणा कुणाच्या डोळ्यात खुपायचा,पण मी कशाला पर्वा करायची त्याबद्दल.?

माझा तर्क आहे की,असेन मी त्यावेळी दिसत हास्यास्पद, असेनही मी हाडकूळी,माझी समज आहे की,अजुनही मी तशीच आहे.पण माझी मी आहे.आणि सध्या मी जशी आहे तशी आहे हे पण ठीक आहे.मी माझा स्वतःचा स्वीकार केला नाही तर कुणीही मला स्वीकारणार नाही.”

वंदनाची सत्य परिस्थिती ऐकून मला ही तिचा थोडा गहिवर आला.
मी तिला म्हणालो,
“एखादी व्यक्ती आतून कशी आहे हे महत्वाचं आहे.चवथीत असताना तो फाल्तू जाड काचेचा गोल चष्मा तुझ्या डोळ्यावर होता तो इतका महत्वाचा नव्हता.
मला वाटतं,कुणालाही राजहंस असण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचा स्वीकार त्याने केला पाहिजे.पण काही कारणास्तव कुणी राजहंस नसलं, तरी,ते काळंबेरं बदकाचं पिल्लूसुद्धा तितकच गोजिरवाणं असतं,असं मला वाटतं.”

असं म्हणून झाल्यावर वंदनाला काय वाटत असेल हे पहाण्यासाठी तिच्या चेहर्‍याकडे लक्ष देण्याऐवजी,मी वेटरला पैसे देण्याचा बहाणा करून कॉफीच्या बिलाकडे पहात होतो.
कॉन्टॅक्ट लेन्स असलेले तिचे डोळे कोणत्याही कारणानी ओले झाल्याचं मला पाहायचं नव्हतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: