जीवनभराची शिकवणूक.

“प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.”

आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट खाली पडून झाडाखाली पानांचा पाचोळा जमायला सुरवात झाली आहे. झाडावरच्या सफरचंदासारख्या फळांनी रंग घ्यायला सुरवात केली आहे.त्याचाच अर्थ आकाराने मोठी असलेली फळं खायला गोड लागणार आहेत.वेळीच ही फळं झाडावरून काढली नाहीत तर देठासकट ती खाली पडणार आहेत.एखाद दुसर्‍या फळावर पक्षांनी चोच मारून फळ खाल्याचं निदर्शनाला आणून दिलं आहे.म्हणजेच ही फळं खाण्यालायक झाली आहेत.
मुबलक फळफळावळचा हा प्रदेश असल्याने ज्याने त्याने आपल्या परसात फळांची झाडं लावली आहेत. खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी उरलेली फळं,पक्षी,खारी खाऊन टाकतात आणि झाडाखाली फळांचा खच पडतो.झाडाखाली पडणारी फळं कुजण्यापूर्वीच जमवून काढून टाकून जागा साफ केली नाहीतर गंदगी पसरते.

आता जवळ जवळ मार्च महिना येईतोपर्यंत तळ्यावर जायचं विसरून गेलं पाहिजे.काळोख खूप लवकर येतो.संध्याकाळचे पाच म्हणजे रात्रीचे दहा वाजल्यासारखे वाटतात.अशावेळी प्रो.देसायांचा फोन येतोच.
“आपण अधून मधून एकमेकाच्या घरी संध्याकाळच्यावेळी भेटूया.”

ह्यावेळी मी भाऊसाहेबांच्या घरी गेलो होतो.मी जाण्यापूर्वीच आणखी एकदोन पाहुण्याबरोबर प्रोफेसरांच्या गप्पा रंगल्या होत्या.मी गप्पांत भाग घेताना म्हणालो,
“मला वाटतं,असे काही लोक असतात की,त्यांना काही गोष्टी खचीतच माहित असतात.पण मला असंही वाटतं की,ह्या बोधगम्य गोष्टींचा,खास असा, परिणाम त्यांच्यावर होत नसावा.
एखादा खास गणीत-तज्ञ संख्येबद्दल खरं काय ते जाणत असेल,आणि एखादा इंजीनियर प्राकृतिक बळाचा त्याच्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे चांगलं जाणत असेल.पण गणीत-तज्ञ आणि इंजीनियर ही प्रथम माणसं आहेत,त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर मलाही धरून ,विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्ञान किंवा अंगातली कला ही तितकी मोठी बाब नाही,इतरांबरोबर असलेले संबंध जास्त महत्वाचे आहेत. आपणासर्वांनाच इंजीनियर किंवा गणीत-तज्ञ व्ह्यायची जरूरी नाही पण इतरांबरोबर संबंध ठेवणं सर्वांनाच जरूरीचं असतं.”

माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“आपली ही एकमेकासंबंधीत नाती,जी जीवनात जास्त महत्वाची असतात, ती सांभाळायला कठीण असतात, कारण बरेच वेळा खरं काय आणि खोटं काय ह्याचा प्रश्न उद्भवत असतो.
मला वाटतं,आपल्याला खरं आणि खोटं याबद्दल खास ज्ञान नसतं.आणि जरी माहित असलं तरी,मला वाटतं, आपल्या वयक्तिक स्वारस्याच्या आणि आपल्या प्रवृत्तिच्या विरोधातही जे काही आपल्याला खात्रीपूर्वक खरं आहे असं वाटत असलं आणि शोधून काढणं निरन्तर कठीण आहे असं वाटत असलं तरी ते शोधून काढणं बरं असतं.

तसं पाहिलं तर,काय सत्य आहे ह्याबद्दल आपल्याला जमेल तेव्हडं त्याचं उत्तम मुल्यांकन करून त्यानंतर आपणच ,भले त्यावर खात्री नसेना का, ती शर्त समजून कृती केली पाहिजे.

खरं काय आहे ते समजायची खात्री नसल्याने आणि कदाचीत चुकीची समज असण्याचा संभव असल्याने आपल्यात आपण दयाळु वृत्ती आणि मन वळवण्याची वृत्ती ठेवायला हवी.परंतु,त्याचबरोबर खरं शोधून काढायला सफल होण्यासाठी, आपल्याला अविचल आणि हिमती रहायला हवं.
योग्य काय आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात,नम्रता आणि कारूण्य ह्याचा मेळ जमवून सफलता आणणं काहीसं कठीण जातं.परंतु,खरं करून दाखवणं हे अंमळ कठीण असतं कारण त्यासाठी स्वतःशीच लढत द्यावी लागते.

योग्य तेच करणं म्हणजेच स्वतःशीच लढत देणं,कारण,नैसर्गिक दृष्ट्या,आपण प्रत्येकजण असंच आचरण करण्याच्या प्रयत्नात असतो,प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण वागतही असतो की,जणू हे विश्व आपल्याच भोवती केंद्रीभूत झालेलं आहे आणि आपलं त्या विश्वात असणं हे ह्या विश्वाचा उद्देश आहे.

मला खात्रीपूर्वक वाटतं,माझं तरी तसं काहीही नाही. परंतु,जणू आहे असं वागून, मी नक्कीच चुक करून घेणार आहे.
त्यासाठी मला नेहमीच स्वतःशी लढत देत राहिलं पाहिजे.याचाच अर्थ,कष्ट,पीडा ही नुसतीच अनिर्वाय नाही तर ती जीवनभराची अत्यावश्यक तालीम आहे आणि ह्यातून मला माझं हित कसं साधायचं हे शिकता येतं.

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते.अशी ही माझ्या मनातली श्रद्धा कुठून आली असेल तेही मला माहित आहे.मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”

भाऊसाहेब बोलायचे थांबले आहेत असं पाहून मी त्यांना म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“हे ब्रम्हांड हा एक एव्हडा मोठी चमत्कार आहे की,तो समजून घेण्यासाठी त्याच्या निकट जायला फक्त एकच मार्ग असणं महाकठीण आहे.”

माझं हे विवरण ऐकून चर्चा संपवताना प्रो.देसाई म्हणाले,
“धर्मातून मिळणारी शिकवणूक तसंच समाजातल्या इतर विद्वान लोकांकडून मिळणारी शिकवणूक ऐकून घेऊन मग आपलं मत ठरवण्याचे आता दिवस आलेले दिसतात.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted नोव्हेंबर 11, 2011 at 8:38 pm | Permalink

  khup khup diwasa nantar aaj nivaant pane barachsa blog anni ghoshati vachyalya,khup chan vatala kaka.

  • Posted नोव्हेंबर 13, 2011 at 7:18 pm | Permalink

   mehhekk,
   मला पण आपली खूप दिवसानी आलेली प्रतिक्रिया पाहून आणि वाचून आनंद झाला.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: