आणखी आणखी मिळवण्याची आशा.

“हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे. अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.”

रमाकांतचं पूरं आयुष्य कोकणात गेलं आणि तेसुद्धा आपल्या आजोळच्या घरात गेलं.रमाकांत प्रथमच मुंबईला आला होता.यायची पाळी आली नसती तर तो मुळीच आला नसता.
“ज्यांना आणखी आणखी मिळवण्याची हौस असेल त्यानी जावं वाटलं तर मुंबईला.”
मी ज्या ज्या वेळी कोकणात रमाकांतला भेटायला जायचो त्या त्या वेळी हे त्याचे उद्गार माझ्या कानावर आले आहेत.

“काय रे बाबा?आणखी आणखी मिळवण्याचे तुझे दिवस आता राहिले नाहीत मग तू का बरं मुंबईला आलास?”
असं मी रमाकांतला विचारण्यापूर्वीच उमेशने,त्याच्या मुलाने,सर्व हकीकत सांगायला सुरवात केली.

“बाबांचं आता वय झालं आहे.त्यांना मुंबईचा प्रवास जमत नाही.पण काय करणार उपाय करण्यासाठी इकडे यावंच लागलं.”
मी उमेशच्या घरी रमाकांतला भेटायला गेलो होतो तेव्हा मला उमेश असं म्हणाला.

उतार वयात प्रकृती केव्हा ढांसळेल ते सांगता येत नाही.जीवन प्रवासात आयुष्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे साधरण वय वर्ष अठरा ते अठ्ठावीस.
अठरा वर्षाच्या अगोदरच्या काळात अन-अनुभवी म्हणून ऐकून घ्यावा लागतो तो काळ आणि अठ्ठावीस नंतर तेव्हडा दांडगटपणा करता येत नाही तो काळ.तीशी,चाळीशी,पन्नाशी आणि पुढे आयुष्याचा आलेख हळू हळू उतरणीला लागलेला असतो.
रमाकांत आता सत्तरीला आलेला होता.

“एकाएकी सकाळी उठल्यावर बाबांना लघवीच होईना.ओटीपोटात कळा यायला लागल्या.लगेचच गावातल्या पंडीत डॉक्टरना बोलवलं.”
उमेश मला सांगत होता.
पुढे म्हणाला,
“पंडीतानी काही गोळ्या दिल्या आणि बेळगावला ताबडतोब घेऊन जा म्हणून सल्ला दिला.टॅक्सी करून बाबांना बेळगावला घेऊन गेलो.तिकडच्या डॉक्टरानी बाबांच्या ब्लॅडर मधे कॅथीटर घालून ब्लॅडर रिकामा केला.त्यांना खूप बरं वाटलं पण म्हणाले आता त्यांना मुबईला घेऊन जा.प्रोस्ट्रेट
ग्लॅन्डला सुज आली आहे.तिकडे उपाय होतील.म्हणून तसेच आम्ही त्यांना घेऊन मुंबईला आलो.”

“मग इकडे काय निदान निघालं?”
मी उमेशला कुतूहलाने विचारलं.

“ग्लॅन्डला सूज आल्याने तसं झालं.ह्या वयात तसं होतं.ग्लॅन्डचे फोटो काढून कदाचीत बायप्सी करून निर्णयाला आलं पाहिजे.कॅन्सरपण असू शकतो.”
असं इकडचे डॉक्टर म्हणाले.”

चेहर्‍यावर समाधानीची छटा आणून उमेश सांगत होता.
“कोकणात आयुष्य गेल्याने रमाकांतची विल-पॉवर जबरी असणार.”
मी उमेशला म्हणालो.

“अगदी बरोबर. सर्व टेस्ट्स झाल्यावर,तसं काही नाही असं डॉक्टरनी सांगीतलं.फक्त रेस्ट घ्यायाला सांगून औषधं घेण्याची लिस्ट दिली आहे.औषधानी सूज कमी झाल्यावर बरं वाटणार असं डॉक्टर पुढे म्हणाले.बाबा परत कोकणात जातो म्हणून माझ्या मागे लागले आहेत.त्यांना इथे करमत नाही.”
आपल्या बाबांच्या चेहर्‍याकडे बघत उमेशने सांगून टाकलं.

उमेश आणि माझ्यामधे चाललेला हा संवाद ऐकून रमाकांत काहीतरी सांगायला उत्सुक्त झालेला दिसला.
मला म्हणाला,
“मी हा पहिल्यांदाच मुंबईला येतोय.कोकणातलं आयुष्य तुला माहित आहे.इथे मला अवघडल्यासारखं होतं.आमचे आजी आजोबा अशा वयात कुठे मुंबईला येऊन उपचार करायचे?
हरी हरी म्हणत दिवस काढण्याचं हे वय.आहे ते सहन करून दिवस काढण्याचं हे वय.एव्हडा उपाय करण्यासाठी पैसा कुणाकडे होता.आणि उपायही त्यावेळी नव्हते.निवांत अंथरूण धरून रहायचे.आणि त्यातच अंत व्हायचा.
माझे लहानपणातले दिवस मला आठवतात.”

असं म्हणून रमाकांत खुशीत येऊन मला सांगायला लागला,
“पैसे सतत जवळ असण्यात किती फायदेमन्द असतं हे मला माहित होतं.हवेत त्यावेळी मला पैसे मिळायचे.एव्हडंच की मला मागावे लागायचे.पण बरेच वेळा या न त्या कारणाने मी पैसे कमवित असायचो.मी माझ्या आजोळी वाढलो.गावात मला हवं हवं ते मिळायचं.

माझ्या आजोबांच्या घराजवळून गावातला मुख्य रस्ता जायचा.रस्त्याच्या एका दिशेने वाटलं तर मला डोंगरावर चढून घनदाट झाडांच्या रानातून वर पर्यंत जाता यायचं, तसंच वाटलं तर रस्त्याच्या दुसर्‍या मार्गाने समुद्र-चौपाटीवरपण जायला यायचं.संध्याकाळच्या वेळी डोंगरावर चढून गेल्यावर एका विशिष्ट जागेवरून खाली वसलेलं गाव दिसायचं.काळोख होण्यापूर्वी घराघरातून छपरामधून नीळसर धुराचे लोट दिसायचे आणि काळोख झाल्यावर मिणमिणत्या दिव्यातून घरं आढळून यायची.मंगळोरी कौलाच्या घराच्या छपरातून विशिष्ट तर्‍हेच्या कौलामधून धुराचा लोट एखाद्या बोटीच्या नळकांड्यातून येणार्‍या धुरासारखा भास व्हायचा.

घराच्या मागच्या बाजूला आजोबांचं जवळ जवळ चारपाच एकराचं शेत होतं.घराच्या मागच्याच बाजूला मोठा मांगर होता.चारपाच गाई,चारपाच म्हशी, रेडे,शेताचे बैल मांगरात बांधून ठेवलेले असायचे.आम्ही त्याला गाई-गुरांचा गोठा म्हणायचो.गुरांचं शेण आणि मुत जमाकरून दोनतीन मोठ्या खड्यात साचवलं जायचं.त्याला आम्ही गायर्‍या म्हणायचो.शेताला ह्याचा खत म्हणून वापर व्हायचा.

मी पाचएक वर्षांच्या असेन.सर्वांबरोबर अगदी पहाटे उठून आजीबरोबर गोठ्यात जायचो. गड्यांच्या मदतीने आजी दोन चार चरव्या दूध काढून झाल्यावर सर्व गुरांना शेतात सोडून देण्यासाठी गुराख्यांच्या ताब्यात द्यायची.आजोबा बैलांची गाडी जुंपवून त्यात गवताच्या जुड्या भरून शेतात घेऊन जायचे.मी बैलगाडीत माझ्या आजोबांच्या जवळ त्यांच्या मांडीवर बसून बैलांना हाकायचो.गवताचा आणि सरकीच्या पेन्डीचा वास गाडीत बसल्याबरोबर माझ्या नाकात भरायचा.सकाळच्यापारी थंडगार पण झोंबणारा वारा माझ्या अंगावरून गेल्यावर अंगात शिरशीरी यायची.

शेताच्या जवळ शेणाने सारवलेल्या एका ओसरीजवळ आजोबा बैलगाडी थांबवून ठेवायचे.बैलांना इतर गुरांबरोबर जायला सोडून द्यायचे.ओसरीत गवताच्या जुड्या आणि पेन्ड रचून ठेवायचे.हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे.अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.
गाई-गुरांबरोबर आणि शेतीच्या वातावरणाबरोबर मिळत राहिलेला अनुभव मी नेहमीच माझ्या उराशी बाळगून होतो.इतक्या वर्षाच्या माझ्या आजोळच्या वास्तव्यात माझ्या सर्व नातेवाईकांच्या सहवासात मी असायचो.

माझे आईबाबा,बहिणी,आजीआजोबा,पंजी पंजोबा,मामा, मावश्या,चुलत भावंडं शिवाय माझ्यासारखेच माझे खुळे मित्र ते पण तोपर्यंत नातेवाईक म्हणून जमा झाले होते. गावात एकमेकाला सहाय्य होण्याची व्यवस्था स्थापन झाली होती.उन्हाळ्याच्या दिवसात एक आठवड्यासाठी सर्व गोतावळा आमच्या आजीआजोबांच्या घरात एकत्र जमून, धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी, मजा करायचो.साध्या जीवनशैलीची शिकवणूक मी ह्यातूनच शिकलो.

सर्व परिसर शांत असायचा.टीव्ही नाही,रेडिओ नाही.रात्रीचे दिवे म्हणजे घासलेटवर चालणारे कंदील.संध्याकाळ झाली की पडवीत सर्व दिवे आणून साफ पुसून ठेवून,नसल्यास घासलेट भरून मंद पेटवून ठेवले जायचे.नंतर पुर्ण काळोख झाल्यावर एक एक कंदील वेगवेगळ्या खोलीत नेऊन वात मोठी करून ठेवले जायचे.

सर्व वयस्कर मंडळी घरात झोपायची.आम्ही सर्व बाहेर उघड्या पडवीत अंथरूणं घालून झोपायचो. पौर्णिमेदिवशी लख्ख चांदण्यात झोपायला मजा यायची.चंद्रप्रकाश पाहून दिवस उजाडला असं समजून मधूनच एखादा कावळा काव काव करायचा.एखाद दुसर्‍या घुबडाचा ओरडण्याचा आवाज ऐकायला यायचा.बाहेरच्या वातावरणात एव्हडी शांत झोप लागायची की सकाळ कधी झाली हे कळायचंच नाही.

बाहेर मोठ्या फणसाच्या झाडाखाली एका मोठ्या हंड्यात गरम पाणी तापवलं जायचं.शेजारीच असलेल्या, नारळाच्या झापानी बांधलेल्या,आडोशाच्या खोलीत बायका आंघोळ करायच्या.आम्ही सर्व विहीरीत कळशी टाकून रहाटाच्या सहाय्याने पाणी काढून माडाच्या झाडाखाली ठेवलेल्या पाथरीवर आंघोळ करायचो.सर्वांचे धुवायचे कपडे एका मोठ्या ढोणीमधे साचवून धुतले जायचे. विहीरी जवळच ही ढोणी असायची.दोन मोठ्या पिंपळाच्या झाडामधे सूंभाची दोरी बांधून त्यावर धुऊन आलेले कपडे सुकण्यासाठी टांगले जायचे.

मला वाटतं,अगदी साधेपण हे उत्तम असतं.कॉन्क्रीटच्या जंगलात राहून जिथे शेकडो दुकानं असतात,हात पुढे करून बोटाला लागेल ती वस्तु निवडून खरेदी करता येते,तिथे जीवनातल्या लहान लहान गोष्टींचा विसर पडून सुखी जीवनाला गमावून बसलं जातं.मोठमोठाले शॉपिंग मॉल आणि तत्सम सुविधा न मिळाल्याने जीवन कसं जगायचं ह्याचा विसर पडला जातो.

एकंदरीत काय?आताचं आमचं हे वय म्हणजेच व्याधीना तोंड देत जगणं.कोकणात संध्याकाळच्या वेळी समुद्र-चौपाटीवर गेलं असताना सूर्यास्ताचा समय आनंद देऊन जातो.सूर्य अस्ताला जातानाचा देखावा अवर्णनीय असतो.सूर्यास्तावरून मला एक आठवलं,कुणीतरी म्हटलंय,
“सूर्याकडून एक शिकावं.संध्याकाळ झाली की निमुट अस्ताला जावं.”
अगदी तसंच मला वाटायला लागलं आहे.आता आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे.पण अस्ताला जाणं आपल्या हातात थोडंच आहे?”

रमाकांत जे काही सांगत होता ते मी निमुट ऐकून घेत होतो.गत जीवनाच्या जुन्या आठवणी काढून तो रममाण होत असताना डॉक्टरांच्या औषधाला पुष्टी म्हणून,आपल्या बालपणाच्या आठवणी काढून,त्या मला सांगून,तो सुखी होत असेल आणि हा उपाय रमाकांतला बरं होण्यात मदत होत असेल तर ऐकायला काय हरकत असावी असं मी माझ्या मनात म्हणत होतो.?

शेवटी मी त्याल एव्हडंच म्हणालो,
“थोडक्यात मी म्हणेन जे काही आहे त्यात समाधानी मानून न रहाता आणखी आणखी मिळवण्याच्या आशेने कुठेतरी निराशा पदरी आणून रहाणं कितपत योग्य होईल.?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: