हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.

“आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही.कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.”

मागच्या आठवड्यात विकएन्डला मेरी आणि तिचा नवरा पास्कल माझ्या घरी आला होता.खरं पाहिलंत तर ती दोघं वेसाव्याला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेली होती.पास्कलचं वेसाव्याला त्याच्या वाडवडीलांचं एक टुमदार घर होतं.वेसाव्या गावात बरीच सुधारणा होत असताना ह्यांचं
घर आड येत असल्याने प्लानमधे ते पाडून टाकण्याची गरज भासली होती.त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळणार होती.पास्कलच्या इतर भावंडात ती रक्कम वाटून घेऊन त्याच्या वाट्याला आलेल्या पैशातून त्याने वसईला एक टुमदार घर घेतलं होतं.आणि त्याला बरेच दिवस होऊन गेले होते.मला पास्कल आणि मेरी वसईला एकदिवस तरी येऊन जा म्हणून आमंत्रण द्यायला आले होते.

मेरी वेसाव्याला असताना नोकरी करायची.मुळात ती हुशार असल्याने बरीच शिकली आहे.कधी कधी कविता करते.काही मासिकात लहान मुलांवर लेख लिहिते.माझी तिची त्यामुळेच एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी भेट झाली होती.
वसईहून नोकरी करण्यासाठी मुंबई शहरात येणं कठीण होणार आहे हे तिला वेसाव्याहून सोडून जातानाच माहित होतं.म्हणून तिने नोकरी सोडून देण्याचा विचार अगोदरच करून ठेवला होता.

एकट्या नवर्‍याच्या जीवावर घर संसार चालवावा लागणार त्यामुळे प्राप्त परिस्थितीत काटकसरीत रहाणं आवश्यक होणार आहे हे ती जाणून होती.काही मंडळी आपलं ज्ञान,आपलं शिक्षण आणि आपले संस्कार हीच आपली संपत्ती आहे. जीवन जगण्यासाठी कमीतकमी आवश्यक गोष्टी
मिळाल्यावर त्यात समाधान मानून रहाणं आपल्याच हिताचं आहे असं मानतात.मेरी त्यातलीच होती.

मला ही तिची वृत्ति अगोदर पासूनच माहित होती.तशात पास्कल सारखा गुणी नवरा मिळाल्याने मेरी जास्तच सुखी होती.
“वेळातवेळ काढून मी वसईला नक्कीच येईन.पण सध्या तुमचं कसं काय चाललं आहे?तुझं होमवर्कर म्हणून कसं काय चाललं आहे?”
असं मी मेरीला विचारलं.

मला ती म्हणाली,
“आपलं जीवन सामान्य असावं असं मला नेहमी वाटत असतं.नशिबाने,माझं कुटूंब आणि माझी मित्रमंडळी मला जेव्हडा आनंद व्हावा तेव्हडा देत आहेत.मी खरंच नशिबवान आहे की,माझ्या नवर्‍याची मिळकत एव्हडीच आहे की आमच्या कुटूंबाला पुरते.वसईजवळ आमचं एक घर आहे. माझ्या दोन मुलांच्या स्वतंत्र खोल्या आहेत.आमच्या घराच्या मागून दिसणारा देखावा मन लोभण्यासारखा आहे.
मागच्या परसात उंच झाडं आहेत.आमच्या घराच्या छप्परावर त्यांची सावली पडून घर नेहमीच थंड रहातं.आवाढव्य निसर्गात मला रहायला आवडतं.

घरी जेवणखाण भरपूर असतं.आमचं सर्व जेवण आम्ही घरीच करतो.कारण तसं करणं आम्हाला परवडतं.शिवाय बाहेरून आणलेला शेकडो रुपयांचा पिझा किंबा तत्सम खायच्या गोष्टी माझ्या मुलांना खायला जरूरीचं आहे असं मला वाटत नाही.त्यातून खूपच अन्न खाल्लं जातं आणि खूपच पैसे लागतात.

जेव्हडं जमेल तेव्हडं कपड्याची खरेदी करताना मी, सेल लागला असेल तरच करते.प्रसिद्ध ब्रॅन्डचे कपडे खरदी करून नाहक पैसे घालवून बसायला मला आवडत नाही आणि परवडतही नाही.आमच्यासारखीच मिळकत असलेले आमचे शेजारीसुद्धा नाहक खरेदी करण्यात पैसे उडवीत नाहीत.मोठ्या मुलाचे कपडे नीट असतील आणि विरलेले नसतील तर ते धाकट्या मुलाला वापरतात.असं करणं व्यवहारिक आहे असं मला वाटतं.

माझ्या जवळ आहे ते वापरायला मला आवडतं.टीव्हीवरच्या आणि अन्य ठिकाणाहून, जाहिरातीतून येणार्‍या उपदेशावर मी भुलून जात नाही.एका स्थानिक फर्निचर बनवणार्‍याकडून आम्ही आम्हाला जरूरीचे सोफे बनवून घेतले.आमच्या मुलांना त्यावर उड्या मारून खेळण्या इतके ते मजबूत आहेत.
आमच्याकडे एक लहानसा टीव्ही आहे.त्याच्यासाठी एक पेटी बनवून त्यात तो पेटी बंद करून ठेवला आहे.त्यातून येणारा कलकलाट जो आम्हाला जरूरीचा वाटतो तेव्हडाच ऐकून घेण्यासाठी ही योजना आहे.

आमच्या जवळ एक जुनी गाडी आहे.मुलांच्या शाळेतल्या सुट्टीत ती गाडी आम्ही गावोगावी जाण्यास वापरली आहे.आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही. कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.
शिवाय आणखी खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत.आम्ही घरात प्रत्येकाचा जन्म-दिवस साजरा करतो.केक घरातच बनवतो.स्वतःच्या हाताने बनवलेली ग्रिटींग्स लोकाना देतो.मुलाना बरोबर घेऊन प्राणी दाखवण्यासाठी झूमधे घेऊन जातो.म्युझीयम्सपण त्यांना दाखवतो.नातेवाईकांकडे भेटीला जातो.अशावेळी बाहेर गावच्या दिखाव्याच्या होटेलमधे आम्ही रहात नाही.ह्यातच आम्हाला मजा येते.

आमच्या बाहेरच्या जगात डोकावून पाहिल्यावर,माझ्या नजरेतून अनेक गोष्टी सुटलेल्या नाहीत. आकाराच्या बाहेर प्रत्येक गोष्ट फुग्यासारखी फुगलेली दिसते.गाड्या जरूरी पेक्षा मोठ्या मिळतात.जरूरीपेक्षा जास्त खोल्यांची घरं बांधली जात आहेत.शॉपिंग-मॉल्स प्रचंड राजवाड्यासारखे बांधले जात आहेत.
जरूरीपेक्षा जास्त पाण्याचा विजेचा,गॅसचा,पेट्रोलचा,अन्नाचा वापर करणं म्हणजे एक प्रकारचा हावरटपणा दिसून येतो.
मला वाटतं,जरूरीपेक्षा मोठं करणं म्हणजेच अतिरेक करणं.आणि सर्वच काही मोठं व्हायला लागल्यास,खरं सृष्टीसौंदर्यच बिघडवून टाकलं जात आहे.

प्रत्येकानी जर का हात रोखून जीवन जगलं तर मला वाटतं,कदाचीत ज्यांच्या जवळ खरंच काही कमी आहे त्यांना जास्त मिळू शकेल.
आमची दोन जूनी कपाटं आहेत.मधूनच ती कधी उघडून पाहिली तर खूपच कोंबून ठेवलेल्या गोष्टी त्यात दिसतात.ते पाहून मला नेहमीच वाटतं की,निरूपयोगी गोष्टींचा दुरूपयोग होत आहे. जीवन तृप्त आहे असं मानल्यावर अशा गोष्टी पाहून त्या अनावश्यक आहेत असं असताना माझ्या मला मी अशिष्ट आहे असं वाटतं.एखाद्या शर्यतीत भाग घेऊन ती अनुचित मार्गाने जिंकल्यासारखं वाटतं.भरपूर पैसे असल्यानंतर थोडं विक्षित्प वागणं चालून जातं.पण मुळात जे जवळ आहे त्याने प्रत्येकजण तृप्त असेलच असं नाही.

सुखकर जीवन जगण्यासाठी माझ्या जवळ अगदी हवं तेव्हडंच आहे.आणि मला वाटतं,हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.
हे सर्व मी तुम्हाला सांगीतलं तरी तुम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी येऊन तळलेलं पापलेट आणि पापलेटाची तिखट आमटी गरम गरम भाताबरोबर जेवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. त्यासाठी आम्ही दोघं मधेच उतरून खास तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहो.”

“तुझ्याबद्दल मला खूप आदर आहे.तुझ्या शिक्षणाचं आणि तुझ्या संस्काराचं तू उत्तम चीज केल्याशिवाय रहाणार नाही हा तुझ्यावर माझा विश्वास आहे.तुझं घर आणि तुझा संसार बघून मला निश्चितच आनंद होईल.मी नक्कीच तुझ्याकडे येतो.”
असं मी मेरीला सांगीतल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद लक्षणीय होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. Posted नोव्हेंबर 20, 2011 at 9:49 pm | Permalink

  Shri Shrikrishanji
  Lekha madhil gruhiniche vichar atyant chan, sundar , sansara sukhi honya karita khup changale vatle.

  Krupaya ha lekha tumhi marthi vartaman patra madhy prasiddha karava ase mala vatate, karan lekhamadhil vichar sarvanna , khaskarun tarun jodpyana atayant upyogi ase aahet.

  tasecha aamhi ( sakya zalyas) tumcha navane ha lekh prasiddha karava ka?

  Krupya kalvave.

  eka changlya lekhabaddal tumhala khup khup Dhanyvad.

  Regards,

  Munot M S

 2. sadashiv Patil
  Posted नोव्हेंबर 24, 2011 at 4:35 सकाळी | Permalink

  Important thoughts exploring. Dhanywad


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: