विजयचं शहाणं खूळ

“कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.”

जेव्हा पहावं तेव्हा विजय आणि त्याचं कुटूंब देशात कुठेतरी सहलीवर गेले आहेत असं ऐकायला यायचं.मुलांना सुटी नसेल तर विजय एकटा कुठेतरी सहलीवर जाऊन यायचा.मात्र सुट्टी लागल्यावर सर्व कुटूंब सहलीवर जायचं.त्या त्या जागी सर्व ऋतूत कसं वाटतं हेही पहायला त्याचं कुतूहल कमी पडत नसायचं.कोकणातला पावसाळा,काश्मिरमधला बर्फ पडण्याचा मोसम, चेरापूंजीला अतोनात पाऊस पडत असताना,हिमाचल प्रदेशात फळफळावळचा सिझन असताना असं हे साधून तो सहली काढायचा.

एकदा मी विजयला मुद्दाम विचारलं,
“अशा ह्या सहली काढणं म्हणजे एक प्रकारचं खूळच आहे असं मला वाटलं तर ते गैर होईल का?”
माझं हे ऐकून विजयला राग येईल असं मला वाटलं होतं.उलटपक्षी त्याचा चेहरा आनंदलेला दिसला.

मला म्हणाला,
“मला हा असा प्रश्न तुम्हीच विचाराल ह्याची मला खात्री होती.कारण इतक्या लांबून ज्याज्या वेळी तुम्ही माझ्या घरी यायचा तेव्ह तेव्हा दाराला मोठं कुलूप बघून कोण वैतागणार नाही?. आणि शेजार्‍याकडे चौकशी केल्यावर विजय सहलीवर गेला आहे ऐकल्यावर नक्कीच वैताग येणार.
हो! माझं हे सहलीवर जाणं हे एक खूळच आहे.पण कुठचीही गोष्ट कारणाशिवाय नसते.ह्या खूळालाही एक कारण आहे.”

विजयच्या वडीलांनी अर्ली-रिटायर्डमेंट घेतली होती.आणि ते शहरातला ब्लॉक विकून गावात रहायला गेले होते हे मला माहित होतं.विजय त्यावेळी लहान होता.त्यांनी विजयच्या आजीआजोबांच्या शेतीवाडी जवळच एक टुमदार घर घेतलं होतं.आणि ते तिथेच कायमचे रहायला गेले होते.विजयच्या लहानपणचं जीवन हेच तो कारण सांगणार ह्याचा मला अंदाज होता.

मला विजय म्हणाला,
“मुक्काम-पोस्ट बदलणं म्हणजे कुणालाही वैतागल्यासारखं होणं स्वाभाविक आहे.जास्त करून दहाएक वर्षाच्या वयावर.
शहरातला रहाता ब्लॉक सोडून देऊन कुठच्या कुठे रहायला जायचं म्हणजे महाकठिण म्हणावं लागेल.मला आठवतं ज्या टॅक्सीतून आम्ही जात होतो,त्या रात्रीच्यावेळी आजुबाजूने पास होणार्‍या गाड्यांच्या आवाजाने आणि खड्डे ,खळगे संभाळीत जाताना गाडीला मिळणार्‍या हेलकाव्याने,त्या टॅक्सीत झोप येण्याऐवजी,आजुबाजूच्या शेतातल्या बेडकांच्या डरांव,डरांव आवाजाने आणि किड्यामकोड्यांच्या किर्र ओरडण्याने माझ्या डोक्यात त्यावेळी त्या आवाजांचे प्रतिध्वनी ऐकायला येत होते.

शेवटी मला दिलेल्या चार भिंतीच्या एका खोलीत मी मलाच जखडून घेतलं होतं.मी अगदी भयभीत आणि बेचैन झालो होतो.ह्या नव्या जागेतलं माझं भवितव्य काय असावं हे माझं मलाच कोडं झालं होतं.

जसजसे दिवस जात होते तसतसं माझ्याच मनात कुतूहल निर्माण होत गेलं.घराला बाल्कनी नव्हती.घराभोवती फेन्सिंग नव्हतं.रस्त्यावरून बसीस जाताना दिसत नव्हत्या.लोकांचा गलबलाट नव्हता.टीव्हीचं कोकाटणं नव्हतं.सगळं कसं शांत शांत होतं.सकाळीच गाईचं हंबरणं,कोंबड्यांच्या बांग, पक्षांची किलबिलाट,कुक्कुट-कोंबड्याचं अंतराअंतराने ओरडणं ह्याच गोष्टी कानावर यायच्या. हे ऐकून मन प्रसन्न व्हायचं हे मात्र निश्चित.

माझ्या अवतिभोवतीचा परिसर पहायची मला उत्सुकता होती. आम्ही आलो हे ऐकताच माझा मामा आमच्या घरी आला होता.माझ्या आजीआजोबांचं घर जवळच होतं.त्याच्या बरोबर मी त्यांच्या शेतावर गेलो.पायवाटेच्या दोन्ही बाजूला सूंदर हिरवी गार भाताची रोपं दिसली.एका कुणग्यात माझी आजी काम करताना मला दिसली.तिने मला पाहिल्यावर हातातलं सर्व टाकून माझ्याकडे लगबगीने आली.खूप दिवसानी माझ्या आजीला पाहून मला जो आनंद झाला तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

माझा हात तिच्या हातात घेऊन मी आणि माझी आजी आम्ही दोघं रानातून जायला निघालो. वाटेत एक नैसर्गिक झरा वहाताना पाहिला.त्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मी आणि माझी आजी पुढे पुढे जात राहिलो.त्या झर्‍याचं ते सर्व पाणी एका लहानश्या तलावात जमत होतं. आजीने मला तळ्याच्या काठी बसवलं आणि त्यात पोहणारे लहान मोठे मासे दाखवले.असं करत करत मी आणि माझी आजी त्यांच्या घरी आलो.सर्व परिसरात जोमात येऊन बहरलेली वनस्पती मला दाखवायची माझ्या आजीला इच्छा होती असं वाटलं.

शहर सोडून ह्या गावात आल्याबद्दल आता मला मुळीच वैताग वाटत नव्हता.जवळ जवळ ह्या वातावरणात मी आधीन झालो होतो,आहारी गेलो होतो.

शहरात ह्यापूर्वी असा अनुभव मला कधीच आला नव्हता.माझ्या अवतिभोवती अपक्षय आणि पुनर्जीवन होत असताना मला दिसत होतं.
कधीच अंत न होणारं कालचक्र,जन्म,जीवन,अंत आणि पुन्हा पुनर्जीवन ह्याचं दृष्य पहायला मिळत होतं.निसर्ग हेच माझं आश्रयस्थान झालं होतं.

जीवनातले तणाव आणि मागणी यापासून मी सहजच सुटका करून घेत होतो.आणि त्याचबरोबर मनाला विस्कळीत करणार्‍या विचाराना अडथळा आणीत होतो.हा निसर्गाशी जुळणारा माझा बंध माझ्या अख्या बालपणात वृद्धिंगत होत होता.उन्हाळ्याच्या दिवसात रानात हुदडणं,झर्‍याच्या पाण्यात पोहणं आणि झाडावर चढणं ह्यात दिवस जात होते.

आता ह्या वयावर निसर्गाचं देणं काय असतं त्याची प्रशंसा करणं खरोखरच जास्त सोपं जात आहे.आता माझ्या कुटूंबाबरोबर मी देशात जमेल तिथे सृष्टीसौन्दर्य पहायला अक्षरशः धावळपळ करीत असतो.धावपळ येवढ्यासाठीच की जसं वय होत जातं तसा प्रवास आणि दगदग जमत नाही.हे होण्यापूर्वीच इच्छा पूरी करून घेणं बरं असं उगाचच मनात येत असतं.

आम्ही देशातल्या सर्व राज्यात एकापाठून एक सहली काढीत आहो.कुठे प्राचिन गुहा दिसल्या की त्यात सरपटत जाऊन पहाणं,कुठे मोठे तलाव दिसले की त्यात मासेमारीचा छंद पुरवून घेणं, डोंगरावरून वाट फुटेल तिथे वरवर चालत जाणं,जाताना अपरिचीत दिसणारी वनस्पती,पक्षी न्याहळून पहाणं,समुद्र चौपाटीवर जाऊन सूर्योदय तसंच सूर्यास्त पाहून घेणं,हे करायला देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर जाणं, असं हे आमचं सारखंच चालू आहे.निसर्ग माझ्या जीवनात माझ्या स्वास्थ्याचं,माझ्या सुखासमाधानीचं गुणसंवर्घन करीत असतो,मला मार्गदर्शन करतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला प्रेरणा देतो असं मला वाटतं.

मी म्हणतो त्याचा अनुभव घेतल्याशिवाय जाणीव होणार नाही.सध्या आपण अतिवेगवान दुनियेत वावरत असतो.ह्या कटकटीच्या आणि खडतर जीवनात माणसं एव्हडी गुंतून गेली आहेत की, निसर्गरम्य जीवन असतं ह्याचा त्यांना विसर पडत चालला आहे.लोकांचं लक्ष विचलित झालं आहे असं मला वाटतं.कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.

माझ्या बालपणाच्या जीवनातल्या अनुभवावरून मी म्हणेन,आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे, निसर्ग सौन्दर्याच्या कल्पना मनात आणून शोधमोहीम काढून त्यात पूर्णपणे तल्लिन होऊन गेलं पाहिजे.निसर्गाच्याच उपचारात्मक स्वरूपात आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं.”

विजयचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मला त्याच्या खूळाची कल्पना आली.मला कुणाच्यातरी कवितेच्या दोन ओळी आठवल्या.
मी त्याला म्हणालोही,
“तुझे नाही इथले काही, अदृष्टातून आले कूळ
आदीम अंतीम सत्याला की जसे लगडते शहाणे खूळ!”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: