कट्ट्या-बट्ट्या.

“तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच.”
मी माझ्या पत्नीला म्हणालो.

केशव, माझा मित्र,वांद्रा स्टेशन जवळच असलेल्या एका चाळीत रहातो.मी कधी कामाला वांद्र्याला उतरलो की हटकून केशवला भेटून येतो.
असाच काल मी केशवकडे गेलो होतो.आमच्या राजकारणावर,महागाईवर,हवामानावर गप्पा चालल्या होत्या,तेव्हड्यात केशवचा सहा वर्षाचा मुलगा रडत रडत केशवजवळ येऊन म्हणाला,
“शेजारचा बंटी माझ्याशी बोलत नाही.तुम्ही त्याला तसं नको करू म्हणून सांगा.

केशव लागलीच त्याला म्हणाला,
“त्याला सॉरी म्हणून सांग”
“ते मी केव्हाच सांगीतलं,पण तो ऐकायला तयार नाही.”
मुलाने उत्तर दिलं.
“मग थोडावेळ त्याच्याकडे जाऊ नकोस.इथेच बस तो सर्व विसरून गेल्यावर तुझ्याशी तो बोलायला येईल.”
केशवने मुलाची समजूत घातली.
आणि माझ्याकडे बघून केशव हसला.

मी केशवला म्हणालो,
“अरे लहान मुलांत हे नेहमीच होतं.त्यांची कट्टी-बट्टी असते.मला माझं लहानपण आठवतं.आम्ही आते,मामे,चुलत भावंड नेहमी भांडायचो आणि मग कट्टी घ्यायचो.वेळ निघून गेल्यावर सर्वकाही विसरून बट्टी म्हणून परत खेळायला सुरवात करायचो.”

“कट्टी-बट्टी वरून मला एक गोष्ट आठवली”
केशव मला म्हणाला.
माझा किस्सा सांगतो असं म्हणून मला सांगू लागला,
“मोठी मंडळी पण अशीच कट्टी-बट्टी करतात.पण त्यांची बट्टी व्हायला फारच कष्ट पडतात. मोठ्यांची मनं लहानांसारखी मऊ नसतात.
त्याचं काय झालं एकदा मी ऑफिसात काम करत बसलो होतो.बरेच फोन येत होते.त्यात एक फोन माझ्या पत्नीकडून आला.मला ती फोनवर हुंदके देत रडत सांगत होती.

तिचा मनस्ताप सुस्पष्ट होता.तिची सख्खी बहिण काही केल्या तिच्याशी बोलायला तयार नव्हती. माझ्या पत्नीने तिला पाठवलेल्या माफीच्या पत्रांची तिच्या बहिणीने ती न उघडताच तिला ती परत केली होती.वाटेत कुठे जवळपास एकमेकाच्या नजरेला नजरा झाल्या तर तिची बहिण मान खाली
घालून पुढे जायची.

माझ्या स्वतःच्या बहिणीबरोबर असंच काहीसं झालं.माझे भावोजी-माझ्या बहिणीचा नवरा-जाऊन सहा वर्षं झाली.तिचा स्वतःचा मुलगा तिथपासून आपल्या आईबरोबर एक चकार शब्द बोललेला नाही.नव्हेतर आम्हा कुणाही नातेवाईकांशी एक शब्द बोलला नाही.

तात्पर्य: माझी पत्नी काय किंवा माझी बहिण काय दोघंही ह्या दुखदायी समस्येचं मुळ कारण समजूच शकल्या नाहीत. गैरसमज निर्माण झाले.राईचा पर्वत केला गेला.एकमेकात दरी निर्माण झाली.कित्येक वर्षाच्या प्रेमावर आणि विश्वासावर अविस्मरणीय आठवणीवर आणि नाजुक परिस्थितीत घेतल्या गेलेल्या काळजीवर पाणी पडलं.

मी फोनवरच माझ्या पत्नीला विचारलं,
“एकदा तरी तिला कट्टीची बट्टी असं म्हणालीस का?”
“कसली कट्टी आणि बट्टी?”
रागानेच मला माझ्या पत्नीने उलट प्रश्न केला.

“तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच.”
मी माझ्या पत्नीला म्हणालो.

तिला ह्यातलं काही माहितच नव्हतं.मी माझ्या पत्नीला त्यामागचं मूलतत्व काय असतं ते समजावून सांगत होतो.
“कुणी कुणाचं मन मोडलं,कुणी पहात नाही असं वाटून एकाने दुसर्‍याच्या ताटातला आवडीचा पदार्थ पटकन खाल्ला आणि लक्षात आल्यावर जर कुणी कट्टी घेतली,म्हणजेच बोलणं बंद केलं तर माझी चूक झाली,मला माफ कर,मी असं करायला नको होतं, असं म्हणताना माझी तुझी बट्टी असं म्हणायचं.असं हे लहान मुलं करतात.
असं किती वेळा कट्टीची बट्टी करायची ही दोघांमधे ठरलेली संख्या असायची.त्यानंतर मात्र नंतर करायचं ते म्हणजे जशास-तसं.

हे जशास-तसं म्हणजे,लहानपणी आपण जमीनीवर चौकोन काढून दगडाची खापरी टाकून एका पायावर लंगडत उडी मारून खेळ खेळायचो ते करताना चुकलं तर पुन्हा खेळण्यासाठी जशास-तसं खेळायचो ते जशास-तसं नव्हे.
हे जशास-तसं म्हणजे,ज्याची खोड काढली गेली त्याला खोडकाढणार्‍यांने तसाच आवडीचा पदार्थ आपल्या ताटातून मुद्दामून खायला द्यायचा किंवा काहीतरी लागट बोलून घ्यायचं.

माझी पत्नी मला म्हणाली,
“हे कट्टीबट्टी आणि जशासतसं माझ्या बहिणीबरोबर चालेल असं वाटत नाही.”

पण मी माझ्या पत्नीशी सहमत नव्हतो.माझी खात्री आहे की,जरी कुणाची कळ न काढायचं प्रयत्न केला गेला तरी आपण हाडामासाची माणसं काहीतरी चुका करतोच.आपण दुसर्‍याला,आपण ज्यांच्यावर अतीशय प्रेम करतो त्यांना,लागट असं बोलतो,आपण खोटं बोलतो,फसवतो आणि
कसलातरी घातही आपणाकडून होतो.
असं झाल्यावर कुणीही चिडून ओरडावं.उलट लागट बोलावं.पण कुणी माफी मागितली तर अस्वीकार करू नये.
कुणाशीही समझोता करणार नाही असं समज करून घेऊ नये.झिडकारू नये,टाळाटाळ करू नये,परित्याग करू नये.

सर्व कट्ट्या-बट्ट्यांचा आणि जशासतशाचा स्वीकार करून एकमेकासमोर बसून, कष्ट घेऊन, मोडलेलं दुरूस्त करावं.
अहमपणा गिळून टाकावा,दोन्ही हात दोन्ही बाजूला फैलावावेत आणि मनात जरा मऊपणा आणून, फारच लांबलं न जाण्याची खबरदारी घ्यावी.
कुणी जर का चुकलं माझं असं म्हणाल्यास माझंही चुकलं म्हणायला वेळ लावू नये.लाथा झाडाव्यात,श्वास कोंडून धरावा,मोठा गळा काढून ओरडून घ्यावं,असं हे दुसर्‍याला समजेतोवर करावं पण शेवटी माफ करावं.

मला वाटतं,माफ करण्याची क्रिया माणसाकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.जेव्हा कुणी दुसर्‍याची माफी स्वीकारतं,वास्तवीक तुमच्यावर अन्याय होऊनसुद्धा, तेव्हा उत्तमता आणि सभ्यता जी माणसाच्या मनात घर करून असते ती शांतीला आणि सद्भावनेला प्रोत्साहित करते.ज्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो.

तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगीतलं की,
“तू सर्वार्थाने झालेल्या गैरकृत्याच्या कट्ट्या-बट्ट्या मागे घेण्याची तयारी दाखवावी.आणि असं करूनही जर का तुझी बहिण तुझी माफी स्वीकारीत नसेल तर तिने तुझ्याशी सर्व तर्‍हेनं जशास तसं करावं. पण हा निर्थक हट्ट सोडून द्यावा.
मोठ्या मुष्किल काळानंतर शेवटी त्या दोघांचा समझोता झाला एकदाचा.”

तेव्हड्यात बंटी आणि केशवचा मुलगा हातात हात घालून आमच्या दोघां जवळ येऊन उभे राहिले.
मला हसू आवरेना,मी केशवला म्हणालो,
“लहान मुलांना कट्टी-बट्टी माहित आहे पण जशास-तसं माहित नाही हे बरं झालं नाहीतर तुझ्या पत्नीला पुन्हा एकदा फोनवर हे प्रकरण आणावं लागलं असतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: