व्यसनमुक्ती.

“मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात. अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात.”

अनंत नाडकर्ण्याला माझ्या दारात बेल वाजवून उभा ठाकलेला पाहून मी खरंच अचंबीत झालो.ही गॉन केस असं मी तत्पूर्वी समजत होतो.

त्याचं असं झालं,एका नावाजलेल्या बॅन्केत चांगल्या वरच्या पोझीशनवर असलेल्या अनंताला एका एकी अवदसा सुचली.
वडील दारूच्या व्यसनाने जर्जर होऊन सर्व नाशाला कारणीभूत झाले असल्याने,चार बहिणीत एकटा भाऊ असलेल्या अनंताने दारूला कदापी शिवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.मग हे कसं काय झालं? असा माझ्या मनात नेहमीच विचार यायचा.

एकदा मी अंधेरी स्टेशनजवळच्या सातबंगल्यासाठी जाणार्‍या बसस्टॉपवर रांगेत उभा होतो.अचानक एक भिकारी दिसणारा माणूस माझ्याजवळ येऊन पैसे मागायला लागला.हात पुढे करून माझ्या नावाने मला संबोधून त्याने हात पुढे केला.तो अनंत नाडकर्णी आहे ह्यावर माझा विश्वासच बसेना.
रांगेतून बाहेर येऊन मी त्या व्यक्तिला समोरच्या इराण्याच्या हॉटेलात घेऊन गेलो.

“अरे अनंता! काय ही तुझी दशा झाली आहे?मी स्वप्नातसुद्धा तुला असा दिसशील असा विचार केला नसता.”
अनंताला मी माझा चेहरा टाकून विचारलं.

“काय सांगू?माझे भोग.प्रमोशनवर, लोन सॅन्कशन डिपार्टमेंटमधे, गेलो.प्रथम लोन सॅन्कशन झाल्यावर लोक मला मर्जीने चिरीमिरी द्यायचे.मग बाटली देऊ लागले.अतोनात पैसा आणि बाटली ह्यामुळे मला अवदसा सुचली.”
अनंता दोन समोसे तोंडात बोकून आणि गटागट चहा पिऊन झाल्यावर मला सांगू लागला.त्याला भुकेलेला पाहून मी त्याच्यासाठी एक ब्रुनमस्का पाव आणि एक कप चहा मागवला.

तृत्प झाल्याचा चेहरा करून अनंता मला पुढे सांगू लागला,
“एक दिवस मला रंगे हात पकडलं.आणि माझी नोकरी गेली.काही वर्षानी माझी बायकोपण मला सोडचिठ्ठी देऊन गेली.तिची काहीच चूक नसावी.

कारण तोपर्यंत मी दारुच्या आधीन झालो होतो.माझी रहाती जागा गेली.माझ्या बहिणींकडे मी जाऊन रहाण्याचा प्रयत्न केला पण मायेपोटी बहिणी कबूल झाल्या तरी त्यांच नवरे आधार देईनात.त्यांचीही काही चूक नाही.थोडे दिवस कोकणात जाऊन राहिलो.पण मिळकत शुन्य झाल्याने भीक मागून तरी राहूया म्हणून शहरात आलो.”

मी खरोखरच सद्गदित झालो.एका दानशूर फॉऊंडेशनमधे माझा एक मित्र काम करीत होता. अनंतातर्फे त्याला एक चिठ्ठी लिहून त्याच्याकडे अनंताला जायला सांगीतलं.दुर्धर व्यसनी लोकाना चांगल्या मार्गावर येण्यासाठी हे फॉऊंडेशन मदत करतं असं माझा मित्र मला म्हणाल्याचं आठवलं.
अनंताजवळ थोडे पैसे दिले आणि निरोप घेताना मी त्याला म्हणालो,
“ही चिठ्ठी फेकून देऊन पैसे पुन्हा दारू पिण्यात खर्च करावे की, मी म्हणतो तसं करावं ह्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे.तेव्हा तू काय ते ठरव.”

अनंताने आपलं भवितव्य काय ठरवलं ह पाच वर्षानंतर माझ्या घरी अनंता बेल दाबून आला त्या दिवशी मला कळलं.

मला अनंता सांगत होता,
“मला दारूचं व्यसन होतं.पण मी एक नशिबवान आहे की ज्याला ह्या व्यसनातून निवृत्ति मिळाली. आता पाचएक वर्षं झाली असतील पण ते मी विसरलेलो नाही.मला आठवतंय की त्या निराशजनक मनस्थितीत आणि विद्वेषपूर्ण व्यथेत राहून माझं मला कळत नव्हतं की मला काय झालंय.
हताश होऊन मदतीची याचना करण्याचे ते दिवस मला आठवतात.मदतीची शक्यता नाही असं पाहून माझ्या मनातच्या आतला विषाद आणि बाहेरून केली जाणारी अवज्ञा मला आठवते.

माझ्या भयानक छुप्या आशंका,जगायचं आणि मरायचं भय मनात असतानाही, ज्याला समजून घेता येत नाही त्या बाह्य जगाच्या मेदाला आणि अहंकाराला मी सामोरा गेलो.काहीवेळा जगण्यात एव्हडं भय वाटायचं की दोनदा मी मरण पत्करण्याचं ठरवलं होतं. त्रस्त मन आणि मनातल्या
यातना सहन करण्यापेक्षा आत्मबलिदानातून सुटकारा बरा असं वाटायचं.

त्यात मी अयशस्वी झालो ह्याचं आता बरं वाटतं.पण त्यावेळेला माझा कशातही विश्वास नव्हता. माझ्या स्वतःत नव्हता तसाच माझ्या बाहेरच्या जगात नव्हता.मला स्वतःलाच मी यातनेच्या चार भिंतीत कोंडून ठेवलं होतं आणि माझंच मला वाटायचं की मी पूर्णतया परित्यक्त झालो आहे.

पण मी तेव्हडाकाही परित्यक्त नव्हतो तसं पाहिलं तर खरंतर कोणही तसा नसतो.मला दिसायचं की माझ्या मीच दुःख भोगत होतो.पण आता आता मला वाटायला लागलंय की मी एकटा कधीच नव्हतो,कोणही तसा नसावा.मला असंही वाटायचं की,मी जेव्हडं सहन करीन तेव्हडं मला पेलूं दिलं

नाही.पण त्या यातनांची मला जरूरी होती असं वाटतं. माझ्या बाबतीत एव्हड्या यातना मी सहन केल्या असाव्या की त्यामुळे माझ्या भोवतीच्या भिंती तुटून पडल्या,माझा मेद,माझा अहंकार गाडण्यासाठी,जी काही मदत मला मिळत होती ती स्वीकारण्यासाठी हे सर्व होत होतं असं मला वाटतं.

माझ्या यातना एव्हड्या खोलवर पोहचल्या होत्या की माझा विश्वास बसायला लागला.त्यावर विश्वास बसायला लागला की एखादी मोठी शक्ती मला मदत करू शकेल.ह्यावर विश्वास बसत गेल्याने मला मदत होईल याची माझ्या मनात आशा बळायला लागली.

डॉक्टरातर्फे मला मदत मिळायला लागली.माझ्या सारख्याला आणि इतर माझ्या सारख्याना मदत करण्याच्या त्यांचा व्यवसायच होता.माझ्या गहिर्‍या विवरातून बर्‍याच व्यक्तिकडून मला मदत,दया आणि समजून घेण्यात आलं.लोक दयाशील असतात हे मी शिकलो.लोकं आणि त्यांच्यातला
चांगुलपणा कसा असतो ते मी शिकलो.

मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात.अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात.बरेच असे लापरवा्ईचे,खोचक शब्द आणि प्रत्यक्ष वागणं ह्यामुळे जीवन खूपच खडतर होतं.माझ्या लक्षात आलं की हे सर्व मी समजून घेतलं तर चिडण्यातून आणि मनाला दुःख होण्यातून मी एव्हडी प्रतिक्रिया द्यायला अनुकूल होणार नाही.आणि मी जर का कठिण वागणुक मिळाल्याने त्याची प्रतिक्रिया देताना समजून घेऊन आणि आस्था बाळगून रहाण्याचा प्रयत्न केला तर कदाचीत मिळणार्‍या वागणुकीत बदल आणण्यात सहाय्य मिळवीन. माझ्याच यातनानी हे समजायला मदत केली.

मी म्हणत नाही की,प्रत्येकाला अशा यातना व्हाव्यात.एक मात्र मला नक्की वाटतं की,यातना होणं बरं आणि कदाचीत त्या येणं आवश्यकही आहे.

जर आणि फक्त जर का त्या यातना स्वीकार करण्याने समजून घेण्याची आवश्यक प्रक्रिया होत असेल तर.आणि तिचा उपयोग स्वतःसाठी आणि त्यातून जाणार्‍या इतरांसाठी होत असेल तर.

आपण सर्व काहीनाकाही यातनातून जात असतोच नाही काय? हे तथ्य माझ्यात एक प्रकारचं आपलेपण निर्माण करतं आणि त्यातून इतरानाही मला जमेल तशी मदत करायला प्रोत्साहन देतं.

ह्या विश्वासातूनच मी ह्यात असलेल्या इतर व्यसनाधीन लोकांत वावरून ते व्यसन विरहीत व्हावेत म्हणून काम करण्यात माझ्याच अनुभवातून मी अनुरूप झालो आहे असं समजतो.त्यासाठी कुणाला सुंदर असलं पाहिजे,प्रतिभावान असलं पाहिजे,शक्तिमान असलं पाहिजे अशातला भाग नाही.
तसंच मला हेही वाटतं की हे असं करून त्या मोठ्या शक्तिबरोबर चालण्याचा मला लाभ होत आहे.त्याच फॉऊंडेशन मधे मी नोकरीला असतो.आता माझं अगदी बरं चाललं आहे.”

असं म्हणून अनंताने खाली झोपून मला अगदी साष्टांग नमस्कार घातला.त्याने ते इतक्या पटकन केलं की मी त्याला अडवू शकलो नाही.

अनंता उठून उभा राहिल्यावर मी त्याला म्हणालो,
“जे झालं ते गंगेला मिळालं.जे होतं ते नेहमी बर्‍यासाठीच होत असतं असं बुजूर्ग म्हणतात.कारण आयुष्यात उनपाऊस येतच असतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: