अनवाणी चाल.

“अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळतं ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात येऊन मला मिळतं.”

दत्तू बांदेकराची नातवंडं अमेरिकेत असतात. त्यांना सुट्टी पडली की ती कधी कधी कोकणात आपल्या आजोबाकडे रहायला येतात.भारतात कुठल्याही शहरात जायला त्यांना कंटाळा येतो.जे अमेरिकेत नेहमीच दिसतं तेच तेच भारतातल्या शहरात दिसतं.ते पहाण्यात त्यांना गम्य वाटत
नाही.कोकण आणि गोवा परिसर त्यांना खूपच आवडतो.कोकणात आपल्या आजोबांच्या घरी असताना सकाळचा नास्ता झाला की कोकणातल्या डोंगर दर्‍यात फिरायला जातात.काही डोंगरात त्यांनी स्वतःच्या पायावाटा काढल्या आहेत.

दोन्ही नातवंडं वनस्पतिशास्त्रात दिलचस्पी घेत असल्याने कोकणातल्या डोंगरावरच्या आणि रानातल्या निरनीराळ्या वनस्पती बघून त्यांना खूप आनंद होतो.भारताचा बराचसा भाग विषुववृत्तावर असल्याने कोकणातल्या डोंगरावरच्या वनस्पतीत त्यांना नाविन्य सापडतं.

डोंगरावर सापडणारी लाजाळुची झुडपं,निवडूंगातले प्रकार,अमाप जातीची फळांची झाडं,अनेक प्रकारची फुलं,वेली ह्या गोष्टी त्यांना तिकडे मुळीच पहायला मिळत नाहीत.त्याशिवाय कडूलिंबाच्या झाडाच्या पानाची औषधी गुण,तुळशीच्या पानांतली जंतुविरहित करण्याची द्र्व्य,अशा बर्‍याच
विषयावर त्यांना खूप स्वारस्य आहे.

मागल्या खेपेला मी जेव्हा दत्तूला भेटायला कोकणात गेलो होतो तेव्हा तो आपल्या नातवंडांबद्दल सांगत होता.आणि हे सर्व सांगताना एक सांगायला विसरला नाही म्हणजे ती मुलं पायात वापरत असणार्‍या पायतानाबद्दल.त्यांचे ते निरनीराळ्या कारणासाठी वापरले जाणारे शुज पाहून दत्तू खुपच
अचंबीत होतो.जॉगींगसाठी निराळे शुज,हायकींग आणि ट्रेकींगसाठी निराळे शुज,कुणाच्या घरी जायचं झाल्यास निराळी शुजची जोडी.

नातवंडांच्या शुज वापरण्याच्या सवयीवर माहिती देत असताना, दतू मला आपल्या लहानपणातल्या सवयी सांगत होता ते आठवलं.
मला द्तू म्हणाला होता,
“अनवाणी चालायला मला बरं वाटतं.मला आठवतं,कोकणात आमच्या गावी माझ्यासारखी आम्ही पाच-सहा मुलं होतो कुठेही गेलो तर अनवाणी जायचो.काही लोक आमच्या त्या वागण्याला पाहून म्हणायचे ही भंपकगीरी आहे.काही सांगायचे आम्हाला की तुमचे पाय खरचटून खराब होतील.पण
आम्ही कुणाच्याच म्हणण्याची पर्वा केली नाही.

मला आठवतं की खूप उन्हाळा असला की आम्ही फक्त आमच्या घराच्या आजुबाजूलाच अनवाणी फिरायचो.मात्र थंडी आणि पावसाळा आला की आम्ही अनवाणीच फिरायचो.बाहेर खेळायला मैदानात गेल्यावर आमच्या उघड्या नागड्या पायानी चिखलात,गवतावर,सुकल्या पाचोळ्यावर आम्ही चालत असायचो.
माझ्या काही मित्रांचे आईबाबा म्हणायचे की हे आम्ही करतो तो शुद्ध वेडेपणा आहे आणि एकनाएक दिवस आम्ही दुखापत होऊन आजारी पडणार.
पण असं कधीच झालं नाही.उलटपक्षी आमच्यासारखी निरोगी मुलं आमच्या आम्हीच होतो.

फक्त उन्हाळ्यात अनवाणी चालण्याने थोडा त्रास व्हायचा.पण उन्हाळा संपता संपता आमच्या पायांचं रुपांतर पायताण होण्यात व्हायचं.पायचे तळवे एव्हडे दमदार मजबूत व्हायचे की आम्ही कशावरही चालायचो.रानातून चालत जाताना पाण्यात बुडलेल्या गवतावरून,पायवाटेवर येणार्‍या
उंचवट्यावरून,जमिनीवर आलेल्या झाडांच्या मुळावरून सहजपणे चालायचो.

कधीकधी एकमेकात धावण्याची चुरस लावून खडबडीत रस्त्यावरून धावताना,रस्त्याच्या कडेला जमलेल्या चिखलमिश्रीत पाण्याच्या डबक्यात पाय बुडवून पायाचे तळवे थंड करून घ्यायचो. बाजारात जायचं झाल्यास गरम पायवाटेवरून धावत जायचो,मे महिन्याच्या कडक उन्हाळात,अगदी गरम झालेल्या फरशीवर चालताना पाय चुरचुरून यायचे.कुठेही गेलो तरी अनवाणीच फिरायचो.
कधी कधी घरी आल्यावर पायाकडे पाहिल्यावर खरचटलेली पायाची बोटं आणि चर आलेले पायाचे तळवे पाहायला मिळायचे.पण त्यामुळे आम्ही खच खाल्ली नाही.कारण अनवाणी चालणार्‍याचा आमचाच कंपू होता.

आमच्यापैकी कुणीही आपल्या बाबांबरोबर बाजारात खरेदीसाठी गेलो असताना मधेच जरका बाबांनी आम्हाला अनवाणी चालताना पाहिलं तर घरी परतून जायला सांगायचे.घरी जाऊन पायताण घालून यायला सांगायचे.आम्ही परत जायचंच टाळायचो.भर बाजारात आम्ही अनवाणी आहोत असं
त्यांच्या लक्षात आल्यास,
“अनवाणी पायानी आत येण्यास मनाई आहे”
असा बोर्ड असलेल्या हॉटेलात आम्हाला आवडीची भजी आणि बटाटेवडे खायला मिळायचे नाहीत.

आता ह्या वयातही मला चप्पल,बूट पायात वापरायला कंटाळा येतो.कुठेही अनवाणी जाण्याचा आमचा लहानपणाचा शिरस्ता मी कधीही विसरणार नाही.माझी मुलं जरा मोठी झाली की तीही माझं अनुकरण करतील अशा आशेवर मी असायचो.
अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळतं ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात येऊन मला मिळतं.
अनवाणी चालण्यावर माझा भरवसा आहे.”

हे सर्व दतूचं पादत्राणांवरचं लेक्चर ऐकून मी त्याला म्हणाल्याचं आठवतं,
“बाबारे दत्तू,मुलं तुझी आहेत ती कदाचीत तुझं अनुकरण करतील हा तुझा विचार ठीक होता. पण नातवंडं तुझ्या मुलांची मुलं आहेत आणि अमेरिकेत असल्यावर तुझं अनुकरण सोडाच आपल्या बाबांचही अनुकरण करणार नाहीत कारण जमाना बदललेला आहे आणि तिकडचा जमाना व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेला आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. veena samant
  Posted जानेवारी 9, 2012 at 2:52 सकाळी | Permalink

  kaka anawani chalanyache mahattva tumhi chhan sangitalay. Aajunahi kokanat gelyavar anawani chalanari manasa baghayala milatat. pan jevha lahan, choti mula(studants) anawani payane duparchya taltaltya unhat shalet jatana distat tenvha manat chhar…hota….aani apalya AC gaditun phiratana suddha kelelya complaintchi laj vatate…

  • Posted जानेवारी 10, 2012 at 12:49 pm | Permalink

   नमस्कार विणा,
   तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे.मला माझ्या बालपणाच्या आठवणी आल्या.मी शाळेत जाताना अनवाणी जात नसायचा.पण माझे काही शाळासोबती अनवाणी यायचे.माझी आई आमची जुनी पादत्राणं काही माझ्या शाळासोबत्याना द्यायची ते मला आठवतं.एकवीसाव्या शकतातसुद्धा कोकणात असंच चाललंय हे तुझ्या प्रतिक्रियेतून वाचून मन उदास होतं.
   AC गाडीतून फिरणार्‍यांची तक्रार होऊ शकते हे खरोखरच लज्जास्पद आहे.
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: