आजोबांची ती आरामखुर्ची

“म्हणूनच मी म्हणतो, सर्वांनीच “त्या गोष्टीची” दुसरी बाजू शोधून पहाण्याचं धाडस करून पहावं मग “ती गोष्ट” काही का असेना.”

एकदा मी राजेन्द्राला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो.घरात राजेन्द्र नव्हता.त्याच्या पत्नीने माझ्या हातात वर्तमान पत्र देऊन ती मला म्हणाली,
“ते केस कापायला सलुनात गेले आहेत.इतक्यात येतील तोवर तुम्ही हॉलमधे पेपर वाचत बसा.मी तुमच्यासाठी गरम ताजा चहा बनवते.”
“नको नको मी राजेन्द्राबरोबर चहा पियीन.तो पर्यंत बाहेर बाल्कनीत पेपर वाचत बसतो.”
असं म्हणून मी त्यांच्या बाल्कनीत गेलो.तिथे एक आरामखुर्ची मी पाहिली.त्या आरामखुर्चीत बसून मी पेपर वाचीत होतो.वाचता वाचता मला डुलकी लागली.आणि दिवास्वप्न पडलं.मी माझ्या आजोबांच्या आरामखुर्चीला स्वप्नात पाहिलं.नंतर मला सर्व काही आठवायला लागलं.

कोकणातल्या आमच्या घराच्या पडवीला लागून एक खोली होती. ती माझ्या आजोबांची खोली होती.खोलीला दोन समोरासमोर गजाच्या खिडक्या होत्या.दोन्ही खिडक्या उघड्या ठेवल्यावर क्रॉस-व्हेन्टीलेशन मुळे खोलीत वारा वहायचा.पूर्वेकडे असलेल्या खिडकी जवळ माझे आजोबा एका आरामखुर्चीवर बसायचे. खिडक्याना उंची असली तरी त्या भिंतीत सखल भागावरून बसवल्या होत्या त्यामुळे आजोबा आरामखुर्चीवर बसून घराबाहेरचं
सृष्टीसौन्दर्य सहजपणे पहायचे.

माझे आजोबा जर का पलंगावर झोपलेले नसले तर नक्कीच ह्या खूर्चीवर बसलेले दिसायचे.कधीकधी खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांना लखणी यायची.अर्थात ती जागृत झोप असायची.मी आजोबांबरोबर गप्पा गोष्टी करायला आलो असताना त्यांच्या जवळच ठेवलेल्या एका स्टुलावर बसायचो.

त्यांच्या खूर्चीवर ती रिकामी असताना बसायचं मी कधीच धाडस केलं नाही.माझ्या आजोबांनी मला खूर्चीवर बसायला कधीच मज्जाव केला नव्हता.

ही त्यांच्या खोलीतली आरामखुर्ची अशा धाटणीत खिडकीजवळ ठेवलेली असायची की तिची जागा काहीशी अडचणीची वाटायची. जवळच असलेल्या एका स्टुलावर आजीनेच वीणलेला एक रंगीत पोश असायचा आणि त्यावर तांब्याचा तांब्या आणि त्यावर पितळेचं फुलपात्र ठेवलेलं असायचं.
विहीरीतल्या थंडगार पाण्याने तो तांब्या सकाळीच भरून ठेवलेला असायचा.माझ्या आजोबांची तशी शिस्त असायची.

आजोबांच्या खुर्चीची मजेदार गोष्ट म्हणजे,माझे आजोबा असेपर्यंत आणि त्यानंतरही ती खुर्ची जागच्या जागी ठेवली जायची.माझे आजोबा असताना आणि ते गेल्यावरही मला कुणाचा अटकाव नसतानाही त्या खुर्चीवर मी कधीच बसलो नव्हतो.एकदापण नाही पण एकदिवशी,म्हणजे माझे आजोबा गेल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर मी त्या आरामखुर्चीवर बसलो.

माझे आजोबा हयात असण्यापासून रोज सकाळी,सूर्योदय झाल्यावर,किंवा साधारण सकाळच्या सहा वाजता, मी उठून सकाळची नित्याची कामं उरकल्यावर शर्ट आणि खाली सफेद लेंगा चढवून कोल्हापूरी चप्पल घालून माझ्या रॅले सायकलवर आरूढ होऊन दोन मैलावर असलेल्या पावाच्या बेकरीत जाऊन पाव विकत घेऊन यायचो.माझ्या आजोबांना आवडणारे,वरून तांबूस रंगाचे गोड मऊ, गरम गरम बनपाव आणायचो.आजोबा सकाळीच चहात बुडवून बनपाव खायचे.

आजोबांच्या आरामखुर्चीशी माझा पहिला आकस्मिक सामना ज्या दिवशी झाला तो दिवस शनिवार होता.खूप दिवसानी मी शनिवारचा घरी होतो.मी सकाळी उठायला जरा उशीर केला.जाग आल्यावर बिछान्यातून उठून, धडपडत स्वयंपाकघरात जाऊन किट्लीत होता तो कपभर चहा कपात ओतून बाहेर येण्यासाठी पडवीत आलो.अर्धवट झोप डोळ्यात होती.आजोबांच्या खोलीत सहजच डोकावून पाहिलं.मला बराच थकवा आल्यासारखं वाटत होतं.

गेले दोन महिने सतत कामाच्या झालेल्या ओझ्याने माझ्या झोपेचा चुराडा झाला होता.कसलाच विचार न करता ओणवा होत आजोबांच्या खुर्चीत जाऊन बसलो.

झापड आलेले डोळे किंचीतशे किलकीले करून खुर्चीवर बसल्या बसल्या खिडकीतून बाहेरचा देखावा मी पाहू लागलो.यापूर्वी अशा पोझमधे मी बाहेर कधीच पाहिलं नव्हतं.
वडीलांच्या मांडीवर बसायला सावत्र आईने मनाई केलेल्या ध्रुव्वाला वडीलांच्या मांडीवर बसायला मिळावं तसंच काहीसं मला माझ्या ह्या आजोबांच्या खुर्चीवर पहिल्यांदाच बसल्यावर वाटलं.

तेव्हड्यात माझ्या लक्षात आलं की मला कधीही आजोबांनी बसायला मनाई न केलेल्या ह्या खुर्चीवर मी प्रथमच बसलो असताना त्यांची ती खोली मला भव्य आणि शानदार वाटत होती. त्या खूर्चीवर मी बसल्यानंतर त्याच सूर्यप्रकाशाने माझ्या आजोबांच्या खोली्ला एव्हडं प्रकाशीत केलं होतं की ती खोली मी तशी कधीच पाहिली नव्हती.ध्रुवावाला वडीलांच्या मांडीवर बसल्यावर वाटलं असेल त्याच्या पेक्षा कतीतरी पटीने मला ह्या खुर्चीवर बसल्यावर वाटलं.

मी तिथेच अगदी शांतपणे बसलो होतो.नव्याने दिसणार्‍या त्या खोलीत मी अगदी तल्लीन झालो होतो.निस्तब्ध असलेल्या त्या माझ्या प्रतिवर्तनांच्या क्षणात आजोबांच्या खोलीत,अडचणीत ठेवली आहे असं भासणार्‍या, त्या खू्र्चीने मला काहीसं परिवर्तनशील जीवन समजावण्यासाठी मदत केली.

शिवाय त्या आरामखुर्चीने जो मला धडा शिकवला त्याने एक नवी श्रद्धा प्रतिपादित करायला मला मदत झाली.
त्यानंतर मला नेहमी असंच वाटायला लागलं की,एखाद्या गोष्टीशी तुम्ही कितीही परिचित आहात असं तुम्हाला वाटलं तरी त्या गोष्टीकडे पहाण्याचा नेहमीच दुसरा दृष्टीकोन असू शकतो.
जरी तुम्ही कितीही वेळा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला पाहिलंत किंवा अनुभवलंत,तरी त्याला नेहमीच दुसर्‍या बाजूने अनुभवता येतं,ज्याची तुम्ही कदाचीत कल्पना करायलासुद्धा सुरवात केली नसेल.
ह्या साध्या कल्पनेने त्यानंतर माझ्या जीवानातून नैराश्याला दूर केलं गेलं.कारण जिथे एखाद्या गोष्टीला दुसरा छुपा दृष्टीकोन असू शकतो तिथे नैराश्याला जागाच नसते.

त्या दिवशी ज्या आरामखुर्चीला मी थोडीशी अडगळीत आहे असं समजत होतो त्याच खुर्चीने मला शिकवलं की,मी कुणालाही अडगळ म्हणू शकत नाही.कारण अशी शक्यताही असू शकते की,त्या गोष्टीला दुसरी एखादी मजेदार किंवा असामान्य बाजू असू शकते ज्यामुळे माझा दृष्टीकोन बदलू शकतो.
म्हणूनच मी म्हणतो, सर्वांनीच “त्या गोष्टीची” दुसरी बाजू शोधून पहाण्याचं धाडस करून पहावं मग “ती गोष्ट” काही का असेना. माझा ह्या म्हणण्यावर विश्वास आहे.”

राजेन्द्र केस कापून घरी केव्हाच आला असावा.
बहुदा,मला जाग आली आहे असं पाहून तो चहाचा कप घेऊन मला द्यायला बाल्कनीत आला.आजोबांच्या आरामखुर्चीच्या ह्याच आठवणी मी त्याला वर्णन करून सांगीतल्या.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Mangesh Nabar
  Posted जानेवारी 12, 2012 at 7:58 pm | Permalink

  तुम्ही ज्या तळमळीने “आजोबांच्या आरामखुर्चीचे ” वर्णन केले आहे, त्यावरून माझ्याही अशाच एका आरामखुर्चीच्या आठवणी जाग्या झाल्या. अर्थात एक आनंदाची बाब की ही आरामखुर्ची अद्यापही आमच्या परळच्या घरात अस्तित्वात आहे. माझे वडील या खुर्चीचा उपयोग त्यांच्या वयाच्या ९४ व्या वर्षापर्यंत करत होते. आज ही आरामखुर्ची माझ्या भाच्यांना म्हणजे त्यांच्या नातवांना इतकी प्रिय आहे, की ते इथे आल्यावर एकदा तरी त्यात बसून आपल्या बालपणीच्या काही क्षणकाळात रममाण होतात.
  मंगेश नाबर.

 2. Posted जानेवारी 13, 2012 at 11:55 सकाळी | Permalink

  नमस्कार मंगेशजी,
  माझा लेख वाचून आपल्याला अशाच एका आरामखुर्चीची याद आली हे वाचून बरं वाटलं.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: