कमाआत्या.

“कुणास ठाऊक त्या माझ्या कठीण काळात मला वाचनाचा छंद लागला नसता तर आज जी मी आहे ती झालेच नसते.”

“कमाआत्याचा आजचा ,तिच्या सेवेचा म्हणा किंवा तिच्या नोकरीचा म्हणा,शेवटचा दिवस.ती आज हॉस्पिटल मधून निवृत्त झाली आहे.आमची कमाआत्या जरी नर्स म्हणून त्या हॉस्पिटलात काम करीत असली तरी आम्हाला घरी ती अर्धी डॉक्टरच होती. बारा,बारा तास तिथे काम करून आणि तेव्हडाच वेळ डॉक्टरांच्या सानिध्यात राहून शरीराच्या व्याधी विषयी कमाआत्याला बरीच माहिती झाली आहे.”
ललिता मला आपल्या आत्याची माहिती सांगत होती.

योगायोगाने मी ललिताला भेटायला तिच्या घरी गेलो होतो. कमाआत्या हारतुरे घेऊन मी येण्यापूर्वीच घरी आली होती.हारतुरे देऊन तिचा सत्कार झाला होता.तिला सेन्डऑफ मिळाला होता.

” शरीराला मामुलीशी इजा झाली की आमचा प्रायमरी डॉक्टर कमाआत्याच असायची.कसली जखम झाली,एखाद्या भागाला सुज आली,कुठे बॅन्डेज लावायची पाळी आली की आमची कमाआत्या पुढे यायची.तिच्या इलाजाने सुधारलं नाही की ती आम्हाला डॉक्टरकडे जायला सांगायची.कारण ह्या व्यवसायतल्या तिच्या मर्यादा तिला माहित होत्या.”
ललिताने असं सर्व सांगून नंतर माझी आणि कमाआत्याची ओळख करून दिली.

“तुम्हाला सुरवातीपासूनच ह्या सेवेत काम करायची इच्छा होती का?”
मी कमाआत्याला प्रश्न केला.

“हो!असं एका शब्दात मी तुम्हाला सांगीतलं तर ते बरोबर होणार नाही.”
कमाआत्या मला म्हणाली.

“प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक घटना काही कारणास्तव होत असते असं मला नेहमी वाटतं.फक्त समस्या हीच असते की ज्या गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे आपण उदास होतो त्यातली चांगली बाजू आपण शोधून काढायला असमर्थ असतो.”

अशी प्रस्तावना करून कमाआत्या मला पुढे म्हणाली,
“माझ्या तरूणपणी मी माझ्या जीवनात नेहमीच रागावलेली असायची.नेहमीच माझ्या मनात यायचं की माझ्या वाट्याला एव्हडं कमी का असतं आणि इतराना मात्र कसं एव्हडं मुबलक मिळतं. नव्हे,नव्हे मी ऐहिक सुखाबद्दल किंवा भौतिक वस्तुंबद्दल म्हणत नाही.खरं म्हणजे ज्याला स्वातंत्र्य म्हणतात त्याबद्दल मी म्हणते. स्वातंत्र्याला,मला वाटतं,मी दुरावले होते.माझ्या वयाची इतर, त्यावेळेला बाहेर जाऊन मजा करायला मुक्त होती.
मला नेहमीच वाटायचं की,मला एव्हडं ज्ञान आहे आणि मी ते आणखी प्राप्त करू शकले असते.फक्त मला ते करायला मुभा हवी होती.

माझे बाबा खूपच शिस्तशीर होते.जुन्या वळणाचे होते.मुलीनी घरी रहायचं.आणि त्यांना सांगीतलं जाईल तेच करायचं.माझ्या आजोबांनी स्थापन केलेली एक खानावळ होती.माझे वडील तिच खानावळ पुढे चालवायचे.आम्हा मुलीना खानावळीसाठी जेवण करायला स्वयंपाकघरात काम करायला मुभा होती.
मी बारा वर्षांची असताना शाळा सोडली.आणि घरीच काम करायला लागले.जेवण करायला मदत करायचे.उपहासाने विचार केला तरी माझं उदास रहाण्याचं हे कारण मुळीच नव्हतं.

माझ्या बरोबरीच्या बर्‍याच मुली नृत्य,गाणं नाटक शिकायला जायच्या.मला नेहमीच वाटायचं मला जर का तसं करायला घरून परवानगी मिळाली असती तर माझं जीवनही प्रभावशाली झालं असतं.रांधा,वाडा उष्टी काढा ह्या उक्तीप्रमाणे माझं आयुष्य मी जगत होते.कुणाशीही मैत्री करायला मोका मिळत नव्हता. मला असं दिसून आलं होतं की माझं जीवन सुखाचं व्हायला मला ज्यात गम्य आहे ते करायाला मिळायला हवं.

त्यावेळी आमच्या घरात एक लहानसा रेडिओ होता.मी धरून मला आणखी सहा भावंड होती.मला ज्या गाण्यात आवड असायची ती गाणी ऐकायला मला संधी मिळत नसायची.फावल्यावेळात मला जे हवं ते करायला मिळत नसल्याने मी तासन तास वाचनात वेळ घालवायची.कथा कादंबर्‍या,मासिक अंक, दिवाळी अंक मला वाचायला मजा यायची.

माझ्या जीवनात मागे वळून पाहिल्यावर माझीच मला चीड यायची. माझं बालवय आणि कुमारवय माझ्याकडून हिसकावून घेतलं गेल्ं होतं.आणि त्यातून आणखी चीड यायची की ह्यातून बाहेर पडायला मला कुणाचंही सहाय्य मिळालं नाही.इतरांच्या मुलांना जे मिळालं त्याला मी मुकले,माझ्या स्वातंत्र्याला मी मुकले जीवन खरोखरच अन्यायपूर्ण होतं.

हे समजून घ्यायला मला खूप वर्ष घालवावी लागली की ज्या गोष्टीकडे मी माझ्या आयुष्यातला मज्जाव असं समजून घेत होते तेच माझ्या आयुष्यात मला चांगल्या स्थानावर न्यायला कारणीभूत झालं.

माझ्या वडीलांच्या पश्चात आम्हाला ती खानावळ बंद करावी लागली.मी शाळेत जाऊन जमेल तेव्हडं शिकले.नंतर मी नर्सिंग कोर्स केला.एका हॉस्पिट्लात मला काम मिळालं.तिथे काम करीत असताना मला रुग्णांची सेवा करायला मिळून त्यांची स्वप्न साकार करायला मोका मिळाला.

मला वाटतं,हे मी करू शकले याचं कारण मी कुठे होते ते नसून,ते तसं वातावरण होतं त्यामुळेच ते होऊ शकलं.सुरवातीला जी गोष्ट मला वाईट म्हणून दिसायची तिच माझ्यासाठी अप्रत्यक्षपणे कृपादान झाली.कुणास ठाऊक त्या माझ्या कठीण काळात मला वाचनाचा छंद लागला नसता तर आज जी मी आहे ती झालेच नसते.
जे काही होत असतं ते काही कारणास्तव होत असतं ह्यावर माझा विश्वास आहे.”

ललिताला आणि कमाआत्याला मी म्हणालो,
“योगायोगाने का होईना आज मी तुमच्याकडे आलो त्याचं सार्थक झालं असं मला वाटतं.एखाद्याच्या उभ्या आयुष्याची एव्हड्या थोडक्या शब्दात उजळणी ऐकून आणि त्यातून एक चांगला संदेश ऐकायला मिळावा हे खरंच माझ्या दृष्टीने भाग्याचं आहे.”

श्रकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: