मासा गळाला लागेतोपर्यंत.

“मासे पकडणार्‍या कोळ्याला गळाला ओढ लागेपर्यंत इतर गोष्टीचं चिंतन करायला वेळ सापडतो तसंच काहीसं माझं झालं आहे.”

आज मी प्रो.देसायाना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.डिसेंबरचा महिना म्हणजे थंडीचा उच्चांक.तळ्यावर जाऊन गप्पा करण्याचे विचारसुद्धा मनात येणं कठीण आहे.

मला पाहून भाऊसाहेब फारच खूश झाले.
मला म्हणाले,
“माझ्या मनात तुम्हाला सांगण्यासारखं काहीतरी सतत घोटत होतं. मी तरी तुमच्या घरी यावं किंवा तुम्हाला माझ्या घरी बोलवावं असा मनात विचार येत होता.”

“मलाही घरी बसून वाचन करून कंटाळा आला होता.तुमच्याकडून नवीन काय शिकण्यासारखं आहे ते पाहावं म्हणून मीच तुमच्याकडे यायला निघालो.”
मी प्रो.देसायाना माझ्या मनातला विचार सांगीतला.

माझ्या मनातला विचार मी तुम्हाला सांगतो.असं म्हणून भाऊसाहेब म्हणाले,
“मला आठवतं काही वर्षापूर्वी मी एक पावरफुल बायनॉक्युलर घेऊन आकाशातले तारे पहाण्याचा छंद करीत होतो.आणि माझ्यासारख्यासाठी लिहिल्या गेलेल्या खगोल विद्दे वरची पुस्तकं वाचीत असायचो.मी एक मोहित झालेला खगोल तज्ञ म्हणून स्वतःला समजत होतो.

आतापर्यंत आपल्याला माहित असलेल्या लोकांत ज्यानी विश्वाचा अभ्यास केला आहे ते म्हणतात सूर्य हा एक नगण्य तारा आहे. त्यामानाने तपमान नसलेला हा एक नीहारिकेत निर्धारीत केलेला तारा आहे.मिल्की-वे,मला “वे”ला मिल्कीव्हे,”व्हे” म्हणजे मठ्ठा म्हणायला आवडेल.तर हा मिल्कीवे आपल्या बहिणी आणि भावांनी बनलेला आहे आणि आपण सर्व एका केन्द्रा सभोवती फिरत आहोत.आणि हे केन्द्र कुठच्यातरी जागी जात आहे.कुठे ते काही मला माहित नाही.माझे भाऊ आणि बहिणी कोट्यांनी-अब्जानी मोजले जातील एव्हडे आहेत.आणि आपली ही आकाश गंगाच अनेकातून एक आहे. किती ते मला माहित नाही.

आपला सूर्यतारा एव्हडा लहान आहे आणि त्याचं पिल्लू आपली पृथ्वी एव्हडी चिमुकली आहे की मी ज्यावेळेला तिच्या आकाराचा विचार करतो तेव्हा मला मोठ्या कॅनव्ह्यासवर पडलेला एक ठिपका कसा दिसावा तसं वाटतं.

माझ्या अस्तित्वाने काय फरक पडतो?.मी किंवा माझा देश किंवा हे सर्व विश्वच एव्हडा कसला प्रभाव पाडू शकतं?.
मी स्वार होऊन कुठे चाललो आहे?त्याला काही अर्थ आहे का?ह्या सर्वाचा स्वामी कोण आहे?त्याच्या मनात तरी काय आहे? असे मला प्रश्न पडतात.

ह्याचाच मी विचार करीत असतो.हे सर्व काही प्रचंड आहे,अपरिहार्य आहे,अदम्य आहे आणि मी जर का डोळे झाकून त्याचा विचार करीत राहिलो तर ते मला एक प्रकारचं निराशात्मक चित्र दिसतं.”

प्रो.देसायांचा हा विचार ऐकून माझ्या अनेक आठवणीतली एक आठवण माझ्या मनात जागृत झाली.
मी त्यांना म्हणालो,
“मला आठवतं मी असाच एकदा सुट्टीत कोकणात गेलो होतो.नेहमी प्रमाणे डोंगर चढून वर जायची सवय असल्याने त्या सकाळी मी त्या डोंगरावरच्या रानात काही बकर्‍या, मिळेल तो पाला झाडावरून ओरबडून, तोंडात चावत चावत फिरत होत्या हे पहात होतो.त्यांच्या लोकरीसारख्या कातडीवर खाजकुली सारखी वनस्पती चिकटून त्याची पानं आणि फुलं मधेच कुठेतरी अंगावरून सुटून जमीनीवर पडत होती.हे दृश्य पाहिल्यावर मी नेहमीच त्यांच्या अंगावरची ती चिकटलेली पानं दूर करण्याच्या प्रयत्नात असायचो.

पण ह्यावेळी कुणास ठाऊक,माझ्या लक्षात आलं की,त्या वनस्पतीचा आणि ह्या जनावरांचा निकटचा संबंध असावा.त्या बकर्‍या काहीतरी महत्वाची भुमिका बजावीत होत्या.ही वनस्पती आपल्या अंगावरून नेत जात असताना त्या पाना-फुलातून त्या वनस्पतीच्या उत्पतिचा फैलाव करीत होत्या.
बकर्‍या त्या वनस्पतीची वाहनं झाली होती.

मंद वार्‍यावर तरत जाणारे म्हातारीचे केस म्हणजेच कापसी झुपका अशाच प्रकारची बिजं वाहून अन्य वनस्पतीचा फैलाव करायला कारणीभूत होत असतात.बकर्‍या आणि त्यांच्या अंगावरची खाजकुली हे सर्व एका मोठ्या योजनेचा भाग असावा.आणि मीही त्यातलाच-त्याच योजनेतला- भाग असावा.असं मला नेहमीच वाटत असतं.

मला वाटतं,ह्या एकट्या दुकट्या पृथ्वीवर ही फैलाव होण्याची कल्पना फलद्रुप व्हावी अशी योजना असावी.पण जसजशी माणसाची संख्या वाढत आहे तसतशी ही योजना पार पडायला अडचणी यायला लागल्या आहेत.

खूप वर्षापूर्वीपासून मी ज्यावेळी मुंबईसारख्या शहरात रहायला आलो त्यावेळपासून मला दिसून आलं की,शहरातले लोक घाईगर्दीचं जीवन जगत आहेत,कुठच्याही गोष्टीचा लगोलग निर्णय घेत आहेत. त्यामानाने खेड्यातले लोक खूपच मंद आहेत.अस्तित्वासाठी कदाचीत त्यांना अशी धडपड करणं भाग पडत आहे.

गळाला चिंगूळ लावून वहात्या नदीच्या प्रवाहात गळ टाकून मासा गळाला केव्हा लागेल ह्या प्रतिक्षेत असलेल्या एखाद्या मासे पकडणार्‍या कोळ्याला गळाला ओढ लागेपर्यंत इतर गोष्टीचं चिंतन करायला वेळ सापडतो तसंच काहीसं माझं झालं आहे.

आकाशातले तारे,डोंगरावर चरणारी जनावरं आणि खाजकुलीची वनस्पती ह्यांचं चिंतन करण्यात मला मजा येते.ह्या मजेतूनच मला सुख मिळतं. सन्तुष्टता मिळते,शांती मिळते.”

एकमेकाचे विचार ऐकून संध्याकाळ मजेत गेली ह्याचा खूप आनंद झाला.एक एक कप गरम कॉफी घेऊन आम्ही संध्याकाळ साजरी केली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: