औदासीन्य

“मला वाटतं,हे औदासीन्य माझं मौल्यवान साथीदार बनलं. माझ्या जीवनाला चांगली कलाटणी मिळाली.”

माझी भाची अलीकडे बरेच वेळा आपल्याच तंद्रीत असते.मी एकदा माझ्या बहिणीला विचारलं,
“का गं,हिला काही प्रॉबलेम आहे का?”
माझी बहिण मला म्हणाली,
“डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे तिला क्रॉनीक डिप्रेशन आलं आहे.तिचा नवरा उच्च शिक्षणासाठी गेली दोन वर्षं अमेरिकेत आहे.त्याचा तिचा नियमीत संपर्क असतो म्हणा.
पण अलीकडे ती नेहमी काळजीत दिसायला लागली.
मी काही प्रश्न केले तर उडवाउडवीची उत्तरं देते.तेव्हाच मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि तिला तपासून तसं ते म्हणाले.”

मालतीला असंच एकदा औदासीन्य आलं होतं हे मला ठाऊक होतं.मालती माझ्या मित्राची थोरली मुलगी.माझा मित्र मला म्हणाल्याचं आठवतं,
“आताशा, मालतीने औदासीन्यतेवर विजय मारला आहे.
ती ह्या व्यथेतून बाहेर कसं पडायचं ते आपल्या अनुभवातून नक्कीच कल्पना देईल.”

माझ्या बहिणीला जरा दिलासा वाटावा म्हणून मालतीचा अनुभव तिच्या तोंडून ऐकून मग तो तिला सांगावा आणि मग माझ्या भाचीवर काय उपाय होऊ शकतो ते पहावं म्हणून मी अलीकडेच मालतीच्या घरी गेलो होतो.
मालतीला भेटल्यावर मी सरळ मुद्याला हात घातला.माझ्या भाचीची बॅकग्राऊंड सांगून मी मालतीला विचारलं,
“तुझा ह्या बाबत सल्ला काय आहे?”
मालती मला म्हणाली,
“सल्ला देण्यापेक्षा माझी कथा तुम्ही ऐकावी आणि त्यातून तुम्हाला योग्य ते काय सापडतं ते पहावं.”
“ठिक आहे सांग तुझी कथा”
मी मालतीला म्हणालो.

सुरवात करून मालती म्हणाली,
“ह्या जानेवारी महिन्यात त्या गोष्टीची वर्ष-गाठ आहे.दोन वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळी मी सुयांचा खोका घेऊन माझ्या बाथरूममधे गेले.बाथरूमला कडी लावून आत बसले.खोक्यातून निरनीराळ्या आकाराच्या सुयांमधून दोन जरा जाड दिसणार्‍या सुया बाजूला काढून घेतल्या. जमीनीवर बसले,आणि दोन्ही सुया माझ्या पायात घुसवल्या आणि पुरेसं रक्त पायावर दिसेल असं झाल्यावर त्या सुया काढून घेतल्या.हे सर्व करण्यासाठी त्यामागे कारण होतं.मला जखम करून घ्यायची होती.जखम पहायची होती आणि जखमेला स्पर्श करायचा होता.

बर्‍याच लोकानी ही घटना-यातना आणि निराशेचं जीवंत उदाहरण असं समजून- विसरून जायचं ठरवलं असतं.पण मी मात्र ध्यानात ठेवण्याचं ठरवलं होतं.कारण मला वाटतं ही घटना,मी कोण आहे आणि मी कोण होणार आहे,हे समजायला ठोस अशी बाब असं समजून गेले.त्यावेळी मला उदासीनतेची व्याधी झाली होती आणि माझं जीवन अस्ताव्यस्थ झालं होतं.माझ्या मला मी जखम करून घेणं तर्कसिद्ध वाटत होतं.

मला खूप यातना होत होत्या.त्यापासून सुटका करून घ्यायला यातनेचं अस्तीत्व आणि जखमेच्या रूपाने प्रत्यक्ष पुरावा स्वीकार करून पहायचं होतं. औदासीन्य घातक असतं.ते शरीरात फैलावतं आणि छपून असतं.एखाद्या कॅन्सर सारखं किंवा बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमेसारखं स्वतःला प्रकट करून घ्यायला नाकारत असतं.पण त्या दिवसाची माझी ती वेडपटपणाची सहल माझं औदासीन्य प्रकाशात आणायला कारणीभूत झाली.माझं दुखणं माझ्या चेहर्‍यावर प्रकाशमान झालं.एका काळोख्या गुहेतून ओढून काढून उन्हाळ्याच्या सूर्यप्रकाशात त्या औदासीन्याला मी आणलं. त्यानंतर आम्हा दोघांची असाधारण मैत्री जमली.

कित्येक वर्षं ह्या उदासीनतेला मी झुंझ दिली.त्याकडे दुर्लक्ष केलं.त्याचं सान्तवन केलं.ते नसल्याचा बहाणा केला.
पण जेव्हा औदासीन्य हा माझ्यातलाच एक भाग आहे असं समजून मी त्याला कवटाळलं आणि मदतीची शोध घेतला त्यावेळेला मी त्याच्याशी सामना करायचं ठरवलं.मी त्यातून शिकायला लागले.आणि त्याचा परीणाम म्हणजे माझं जीवन बदलायला लागलं आणि ते अशा तर्‍हेने बदलू लागलं की मी तसं कल्पनाही करू शकले नसते.

मला वाटतं,हे औदासीन्य माझं मौल्यवान साथीदार बनलं. माझ्या जीवनाला चांगली कलाटणी मिळाली.मी हातात घेतलेली कामं,माझे येणारे संबंध आणि जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन ह्या सर्वात सुधारणा दिसू लागली.कारण मी माझ्या व्यथेशी सामना करायला सुरवात केलीच आणि शिवाय त्याचा माझ्यावर होणारा प्रभाव मी स्वीकारू लागले.यापुढे मी दरवाजाला घट्ट कडी लावून ते छपवण्याचं बंद केलं.

औदासीन्य माझाच गुरू ठरला असं मला वाटू लागलं.माझ्यात आणि त्याचबरोबर इतरात असलेली क्लिष्टता मला ते शिकवायला लागलं.यातनेबरोबरखुशीचं अस्तित्व असतं.अपयशाबरोबर यश आणि वेडपटपणाबरोबर समझदारीचं अस्तित्व असतं.
उदासीनता मला,समानुभूति,सबूरी आणि विरोधाभास म्हणून, आनंदाचीही शिकवणूक देते.जीवनात हजर असलेल्या धुसर रेषा ज्यांना समर्पक उत्तर नाही किंवा कदाचीत उत्तर नाहीच नाही, त्या रेषा मला उदासीनतेतून दाखवल्या गेल्या.
ह्या धूसर रेषांपासून एव्हडं काही घाबरण्याचं कारण नसतं हे मला माहित आहे,उलटपक्षी ह्या रेषांकडून दुसर्‍याच कसल्यातरी जीवनातल्या रंगांची चमक दाखवली जाते.

एकदा काय गंमत झाली ते सांगते.मी एका पुस्तक विक्रीच्या दुकानाच्या बाहेर उभी होते.एक भिकारी दिसणारी बाई,माझ्या जवळ आली आणि तिने हात पुढे केला.तिच्या नजरेत माझी नजर गेली आणि मी माझा हात तिच्या हातात दिला.तिने मला सांगून टाकलं की मला फक्त हातात हात देण्यासाठी तिने हात पुढे केला.मी तिचा हात हातात धरून दोन शब्द बोलले.ती हसली आणि पुढे निघून गेली.आमच्या दोघांमधला थोड्याच वेळेचा पण तो जोरदार विनिमय होता.मला वाटतं,कदाचीत आम्हा दोघांमधला माणूसकीचा संपर्क तिने त्यादिवशी अनुभवला असावा.आणि हा संपर्क मी जो तिला दिला तो माझ्या औदासीन्याने,त्यातल्या सर्व क्लिष्टता ठेवून, मला जो दिला होता त्यातला होता.”

मालतीने सांगीतलेला तिचा सर्व अनुभव मी माझ्या बहिणीला आणि भाचीला थोडक्यात सांगीतला.
माझी बहीण मला म्हणाली,
“मालतीचं ते बाथरूम मधलं प्रात्यक्षीक आणि भिकारी बाईशी आलेला संपर्क ही सर्व ज्यादा माहिती म्हणून लक्षात घेऊन झाल्यावर,मला वाटतं तात्पर्य हेच की ह्या व्यथेशी सामना करायला हवा.मनातल्या मनात कुढत राहू नये.आणि सर्वाशी संपर्कात रहावं.”

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. veena samant
  Posted फेब्रुवारी 14, 2012 at 3:06 सकाळी | Permalink

  काका,

  फारच छान.अगदी खर आहे. माणसांनी एकमेकांच्या संर्पकात राहील पाहिजे आणि आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या पाहिजेत.

  वीणा

  • Posted फेब्रुवारी 14, 2012 at 1:14 pm | Permalink

   थॅन्क्स वीणा,
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: