अंतरातल्या नाना कळा…५

 

“आपण करतो वेळेची वसुली
वेळच करते आपुली वसुली
घेतो श्रम विसरुनी विश्रांती
करते वेळ वसुली विश्रांतीची
श्रम आणि विश्रांतीचा हा लपंडाव
करितो आपुल्या प्रक्रुतीचा पाडाव”

२७ फेब्रु.२०१२
आज सोमवार.दुनियादारी चालू झाली.गडबड, सडबड, धावपळ चालू झाली.माझ्या पत्नीचाही हा हॉस्पिटल मधला सहावा दिवस.यथा योग्य नियमीतपणाने तिची देखभाल होत होती.ब्लडशुगर चेक,ब्लडप्रेशर चेक,सकाळचं तोंड धुणं,आवश्यक त्या औषधाच्या गोळ्या देणं,तिला साफ करणं, स्पॉन्ज बाथ देणं,ब्रेकफास्ट देणं वगैरे कामं होत होती.तोपर्यंत नऊ वाजले.संबंधीत डॉक्टरांची आपआपल्या पेशंटकडे रुटीन व्हिझीट्स सुरू झाल्या.

आमच्या किडनीच्या डॉक्टरबाईने,ती पत्नीच्याबाबतीत हॉस्पिटलकडून इनचार्ज होती,मला सांगीतलं की बहुदा आज तिला आम्ही डिसचार्ज देऊ.तिच्या किडनीच्या,हार्टच्या,मेंदुच्या,कण्या मणक्याच्या आणि रक्ताच्या टेस्ट्स नेगेटीव्ह म्हणजे सुरळीत आहेत.हॉस्पिटलच्या केस मॅनेजरला रिपोर्ट गेला आणि त्यात माझ्या पत्नीला रिहॅबमधे म्हणजे रिहॅबिलटेशन सेंटर म्हणजेच पुनर्सुधार सेंटर मधे हलवावयाला फर्मान निघालं.

केस मॅनेजर माझ्या मुलांना भेटली आणि तिने आमच्या घराच्या जवळपासच्या पुनर्सुधार सेंटरची लिस्ट देऊन प्रत्यक्ष सर्व सेंटवर जाऊन एका सेंटरची निवड करायला सांगीतलं.
माझ्या मुलांने आणि सुनेने तसंच माझ्या जावयाने आणि मुलीने हे काम विभागून घेऊन सर्वानुमते एका पुनर्सुधार सेंटरची निवड केली आणि केस मॅनेजरला कळवलं.

संध्याकाळी बरोबर चार वाजता ऍम्ब्युलन्स आली.हॉस्पिटलच्या बेडवरून माझ्या पत्नीला फुलासारखं उचलून पुनर्सुधार सेंटर्वर आणून सोडलं. मेकनाइझ्ड स्ट्रेचरवरून, हॉस्पिटलने आखून दिलेल्या मार्गावरून,ऍम्ब्युलन्स योजून दिलेल्या ठरावीक जागेवर हजर होती.सर्व काही वेल प्लान्ड होतं.

पुनर्सुधार सेंटरला हॉस्पिटलच्या केस मॅनेजरने फॅक्स करून पत्नीचे मेडिकल पेपर्स पाठवले.तिला कोणती फिझीकल थेरपी द्यावी,कोणती औषधं द्यावी, किती दिवसात तिच्यात अपेक्षीत सुधारणा व्हावी तिला कोणतं डायट द्यावं वगैरे वगैरे कळवण्यात आलं.

पुनश्च सोमवारी रात्री पत्नी हॉस्पिटल ऐवजी सुधार सेन्टरवर मुक्कामाला राहिली.मंगळवारी फिजीओथेरपीस्टचे विशेषज्ञ तिला पहातील आणि निर्धारण करतील असं आम्हाला सांगण्यात आलं.मोठ्या जड पावलानी आम्ही सर्व तिला एकटीला त्या सेन्टरवर सोडून घरी गेलो.

“तू तिकडे अन मी इकडे”
ही त्या गाण्यातली ओळ, मला त्या रात्री घरी आल्यावर बिछान्यावर पडल्यावर,सतत मनात येऊन झोपच देईना.
रात्री केव्हा झोप लागली हे मला कळलंच नाही.पण तरूणपणातले ते दिवस पुन्हा आठवायला लागले.का ते दिवस आता मला आठवत होते आणि त्यावर स्वप्न पडत होतं माझं मलाच कळेना.

समुद्रातला संसाररूपी प्रवास डोळ्यासमोर यायला लागला.
सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.

“भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी “

बिचारी गेली वीस वर्षं तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
“मी कुणाचं काय वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?”
असं ती मला म्हणते.
“पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने “आशा” नावाची एक क्षमता माणसाला दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया”
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.

सकाळ केव्हा झाली ते कळलंच नाही.नेहमीप्रमाणे माझ्या मुलीने ह्या सुधार सेन्टवर मला सोडून ती आपल्या कामावर गेली.आमच्या मुलांची होणारी तिरपीट पाहून माझं मन खूप उदास होतं.त्यांचं जीवन हे एक सॅन्डवीच जीवन असं व्हायला लागलंय.एकीकडे आईवडीलांची जबाबदारी आणि दुसरीकडे त्यांच्या मुलांची जबाबदारी ह्या दोघांमधे त्यांचं जीवन सॅन्डवीच झालं आहे.आमच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना भागणार नव्हतं आणि मुलांची हेळसांड होऊन त्यांना परवडत नव्हतं.

“दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.”

ह्या गीतरामायणातल्या ओळी आठवल्या.तेव्हड्यात निर्धारण करण्यासाठी फिजीओथेरपीचे विशेषज्ञ आले आणि माझ्या विचाराची शृखंला तुटली.
क्रमशः

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: