अंतरातल्या नाना कळा…८

 

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे

आज शनिवार,सुट्टीचा दिवस. आज पुन्हा माझ्या पत्नीला पहायला नातेवाईक, सुधार सेंटरवर आले होते.त्यात विशेष करून आमची चारही नातवंड आली होती.मोठा नातू-मुलीचा मुलगा- सहा फूट चार इंच उंच, गोरा पान, राजबिंड,इंजीनियर झाल्यावर त्याच विषयात पीएचडी करीत आहे.नात -मुलीची मुलगी-युसी.बर्कलीमधे कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.दुसरी नात-मुलाची मोठी मुलगी-ग्रॅज्युएट झाली आणि आता मेडिसीनसाठी सिलेक्ट झाली आहे.आणि तिसरी नात-मुलाची मुलगी-सहावीत शिकत आहे.ह्या सर्व नातवंडानी आल्या आल्या आजीला पाहून तिला गराडाच घातला.आजीला मिठ्या मारून तिच्या पाप्या घेऊन,सर्वात धाकट्या नातीने स्वतःच्या हाताने चितारलेले,गेटवेल सून,ग्रिटींग तिला देऊन तिचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला.आजीच्या चेहर्‍यावरून ते दिसत होतं.असलं हे औषध बाजारात मुळीच विकत मिळणार नाही.

रोजच्या प्रमाणे,पत्नीची थेरपी चालूच आहे.पॅर्ललबार ह्या फि.थे.च्या एका उपकरणात उभं राहून पावलं टाकण्याच्या मुख्य व्यायामात थोडी थोडी प्रगती दिसत आहे.हा थेरपीचा दुसरा आठवडा चालू झाला आहे.तिसर्‍या आठवड्यात तिच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.मला आणि मुलांना १९ मार्चला बोलावून मिटींग घेतली जाणार आहे.

पेशंटकडे रोज एव्हडा वेळ न घालवण्याचा मला सल्ला दिला आहे.पेशंटची सर्व देखभाल होत असल्याने,पेशंटच्या सुधारासाठी प्रेरणा मिळण्याची जरूरी असल्याने त्याला नातेवाईकापासून एकाकी ठेवल्याने उद्देश साध्य होतो असं सांगण्यात आलं.त्यामुळे अलीकडे आम्ही सर्व अधुनमधून तिला भेटायला जात आहोत.

माझ्या मनाला हा सल्ला कसासाच वाटला पण नीट विचार केल्यावर सल्ल्यातली सत्यता नाकारता येणार नाही अशी मनाची खात्री झाल्याने आठवड्यातून एकदा आणि विकेंडला एकदा असं मी माझ्या पत्नीच्या सानिध्यात रहायचं ठरवलं.माझ्या पत्नीनेही मला धीर देऊन तसं करायला समत्ती दिली.हे मला जास्त प्रोत्साहक वाटलं.

आज सोमवारचा दिवस होता.आज मी सुधार सेंटरवर गेलो नाही.घरीच वेळ घालवला.रात्री झोपायच्या वेळी तिची फारच आठवण येत होती.जुन्या आठवणीने मनात काहूर केलं होतं.समुद्ररूपी संसाराच्या पुन्हा आठवणी येऊ लागल्या.वय होत चालेलं असताना मन भयभयीत होतं.समुद्रातही असंच होत होतं.

हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.त्रेपन्न वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे छत्तीस महिन्यांची सोबत, म्हणजेच जवळ जवळ एकोणीस हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला विचारतो,
“उद्या कसं होणार?”
आणि ती पण कधी कधी मला सहाजिकच म्हणते
“उद्या कसं होणार?”

तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्या होता.आणि हाच आज उद्याचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्या होतच रहाणार आहेत. तेव्हां,
आता कशाला उद्याची बात?

 

स्वप्न विरल्यावर जागा झालो.वास्तवीकतेत आलो.उद्याची बात करायची जबाबदारी आली आहे ह्याची जाणीव झाली.
ही व्याधी होण्याआधी होती ती परिस्थिती परत आल्यावर रोजच घरी व्यायाम तिला करावा लागणार आहे आणि मला तिच्या जवळ बसून तिचा व्यायाम घ्यावा लागणार आहे.हे नक्कीच झालं आहे.
माझ्याच एका जुन्या कवितेची मला आठवण आली.

निरोगी मौज

पडूं आजारी
मौज हिच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: