अंतरातल्या नाना कळा…११

 

“जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील”

आज सकाळीच मी सुधार सेंटरवर आलो.आज पत्नीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मिटिंग घेतली जाणार होती.मुलांनी आपल्या दुपारच्या सुट्टीत मिटिंगसाठी सेंटरवर यायचं ठरवलं होतं.आम्ही दोघं आणि आमची मुलं आणि सेंटरकडून सोशल वर्कर,फि.थे.चा एक्सपर्ट आणि नर्सिंगची हेड असे सर्व जमलो होतो.

सोशल वर्कर बाईने पत्नीच्या देखभालीची माहिती दिली.आणि तिच्याकडून मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल सांगीतलं.ह्या बाबतीत ती बाई पत्नीवर खूश होती आणि तिला लवकर आराम मिळो अशी शुभेच्छा तिने दिली.

नर्सिंगच्या बाईने पत्नीला दिल्या जात असलेल्या औषधपाण्याची कल्पना दिली आणि शरीराच्या जरूरीच्या मोजमापाची-ब्लडशुगर,ब्लडप्रेशर वगैरे-समाधानकारक होत असलेली माहिती दिली.

फि.थे.च्या व्यक्तीने पत्नीच्या निरनीराळ्या अवयाच्या -हात पाय,कंबर वगैरेत व्यायामातून होत जाणारी प्रगति आणि त्यांचं मोजमाप किती समाधानकारक आहे ते सांगीतलं.

सुधार सेंटरचे हे लोक अशा निर्णयाला आले की असंच चाललं तर एप्रिलच्या अखेरीपर्यंत पत्नी वॉकर घेऊन स्वतंत्र पणे आपल्या पायावर चालेल.आम्हा सर्वांना हे ऐकून उमेद आली आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपआपल्या परिने काम करायचं ठरवलं.

मला राहून राहून ह्या मिटिंग नंतर प्रो.देसाय़ांची आठवण आली ते म्हणायचे,

“प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते. तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते..मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”

मिटींग संपल्यावर माझी मुलं आपल्या कामाला गेली.जाताना त्यांनी आपल्या आईला भरपूर भरवसा दिला.
प्रेमाने अलिंगन दिलं.तिच्या डोळ्यात टपकणारे अश्रू आपल्या बोटांनी फुसले.
मी फक्त एव्हडंच म्हणालो,
“हे ही दिवस जातील”
तेव्हड्यात कुणीतरी शिंकलं.
माझी पत्नी लगेचच म्हणाली,
“ब्लेस यू”
असे वाकप्रचार वापरायची तिला आता इथे राहून सवय झाली होती.
माझी पत्नी व्हिलचेअर ढकलत आणि मी तिच्याबरोबर तिला सहाय्य देत तिच्याच सात नंबरच्या रूममधे आलो.
नर्सिस आणि त्यांच्या मदतनीसने येऊन पत्नीला तिच्या बिछान्यावर पडायला मदत केली.दोन तीन तासाची विश्रांती देऊन परत तिला उठवायला हा स्टाफ येतो.तिने सतत झोपून राहू नये हा त्यांचा उद्देश असतो.

ती लगेचच झोपी गेली.सकाळचा व्यायाम आणि दुपारच्या मिटिंगमुळे तिच्या जीवाला श्रम झाल्यासारखं वाटणं सहाजिक होतं.मीही तिच्या बेड जवळच खूर्चीवर बसलो होतो.मलाही थोडीशी डुलकी लागली.

मी लिहिलेल्या जून्या कवितेची कडवं माझ्या मनात एका मागून एक येऊ लागली.ही कविता थोड्याफार प्रमाणात ह्या प्रसंगाला लागू होत आहे असं मला वाटत राहिलं.

जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील

हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा
हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा
काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी
जीवन भासे यात्रा अन देवी तू मंदिरातील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील

हर एक फुल महकते आठव तुझी देऊन
तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून
हे तुळशी वृंदावन की प्रीतिचे ठिकाण
तू जवळ अथवा दूर असूनी आहेस काबील
जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील

हर एक शय्या झगमगे प्रीतिच्या किरणानी
ही झगमग पाहूनी नको आशा अधूरी जीवनी
जीवन यात्रेत असते सहयात्रीची जरूरी
यात्रा एकाकी करील माझे जीवन मुष्कील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील

 

यानंतर अधुनमधून

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishna@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: