स्त्रीचा अवमान टाळणार नाही.

 

सध्या ऊन्हाळ्याला जोर आला आहे.फारच गरम होतं.नव्वद आणि वरचं फॅरेनेट तपमान जीवाची कालवाकालव करतं.पण सूर्य एकदाचा खाली गेला की मग मात्र मस्तच वाटतं.तशात एखादी गार वार्‍याची झुळूक येऊन गेली तर विचारूच नका.

प्रो.देसाय़ाना सकाळीच फोन करून विचारलं याल का तळ्यावर?.कबूल झाले आणि आम्ही संध्याकाळी तळ्यावर भेटलो.
“माझा एक जवळचा स्नेही गेला.सुटला बिचारा वय खूप झालं होतं.”
भेटल्याभेटल्या भाऊसाहेब मला म्हणाले.
“गुणाजी पवार.एका फार्मसीत कामाला होता.नाकासमोर बघून चालणारा माणूस.कुणाच्या आ्ध्यात ना मध्यात पण भारीच तत्वनीष्ट होता.पाच मुलं होती.दोन मुलगे तीन मुली.पण बायको धरून कुणाशीच घरी पटायचं नाही.”
मला भाऊसाहेबांनी पुढे सांगून टाकलं.
“नाव गुणाजी पण अंगात चांगले गुण नव्हते असं म्हणायला हरकत नाही.”
मी म्हणालो.

“अहो काय सांगू?मोठा मुलगा जेव्हा अमेरिकीत जायला निघाला त्यावेळी तो मला भेटायला आला होता.मला म्हणाला,
“बाबांची कसली नुकसानी होणार आहे मी जाऊन?महिन्याचा माझा पगार त्यांच्या हातात पडणार नाही एव्हडंच.नाहिपेक्षा माझ्याबद्दल त्यांना तेव्हडंच वाटतं.”

मला त्या मुलाची कीव आली.मी त्याला म्हणालो,
“हे ही दिवस जातील. तू काळजी करू नकोस.”
बिचार्‍याला तेव्हडाच माझ्याकडून दिलासा मिळाला असं वाटलं.
प्रो.देसाई खजील चेहरा करून मला म्हणाले.

“गुणाजीचे रोज घरात वाद व्हायचे.कुणाचीही बाजू ऐकायला ते तयार नसायचे.आपलं तेच खरं.हळू हळू मुलं स्वतःच्या पायावर जगायला शिकल्याबरोबर काही तरी निमित्त काढून त्यांच्या पासून दूर जायला लागली.मोठी मुलगी भावाची मद्त घेऊन अमेरिकेत गेली.तिकडेच तिने आपलं लग्न केलं.भावानेही आपलंही तसंच तिकडे लग्न केलं.एका मुलीने गुजराथ्याशी लग्न करून बडोद्याला रहायला गेली.गुणाजीने धाकट्या मुलीचं लग्न आपल्या पसंतीने एका व्यापार्‍याच्या मुलाशी करून दिलं. ती पण ऑस्ट्रेलियात नवर्‍याबरोबर रहायला गेली.आणखी सगळ्यात धाकटा मुलगा बहिणीच्या मदतीने ऑस्ट्रेलियात स्थाईक झाला.
शेवटी गुणाजी आणि त्याची बायको होत्या त्या जागेत स्थाईक झाली.”

हा सगळा गुणाजी पवारांचा इतिहास भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकून मला दिलीप प्रभावळकरांची “श्री.गंगाधर टिपरे” ह्या टीव्ही सिर्यलची आठवण आली.त्यात एक प्रसंग असा होता की टिपरे आजोबा आपल्या मुलासह आणि नातवासह एका वयोवृद्ध गृहास्थाच्या अंतीम यात्रेला त्याच्या घरी गेले असताना त्या गृहस्थाच्या नातवासमोर टिपरे औपचारीक होऊन त्याच्या आजोबांचे गुण गात होते.पण त्या गृहस्थाचा नातुच त्यांना म्हणाला,
“आमचे अजोबा गेल्याने घरात कुणालाही वाईट वाटलं नाही.शेवट पर्यंत सर्वांना भांडावून सोडलं होतं.हट्टीपणा मुळीच गेला नव्हता.”
मी हे भाऊसाहेबांना सांगीतल्यावर त्यांना अचंबा वाटला.

“म्हणजे, आपलं तत्व न सोडणारे असे बरेच लोक जगात असतात तर”
घरी जाण्यासाठी उठता उठता प्रो.देसाई मला म्हणाले.

मीसुद्धा घरी जाताना “तत्व माझे सोडणार नाही” ही ओळ माझ्या मनात गुणगुणायला लागलो.आणि झालं एक कविता सुचली. घरी गेल्यावर ती एका कागदावर लिहून काढली आणि नंतर जेवायला बसलो.

 

तत्व माझे सोडणार नाही

 

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दारु पिऊनही झिंगणार नाही
झोप घेऊनही पेंगणार नाही
कसल्या कोणत्या आल्या भावना
शिस्ती शिवाय मला रहावेना

 

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दुःखाची नाही कसली खंत
परिणामाची नाही मुळीच भ्रांत
पुरूषगीरी सोडणार नाही
स्त्रीचा अवमान टाळणार नाही

 

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
करून करून भागले
देवपूजेला लागले
नैवेद्या शिवाय पूजा होणार नाही
पुजेपूर्वी प्रसाद मागुनही देणार नाही

 

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
वय झाले तरी आढ्य रहाणार
आपले तेच खरे म्हणणार
लाकडे स्मशानात गेली तरी
वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.

 

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही

दुसर्‍या दिवशी प्रो.देसायांच्या हातात हा कवितेचा कागद मी दिला.कविता वाचून झाल्यावर ते मला म्हणाले,
“गेलेल्या माणसाच्या मागे त्याच्याबद्दल वाईट काही बोलू नये असं म्हणतात.कारण त्याला आपली बाजू मांडता येत नाही.पण कवितेतून भावना तरी
प्रकट करता येतात.”

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted जून 23, 2012 at 7:57 सकाळी | Permalink

  मोडेन पण वाकणार नाही
  तत्व माझे सोडणार नाही
  करून करून भागले
  देवपूजेला लागले
  नैवेद्या शिवाय पूजा होणार नाही
  पुजेपूर्वी प्रसाद मागुनही देणार नाही

  फारच सुंदर..!


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: