एकदां काय जहालें!

“स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:”

तो रविवारचा दिवस होता.प्रमोद,त्याची पत्नी आणि मुलं माझ्याकडे जेवायला आली होती.माझ्या पत्नीने सुकं मटण,वडे ताज्या सोलांची कडी आणि भात असा जेवणाचा बेत केला होता.जेऊन झाल्यावर दुपारी थोडी डुलकी काढून झाल्यावर जुहू चौपाटीवर जायचा विचार केला.माझी पत्नी काही आली नाही.
“मी आवराआवर करीन तुम्हीच जाऊन या”
असं मला म्हणाली.

इतर आम्ही चौपाटीवर गेलो.सुर्यास्त बघून झाल्यावर प्रमोद आणि मंडळी घरी जायला निघाली.मी बराच वेळ वाळूत पडून होतो.सुर्यास्त झाल्यानंतर आणखी थोडावेळ बसायला मला आवडतं.
विशेषतः सूर्य पुरा समुद्रात डुबून गेल्यावर आकाशात दि़सणारे ते पिवळे-लाल रंग बघायला मला मजा येते.
वाळूवर थोडा लेटून हा प्रसंग मी पहात होतो.तासाच बसून होतो.काळोख केव्हा झाला ते कळलंच नाही.सूर्यास्ताकडे पाहून मनात विचार आला,
“हे काय चाललं आहे?”

सूर्य,पृथ्वी,पहाट,सकाळ,दुपार,दिवस,संध्याकाळ,रात्र,काळोख वगैरे अखिंडीतपणे चालू आहे.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची बाकी ही सर्व मुलं आहेत आणि ह्या कुटूंबाचा संसार असाच अखंडितपणे चालू आहे अशीही कल्पना मनात आली.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची पाच मुली आणि दोन मुलगे,दिवस आणि काळोख,अशी कल्पना मनात येऊ लागली.

घरी गेल्यावर तसाच कागद पेन्सिल घेऊन कविता उतरून काढली.दुपारी यथेच्छ जेवल्यावर आम्ही रात्री जेवत नाही.एक एक कप कॉफी पिऊन आम्ही झोपायला गेलो.

सकाळी उठल्यावर चहा घेताना मी माझी कविता पत्नीला वाचून दाखवली.

“कसं हे तुम्हाला सुचतं?”
नेहमी प्रमाणे माझ्या पत्नीने मला प्रश्न केला.
ह्यावेळी मी तिचा प्रश्न ऐकून फक्त हसलो.
माझ्या हसण्याचा अर्थ तिला समजला असावा.
दोन्ही चहाचे रिकामे झालेले कप उचलून ती उठून गेली.
मी मात्र माझ्या मनात नेहमीचं उत्तर पुटपूटलो.
“अग! विचाराच्या प्रांगणात अक्कलेने केलेला शब्दांचा हा खेळ आहे दुसरं काय?”

कविता अशी होती.

कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबूजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहूनी सूर्याला

ऐ्कूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
नेम असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्त दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
श्रेय नको देऊं तू सूर्याला
नेम असे हा पण पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे “दिवस” संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: