नाचावं पावसात ओलं चिंब होऊनी

 

“कसली वाट बघता? जा आणि नाचा”

हे सुधाताईचे शब्द आज मला आठवले.
मे महिना उजाडत आहे.लवकरच पावसाळा चालू होईल.तो मागच्या पावसाळ्यातला तो
एक दिवस मला आठवला.हवामान खात्याने त्या दिवशी संध्याकाळी जोराचा पाऊस
येणार आहे असं भाकीत केलं होतं.मी ऑफिसात जाताना न विसरता सकाळीच छत्री
घेऊन गेलो होतो.

संध्याकाळी खरोखरच जोराचा पाऊस येणार असं वातावरण झालं होतं.अंधेरी स्टेशनवर
उतरून सातबंगल्याच्या बसच्या रांगेत मी उभा राहाण्यासाठी तयारी करीत होतो.ती
लांबच लांब रांग पाहून चालत गेल्यास लवकर पोहोचूं असं मनात आलं.घरी पोहोचेपर्यंत
पाऊस नक्कीच पडणार नाही असं वाटून पायीच चालायला लागलो.नवरंग सिनेमापर्यंत
पोहचेन न पोहचेन तो पर्यंत जो काही पाऊस चालू झाला त्याची कल्पनाच करवेना.
नवरंगच्या पुढे पाठारे वाडीत सुधा पाठारे रहायची. तिच्या घरी जाऊन थोडा वेळ काढावा
म्हणून तिच्या वाडीत वळलो.तोपर्यंत जोरदार पावसाला सुरवात झाली होती.

आडवा-तिडवा वारा आणि पावसाची झोड यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं.
मी तर भिजलो होतोच आणि माझी छत्री ओली चिंब झाली होती.सुधाने दरवाजा उघडून
माझी छत्री माझ्या हातातून काढून घेऊन बाथरूममधे गळत ठेवली आणि मला हातात
टॉवेल देऊन अंग पुसून घायला सांगीतलं.गरम गरम चहा करते तोवर बाहेरच्या
हॉलमधे बसा असं सांगून ती चहा करायला आत गेली.
तिच्या फ्लॅटमधल्या बाल्कनीत जाऊन जोरदार पावसात भिजण्यापासून मी कसा वाचलो
त्या पावसाच्या सरीकडे पहात बसलो होतो.
स्टुलावर एक उघडी वही पाहिली. सुधा काहीतरी त्यात लिहित असावी.

“येणारं तुफान निवळून जाण्याची वाट पहाण्यासाठी जीवन नसतं.पावसात चिंब होऊन
नाचण्यासाठीच जीवन असतं.”
ह्या एव्हड्याच ओळी तिने नुकत्याच लिहिलेल्या असाव्या असं मला वाटलं.
पण दुसर्‍या पानावर तिने लिहलं होतं,

“भल्या मोठ्या खिडकीच्या गजामधून बाहेर निरखीत रहावं,निरखून पहात असताना,
नुकत्याच येणार्‍या पावसाच्या सरीमुळे सर्व परिसरात पाणीच पाणी होऊन आजुबाजूला
डबकी तयार होऊन त्यात डुंबावं,अशा तर्‍हेच्या आठवणीनीं माझ्या जीवनातले उत्तम
क्षण जागृत झाल्यावर, मला कसंसच होतं.”
माझ्या हातात चहाचा कप देत मला म्हणाली,
“बाळपणातल्या आठवणी यायला लागल्या, म्हटलं काहीतरी वहित उतरून काढावं
म्हणून लिहित बसले होते.तुमची बेल ऐकून दरवाजा उघडण्यासाठी उठले.”

“अरेरे! मी तुला व्यत्यय केला ना?”
मी सुधाला म्हणालो.

सुधाची दोन्ही मुलं आणि नातवंडं परदेशात असतात.ती ह्या जागेत एकटीच रहाते.दोन
वर्षापूर्वी सुधाचा नवरा अचानक वारला.एका मुलाकडे जाऊन रहावं अशा विचाराने ती
त्यांच्या होकाराची वाट बघत होती.
इकडचं सगळं सोडून जायला तिला जीवावर आलं होतं.पण तिची मुलं, तिने इकडे एकटं
रहावं हा विचार पसंत करीत नव्हती.

मला सुधा म्हणाली,
“सतत येणार्‍या ह्या विचाराने मन बरेच वेळा उदास होत असतं.पण मुलांकडे जाऊन
रहाणं अपरिहार्य होतं.आता इथं रहाणं ठीक आहे पण पुढे जास्त वय झाल्यावर एकट्या
मी नातेवाईकांना आणि शेजार्‍यांना किती कष्ट द्यावेत.त्यापेक्षा आपल्या मुलांकडेच
जाऊन रहाणं बरं असं माझं मन मला सांगत रहातं.”

निलेशने म्हणजे सुधाच्या नवर्‍याने आपल्या पश्चात एकटी राहून नयेस असं तिला
निक्षून सांगीतलं होतं.त्याचीही तिला आठवण व्हायची.
एकटी बसली असताना सतत येणार्‍या ह्या विचारांना पावसाच्या जोरदार सरीने
पावसाबद्दल विचार करण्याची तिला चालना दिली.

मला सुधाताई म्हणाली,
“काहींना वाटत असतं की,पावसाच्या आगमनाने सर्व दिवसाचं वातावरण उदास होऊन
जातं. किंवा काहींना वाटतं आजचा दिवस खरोखरच वाईट दिवस आहे.तर काहींना वाटतं
आज घरात स्वस्थ पडून रहावं आणि काहीच करू नये.

खरंच, पावसाचे दिवस म्हणजे नुसतं ढगाळ आकाश आणि उदास वाटणारं वातावरण
असण्य़ाचा प्रकार नव्हे. याऊलट जसे, सूर्याचं लख्ख उन पडलं असतानाचे, दिवस
असतात तसे चक्क घराबाहेर पडून कल्पनाशक्तिला आनंददायक प्रवृत्तित आणण्याचा
प्रयत्न केल्याचं सूख असतं.घरात बसून नकोत्या गोष्टींचा विचार करून स्वतःच्याच
मनाला यातना देण्यापेक्षा त्या वातावरणाचा उपयोग हा एक उत्तम दिवस आहे असं
समजून रहायला काय हरकत आहे.?”

सुधाचा हा विचार ऐकून मला पण माझ्या लहानपणाची आठवण आली.
मी सुधाला म्हणालो,
“लहानपणी आम्ही असं पावसाळी वातावरण पाहून घराबाहेर पडून पावसात चक्क
नाचायला जायचो.माझी बरोबरीची सर्व मित्र मंडळी मला साथ द्यायची.
मला नेहमीच वाटायचं की,पावसात नाचल्याने,उदास,दुःखी तापदायक दिवसाना विसरून
जाऊन,मजेदार,उत्तेजित आनंदायी दिवस बनवण्य़ाचे प्रयत्न होतात.असे उदास
यातनादायक दिवस उगवल्यास आणि बाहेर पाऊस पडत असल्यास, सरळ पावसात
जाऊन नाचावं,ओलं चिंब व्हावं.कसल्याच गोष्टी मनाला शिवणार नाहीत. सर्व काही
पावसाने धुऊन गेल्यासारखं होतं. असं वाटायचं.”

“आत्ता तर तुम्ही येण्यापूर्वी माझ्या मनात पावसाबद्दल असाच काहीसा विचार आला.
बाहेर पाऊस पडतोय त्याचा आवाज ऐकून मनाला आराम मिळतो.एखादी उबदार गोधडी
अंगाभोवती लपेटून खिडकीतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघत बसावं.मनात काही
कमतरता आल्यास पावासाच्या वातावरणात त्या आपोआप कमी केल्या जातात.मनात
असलेल्या सर्व समस्या मनातून धुऊन गटारतल्या पाण्यासारख्या वाहून नेल्या जातात.
मन एव्हडं प्रफुल्लीत होतं की मनोदशा एकदम आनंदीत होते.
पाऊस म्हणजे विस्मयकार, पाऊस म्हणजे दिलासा,पाऊस म्हणजे मज्जा.”
सुधाने आपला विचार सांगीतला.

पाऊस जरा काढल्यावर मी सुधाचा निरोप घेऊन घरी गेलो.जेवून झाल्यावर त्या
पावसाळी वातावरणात पांघरूण घेऊन कधी झोपायला जातो असं झालं.सुधाताईचे
पावसाबद्दलचे विचार मनात घोळत होते.झोप केव्हा आली ते कळलंच नाही.पहाटेच्या
स्वपनात सुधाताई मला सांगत होती,
“जेव्हा पावसात जाऊन नाचावं असं वाटतं तेव्हा सरळ पावसात जाऊन नाचावं.
माझ्या मनाचा खास विश्वास आहे की जर का जीवनात समस्या उध्भवल्या तर थेट
पावसात जाऊन नाचावं.असं कधी नाचलोच नाही असं नाचावं.मी खात्रीपूर्वक सांगते
तुम्हाला वाटणार्‍या सर्व चिंता दूर होतील आणि खूप बरं वाटेल.कोणी काही म्हणो,
लाजकरून घेऊ नका,नको होय म्हणू नका.मनाचा धीर करा,सहास केल्यासारखं मनात
आणा,सहजच नाचल्यासारखं वाटून घ्या.कसली वाट बघता?जा आणि नाचा.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Amol
  Posted मे 3, 2013 at 6:04 सकाळी | Permalink

  पावसाळी वातावरणातले सुंदर स्फुट.
  यंदाच्या पावसाळ्याची आतुरतेने वात बघत आहे.

  • Posted मे 3, 2013 at 6:03 pm | Permalink

   अमोल,
   प्रतिक्रियेबद्दल थॅन्क्स.यंदा भरपूर पाऊस पडो.महाराष्ट्रातला दुष्काळ संपून जावो.अशी प्रार्थना.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: