लाला,हिंदू की मुसलमान?

लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे.

वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि सतत पानाचा तोबरा लालाच्या तोंडात असल्याने,त्याचे कपडे वर पासून खाली पर्यंत लाल झालेले असायचे.तोंडातून ओघळणारी थुंकी अधून मधून कपड्याला फुसायच्या संवयीमुळेपण, त्याचे कपडे लाल दिसायला भर पडायची.
” जुम्मेके जुम्मे ” न्हाण्याची संवय असल्याने पुढल्या शनिवारी तेव्हडे ते त्याचे कपडे पांढरे शुभ्र दिसायचे.

वेंगुर्ल्याच्या बंदराच्या दिशेने मार्केटच्या अगोदर उजव्या बाजूला डोंगराकडे चढत जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने अगदी वर गेल्यावर रस्ता संपतो,त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगराच्या सपाटीवर तांबळेश्वराचं मंदीर आहे. त्याच्या उजव्या बाजूला उतरणीवर गांवाचं स्मशान आहे.ह्या स्मशाना जवळ एका पडक्या झोपडीत लालाचा,
रात्रीचा झोपण्यासाठी मुक्काम असायचा. त्या स्मशानशांततेच्या एकांताच्या परिसरात लाला कसा राहायचा हे, गावातल्या लोकांचे भयभयीत आश्चर्य असायचं.त्यावेळच्या आमच्या लहान वयांत तर लालाला दिवसा रस्त्यावर पाहून देवचार भुताटकीचा प्रतिनिधी असावा असंच वाटायचं.दिवसा प्रेतं जाळायला येणाऱ्या लोकाना लालाची झोपडी रिकामीच दिसायची,आत डोकावून पाहिल्यावर ईतःस्था पडलेली ऍल्युमिनीयमची कळकटलेली भांडी पातेल्या,लोटा आणि सुंभाच्या दांडीवर लटकणारी एकदोन लक्तरं दिसायची.मात्र रात्रीची प्रेतं घेवून येणाऱ्याना रात्री बारा नंतर लाला आत घोरत पडलेला दिसायचा.तो स्मशानाकडे ढुंकूनसुद्धा पहात नसे,असं नियमीत स्मशानयात्रेला जाणारे लोक म्हणायचे.तसंच प्रेत-संस्कार झाल्यावर लोकं निघून गेल्यावर ईकडे तिकडे पडलेले सामानसुमान, कपडेलत्ते पाहून लाला कशालाही हात लावत नसे.

तो निरपेक्ष,निराधार,निस्पृह असावा असं लोकाच मत, त्याच्या विषयी पक्कं झालं होतं.कधी तरी तापाने फणफणला असेल तर ” अल्ला,अल्ला ” असं ओरडल्याचं कुणी तरी ऐकणारे सांगतात ह्या एकाच शब्दावरून लाला मुसलमान असावा अश्या निर्णयाला लोक आले होते.रस्त्यावरून फिरत असताना तसा तो अल्पभाषीच होता. एखाददुसरा शब्द कुणी ऐकला तर तो मराठीत,मालवणीत किंवा “अच्छा ” असा उर्दूत असायचा त्यामुळे रस्त्यावर पहाणारे लोक लालाला मुसलमान संमजायचं की काय समजायचं ह्याच्या संभ्रमात असायंचे.त्याच्या धर्माचा विषय ओघाओघाने पुढे येणारच आहे.

सकाळी खाली गावात आल्यावर थेट तुळसुली गावापर्यंत जवळ जवळ तिन मैल चालत जायचा.मधे एका चहाच्या दुकानात बाहेरच त्याला रतीबाने एक कप चहा आणि बेकरीतला पाव खायाला मिळायचा. खांद्दयावरच्या झोळीत त्याचा एक कप असायचा तसंच एक ऍल्युमिनियमची थाळी आणि एक पांढऱ्या पोरसिलीनची तबकडी,त्यावर निळ्या गर्द रंगाची किनार असायची.दुपारचा मार्केट मधे आल्यावर सांळगावकरांच्या खानावळीच्या बाहेर बसल्यावर डाळ,भात एखादा माशाचा तुकडा आणि आमटी फुकट जेवायला मिळायची,तसंच बुधवारी आणि रविवारी मयेकरांच्या हॉटेलातून बशीभर मटण आणि दोन पाव दुपारचे मिळायचे.मटण लाला पोरसीलीनच्या तबकडीत न चुकता घ्यायचा लाला कुणाकडे काही मागायचा नाही.दुकानात बाहेर बसल्यावर हॉटेलचा पोऱ्या त्याला पाहून खाणं आणून द्दयायचा.
लालाने कधीच भीक मागीतली नाही.कुणी त्याच्या कमंडलूत एखादं केळं,आंबा,चीकू सारखं फळ दान करायचा आणि लाला ती कधी खायचा किंवा एखाद्दया लहान मुलाला देवून टाकायचा.

मार्केटच्या आवारात असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथुऱ्यावर दुपारची वामकुक्षी घ्यायचा.कधी कधी बाबल्याच्या पानाच्या गादी जवळ जावून उभा राह्यचा.दोन चार हिरवी खायची पाने,थोडी कुटलेली सुपारी,थोडा तंबाखू आणि एका पानावर चुना लावून त्याची पुरकंडी त्याच्या झोळीत बाबल्या टाकायचा.लालाला असं दान केल्यावर त्याच्या धंद्दयाला
बरकत येईल अशी त्याची भाबडी समजूत असायची.

बाजूच्या दुकानाच्या उंबरठ्यावर दोन चार उपट्सुंभ गांवठी जुगार खेळत बसायचे.चार आण्याच्या (पावलीच्या) नाण्यावर माशी बसेल त्याला जुगार लागला असा नियम करून ईतरानी ठेवलेली नाणी त्याची व्हायची.उंबरठ्यावर रांगेत ठेवून दिलेल्या कुणाच्या नाण्यावर माशी बसेल हे ज्याचे त्याचे नशिब असायचे.कधी कधी पंधरा पंधरा मिनीटं माशी फिरकायची पण नसायची. लालाला ह्या जुगारात कसलीच उमेद नसायची.
उभं राहायचं म्हणून तो उभा राहायचा.मात्र अन्वर खेळत असेल तर मात्र तो लालाला रोखून धरायचा.लालाच्या पायावर डोके टेकल्याशिवाय त्याला जुगारात लाभ होत नाही असा त्याचा अनुभव होता.आणि खरंच लालाच्या पायावर डोके ठेवून पावली त्याच्या पायावर घासल्याशिवाय त्याला लाभ होत नव्हता,पण ईतर म्हणजे गुरुनाथ,दाजी,दत्या वगैरे हिंदू मंडळी लाला मुसलमान असल्याने त्याच्या पायावर डोकं ठवणं त्यांना पसंत नव्हतं.धर्म बुडतो असा त्यांचा समज असायचा.अन्वर आणि लाला असताना ते जुगारातून काढता पाय घ्यायचे.लाला नसताना मात्र अन्वर कधी कधी हरायचा.

असं कां होतं?, म्हणजे लाला असताना अन्वर का जिंकतो हे चलाख पंढरीच्या लक्षात आलं.अन्वर नक्की काय करतो ते त्याने नीट लक्ष देवून हेरलं.आणि लालालाच्या पायावर डोकं न ठेवता,फक्त पावली लालाच्या पायावर पंढरी घासायचा.नंतर हटकून माशी पंढरीच्या पावलीवर बसायची.पंढरी जुगार जिंकायचा.

त्याचं गुपीत असं होतं की लालाचे मळलेले आणि कधी न धुतलेले पाय एव्हडे अस्वच्छ असायचे की त्याच्या पायावर घोंघावणाऱ्या माशा त्या घासलेल्या पावलीला आकर्षीत व्हायच्या. हे पंढरीच्या चलाख डोक्यात आलं.

अशातऱ्हेने दिवस चालले होते.आम्ही शाळेतून घरी येताना लाला दिसला की “लाला! मी पास की नापास? ” असा प्रश्न केल्यावर, खाली मुंडी ठेवून चालत असलेला लाला हळू आवाजात फक्त म्हणायचा ” पास “. हे ऐकून आम्हा सर्वांना बरं वाटायचं.असंच एकदां दाजी पराडकरने त्याला विचारलं,आणि तो परिक्षेत खरंच नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं.परिक्षेसाठीनीट अभ्यास न केल्याने नापास झाल्याचं दुःख दाजीला नव्हतं,तर लालाचं भाकित खोटं ठरलं याच त्याला जास्त दुःख झालं.
पुढल्या खेपेला लाला दिसल्यावर दाजी त्याला म्हणाला
“लाला तू झूट बोलतोस,मी नापास झालो.”
लाला पहिल्यांदाच रसत्यावर थांबून म्हणाला कसा, ” बेटा मैने तुमको ’तुमना, पास’ असं बोललो होतो.मै झूट कभी नाही बोलत.अल्ला की कसम” दाजीच्या लक्षात आलं लाला “तुम, नापास” असं बोलला असावा.

लाला अलिकडे रोज रसत्यावर दिसत नव्हता.कधीतरी दिसायचा. साळगावकरच्या खानावळीतला पोऱ्या पण म्हणाला लाला थाळीत दिलेले नीट जेवत नाही.मयेकर हॉटेलवाले पण म्हणाले “लालाने अलिकडे मटण सोडलं थाळीत घेतो पण खात नाही”. करता,करता लाला आता खाली उतरून यायचा बंदच झाला.

असंच एकदा तांबळेश्वराला गेलेल्या काही लोकानी सांगतलं की लाला “पैगंबरवासी” झाला.तो अल्लाला प्यारा झाला. कुणी तरी म्युनसिपालीटीला कळवलं.गाडी आली होती,पण लोकानी लालाला बेवार्शी न्यायला दिलं नाही.प्रश्न पडला लालाला पुरायचं की जाळायचं. त्या गर्दीतून अन्वर पुढे आला आणि म्हणाला ” लाला मुसलमानच आहे.तांबळेश्वराच्या देवळाच्या बाजूला मी त्याला बरेच वेळा नमाज पाडताना पाहिलं आहे.आणि नेहमी ’अल्लाकी कसम’असंच म्हणायचा. आणि अगदी खाजगीत म्हणजे लघूशंका करताना मी त्याला पाहिलं आहे त्याचा सुंथा झाला आहे.” एव्हडं सगळं ऐकल्यावर लोकानी त्याला तांबळेश्वरच्या पठारावरच एकेठिकाणी पुरला.

तांबळेश्वराच्या स्मशानात आल्यावर लोक न चुकता ईतर सामुग्री बरोबर एक फुलाचा हार आणायला विसरत नाहीत.सर्व संस्कार झाल्यावर बाहेर येवून लालाच्या कबरीवर आस्थापुर्वक हार घालतात आणि कबरीला हात जोडतात.आणि मुसलमान कबरीला हात लावून मग आपल्याच केसावरून हात फिरवतात.

कधी कधी शाळेतून येताना रसत्यावर लालाचा भास व्हायचा.”लाला! मी पास की नापास? “असं विचारल्यावर आता उत्तर द्दयायला लाला नव्हता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: