ती अमेरिकन मुलगी

लेबरडेची सुट्टी संपली.आता उन्हाळा ओसरत जाणार.फ़ॉल चालू होणार.झाडांची पानं
पिवळी होऊन पडायला सुरवात होणार.अंजीराच्या झाडाची पानं,हत्तीच्या कानाच्या
आकाराची ही पानं, चांगलीच पिवळी होऊन पडायला लागली आहेत.सफरचंदाना लाल
रंग चढत आहे.लालबुंद व्ह्यायला त्या फळांना आता थंडीची जरूरी आहे.सफरचंदाच्या
झाडाची पानं अजून हिरवीच आहेत.ऑक्टोबरमधे चांगलीच थंडी पडायला लागली की ह्या
झाडांची पानंसुद्धा पडायला सुरवात होईल.तोपर्यंत फळं पाडाला येणार.मलबेरीची पानं
झपाट्याने पिवळी व्हायला लागली आहेत.हे झाड सर्वांत प्रथम काटकूळ होणार
आहे.भरगच्च पानांच्या झाडाला अशावेळी बोडक्या फांद्यांचं पाहून मन उदास होतं.पण
काय करणार निसर्गाच्या शिस्तीपुढे कुणाची बिशाद आहे?.

प्रो.देसायांबरोबरच्या तळ्यावरच्या आमच्या भेटीसुद्धा आता कमी कमी होणार आहेत.
आज त्यांना भेटल्यावर मला माझी एक जुनी आठवण सांगायला विषय मिळाला.
मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“ते माझ्या शाळकरी जीवनाचे दिवस होते.कोकण्यातल्या पावसाने मी नेहमीच भारावून
जात असतो.आणि त्या वयातही तसंच होतं.मला आठवला तो श्रावण महिन्यातला
दिवस.ह्या दिवसात पाऊस सरी घेऊन येतो.कधी कधी एखादा दिवस कोरडा जातो.पण
खात्री नसते.त्या दिवशी मी बंदराच्या दिशेला असलेल्या मांडवीवर फिरायला गेलो
होतो.तसे बरेच लोक तीथे फिरायला आले होते.संध्याकाळ होता होता बराच काळोख
झाला होता.त्याचं मुख्य कारण आकाश ढगानी व्यापलेलं होतं.एवढा काळोख झाला की
जणू काही रात्र झाली होती.आणि एकदम जोराची सर आली.सर्वजण पावसापासून
आडोसा घ्यायला पळत सुटले.मी पण एका गुलमोहराच्या झाडाच्या खाली जाऊन उभा
राहिलो.सर सपाट्याने आली होती.एक सुंदर चेहर्‍याची मुलगी,पुर्ण भिजलेली,माझ्याच
जवळ आसर्‍याला येऊन उभी राहिली.जवळ जवळ मला बिलगी म्हटलं तरी चालेल.
माझ्या जवळ आल्यावर मला ती “हाय!” म्हणाली.
मी हसून तीच्याजवळ पाहिलं.तेव्हड्यातच त्या सरीबरोबर एक मोठी पावसाची झड
येऊन सोसाट्याने वारा सुटला.वीजाही चमकल्या. ती मुलगी मला आणखी बिलगली.
आणि मला हळू आवाजात “सो सॉरी” म्हणाली.
मी पुन्हा हसून तीच्याजवळ पाहिलं.तीच्या अंगात चिटाचा रंगीबेरंगी लांब बाह्यांचा
ब्लाऊझ होता.तीला तो अगदी गबाळ्यासारखा दिसत होता.ती आबोली रंगाची साडी
नेसली होती.ती पण गबाळ्यासारखी दिसत होती.लांबसडक केसामधे तीने सुरंगीचा
वळेसार,वेणी, माळली होती.त्या सुरंगीच्या फुलांचा सुवास त्या कुंद वातावरणात
दरवळला होता.

जशी पावसाची सर सपाट्याने आली तशीच ती झपाट्याने निघून पण गेली.पाऊस
उघडला असं पाहून सर्वजण आपआपल्या मार्गाने निघून गेले.मी पण तेच केलं.दुसर्‍या
दिवशी मी त्या मुलीची चौकशी केली असताना मला कळलं की ती तीच्या आजी
आजोबांकडे सुट्टीत कोकणातला पाऊस पहायला आणि त्याचा आनंद लुटायला आली
होती.

ती तीच्या आईवडीलांबरोबर अमेरिकेत रहायची.तीथेच तीचा जन्म झाला होता.तीच्या
आजोबांनी,तीच्या लहानपणापासून तीला कोकणातल्या पावसाच्या गम्मती जम्मती
सांगीतल्या होत्या.त्या प्रत्यक्ष अनुभवायला आणि आनंद लुटायला ती आली होती.असं
मला कळलं.तीने जो ब्लाऊझ आणि साडी परिधान केली होती ती तीच्या मावशीची
होती.सहाजीकच तीच्या त्या तरूण वयात तिला ते कपडे गबाळ्यासारखे दिसत होते.

तो कोकणातला पाऊस,तो श्रावण महिना,त्या श्रावण महिन्यातल्या सरी,ह्यांची मला
कधीही आठवण आली की ही घटना आठवायची.त्या वयातल्या त्या आठवणी
रोमा़ंचकारक नसल्यातर नवलच.परवा दिवशी रेडीओवर मी एक हिंदी गाणं ऐकलं आणि
त्या घटनेची प्रकर्षाने आठवण आली त्या गाण्याचा मी ताबडतोब मराठीत अनुवाद
केला.तो असा,

कशी मी विसरू?

अवघ्या आयुष्यात कशी मी विसरू?
ती श्रावणातली रात्र
अशाच एका अनभिज्ञ लावण्यवतीशी
झालेल्या नजरानजरीची ती रात्र
कशी मी विसरू?

अरेरे! मऊ केशपाशातून ते
ओघळणारे पाणी
फ़ुलावरून लाल गालावर ते
ओघळणारे पाणी
अंतरी करूनी झंझावात
विदारक करणारी ती रात्र
कशी मी विसरू?

विद्युलता पाहूनी भयभीत होऊनी
ते तीचे बिलगणे
आणि लज्जेने चूर होऊनी
ते सहजच चिपकणे
न पाहिली ना ऐकीली अशी
ती विक्षिप्त रात्र
कशी मी विसरू?

चिंब झालेला पदर तीने
जो लिपटलेला होता
जळजळीतसा नजरेचा बाण
जो तीने फेकला होत्ता
पेटलेल्या पाण्याला लागलेली
ती मनोभावनेची रात्र
कशी मी विसरू?

माझ्या गीतात चप्प बसणारी
ती एक तस्वीर होती
यौवनातल्या सुंदर स्वपनाची
ती एक परिणती होती
गगनातून उतरलेल्या रात्रीची
ती एक रात्र
कशी मी विसरू?

कविता सांगून झाल्यावर,प्रो.देसाई मला म्हणाले,
“हे अमेरिकन्स, आनंद मनमुराद लुटतात.कोण काय म्हणतं,कोण कोण काय म्हणतं
ह्याची अजिबात पर्वा करीत नाहीत.आणि त्याचं मुख्य कारण ते स्वतःवर प्रेम करतात.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,ह्या तुमच्या म्हणण्यावर मी आणखी जास्त सहमत होऊच शकत नाही”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: