असावेत काही मित्र वयानेही मोठे.

(“शेवट होणं म्हणजे काही का़ंदबरीचा शेवट झाला असं नव्हे”)

एकदा मी आणि माझा मित्र शरद  सुदेशमधे कॉफी पित  होतो.तो मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं की,
“आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले आपले मित्र हेच खरे चांगले असतात.”
त्यावेळी ते ऐकून मी, शरदला माझी मान डोलावून सम्मती दिली होती.त्यावेळी आमचं वय साधारण वीस,तीस असेल.आत्ता जे माझं वय आहे त्या वयाचे ते माझे मित्र म्हणून होते.कदाचीत त्याहीपेक्षा जास्त वयाचे असतीलही.माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या माझ्या मित्राव्यतिरीक्त माझ्या वयाचेही माझे बरेच मित्र होते.

पण ह्या दोन वयातल्या मित्रांमधे फरक होता.ते मोठे मित्र म्हणजे एखाद्या जाड कादंबरी सारखे ते मला वाटायचे. त्यांच्या जीवनाच्या कांदबरीला बरीच प्रकरणं होती.आणि ती प्रकरणं कुतूहलानी भरलेली होती,दुःखद घटानानी भरलेली होती, आनंद,अमोद, कृतकृत्यता,सफलता आणि उत्तरजीविता,अवशेष या असल्या विषयाच्या प्रकरणांनी भरलेली होती.मात्र माझ्या वयाचे मित्र,मी धरून,आमची परिस्थिती म्हणजे,लघु-कथाच होत्या म्हटल्या पाहिजेत.किंवा वाटलंतर,कच्ची प्रारूपं म्हटली तरी चालेल.जणूं ही प्रारुपं अजून सुधारायची आहेत,त्यांना आकार द्यायचे आहेत.

माझे मोठे मित्र,त्यातल्या त्यात वेळ काढून,जीवनातल्या घटनांचं चर्वीचरण करायला सज्ज असायचे.त्याना असं कधीच वाटलं नाही की,दिवसात घडणार्‍या बारीक सारीक घटनाविषयी आमच्यासारख्याशी चर्चाच करू नये.त्यांची अपेक्षा एव्हडीच असायची की मी त्यांच्याकडे ध्यान देऊन ऐकावं.आणि मी ते निक्षून ऐकायचो.त्यावेळच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या त्या जमान्यातल्या सांगण्यासारख्या घटना ताज्याकरून ते सांगायचे.

माझे मित्र महात्मे,आणि शिरवईकर,ज्यांची लग्न होऊन त्यावेळी त्यांना दोन मुलंपण झाली होती,त्यांच्या घरी ते बोलवायचे.कधी जेवायलाही बोलवायचे. सत्तरी ओलांडलेले हे माझे मित्र सतत कार्यक्षम असायचे.महिना संपता पे-चेकची गरज नसणार्‍या त्यांना त्या त्यांच्या वयात प्रसन्न रहाण्यात आनंद असायचा.
मला आठवतं एकदा श्री.महात्म्यांनी,आपला ड्रॉवर उघडून एक पत्र मला दाखवलं,त्यात त्यांच्या एका जुन्या मित्राने,त्यांची हरवलेली छत्री त्याने त्यांना पोहचती केली ह्याबद्दल कृतकृत झाल्याबद्दल लिहिलं होतं.घटना अगदी क्षुल्लक होती पण त्या मागची भावना मन आनंदी करणारी होती.वयाने मोठे असणारे माझे हे मित्र,ज्या घटना सांगत असत, त्या शुद्ध मनोरंजकते पलीकडच्या असायच्या हे मात्र नक्कीच खरं असायचं.

त्यांच्या विचाराचा आशय सर्वगत विषयाविषयी असायचा.खोलवर विचार करण्या एव्हडी पात्रता माझ्या त्यावयात माझ्याजवळ नसणं स्वाभाविक होतं.तसंच त्यांचे विचार मला नसमजण्याएव्हडे अतीगंभीरही नसायचे.त्यातले बरेचसे मित्र आता निर्वतले आहेत. पण मला त्यांची खूप आठवण येत असते.
आता मीही वयस्कर झालो आहे.त्यांच्यातल्या एकाने निरनीराळ्या गोष्टींबद्दल बरेच वेळां समजावून सांगताना केलेला अविर्भाव मला जास्तकरून आठवला असताना त्यांची खूपच आठवण येते.अशी आठवण आल्यावर ते हयात आहेत असंच वाटू लागतं.

वाटेलत्या वयस्कर माणसाशी माझी मित्र म्हणून गट्टी जमत नसायची,हे मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे.त्यातले काही अजून जीवंत आहेत.त्यांच्यामधले श्री.महात्मे यांच्या जवळ भरपूर पैसे होते आणि ते श्रीमंत लोकांच्या वस्तीत रहायचे.श्री.शिरवईकर तर निवृत्त होऊन बरीच वर्षं जगले.निवृत्तीनंतर ते लेखन पण करीत होते.जग फिरले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांच्या लेखात सुंदर वर्णनंपण केली होती.

शिरवईकरांचा तत्वविचार असा होता,जो त्यांनी माझ्या एका मित्राला समजावून सांगीतला होता,
 “मी सकाळी उठतो,कपडे परिधान करतो आणि प्रत्येक गोष्टीशी सम्मतीत असतो.”
एकदा मी त्यांना फोनवर निरोप ठेवला होता की,
“मी गोव्याला जात आहे.सुट्टी घेऊन फिरायला जात आहे.तुम्ही गोव्याला अमुक अमुक ठिकाणी मला भेटा.”
लगेचच तेही गोव्याला मला भेटले.पण माझा पत्ता हुडकून काढण्यासाठी त्यांचा बराच वेळ गेला होता.ते माझ्यावर त्यावेळी थोडे वैतागले होते.
त्यानंतर एक आठवड्याने ते मला अंधेरी स्टेशनवर भेटले त्यावेळी चक्क म्हणाले,
“तू जर खराच भेटण्यासाठी गंभीर असशील तरच मला आमंत्रण दे आणि नीट पत्ता दे.”
थोडी फार त्यांचीच चुक होती.पण मी त्यांच्याशी वाद घातला नाही.त्यांच्या वयाचा मला आदर ठेवावा असं त्यावेळी वाटलं.

असेच,माझे एक वयस्कर मित्र,परिस्थितीने थोडे सर्वसाधारण होते.नाटकात काम करायचे. शिवाय रोजीरोटी साठी जॉब करायचे.नाटकं चालेनात,तेव्हा ते शहर सोडून आपल्या गावी गेले होते.शेवटी शेवटी ते नाटकात छोटी छोटी कामं करायचे.पण शेवट पर्यंत परीश्रम करायचे.मला एकदा त्यांनी सांगीतलं होतं,
“तू ज्यावेळी जीवनात मोठा निर्णय घेऊ पहातोस तेव्हा,पर्यायाला रद्द करावेस”
त्यानीच मला एकदा सांगीतलं होतं,
“कुठचीही गोष्ट विनोदाने सांगीतलीस तरी चालेल.पण अशालिनतेच्या पलीकडे जाऊ देऊ नकोस.”
आता माझ्या लेखनात जरा काही अप्रिय,घृणास्पद असं वाक्य यायचं असेल, अशावेळी मला त्यांच स्मरण होतं.

मझ्या ह्या मित्रांना वय वाढत चाललं असताना,त्या बरोबर येणार्‍या अनेक अडचणीना, अनेक दुर्घटनाना तोंड द्यावं लागलं आहे. तरीपण ते कधीही कठोर,संतापी झाले नाहीत. वैरागी झाले नाहीत. उलट,त्यांनी शिशु सुलभ आनंद ठेवून, पोक्त आणि बुद्धीपूर्सर निर्णयाची सांगड घातली.आता हाच दंडक मी माझ्या ह्या वयात अंगीकारला आहे.

मला आठवतं अलीकडे मी माझ्या एका मित्राबरोबर,जो माझ्यापेक्षा अर्ध्या वयाने लहान असेल,कानविन्द्याच्या मालवणी जेवणाच्या खाणावळीत जेवत असताना,अशाच एका विषयावर बोलत होतो.मधेच त्याने आपला स्मार्टफोन त्याच्या खिशातून काढला.मला वाटलं माझं म्हणणं त्याला थोडं कंटाळवाणी वाटत असावं,पण खरं म्हणजे त्याने तो फोन माझ्याकडे पाहून फोटे घेण्यासाठी काढला होता.
“आपल्या पेक्षा वयस्कर मित्राबरोबर जेवण घेत असताना!”
असं त्या फोटो खाली लिहून तो फोटो आपल्या मित्रांना ट्विट केला होता.

कुणाष्ठाऊक, कदाचीत तो माझ्या वयाचा झाल्यावर,आणि मी पण ह्या जगात नसताना,तळलेले बांगडे,सोलाची कढी आणि भात जेवताना,माझ्या वयस्कर मित्रानी मला शिकवलेल्या आणि त्याच्याकडे मी प्रकट केलेल्या एका गोष्टीचं त्याला स्मरण होण्याची शक्यता आहे,
“शेवट होणं म्हणजे काही का़ंदबरीचा शेवट झाला असं नव्हे”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co

2 Comments

  1. bhausaheb nimbalkar
    Posted ऑक्टोबर 19, 2013 at 2:31 सकाळी | Permalink

    Dear sir,
    Thanks, I am also 60 years old. I like your thoghts.
    o.k.bye.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: