बॅट आणि टेनीस बॉल

“त्यावेळी आम्ही शिवाजीपार्कला रहात होतो.आमच्या बिल्डींगचं नाव कृष्णकुंज असं होतं.”
जून्या आठवणी उजाळत असताना मनोहर-माझा लहानपणापासूनचा मित्र-एकदा त्याला झालेली आठवण मला वर्णन करून सांगत होता.

“शाळेत जाताना शिवाजीपार्कात लहान मुलांपासून मोठ्यापर्य़ंत क्रिकेट खेळत असायचे ते पाहून मलाही माझी स्वतःची एखादी बॅट आणि टेनीस बॉल असावा असं मनोमनी वाटायचं.आणि मित्रांबरोबर पार्कात येऊन खेळावं असं वाटायचं.स्वतःची बॅट आणि बॉल असल्यावर आपल्याला वाटेल तेव्हा खेळतायेणं,हे किती आनंदाची गोष्ट होईल असं माझं मन मला सांगायचं.”

 मी मनोहरला म्हणालो,
“अरे! क्रिकेट खेळायला कमीतकमी दोन माणसं तरी असणं आवश्यक आहे.”
“हो माझा धाकटा भाऊ आणि मी खेळू शकलो असतो.”
मनोहरला एक भाऊ होता हे मी विसरलोच होतो.
“आमचे वडील आम्हा दोघांना पॉकेट-मनी द्यायचे.मी माझ्या भावाला पटवून दिलं की आपण बॅट-बॉल घेण्याचा उद्देश ठेवून पैसे बाजूला करून ठेवले-पैशांची बचत केली- तर हे बॅट-बॉल घेणं केव्हाही शक्य आहे.आणि नंतर आम्ही तसं ठरवून बॅट-बॉल विकत घेतला.आणि रोज संध्याकाळी आम्ही दोघे पार्कात खेळायला जायला लागलो.हळू हळू आम्हाला काही मित्र जॉईन झाले.वेळ मजेत जाऊ लागला.
नंतर,नंतर मी आणि माझा भाऊ मिळून आणखी काही अशाच-एकमेकाचा फायदा होईल अशा- गोष्टी घ्यायला लागलो.

जसा मी मोठा होत गेलो तसं नशीबाने माझ्या लक्षात यायला लागलं की,अशा वृत्तीने,म्हणजे एकमेकाच्या सहकार्याने, राहिल्यावरच आपल्या आजूबाजूच्या जगाला जीवन जगण्याचा सुंदर आकार यायला लागतो.गावात तयार झालेले रस्ते,आणि मग ते शहरात आणि पुर्‍या देशात होणारे रस्ते असेच तयार होत असतात.राज्यात कर भरतो तो पण असाच उपयोगी होतो.

आमच्या गावात शाळा तयार होतात. त्यातुनच माझी मुलं आणि पर्यायाने इतरांची मुलं पण सुशिक्षीत होत असतात.आम्ही गावातले सर्व गावकरी पैसे जमवून जमीन खरेदी करतो, त्यावर शाळा बांधतो,आणि शिक्षकांचे पगार देतो.
कोकणातला माझा गाव पाच दहा वाड्या एकत्र होऊन बनला आहे.माझे वडील निवृत्त झाल्यावर आम्हा सर्वांना घेऊन ते गावी गेले.आम्ही सर्व सहकार करण्याच्या वृत्तीने वागून गावात खूप सुधारणा केल्या.अर्थात,पैशाच्या दृष्टीने जास्त कामं अंगीकारल्याने व्यवहार जास्त खिचकट व्हायला लागले.त्यामुळे ताळतंत्र संभाळून,प्रामाणीकपणा ठेवून,डोकं वापरून काम हाती घेतल्यावर कसलाच वाईटपणा न येता उद्देश साध्य व्हायला लागले.आमचा गाव आता परीपूर्ण झाला आहे.मात्र सहकार करण्याच्या वृत्तीनेच हे साध्य झालं आहे.”

मनोहरचं हे सगळं ऐकून मला खूपच बरं वाटलं.
“हे तू सर्व करू शकलास कारण अगदी लहानपणी सहकार्याची वृत्ती ठेवून, बॅट-बॉल घेऊन तू तुझ्या भावाबरोबर शिवाजीपार्कमधे खेळण्याचा प्रकार केलास त्यामुळेच ना?
पुढच्या दिवाळीच्या सुट्टीत मी नक्कीच तुझ्या गावी येणार असं मी त्याला म्हणालो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishanas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: